Hungary political changes | हंगेरीतील नवे पर्व

Hungary political changes |
Hungary political changes | हंगेरीतील नवे पर्व
Published on
Updated on

शरयू माने

मध्य युरोपच्या केंद्रस्थानी असणार्‍या हंगेरीमध्ये पार पडलेल्या यंदाच्या संसदीय निवडणुका आणि त्यातील निकालांची सध्या जगभरात चर्चा आहे. या निवडणुकीत गेल्या 16 वर्षांपासून सत्तेत असलेल्या व्हिक्टर ऑर्बान यांच्या ‘फिडेझ’ पक्षाचा धुव्वा उडवत पीटर मगर यांच्या ‘तिस्झा’ नामक पक्षाने जवळपास 70 टक्के जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे.

व्हिक्टर ऑर्बान आणि त्यांच्या ‘फिडेझ’ पक्षाची जणू निरंकुश सत्ता या देशात स्थापन झाली होती. ऑबॉन यांनी या काळात राजकीय अधिकार, संस्थात्मक नियंत्रण आणि प्रखर राष्ट्रवादाची जी वीण विणली होती, ती आता उसवताना दिसत आहे. ऑर्बान यांनी हंगेरीतील प्रसारमाध्यमे, न्यायपालिका आणि शिक्षण संस्थांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते. पीटर मगर यांनी सत्तेतील भ्रष्टाचार आणि ‘क्रोनी कॅपिटलिझम’विरोधात रणशिंग फुंकले तेव्हा ऑर्बान यांनी ही निवडणूक ‘युद्ध की शांतता’ अशा भूराजकीय मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न केला; परंतु हंगेरीच्या जनतेने ढासळती अर्थव्यवस्था, गगनाला भिडलेली महागाई आणि आरोग्य सेवांच्या दुरवस्थेला अधिक महत्त्व दिले. एखादी सत्ता सामान्य जनतेच्या आर्थिक समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ भूराजकीय आणि भावनिक मुद्द्यांवर निवडणूक लढवते, तेव्हा तिचा पराभव अटळ असतो, ही बाब या निकालांनी सिद्ध केली आहे. ऑर्बान यांनी युद्ध, शांतता आणि सार्वभौमत्वाच्या गप्पा मारल्या; मात्र मतदारांनी महागाई, आर्थिक मंदी आणि ढासळत्या जीवनमानाला प्राधान्य देत त्यांना सत्तेतून खाली खेचले. हा निकाल युरोपातील इतर पॉप्युलिस्ट नेत्यांसाठी एक मोठा इशारा मानला जात आहे.

हंगेरीचा निवडणूक इतिहास हा साम्यवादी राजवटीच्या अंतापासून ते आधुनिक लोकशाहीपर्यंतच्या प्रवासाचा एक रंजक दस्तावेज आहे. 1990 मध्ये या देशात पहिल्यांदाच मुक्त आणि बहुपक्षीय निवडणुका पार पडल्या आणि हंगेरी पाश्चात्त्य लोकशाहीच्या प्रवाहात आला. सुरुवातीच्या काळात हंगेरीने मध्यममार्गी आणि उदारमतवादी राजकारणाला पसंती दिली; परंतु 2010 नंतर व्हिक्टर ऑर्बान यांच्या नेतृत्वाखालील ‘फिडेझ’ पक्षाने सत्ता हस्तगत केल्यानंतर या देशाच्या राजकीय दिशेत मोठा बदल झाला.

ऑर्बान यांनी ‘इलिबरल डेमोक्रसी’ संकल्पना राबवत सत्तेचे केंद्रीकरण केले आणि दीर्घकाळ राज्य केले. त्यांच्या मते, एखाद्या देशात निवडणुका होणे आणि बहुमताने सरकार निवडले जाणे म्हणजे लोकशाही असली, तरी त्या सरकारवर उदारमतवादी मूल्ये किंवा बाह्य संस्थांचे निर्बंध असण्याची गरज नाही. याच विचारातून त्यांनी हंगेरीमधील सत्ता हातात येताच घटनात्मक बदल करून सत्तेचे केंद्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्यांनी लोकशाहीच्या ‘चेक्स अँड बॅलन्सेस’ (नियंत्रण आणि समतोल) या तत्त्वाला पद्धतशीरपणे कमकुवत केले, जेणेकरून सरकारला कोणताही निर्णय घेताना अंतर्गत किंवा बाह्य विरोधाचा सामना करावा लागणार नाही. या प्रक्रियेत ऑर्बान यांनी सर्वात मोठा आघात देशातील स्वतंत्र संस्थांवर केला. त्यांनी न्यायपालिकेची पुनर्रचना करून तिथे आपल्या निष्ठावंतांची नियुक्ती केली. यामुळे सरकारी निर्णयांना न्यायालयात आव्हान देणे कठीण झाले. प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातही त्यांनी अशाच प्रकारे नियंत्रण मिळवले. सरकारी जाहिरातींचा ओघ केवळ अनुकूल माध्यमांकडे वळवून आणि महत्त्वाच्या माध्यम समूहांचे मालकी हक्क आपल्या निकटवर्तीय उद्योगपतींकडे सोपवून त्यांनी विरोधकांचा आवाज क्षीण केला. तसेच, शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रम बदलून आणि विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर गदा आणून त्यांनी नवीन पिढीसमोर केवळ सरकारी राष्ट्रवादाचाच विचार राहील याची काळजी घेतली.

या सर्व नियंत्रणामुळे हंगेरीमध्ये विचित्र स्वरूपाची राजकीय कुंठितावस्था निर्माण झाली होती. म्हणजे निवडणुका होत होत्या; पण विरोधकांसाठी मैदान समान नव्हते. ऑर्बान यांनी मांडलेला हा ‘हंगेरियन मॉडेल’चा विचार केवळ हंगेरीपुरता मर्यादित न राहता तो जगभरातील इतर उजव्या विचारसरणीच्या नेत्यांसाठी एक आदर्श मानला जाऊ लागला. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष आणि युरोपातील अनेक राष्ट्रवादी नेत्यांना ते आपले हीरो वाटू लागले. अमेरिकेतील प्रसिद्ध विचारवंत आणि राजकीय रणनीतीकार ऑर्बान यांच्या मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी बुडापेस्टला भेटी देऊ लागले होते. मतदारसंघांची पुनर्रचना आणि निवडणूक नियमात बदल करून आपल्या पक्षाचा विजय कसा सुनिश्चित करता येतो, याचा हंगेरियन पॅटर्न अनेक देशांतील सत्ताधार्‍यांनी जवळून अभ्यासल्याचे सांगण्यात येते. ऑर्बान यांनी रशिया आणि चीनसारख्या देशांशी जवळचे संबंध प्रस्थापित करून युरोपीय महासंघाच्या दबावाला न जुमानता स्वतंत्र आर्थिक धोरण राबवले. ‘सार्वभौमत्व’ हे केवळ राजकीय नसून ते आर्थिकही असावे, हा त्यांचा विचार अनेक विकसनशील देशांमधील नेत्यांना भावला; पण अर्थव्यवस्था सुधारणा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले नाहीत, तर केवळ राष्ट्रवादी विचार सत्ताधार्‍यांना तारून नेण्यास पुरेसा ठरत नाही, हा संदेश हंगेरीच्या निकालांनी जगाला दिला आहे.

इस्रायलसाठीही हे सत्तांतर धक्कादायक आहे. याचे कारण, ऑर्बान हे बेंजामिन नेतान्याहू यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात असत. नोव्हेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने नेतान्याहू यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले, तेव्हा ऑर्बान यांनी त्यांना हंगेरीला येण्याचे निमंत्रण दिले. इतकेच नाही, तर इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हंगेरीला या न्यायालयाच्या सदस्यत्वातून बाहेर काढण्याची प्रक्रियाही सुरू केली होती. इस्रायलवर टीका करणारे किंवा निर्बंध लादणारे युरोपीय महासंघाचे अनेक प्रस्ताव ऑर्बान यांनी आपल्या ‘व्हेटो’ अधिकाराचा वापर करून रोखून धरले. या मैत्रीमुळे इस्रायलला युरोपातील एका महत्त्वाच्या देशाचे संरक्षण मिळाले होते, तर ऑर्बान यांना जागतिक स्तरावर एक शक्तिशाली मित्र मिळाला होता.

गेल्या काही वर्षांत हंगेरीची अर्थव्यवस्था कमालीच्या मंदीतून जात होती. ‘आर्थिक सार्वभौमत्वा’च्या नादात ऑर्बान यांनी युरोपीय महासंघाशी घेतलेला पंगा महागात पडला. महासंघाने हंगेरीचा कोट्यवधी युरोंचा निधी रोखून धरल्याचा परिणाम थेट या देशातील विकासकामांवर आणि सरकारी तिजोरीवर झाला. हंगेरीमधील महागाईचा दर युरोपातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक होताा. यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान खालावले. यातून निर्माण झालेल्या असंतोषाचा उद्रेक ऑर्बान यांच्या पाडावातून झाला. हंगेरीमधील रुग्णालयांची अवस्था इतकी बिकट झाली होती की, रुग्णांना स्वतःचे टॉयलेट पेपरदेखील सोबत नेण्याची वेळ आली होती. जागतिक प्रसारमाध्यमांनी याविषयी बरीच टीका केली होती. नागरिक अशा मूलभूत समस्यांना तोंड देत असताना ‘सार्वभौमत्वा’सारखे मोठे शब्द फिके ठरतात, ही बाब ऑर्बान विसरले. त्यामुळेच 77 टक्के इतक्या विक्रमी मतदानासह हंगेरीच्या जनतेने त्यांचे एकाधिकारशाहीवादी सरकार नाकारले.

ऑर्बान यांच्या विरोधात लढणारे पीटर मगर हे काही बाहेरचे व्यक्ती नाहीत. कधी काळी ते ऑर्बान यांच्याच ‘फिडेझ’ पक्षातील माजी वरिष्ठ पदाधिकारी होते. व्यवस्थेतील त्रुटींचे त्यांना अचूक ज्ञान होते. त्यांनी केवळ ऑर्बान यांच्यावर टीका केली नाही, तर हंगेरीला पुन्हा एकदा सामान्य आणि सुसंस्कृत युरोपीयन राष्ट्र बनवण्याचे अभिवचन दिले. रशिया-युक्रेन युद्धाच्या भीतीपेक्षा आधुनिक युरोपशी जोडले जाण्यात अधिक रस असणार्‍या तरुण मतदारांना त्यांनी मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले. हंगेरीमध्ये यापूर्वी विरोधी पक्ष विखुरलेले असल्याचा फायदा ऑर्बान यांना मिळत असे. मगर यांनी उदारमतवादी, मध्यममार्गी आणि काही प्रमाणात उजव्या विचारांच्या लोकांनाही एकाच ‘तिस्झा’ पक्षाच्या छत्राखाली आणले. त्यांनी समविचारी पक्षांची लोकशाही आघाडी तयार केली आणि ऑर्बान यांची राजवट उलथवून टाकली.

आव्हाने संपलेली नाहीत

या निकालांनी ऑर्बान यांच्या ‘ऑर्बानिझम’ या राजकीय विचारसरणीचा पूर्णपणे नायनाट झाला आहे, असे म्हणणे घाईचे ठरेल. गेल्या दशकात त्यांनी हंगेरीच्या राजकीय रचनेत खोलवर बदल केले आहेत. एक शक्तिशाली शासन, बाह्य दबावाचा विरोध आणि व्यवहारवादी राजकारण हे घटक हंगेरीच्या राजकीय संस्कृतीत अजूनही रुजलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ऑर्बान राजकारणातून निवृत्त झालेले नाहीत. ते आता विरोधी पक्षात राहून मगर सरकारसमोर आव्हाने उभी करतील. फिडेझ पक्षाचे जाळे अजूनही स्थानिक पातळीवर आणि प्रसारमाध्यमांमध्ये घट्ट आहे. 2002 मध्येही ऑर्बान पराभूत झाले होते; पण 2010 मध्ये त्यांनी अधिक शक्तीने पुनरागमन केले होते. आताही ऑर्बान विरोधी पक्षनेते म्हणून राजकीय अडथळे निर्माण करण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मगर यांना मिळालेला कौल मोठा असला, तरी त्यांच्यासमोर आव्हानेही मोठी आहेत. त्यांचा सामना ते कशा प्रकारे करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news