

प्रा. डॉ. विजय कुमार, आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक
नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या द्विपक्षीय परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड करून दोन्ही देशांतील संबंधांमध्ये सकारात्मक परिवर्तनाची नांदी दिली आहे. माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या चीनधार्जिण्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर बालेन शाह यांनी नवी दिल्लीला दिलेले प्राधान्य हे नेपाळच्या कूटनीतिक प्राधान्यक्रमात होत असलेल्या मोठ्या बदलाचे द्योतक मानले जात आहे.
नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या द्विपक्षीय परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड करण्याचा निर्णय दोन्ही देशांतील संबंधांमध्ये सकारात्मक बदलाचे ठोस संकेत देणारा ठरला. गेल्या काही काळापासून भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंधांमध्ये निर्माण झालेली कटुता आणि मतभेदांचे मळभ दूर होऊन परस्पर सहकार्याला नवी दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न या दौऱ्यातून दिसून आला. दक्षिण आशियात चीनचा वाढता आर्थिक आणि राजकीय प्रभाव लक्षात घेता, नेपाळच्या नेतृत्वासमोर आपला खरा आणि पहिला शेजारी कोण, हा प्रश्न पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. बालेन शाह यांचे पूर्वसुरी के. पी. शर्मा ओली यांनी आपल्या चौथ्या कार्यकाळातील परदेश दौऱ्याची सुरुवात बीजिंगमधून केली होती. शेजारील बांगला देशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनीही आपल्या परदेश दौऱ्यांचा प्रारंभ मलेशिया आणि चीनमधून केला होता. या पार्श्वभूमीवर बालेन शाह यांनी भारताला दिलेले प्राधान्य हे नेपाळच्या परराष्ट्र धोरणातील प्राधान्यक्रमात होत असलेल्या बदलाचे द्योतक म्हणून पहावे लागेल.
सप्टेंबर २०२५ मधील तरुणांच्या जनआंदोलनानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला मोठा जनादेश मिळाला आणि बालेन शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. त्यांची आक्रमक राष्ट्रवादी प्रतिमा, काठमांडूचे महापौर असताना भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न आणि लिपुलेखाच्या मुद्द्यावर भारत-चीन यांच्यात झालेल्या कराराबद्दल नेपाळमध्ये असलेला असंतोष या बाबी लक्षात घेता, हा दौरा त्यांच्यासाठी देशांतर्गत टीकाकारांसमोर संतुलन साधण्याची एक कसरतही होती. मात्र, या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बालेन शाह यांच्या भेटीत संबंधांमधील राजकीय परिपक्वता स्पष्टपणे दिसून आली.
दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, दळणवळण, सीमा व्यवस्थापन, पुरानंतरचे पुनर्वसन आणि प्रादेशिक-जागतिक मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. दोन्ही देशांनी विकसित भारत आणि समृद्ध नेपाळ या नावाने संयुक्त दृष्टिकोन पत्रही प्रसिद्ध केले. यामध्ये व्यापार, ऊर्जा, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, डिजिटल सहकार्य आणि दोन्ही देशांतील नागरिकांचा परस्पर संपर्क हे भविष्यातील संबंधांचे मुख्य आधारस्तंभ मानले गेले आहेत. भारताने नेपाळसाठी १५ हजार कोटी रुपयांच्या विकास सहकार्य पॅकेजची घोषणा केली असून, यामध्ये ३५०० कोटी रुपये अनुदान स्वरूपात, तर ११,५०० कोटी रुपये ऊर्जा प्रकल्पांसाठी सवलतीच्या कर्जपुरवठ्याच्या रूपात दिले जाणार आहेत.
दोन्ही देशांच्या प्रमुखांनी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात १९५० च्या शांतता आणि मैत्री करारासह विद्यमान करारांचा आढावा परस्पर सहमतीने घेतला जाऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सीमेशी संबंधित उर्वरित प्रश्न परराष्ट्र सचिवांच्या पातळीवर सोडवण्यावरही एकमत झाले. कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा यांसारख्या भावनिक वादांच्या संदर्भात याला मोठे राजकीय महत्त्व आहे. नेपाळी जनमानसात भारताबाबत असलेली मोठ्या भावाची तक्रार आणि वर्चस्वाची भावना दूर करण्याचा प्रयत्न यावेळच्या संवादाच्या भाषेतून जाणवला.
अयोध्या-जनकपूर व्हाया सीतामढी आणि सरयू-कमला रेल्वे सेवा यांमुळे रामायण परिक्रमेच्या सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. सीता आणि श्रीराम परंपरेशी जोडलेल्या दोन्ही समाजांतील लोकांमध्ये थेट संपर्क वाढवण्याचे हे प्रभावी माध्यम ठरेल. नेपाळशिवाय आमचे प्रभू श्रीराम अपूर्ण आहेत, हे पंतप्रधान मोदी यांचे विधान दोन्ही देशांची सामायिक संस्कृती आणि श्रद्धाभाव अधोरेखित करणारे आहे. बालेन शाह यांनीही ‘आपत्तीच्या काळात भारताला पहिला मदतनीस’ असे संबोधून दोन्ही देशांचे संबंध हिमालयासारखे भक्कम असल्याचे सांगितले.
उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला आणि नेपाळमधील दारचुला यांना जोडणाऱ्या महाकाली नदीवरील नवीन मोटार पुलाचे उद्घाटन या निमित्ताने करण्यात आले. तसेच चंपावत येथील बनबसा येथे नवीन एकात्मिक तपासणी नाक्याचा प्रारंभ झाला. सुदूर पश्चिम नेपाळमधील हजारो नागरिकांची उपजीविका याच मार्गावर अवलंबून आहे आणि हाच भाग कालापानी तसेच लिपुलेख वादाचा केंद्रबिंदू राहिला आहे. पूल आणि तपासणी नाक्याची प्रगती या दोन्ही गोष्टींमधील संदेश असा की, सीमावाद आपल्या जागी असले तरी दोन्ही देशांतील नागरिकांचे शतकानुशतके जुने सामाजिक आणि सांस्कृतिक बंध सातत्याने जपले गेले पाहिजेत.
ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दिशेनेही अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली. ६६९ मेगावॅट क्षमतेच्या लोअर अरुण जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आणि मोतिहारी-अमलेखगंज इंधन वाहिनीचा दुसरा टप्पा नेपाळकडे सुपूर्द करण्यात आला. रक्सौल-काठमांडू रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याची इच्छाही दोन्ही बाजूंनी व्यक्त झाली. चीन तिबेटमधील शिगात्सेपासून काठमांडूपर्यंत रेल्वे मार्ग टाकण्यासाठी प्रयत्नशील असताना भारताचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरते. याशिवाय नेपाळला तिसऱ्या देशांशी व्यापार करण्यासाठी भारताने गुजरातमधील कांडला बंदराचा मार्ग खुला केला असून यापूर्वी २०१६ चा पारगमन करार आणि २०१९ च्या परिचालन नियमावलीअंतर्गत नेपाळला एकूण सात बंदरांचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शैक्षणिक सहकार्याच्या क्षेत्रात नेपाळमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे म्हणजेच आयआयटीचे संकुल उभारण्याची घोषणा झाली आहे. हे पाऊल पुढे नेत पाटणा आणि लखनौ विद्यापीठांनी त्रिभुवन विद्यापीठासोबत शैक्षणिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे. तथापि, चिनी विद्यापीठांची वाढती प्रतिष्ठा आणि चिनी शिष्यवृत्तीबद्दल नेपाळी विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेली ओढ लक्षात घेता, हे काम वाटते तितके सोपे नसेल.
ओली यांच्या ‘चीन प्रथम’ या परराष्ट्र धोरणानंतर बालेन शाह यांनी भारताला दिलेले प्राधान्य हा चीनला स्पष्ट राजकीय संदेश आहे. चिनी माध्यमांमध्ये या दौऱ्याकडे कर्ज, अनुदान आणि प्रादेशिक प्रभावाच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. नेपाळच्या परराष्ट्र धोरणाचा पाया प्रामुख्याने आर्थिक मदत आणि प्रकल्पांचा वित्तपुरवठा हाच बनला असल्याचे चिनी विश्लेषकांचे मत आहे. नेपाळची अमेरिका आणि जपानशी वाढती जवळीक चीनला खटकत आहे. हे लक्षात घेता यापुढील काळात नेपाळ सरकारलाही आपली राजकीय स्वायत्तता आणि दीर्घकालीन हितसंबंधांबाबत अधिक संवेदनशील राहावे लागेल. विशेषतः चीनच्या कर्जाच्या अटी, प्रकल्प व्यवस्थापन आणि पारदर्शकतेबाबत विशेष सतर्क राहावे लागेल. नेपाळची तरुण पिढी आता रोजगार, वीज, वाहतूक, शिक्षण आणि आर्थिक संधींना अधिक महत्त्व देत आहे. सप्टेंबरमधील तरुणांच्या क्रांतीने हेच अधोरेखित केले असून, राष्ट्रवादाचे राजकारण द्विपक्षीय संबंधांवर भारी पडणार नाही, याची काळजी नेपाळच्या नेतृत्वाला घ्यावी लागेल.