NEET paper leak | प्रवेश परीक्षांची विश्वासार्हता धोक्यात

NEET paper leak |
NEET paper leak | प्रवेश परीक्षांची विश्वासार्हता धोक्यात
Published on
Updated on

डॉ. हरवंश चतुर्वेदी, संचालक, बिमटेक

यंदाच्या वर्षीची ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीच्या कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये उच्च शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. किरकोळ अडचणी सर्वत्र दिसतात; परंतु भारतासारख्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना अमेरिका, युरोप किंवा चीनमध्ये क्वचितच घडतात. भारतात प्रवेश परीक्षांमध्ये अशी स्थिती कधी निर्माण होणार?

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी यंदा 3 मे रोजी ‘नीट’ परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातील सुमारे 22.79 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता; मात्र प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात ‘एनटीए’ने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आली असून लवकरच नव्याने परीक्षा घेण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि ‘सीयूईटी’सारख्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. देशातील परीक्षा व्यवस्था मजबूत आणि अभेद्य कधी होणार, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना पूर्णपणे थांबतील का, विद्यार्थ्यांना वारंवार मानसिक त्रास आणखी किती काळ सहन करावा लागणार असे मूलभूत प्रश्न आता अधिक तीव्रतेने पुढे येत आहेत.

वैद्यकीय प्रवेशासाठीची ‘नीट’ असो किंवा अभियांत्रिकी प्रवेशासाठीची ‘जेईई’, या परीक्षांबाबत प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना समोर आली किंवा तशी अफवाही पसरली, तरी युवकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण होते. कारण, या परीक्षा लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा निर्णायक टप्पा असतात. त्यामध्ये घडणारा प्रत्येक गैरप्रकार संपूर्ण प्रवेश परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करणारा ठरतो. 3 मे रोजी देशातील 551 शहरांतील आणि विदेशातील 14 शहरांतील सुमारे 5400 केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी पोहोचलेल्या लाखो विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर काय झाली असेल, याचा विचार ‘एनआयटी’ने केला आहे का?

राजस्थान पोलिसांकडे अशी तक्रार दाखल झाली होती की, ‘नीट’ परीक्षेच्या तब्बल 42 तास आधी ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर एक तथाकथित ‘गेस पेपर’ मोठ्या प्रमाणात फिरत होता. या प्रश्नसंचात बहुपर्यायी स्वरूपातील 410 प्रश्न आणि त्यांची उत्तरे देण्यात आली होती. चौकशीत असे आढळले की, यातील सुमारे 100 प्रश्न प्रत्यक्ष ‘नीट’ परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांशी हुबेहूब जुळत होते. पोलिस तपासातून हेही समोर आले की, या 100 प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित तयार केली, तर 720 पैकी जवळपास 600 गुण सहज मिळू शकत होते. राजस्थानमधील कोटा शहर आधीच ‘जेईई’ कोचिंगच्या प्रचंड व्यापारीकरणामुळे आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमुळे चर्चेत राहिले आहे; मात्र यावेळी ‘नीट’ प्रश्नपत्रिकेशी संबंधित कथित गेस पेपरचा धागा चुरू आणि सीकरसारख्या शहरांपर्यंत पोहोचला. हा गेस पेपर पाच लाख रुपयांपासून तीस हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे, 2024 मध्येही ‘नीट’ परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यावेळी देशभरात संतापाची लाट उसळली होती आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते.

2017 पूर्वी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांचे आयोजन ‘सीबीएसई’, ‘एआयसीटीई’ आणि ‘यूजीसी’सारख्या संस्थांकडून केले जात होते. 1986 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आणि त्यानंतर 1992 मध्ये अमलात आलेल्या कार्यक्रमांतर्गत विविध राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचे केंद्रीकृत नियोजन करणारी स्वतंत्र राष्ट्रीय संस्था उभारण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार 2017 मध्ये शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ची स्थापना झाली. 2024 मधील प्रश्नपत्रिका फुटीच्या वादानंतर ‘एनटीए’मध्ये नेतृत्व बदल करण्यात आले आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने परीक्षा अधिक सुरक्षित करण्याचे दावे करण्यात आले होते.

राजस्थान पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर ‘एनटीए’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात यंदा प्रश्नपत्रिका फुटू नयेत म्हणून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली होती. ‘जीपीएस’ ट्रॅकिंग, ‘सीसीटीव्ही’ निरीक्षण व्यवस्था, ‘5जी जॅमर्स’ यांसारख्या तांत्रिक साधनांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते; मात्र एवढ्या कडक सुरक्षेनंतरही प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप समोर आला. 2024 मध्ये बिहारमध्ये प्रश्नपत्रिकेची उघड विक्री झाल्याचे समोर आले होते आणि आता राजस्थानमध्ये तशाच प्रकारच्या घटना आढळत आहेत. यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्वतंत्र संस्था असूनही ‘एनटीए’चे सर्व प्रयत्न पुन्हा अपयशी का ठरले? प्रश्नपत्रिका फोडणार्‍या संघटित जाळ्यांपुढे संस्थेची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था निष्प्रभ ठरली का? राष्ट्रीय प्रवेश परीक्षांसाठी सध्या वापरली जाणारी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धतच अधिक धोकादायक ठरत आहे का? या परीक्षांचे स्वरूप, प्रश्नपत्रिका वितरण प्रणाली आणि मूल्यमापन प्रक्रिया यांचा नव्याने गंभीर विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये उच्च शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. किरकोळ अडचणी सर्वत्र दिसतात; परंतु भारतासारख्या प्रश्नपत्रिका फुटीच्या धाडसी घटना अमेरिका, युरोप किंवा चीनमध्ये क्वचितच ऐकू येतात. चीनमध्ये ‘गाओकाओ’ नावाची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत दरवर्षी तब्बल 1.3 ते 1.5 कोटी विद्यार्थी सहभागी होतात. 2025 मध्ये 1.34 कोटी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्या काळात संपूर्ण चीनमध्ये रेल्वे, बस आणि विमान प्रवासांवर प्रचंड ताण निर्माण होतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा होत असूनही तेथे प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना जवळजवळ घडत नाहीत. काही किरकोळ अनियमितता दिसतात; मात्र कठोर शिक्षा आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे मोठे गैरप्रकार रोखले जातात. परीक्षेमध्ये गैरप्रकार करताना कोणी आढळल्यास किमान सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news