NASA Voyager 1 | ‘व्हॉयेजर’चे ‘सुवर्ण’पर्व

NASA Voyager 1  |
NASA Voyager 1 | ‘व्हॉयेजर’चे ‘सुवर्ण’पर्व
Published on
Updated on

विजया पंडित

मानवाने अंतराळ संशोधनात अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत. चंद्रावर पाऊल ठेवण्यापासून ते मंगळावर रोव्हर उतरविण्यापर्यंत प्रत्येक मोहिमेने विज्ञानाची क्षितिजे विस्तारली; मात्र या सर्व मोहिमांमध्ये एक अंतराळयान असे आहे, जे आजही पृथ्वीपासून अविश्वसनीय वेगाने दूर जात असून मानवी जिज्ञासा, संशोधनवृत्ती आणि वैज्ञानिक धाडसाचे जिवंत प्रतीक बनले आहे, ते म्हणजे नासाचे व्हायेजर-१. लवकरच हे यान एक ऐतिहासिक टप्पा गाठणार आहे.

मानवाने अंतराळाचा शोध घेण्याचा प्रवास सुरू केल्यापासून अनेक मोहिमा इतिहासात अजरामर झाल्या आहेत. त्यापैकी नासाच्या व्हायेजर-१ या अंतराळयानाचे स्थान सर्वांत वेगळे आहे. जवळपास ५० वर्षांपूर्वी प्रक्षेपित झालेले हे छोटेसे अंतराळयान आजही विश्वाच्या अथांग अवकाशात आपला प्रवास सुरू ठेवत आहे. पृथ्वीपासून सर्वाधिक दूर गेलेली मानवनिर्मित वस्तू म्हणून व्हॉयेजर-१ ने इतिहास घडवला आहे. आता ते आणखी एका महत्त्वपूर्ण टप्प्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी ते पृथ्वीपासून तब्बल १ प्रकाशदिवस इतक्या अंतरावर पोहोचणार आहे. हा टप्पा केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर मानवाच्या जिज्ञासेचा, धैर्याचा आणि ज्ञानलालसेचा प्रतीकात्मक विजय मानला जात आहे.

प्रकाशदिवस म्हणजे प्रकाश एका दिवसात जितके अंतर पार करतो ते अंतर. प्रकाशाचा वेग प्रतिसेकंद सुमारे २,९९,७९२ किलोमीटर इतका असल्यामुळे एका दिवसात तो जवळपास २५.९ अब्ज किलोमीटर अंतर पार करतो. व्हॉयेजर-१ ने हे अंतर गाठण्यासाठी तब्बल ४९ वर्षांहून अधिक काळ घेतला आहे. सध्या हे अंतराळयान पृथ्वीपासून सुमारे ६१,१०० किलोमीटर प्रतितास या वेगाने दूर जात आहे. या वेगाची कल्पना पृथ्वीवरील कोणत्याही वाहनाशी करता येत नाही, तरीही विश्वाच्या अफाट विस्ताराच्या तुलनेत हा वेग अत्यंत लहान ठरतो. त्यामुळे अवकाशातील अंतर किती प्रचंड आहे, याची जाणीव या उदाहरणातून स्पष्ट होते.

व्हॉयेजर-१ चे प्रक्षेपण १९७७ मध्ये झाले. त्याचे प्राथमिक उद्दिष्ट गुरू आणि शनी या महाग्रहांचा अभ्यास करणे हे होते. १९७९ मध्ये त्याने गुरू ग्रहाजवळून तर १९८० मध्ये शनीजवळून यशस्वी उड्डाण केले. या दोन्ही ग्रहांचे, त्यांच्या उपग्रहांचे आणि कड्यांचे अत्यंत मौल्यवान छायाचित्रे व वैज्ञानिक माहिती त्याने पृथ्वीवर पाठवली. मूळ मोहीम पूर्ण झाल्यानंतरही त्याचा प्रवास थांबला नाही. सूर्याच्या प्रभावक्षेत्राबाहेर जाऊन अंतरतारकीय अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी त्याला पुढे पाठवण्यात आले.

व्हॉयेजर-१ आणि व्हॉयेजर-२ या दोन्ही मोहिमांनी मानवाच्या अंतराळज्ञानात आमूलाग्र भर घातली. या यानांनी गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या चार महाकाय ग्रहांचे अभूतपूर्व छायाचित्रण केले. गुरूच्या आयो (खे) या उपग्रहावर पृथ्वीबाहेरील पहिल्या सक्रिय ज्वालामुखींचा शोध याच मोहिमेमुळे लागला. युरोपा या उपग्रहाच्या बर्फाच्छादित पृष्ठभागाखाली द्रवरूप महासागर असण्याची पहिली चिन्हेही याच यानांनी शोधून काढली. त्याशिवाय या मोहिमांमुळे २२ नवीन उपग्रहांचा शोध लागला आणि गुरू, युरेनस व नेपच्यूनच्या गुंतागुंतीच्या कड्या प्रथमच स्पष्टपणे पाहता आल्या. या सर्व शोधांनी ग्रहविज्ञानाला नवे परिमाण दिले.

२५ ऑगस्ट २०१२ रोजी व्हॉयेजर-१ ने सूर्याभोवती असलेल्या हेलिओस्फिअरचे संरक्षण कवच ओलांडून अंतरतारकीय अवकाशात प्रवेश केला. हा टप्पा गाठणारे ते पहिले मानवनिर्मित अंतराळयान ठरले. त्यानंतर ५ नोव्हेंबर २०१८ रोजी व्हॉयेजर-२ नेही हा विक्रम केला. आज ही दोन्ही याने दोन तारांमधील वीरळ अवकाशातून प्रवास करत असून, तेथील चुंबकीय क्षेत्रे, विद्युतभारित कण आणि प्लाझ्मा यांचा अभ्यास करीत आहेत. पृथ्वीपासून अब्जावधी किलोमीटर दूर असूनही ही याने अजूनही संदेश पाठवत आहेत, ही अभियांत्रिकीची विलक्षण कामगिरी आहे.

मात्र, प्रत्येक यंत्राचे आयुष्य मर्यादित असते. व्हॉयेजर-१ ला ऊर्जा मिळते ती प्लुटोनियमवर चालणार्‍या रेडिओ समस्थानिक ऊर्जानिर्मिती यंत्रणेतून. कालांतराने या ऊर्जेची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत नासाने त्यावरील अनेक वैज्ञानिक उपकरणे एकामागोमाग बंद केली आहेत. सध्या केवळ २ उपकरणे कार्यरत आहेत. त्यामध्ये चुंबकीय क्षेत्र मोजणारे उपकरण आणि प्लाझ्मा तरंगांचा अभ्यास करणारी प्रणाली यांचा समावेश आहे. या उपकरणांच्या साहाय्याने अंतरतारकीय अवकाशातील सूक्ष्म विद्युत चुंबकीय हालचालींची नोंद केली जात आहे. नासाच्या मते, २०३० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत व्हॉयेजर-१ कडून संदेश मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऊर्जा इतकी कमी होईल की पृथ्वीशी संपर्क तुटेल. तथापि, संपर्क तुटला म्हणजे मोहीम संपली असे होणार नाही. कारण, व्हॉयेजर-१ वर मानवजातीने विश्वासाठी ठेवलेला एक अमूल्य ठेवा आहे. या अंतराळयानावर बसविण्यात आलेली गोल्डन रेकॉर्ड ही सोन्याचा मुलामा दिलेली तांब्याची ध्वनिमुद्रिका म्हणजे पृथ्वीवरील जीवनाचा परिचय करून देणारा संदेश आहे. भविष्यात कधीतरी एखाद्या बुद्धिमान परग्रहावरील संस्कृतीला हे यान सापडले, तर तिला पृथ्वीवरील जीवनाची माहिती मिळावी, हा या ध्वनिमुद्रिकेचा उद्देश आहे.

या गोल्डन रेकॉर्डमध्ये ५० हून अधिक भाषांमधील शुभेच्छा संदेश ध्वनिमुद्रित करण्यात आले आहेत. त्यामध्ये हिंदीसह भारतातील प्रमुख भाषांचाही समावेश आहे. पृथ्वीवरील विविध नैसर्गिक ध्वनी, पक्ष्यांचा किलबिलाट, समुद्राच्या लाटा, पावसाचा आवाज, मानवी हृदयाचे ठोके, तसेच विविध संस्कृतींतील संगीत यांचीही नोंद करण्यात आली आहे. भारताच्या महान शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांनी गायिलेली प्रसिद्ध ठुमरी ‘जात कहाँ हो’ याचाही या ध्वनिमुद्रिकेत समावेश करण्यात आला आहे. भारतीय सांगीतिक परंपरेचे प्रतिनिधित्व करणारा हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा आजही विश्वात प्रवास करत आहे.

गोल्डन रेकॉर्डमध्ये पृथ्वीचे स्थान दाखविणारा पल्सर नकाशादेखील आहे. या नकाशाच्या साहाय्याने अत्यंत प्रगत परग्रहावरील संस्कृतीला पृथ्वीचे स्थान शोधणे शक्य होईल, अशी कल्पना वैज्ञानिकांनी मांडली होती. तसेच त्या काळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचा संदेशही त्यात समाविष्ट करण्यात आला आहे. या संदेशात त्यांनी मानवजातीच्या आशा, विज्ञान, संस्कृती, संगीत, विचार आणि शांततेची भावना विश्वापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. ही एका छोट्याशा दूरच्या जगाकडून दिलेली भेट आहे, असे सांगत त्यांनी मानवजातीला भविष्यात आकाशगंगेतील इतर संस्कृतींसोबत संवाद साधण्याची आशा व्यक्त केली होती.

व्हॉयेजर-१ ची कहाणी मानवाच्या अमर्याद जिज्ञासेचे, धाडसाचे आणि भविष्यावरील विश्वासाचे प्रतीक आहे. मानवी बुद्धिमत्ता, चिकाटी आणि अमर्याद जिज्ञासेची कहाणी आहे. पृथ्वीवरील एका छोट्याशा ग्रहावर राहणार्‍या मानवाने स्वतःचे अस्तित्व, संस्कृती आणि ज्ञान विश्वाच्या अथांग अवकाशात जपून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. कदाचित लाखो किंवा अब्जावधी वर्षांनी हे यान कोणाच्या नजरेस पडेल किंवा कदाचित कधीच पडणार नाही, तरीही या मोहिमेने एक गोष्ट सिद्ध केली आहे की, ज्ञानाचा शोध हा सीमाविरहित असतो. व्हॉयेजर-१ आजही शांतपणे विश्वाच्या अथांग अंधारातून प्रवास करत आहे आणि त्याच्यासोबत मानवजातीच्या आशा, स्वप्ने आणि अस्तित्वाचा सुवर्ण संदेशही अनंत दिशेने पुढे जात आहे. मानवजातीच्या वैज्ञानिक प्रगतीचा आणि विश्वाशी संवाद साधण्याच्या चिरंतन आकांक्षेचा हा प्रवास कायम स्मरणात राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news