Fighter Mohammad Siraj | हॅटस् ऑफ सिराज!

पराभवाच्या छायेतही सिराज ठरला योद्धा
mohammed-siraj-oval-test-heroic-performance
Fighter Mohammad Siraj | हॅटस् ऑफ सिराज!Pudhari File Photo
Published on
Updated on

विवेक कुलकर्णी

ओव्हलच्या मैदानावर शेवटच्या कसोटीत विजयाचा घास जणू इंग्लंडने हिरावून घेतलेलाच होता. पराभवाची गडद छाया सर्वत्र पसरलीच होती; पण या निराशेच्या गर्तेतही एक योद्धा आपल्या डोळ्यांतील आग घेऊन एकटाच किल्ला लढवत होता. त्याचा प्रत्येक चेंडू हा केवळ प्रतिस्पर्ध्याला नाही, तर परिस्थितीला दिलेले थेट आव्हान होता. आपल्या आक्रमक गोलंदाजीने त्याने प्रतिस्पर्ध्यांना अक्षरश: जेरीस आणले. सामन्यात एक अक्षम्य चूकही त्याच्याकडूनच झालेली; पण त्याचे परिमार्जनही शेवटच्या दिवशी त्यानेच केले. तो खेळाडू होता, लढवय्या मोहम्मद सिराज!

कोणी म्हणतं, हा खेळ तर आहे, त्यात इमोशनल काय व्हायचे? कोणी म्हणेल, पाच दिवस इतके कोण पाहत बसणार? कोणी पराभव उंबरठ्यावर असताना म्हणेल, यांचे आता काहीच होऊ शकत नाही. कित्येक चुका, खेळातील चढ-उतार, हातातून निसटणारे चेंडू, स्टेडियममधून चोहोबाजूंनी होणारा गोंधळ आणि अंतिम क्षणी चेंडू स्टम्पवर आदळल्यानंतर त्याचा कानठळ्या बसवणारा आवाज... चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेण्यासाठी इतके सारे पुरे होते, यालाच म्हणतात, कसोटी क्रिकेटची नजाकत!

जेव्हा एखादा नवा कर्णधार विदेश दौर्‍यावर जातो आणि त्याच्या पाठीवर शाबासकीबरोबरच काही प्रश्नही असतील, संघातून कोणाचा सल्ला घ्यायचा आणि कोण त्याची जबाबदारी घ्यायची? सारे काही निश्चित व्हायचे बाकी असते. त्याचवेळी एक गोलंदाज असाही असतो, जो सलग पाच कसोटीतही आपले सर्वस्व पणाला लावत असतो, प्रत्येक वेळी स्वत:लाच आणखी एक एकदा बजावून सांगत असतो की, खांदे थकलेले आहेत; पण आणखी एक प्रयत्न, आणखी एक शिकस्त करण्यास काय हरकत आहे? न जाणो, तोच प्रयत्न, तीच एक शिकस्त कदाचित बाजीही मारून देऊन जाईल आणि नेमके झालेही तसेच..!

374 धावांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी इंग्लंडचा संघ ज्यावेळी मैदानात उतरला, त्यावेळी त्यांचा सर्वात तडाखेबंद फलंदाज हॅरी ब्रॅूकचा झेल घेताना सीमारेषेवर अक्षम्य चूक झाली, त्यावेळी निराशेने केवळ त्या थकलेल्या खेळाडूचे खांदे झुकले नाहीत, तर सारा संघच झुकला. एकच झालेली चूक नंतर सामना पूर्णत्वाकडे वळत असताना आणखी सलत होती. प्रतिस्पर्धी वार्‍याच्या वेगाने विजयाकडे कूच करत होते आणि दुसरीकडे होती ती केवळ निराशा अन् हतबलता! अशावेळी या खेळातील कठोरता मनावर कित्येक आसूड ओढत असते; पण इथेच या खेळातील काही अनिश्चितताही समोर येतात. अचानक आभाळात ढग दाटू लागतात. मैदानावरील ताणतणाव वाढत राहतो. चेंडू अचानक स्टम्पवर, प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या पॅडवर आदळत राहतो. अपिले वाढू लागतात, आशाअपेक्षा वाढू लागतात, श्वास परतत राहतो. काही सत्रात जे खांदे थकले-भागलेले वाटत असतात, त्यांच्यात जणू जान भरली जाते आणि शेवटच्या दिवसासाठी शिल्लक राहतात ते 35 धावा आणि 4 बळी!

प्रश्न उपस्थित होतो, विजयाचे अंतर सर्वप्रथम कोण पार करणार? क्रिकेटचे मैदान जणू 100 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत बदलते आणि ही शर्यत जिंकून देण्याची जबाबदारी पुन्हा त्याच्यावरच येते, ज्याने आदल्या दिवशी पराभवाच्या मुळाशी फेकले जाण्याचा दंश सोसला होता. येथे मात्र नियतीने जणू त्याला आपली चूक सुधारण्याची एक नामी संधी दिलेली आणि याचा लाभ घेतला नसता, तर तो दर्दी खेळाडू कसला? त्याने या संधीचे सोने केले ते उरलेल्या 4 पैकी 3 बळी ड्रेसिंगरूममध्ये धाडून. महिनाभराचा जोर जणू त्याने त्या स्पेलमध्ये लावलेला. त्याने स्वत:ला फक्त इतकेच बजावून ठेवलेले... आणखी एक प्रयत्न, शेवटचा प्रयत्न! वीरश्री नेहमी संघर्षाला यशाची माळ घालते. तसेच येथेही झाले. सिराज आला, त्याने पाहिले, तो जिंकला! त्याने घेतलेला तो शेवटचा बळी, स्टम्प उद्ध्वस्त केल्याचा तो आवाज इंग्लिश फलंदाज पुढील कित्येक काळ विसरू शकणार नाहीत. तो खेळाडू होता अर्थातच मोहम्मद सिराज!

सिराज हे संघर्षाचे दुसरे नाव म्हटले, तर वावगे ठरू नये, इतकी त्याची या खेळावर हुकूमत. जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी, स्पीडस्टार वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सातत्याने संघातून आत-बाहेर असताना हा ताज्या दमाचा, युवा, भेदक गोलंदाज सिराज मात्र 22 यार्डच्या या खेळपट्टीवर अक्षरश: आग ओकत राहिला. एरव्ही बेझबॉल क्रिकेटच्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणार्‍या इंग्लिश क्रिकेट संघासमोरदेखील याला काहीच तोड नव्हती, यातच सारे काही आले. भल्याभल्यांना जेरीस आणणारी त्याची गोलंदाजी भारतीय संघाला ओव्हलवर विजय तर मिळवून गेलीच शिवाय मालिकेत बरोबरीदेखील करून गेली. आज मोहम्मद सिराज केवळ एक खेळाडू नाही, तर तो कोट्यवधी तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहे. त्याची कहाणी सांगते की, जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल, तर परिस्थिती कितीही बिकट असली, तरी यश खेचून आणता येते. त्याचा प्रत्येक यॉर्कर आणि प्रत्येक विकेट हे त्याच्या संघर्षाचे आणि जिद्दीचे प्रतीक असते. सिराज खर्‍याअर्थाने संघर्षाच्या भट्टीतून तावूनसुलाखून निघालेला एक ‘हैदराबादी हिरा’ ठरतो. मैदानावरील त्याची आक्रमकता, डोळ्यांतील आग आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आज प्रत्येक क्रिकेटप्रेमीला ठाऊक आहे; पण या यशामागे एक असा संघर्ष आहे, जो ऐकल्यावर कोणाच्याही डोळ्यांत पाणी आणेल.

हैदराबादच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सिराजचे वडील ऑटो रिक्षाचालक होते. घरात परिस्थिती बेताची; पण मुलाने देशासाठी खेळावे हे वडिलांचे स्वप्न होते. सिराजने टेनिस बॉलने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याच्याकडे महागडे बूट किंवा क्रिकेटचे किट नव्हते; पण त्याच्याकडे याहून महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे, प्रचंड मेहनत करण्याची तयारी आणि वडिलांनी दिलेला आत्मविश्वास. पुढे अनेक अडचणींवर मात करत त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले. एकेक टप्पे तो पार करत गेला. आयपीएल लिलावाच्या माध्यमातून निवडले गेल्यानंतर त्याच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली, ती सनरायझर्स हैदराबाद आणि नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना. त्याने आपल्या गोलंदाजीची धार अवघ्या क्रिकेट जगताला दाखवली आणि हाच त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.

ऑस्ट्रेलियातील अविस्मरणीय पदार्पण हा त्याच्या कारकिर्दीतील अत्यंतर भावनिक क्षण! दौर्‍यावर असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले; पण कोरोनाच्या नियमांमुळे तो घरी परतू शकला नाही. हे दुःख उराशी बाळगून तो देशासाठी खेळला आणि आपल्या भेदक गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. गाबा येथील ऐतिहासिक विजयात त्याने 5 बळी घेतले आणि आकाशाकडे पाहत जणू आपल्या वडिलांना आदरांजली वाहिली. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर नंतर तो आयसीसी वन डे मानांकनात अव्वल स्थानीही विराजमान झाला. आशिया चषक 2023 चा त्याचा स्पेल निव्वळ अविश्वसनीय होता. त्याने अवघ्या 21 धावांत 6 बळी घेत श्रीलंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळवला आणि भारताला एकहाती विजेतेपद मिळवून दिले. अर्थात, या सार्‍यावर ‘चेरी ऑन द केक’ होता, तो म्हणजे अलीकडेच झालेल्या ओव्हल कसोटीत पाचव्या दिवशी त्याचा शेवटचा अविस्मरणीय स्पेल, ज्याने अवघे इंग्लिश क्रिकेट जणू नेस्तनाबूत केले. ‘रेड आर्मी’ त्यावेळी हतबल झाली ती ‘वन मॅन शो’ सिराजसमोर! या लढवय्या सिराजचा संघर्ष इंग्लिश क्रिकेट जणू कधीच विसरणार नाही. हॅटस् ऑफ सिराज!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news