

भारतात सतत कुरापती करणार्या पाकिस्तानला बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीने जेरीस आणले आहे. यामध्ये सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्त्या महरंग बलूच या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यांच्या बुलंद आवाज ठरत आहेत. बलुचिस्तानची वाघीण म्हणून ओळखल्या जाणार्या महरंग बलूच या डॉक्टर असून मानवाधिकार कार्यकर्ती आणि बलूच यकजेहती समितीच्या संस्थापक आहेत. त्यांनी पाकिस्तानचे सैन्य आणि राजकीय नेत्यांना सळो की पळो करून सोडले आहे.
पाकिस्तानच्या दमनकारी राजवटीला बळी पडलेल्या बलुचिस्तानचा संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. भारतात सतत कुरापती करणार्या पाकिस्तानला बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीने जेरीस आणले आहे. सध्या भारताकडून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर मांडला जात असताना बलुचिस्तानच्या नागरिकांनी भारताच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. त्यामुळे जगाचे लक्ष बलुचिस्तानकडे वेधले गेले असून आगामी काळातील घडामोडी निर्णायक ठरू शकतात.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला अभूतपूर्व दणका दिलेल्या भारतीय सैन्याच्या या शौर्यगाथेची माहिती जगाला दोन रणरागिणींनी दिली आणि नारीशक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन नव्याने घडले. तिकडे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये एका संघर्षकारी महिलेने पाकिस्तानच्या जुलमी राजवटीविरुद्ध दंड थोपटले आहेत. सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्त्या महरंग बलूच असे या रणरागिणीचे नाव असून त्या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा बुलंद आवाज ठरत आहेत. बलुचिस्तानची वाघीण म्हणून ओळखल्या जाणार्या महरंग या डॉक्टर असून मानवाधिकार कार्यकर्ती आणि बलूच यकजेहती समितीच्या संस्थापक आहेत. बलुचिस्तानातील हिंसाचार, असहकार, अपहरण, खंडणी वसुली, हत्याकांड आणि मानवाधिकाराची पायमल्ली याबाबत त्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत. यासाठी त्यांनी बलूच लोकांना एकत्र केले. त्यांच्या आक्रमक भाषणातून बलुचिस्तानमधील गुलामगिरी आणि वेदना समजतात. महरंग यांनी बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांविरुद्ध महिलांना, युवतींना आणि स्थानिक लोकांना एकत्र आणण्यासाठी निकराने प्रयत्न केले. छोट्या-छोट्या जाहीर सभा घेऊन आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. शाळांमध्ये आणि घराघरांत जाऊन त्यांनी हे जनआंदोलन उभं केलं. विशेषतः युवतींना या लढ्याचं सक्रिय नेतृत्व दिलं.
महरंग बलूच यांनी पाकिस्तानचे सैन्य आणि राजकीय नेत्यांना सळो की पळो करून सोडले आहे. यामुळेच काही दिवसांपूर्वी पूर्व क्वेटा येथील आंदोलनादरम्यान पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना अटक केली आणि तुरुंगात टाकले. 2011 मध्ये याच तुरुंगात त्यांच्या वडिलांनादेखील ठेवले होते; मात्र त्यांचा विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.
डॉ. बलूच यांना एकाकी कैदेत ठेवण्यात आले. त्यावेळी त्यांनी बलुचींना उद्देशून एक पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी ‘माझ्या देशवासीयांनो, हुडा तुरुंगातील ब्लॉक नंबर 9 मधील सेल नंबर 5 मधून तुमची बहीण महारंग आणि बिबो तुम्हा सर्वांना बंधनात आणखी एका ईदच्या शुभेच्छा देते,’ असे सांगत बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या सरकारी दडपशाहीवर भाष्य केले. यामध्ये राजकीय अटक, बळजबरीने बेपत्ता होणे आणि आंदोलकांवरील हिंसाचार यावर त्यांनी घणाघात घातला. बीवायसी ही सर्वसामान्यांची चळवळ आहे. तुमची कृती आणि प्रचार आम्हाला कमकुवत करत नसून अधिक मजबूत करत आहेत. प्रत्येक दडपशाहीला आणि खोटारडेपणाला आम्ही धैर्याने, निर्धाराने आणि संघटित संघर्षाने सामोरे जाऊ, असा उल्लेख त्यांनी केला. त्याचबरोबर सध्याचा काळ बलूच राजकीय प्रतिकारातील टर्निंग पॉईंट असल्याचे त्यांनी सांगितले. वीस वर्षांपूर्वी बलोच पुरुषांनाच तुरुंगात डांबण्यात आले होते. आज बलूच स्त्रिया तुमच्या जुलमी व्यवस्थेविरुद्ध प्रतिकाराची भिंत बनल्या आहेत, असे लिहीत त्यांनी आपल्या वज्रनिर्धाराची झलक दाखवून दिली. 2017 मध्ये महरंग यांच्या भावाचे अपहरण करण्यात आले. त्यांचा भाऊ एक वर्षाने परतला; मात्र त्यांच्यावर पाकिस्तानी सैन्याने जे अत्याचार केले, त्यामुळे महरंग हादरून गेल्या; मात्र महरंग यांनी या सर्वांविरोधात 2019 मध्ये संघटित पद्धतीने लढण्यासाठी एका संघटनेची स्थापना केली. याच संघटनेनं 2024 मध्ये पाकिस्तान सरकारविरुद्ध मोठं आंदोलन करत थेट लाहोरपर्यंत धडक मारली होती.
वैद्यकीय शिक्षण घेत असताना बलोच विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व महरंग यांच्याकडे आले. 2023 मध्ये महारंग यांच्या नेतृत्वाखाली बलूच महिलांनी तुर्बत ते इस्लामाबाद असा लाँग मार्च काढला होता. त्यावेळी इस्लामाबाद पोलिसांनी निदर्शकांना ताब्यात घेतले होते. यापैकी काहींची सुटका झाली; पण बर्याच महिला आजही बेपत्ता आहेत. त्यानंतर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि मानवी अधिकारांसाठी लढणारी मलाला युसुफझाई या महरंग यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. गेल्या वर्षी ‘टाईम’ मासिकाने 100 उदयोन्मुख प्रभावशाली नेत्यांमध्ये डॉ. महरंग यांचा समावेश केला. या कार्यक्रमासाठी न्यूयॉर्कला जाण्यापासून त्यांना रोखण्यात आले.
जगभरातील अहिंसक आंदोलनांमध्ये हजारो महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. यामध्ये अनेकींना जीवनातील सर्वांत कटू अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. महरंग यांचा लढा, तर थेट पाकिस्तानच्या लष्कराशी झाला. महरंग सांगतात, ‘लहानपणी मला मृत्यूची भीती वाटत होती. त्यामुळे अंत्यसंस्काराचीही भीती वाटायची. शवागारात माझ्या वडिलांचा छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह ओळखण्यासाठी गेले तेव्हा मी पहिल्यांदा मृतदेह पाहिला. आता गेल्या दीड दशकात जवळच्या माणसांचे अनेक मृतदेह पाहिलेत. आता मृत्यू मला घाबरवू शकत नाही. 1948-50पासून आतापर्यंत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी अनेक आंदोलने झाली आहेत. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या बीएलए म्हणजेच बलूच लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानशी सतत संघर्ष सुरू असतो. यादरम्यान, 14 मे हा बलुचिस्तानासाठी ऐतिहासिक दिवस ठरला. बलूच नेते आणि मानवाधिकार कार्यकर्ता आणि फ्री बलूच मुव्हमेंटचे प्रतिनिधी मीर यार बलूच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली; पण पाकिस्तानने नेहमीप्रमाणेच दमनकारी धोरण सुरूच ठेवले आहे. या दमनशाहीविरुद्ध झुंझार लढा देणारे महरंग बलूच नावाचे वादळ घोंघावत आहे. यंदाच्या शांततेच्या नोबल सन्मानासाठी महरंग बलूच यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. हा सन्मान बलुचिस्तानमध्ये जबरदस्तीने बेपत्ता केलेल्या लोकांचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या आवाजाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचा एक भाग असल्याचे महरंग यांचे म्हणणे आहे. शांतता आणि अहिंसेच्या मार्गावर वाटचाल करत स्वातंत्र्यासाठी झगडणार्या महरंग बलूच यांना सन्मान मिळेल आणि त्यांची सुटका होईल, अशी बलुचींची अपेक्षा आहे.