

जागतिक आरोग्य संघटनेने ‘एएमआर’ हे (अँटिमायक्रोबियल रेजिस्टन्स) मानवतेसमोर भविष्यात निर्माण होणार्या दहा सार्वजनिक आरोग्याच्या आघाडीवरील आव्हानांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. जेव्हा जीवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस), बुरशी (फंगस) किंवा परजीवी (पॅरासाईटस्) औषधांना (अँटिबायोटिक्स, अँटिव्हायरल्स) दाद देत नाहीत किंवा त्यांच्यावर उपचार करताच येत नाही, तेव्हा एएमआर तयार होतो. हवामान बदलानंतरचे जगासमोरचे दुसर्या क्रमांकाचे संकट म्हणजे ‘डायग्नोस्टिक स्टिवर्डशिप’ म्हणजेच औषधांचा वापर कसा करावा हे न समजणे होय. यामुळे प्रारंभीच्या काळात परिणामकारक ठरणारी औषधेदेखील निरुपयोगी ठरू लागतात. जगातील सर्वच देशांनी या स्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
विश्वआरोग्य संघटनेकडून वेळोवेळी जागतिक सार्वजनिक आरोग्याच्या द़ृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती प्रसारित केली जाते. अलीकडेच आरोग्य संघटनेने एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाबाबत जगाला सावध करतानाच एक इशाराही दिला आहे. त्यानुसार सध्या भेडसावणार्या दहा प्रमुख धोक्यांमध्ये ‘रोगाणुरोधी प्रतिकारशक्ती’ म्हणजेच अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्स (एएमआर) ही समस्या समाविष्ट झाली आहे, असे विश्वआरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. रुग्णाच्या शरीरात संसर्ग निर्माण करणार्या रोगजंतूंची ताकद वाढून जेव्हा हे रोगजंतू अँटिबायोटिक औषधांना म्हणजेच प्रतिजैविकांना दाद देणं बंद करतात, तेव्हा अशा परिस्थितीला एएमआर असं म्हणतात. यामध्ये जीवाणू, विषाणू, परजीवी यासारखे सूक्ष्म जीव प्रतिजैविकांविरुद्ध लढा देण्याचे तंत्र विकसित करतात. परिणामी, ही औषधे कितीही प्रभावी असली, तरी ती कुचकामी ठरतात आणि शरीरातील संक्रमण कायम राहते. इतकेच नव्हे, तर झपाट्याने इतरांमध्ये पसरते. आजची जागतिक परिस्थिती पाहिल्यास अँटिबायोटिक्स, अँटिव्हायरल्स, अँटिफंगस औषधांविरोधात बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस व परजीवी यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिकार विकसित केला आहे. आजारी पडल्यानंतर किंवा गंभीर व्याधी जडल्यानंतर औषधोपचार हा एकमेव आशेचा किरण असतो. औषधांमुळे आजार बरा होईल किंवा नियंत्रणात राहील ही सकारात्मक मानसिक धारणाही व्याधीमुक्त होण्याच्या प्रक्रियेत मोलाचे काम करते, हेही आता सिद्ध झाले आहे; परंतु शरीराची हानी करणार्या जीवाणू-विषाणूंवर औषधे कामच करत नसतील, तर आरोग्य यंत्रणा कोलमडणे अटळ आहे. यातून मृत्युदर वाढण्याचा धोका उद्भवू शकतो. तसेच संसर्ग नियंत्रित करणे अशक्यप्राय होण्याचा धोकाही यामध्ये आहे.
एएमआर ही केवळ आरोग्यव्यवस्थेची समस्या नाही, ती औषधांच्या वापराबाबत असलेल्या गोंधळाचा आणि उदासीनतेचाही लक्षणीय पुरावा आहे. ‘डायग्नोस्टिक स्टिवर्डशिप’ म्हणजे आजारानुसार योग्य औषधांचा वापर, याला अजूनही देशोदेशींची आरोग्य प्रणाली पुरेसे महत्त्व देत नाही. औषधांचा गैरवापर किंवा अपुरा वापर यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते आणि पूर्वी प्रभावी असलेल्या औषधांचा काही परिणामच दिसत नाही. भारतात सेल्फमेडिकेशन आणि ‘ओव्हर-द-काऊंटर’ औषधे सहज मिळणे यामुळे अँटिबायोटिक्सचा अमर्याद वापर होतो. परिणामतः सामान्य संसर्गांनाही औषधे काम करत नाहीत. एका पाहणीनुसार, दरवर्षी भारतात 56,000 नवजात बालकांचे मृत्यू सेप्सिसमुळे होतात. हा संसर्ग प्रथम श्रेणीतील अँटिबायोटिक्सना दाद देत नाही. शतकातील सर्वांत मोठी महामारी ठरलेल्या कोव्हिडच्या काळात आयसीएमआरने 10 रुग्णालयांत केलेल्या अभ्यासात असे स्पष्ट झाले होते की, एएमआरमुळे कोव्हिड रुग्णांचा मृत्युदर 50 ते 60 टक्क्यांपर्यंत वाढला. जगभरात कोव्हिड-19 च्या काळात लक्षणांवर आधारित औषधोपचार करूनही लाखो जणांचे मृत्यू झाले. अमेरिका, इटली, चीन आणि भारतात याचे गंभीर परिणाम दिसले. त्यामुळेच पुढे नवीन रोग उद्भवल्यास औषधे निष्प्रभ ठरण्याची शक्यतावजा भीती वर्तवली जात आहे.
सूक्ष्म जीव औषधांशी यशस्वी लढा देतात, तेव्हा त्या औषधांनी आजार बरा करणे अत्यंत कठीण किंवा अशक्य होऊन बसते. अॅलोपॅथीतील अनेक औषधांमध्ये काही मर्यादा असतात. परिणामी, ती कालांतराने निष्प्रभ होतात. नव्या आजारांसाठी नवीन औषधांचा शोध आणि प्रयोगशाळा चाचण्या या वेळखाऊ आणि खर्चिक असतात. त्यामुळे संसर्ग रोखण्याच्या लढ्याला वेळ मिळत नाही. कोव्हिडनंतर नव्या आजारांनी पुन्हा एकदा जगात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कधी चीन, कधी आफ्रिकेतील देशांमधून या आजारांची सुरुवात होते आणि मग काही दिवसांत ते जगभर पसरतात. ही अवस्था पूर्वी कधीच नव्हती.
जागतिक आरोग्य संघटनेने इशारा देताना असे म्हटले आहे की, 2050 पर्यंत जीवाणू, विषाणूंनी मिळवलेल्या प्रतिकारशक्तीमुळे दरवर्षी 1 कोटी लोक मृत्युमुखी पडू शकतात. ‘लान्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, 2019 मध्ये 40.19 लाख मृत्यू केवळ एएमआरमुळे झाले. नवीन अँटिबॅक्टेरियल एजंटस् विकसित होण्याचा वेग हा प्रतिकारशक्ती निर्माण होण्याच्या वेगाच्या तुलनेत कमी आहे; परंतु जागतिक व्यापार, प्रवास यामुळेही एएमआरचे संक्रमण जागतिक स्वरूप घेत आहे. त्यामुळे एएमआरवर वेळीच उपाययोजना झाली नाही, तर सर्जरी किंवा रुटीन उपचार करणेही भविष्यात धोकादायक ठरू शकते. कारण, संसर्ग टाळण्याचे औषधच निष्प्रभ ठरत असल्याने उपचाराचे मूळच हरवणार आहे.
विकसनशील देशांमध्ये औषधांच्या किमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे औषधाचा पुरेसा डोस न घेण्याची प्रवृत्ती सर्रास दिसते; पण यामुळे अनेकदा रोग अधिक गंभीर होतो. हे लक्षात घेता भविष्यातील पिढ्यांसाठी औषधांचा परिणाम टिकवून ठेवण्यासाठी ‘अँटिमायक्रोबियल स्टिवर्डशिप’ महत्त्वाची आहे. याचा उद्देश म्हणजे योग्य रोगासाठी योग्य औषध, योग्य डोस हे योग्य वेळेला दिले जावेत. यासाठी भारतासह विकसनशील आणि गरीब देशांमध्ये मोठी जनजागृती मोहीम राबवावी लागणार आहे. याचे कारण, एएमआरसाठी वापरली जाणारी औषधे अत्यंत महाग असतात आणि ती मोजक्या जणांचेच प्राण वाचवू शकतात. भारतात औषधांचा बाजार अनियमित आहे. किमती ठरवताना इथे पारदर्शकपणा नसतो. त्यातच बनावट औषधांचा काळाबाजार कोट्यवधी लोकांना मृत्यूकडे ढकलतो आहे. या नकली औषधांची किंमत मूळ औषधांच्या तुलनेत 10 ते 500 पट असते; पण गुणवत्ता मात्र शून्य असते. साहजिकच, अशी औषधे वारेमाप प्रमाणात घेतली जातात; परंतु ही औषधे सतत घेत राहिल्याने रोग नाहीसे होत नाहीत. उलट नवीन आजार जन्म घेतात. परिणामी, शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते आणि ते विविध आजारांचे घर बनते. गेल्या चार वर्षांत लाखो लोक एएमआरमुळे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले आहे. हे लक्षात घेता एएमआरविषयी जागरूकता वाढवली, तरच पुढील संकटांपासून आपले संरक्षण करता येईल. अन्यथा ही जागतिक आरोग्य आपत्ती कोव्हिडप्रमाणेच हाहाकार उडवू शकते.
इंडियन मेडिकल असोसिएशनने 2023 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स’ (एएमआर) हे मानवासाठीच नाही, तर प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणासाठीही धोकादायक आहे. ‘एएमआर’मुळे दरवर्षी सुमारे सात लाख रुग्णांचा मृत्यू होत असून 2050 पर्यंत 10 दशलक्ष मृत्यूंपर्यंत वाढण्याचा धोका असल्याचे आयएमएने म्हटले होते. त्यामध्येही रुग्णांकडून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट औषध विक्रेते आणि चुकीच्या व्यक्तीकडून औषधांचा सल्ला घेऊन त्याचे सेवन केल्याने हा प्रकार वाढतो, असे निरीक्षण असोसिएशनने नोंदवले होते. 1987 पासून शास्त्रज्ञ कोणतेही नवीन प्रतिजैविक रेणू विकसित करू शकले नाहीत. याचे कारण, औषध कंपन्यांना संशोधनात फारसा व्यावसायिक फायदा नसतो. परिणामी, जुनी औषधे सतत वापरून निष्प्रभ होत चालली आहेत. या पार्श्वभूमीवर सगळ्याच क्षेत्रांनी प्रतिजैविक औषधांचा गरजेनुसारच वापर करण्याची गरज आहे.
याखेरीज अनेक रुग्णालये व औषधनिर्मिती कंपन्या अँटिबायोटिक रसायने पाण्यात सोडतात आणि ही रसायने ‘सुपरबग्स’ तयार करतात. हे जीवाणू कोणत्याही औषधास प्रतिसाद देत नाहीत, असेही दिसून आले आहे. भारत सरकारने 2013 मध्ये अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स सर्व्हिलन्स अँड रिसर्च नेटवर्कची सुरुवात केली होती. 2017 मध्ये याबाबत राष्ट्रीय कृती आराखडाही प्रकाशित केला होता. आयसीएमआरने नॉर्वे, जर्मनी आदी देशांशी संशोधन भागीदारी केली आणि रुग्णालयांमध्ये अँटिबायोटिक स्टिवर्डशिप प्रोग्राम पायलट तत्त्वावर लागू केला; पण निधीचा अभाव, समन्वयाची कमतरता आणि अनेक जबाबदार यंत्रणांमध्ये गोंधळ यामुळे ‘वन हेल्थ अॅप्रोच’ केवळ कागदावरच उरला. वास्तविक, आज आपण एएमआर रोखण्यात अपयशी ठरलो, तर उद्याचा समाज पुन्हा पूर्वप्रतिजैविक युगात प्रवेश करेल, जिथे साधा सर्दी-खोकलाही जीवघेणा ठरेल. कोव्हिडने सूक्ष्म जीवांचे वर्चस्व किती भयानक ठरू शकते, हे आपणास दाखवून दिले आहे. त्यामुळेच या अद़ृश्य शत्रूविरुद्ध सामूहिक समन्वयाने निर्णायक लढा द्यावा लागेल.