Louvre Museum Jewelry | ‘लूव्र’मधील चोरीचे रहस्य..!

Louvre Museum Jewelry
Louvre Museum Jewelry | ‘लूव्र’मधील चोरीचे रहस्य..!
Published on
Updated on

श्रीराम ग. पचिंद्रे

सीन नदीच्या काठावरच ‘लूव्र’ हे जगप्रसिद्ध आणि जगातील सर्वात मोठे वस्तू संग्रहालय आहे. गेल्याच आठवड्यात लूव्र संग्रहालयाच्या अपोलो गॅलरीमध्ये असलेल्या दागिन्यांची चोरी झाली. हे दागिने असे-तसे, सामान्य नव्हते, तर ते होते सम्राट नेपोलियन आणि त्याच्या सम्राज्ञीचे रत्नजडित दागिने! जागतिक बाजारपेठेत त्यांची किंमत अब्जावधी युरो इतकी होईल. मौल्यवान हिरे जडवलेला मुकुट आणि इतर नऊ दागिने यांचा चोरीच्या वस्तूंमध्ये समावेश आहे.

पॅरिस ही फ्रान्सची वैभवशाली राजधानी होय. सीन ही फ्रान्सची प्रख्यात नदी पॅरिसमधूनच वाहते. सीन नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेल्या पॅरिस शहराचे दर्शन नौकेतून जाताना घडते. या सीन नदीमधून नौकेने पर्यटकांना फिरवून आणण्याची सोय आहे. नदीमधून नौकेतून जाताना मार्गदर्शक पॅरिसची संपूर्ण माहिती पर्यटकांना सांगतो. सीन नदीच्या काठावरच ‘लूव्र’ हे जगप्रसिद्ध आणि जगातील सर्वात मोठे वस्तू संग्रहालय आहे. 73 हजार चौरस मीटर क्षेत्रफळ जमिनीवर हे संग्रहालय उभे आहे. गेल्याच आठवड्यात लूव्र संग्रहालयाच्या अपोलो गॅलरीमध्ये असलेल्या दागिन्यांची चोरी झाली. हे दागिने असे-तसे, सामान्य नव्हते, तर ते होते सम्राट नेपोलियन आणि त्याच्या सम्राज्ञीचे रत्नजडित दागिने! जागतिक बाजारपेठेत त्यांची किंमत अब्जावधी युरो इतकी होईल. मौल्यवान हिरे जडवलेला मुकुट आणि इतर नऊ दागिने यांचा चोरीच्या वस्तूंमध्ये समावेश आहे.

Musee du Louvre असं लूव्र या संग्रहालयाचं फ्रेंच भाषेतील नाव आहे. या विश्वविख्यात संग्रहालयाला दरवर्षी 80 लाख पर्यटक भेट देतात. (आपला ताजमहाल पाहायला दरवर्षी सुमारे 70 लाख लोक येतात). लिओनार्दो विंची या विख्यात चित्रकाराने काढलेले मोनालिसा हे चित्र याच ‘लूव्र’मध्ये ठेवण्यात आलेले आहे. डॅन ब्राऊन या ख्यातनाम लेखकाची ‘द दा विंची कोड’ ही जगप्रसिद्ध कादंबरी मोनालिसाच्या याच चित्राच्या पार्श्वभूमीवर लिहिली गेली आहे. लूव्र हे फ्रान्सचे राष्ट्रीय कला-वस्तू संग्रहालय आहे. जगभरातील अगणित सुंदर आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू, चित्रे, पुतळे ‘लूव्र’मध्ये आहेत. फ्रान्सच्या इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन संग्रहालय पाहताना घडत असते. संग्रहालयाच्या बाहेर एक भव्य पिरॅमिड आहे. या पिरॅमिडमधूनच संग्रहालयात जाण्याचं प्रवेशद्वार आहे. त्याशिवाय अन्य कुठूनही आत जाता येत नाही. कितीही दाट गर्दी असली, तरी रांगेमध्ये अजिबात धक्काबुक्की होत नाही.

राजा फिलिप दुसरा ऑगस्टस याने संग्रहालयाची मूळ वास्तू 1190 मध्ये बांधली. तो एक खूप मोठा किल्ला होता. कडेकोट सुरक्षितता म्हणून राजाचा खजिना, रत्न भांडार, सोने-नाणे, तोफा, बंदुका, तलवारी, चिलखते, राजघराणे विषयी कागदपत्रे, धार्मिक संदर्भ ग्रंथ अशा वस्तू या ठिकाणी संग्रहित करून त्यांचे जतन -संवर्धन करण्यात आले. सन 1400 च्या सुमारास फ्रान्सचे राजघराणे या किल्ल्यात वास्तव्यास आले. या वास्तूचा विस्तार पुढील काळात करण्यात आला. राजा पाचवा चार्ल्स याने वास्तूची संग्रहालय म्हणून सजावट केली.

सन 1546 मध्ये पहिला फ्रान्सिस याने मूळ जुन्या वास्तूच्या ठिकाणी नवा राजवाडा बांधला आणि कला व वस्तू संग्रहालयाची जाणीवपूर्वक जोपासना केली. ‘मोनालिसा’ हे जगभरातील पर्यटकांचे आणि चित्रकारांचे आकर्षण असलेले तैलचित्र पहिला फ्रान्सिस याच्या काळातच संग्रहालयामध्ये आले. तो काळ नवसुधारणांचा होता. त्यापूर्वीच्या काळात फक्त देवादिकांची - येशू ख्रिस्त आणि इतर यांचीच चित्रे रेखाटली जात. नवजागृतीच्या काळात ‘मोनालिसा’ या सामान्य स्त्रीचे चित्र रेखाटण्यात आले. चित्राच्या आगळ्या रंगसंगतीमुळे आणि गूढमंद स्मितामुळे ते वैशिष्ट्यपूर्ण ठरले. ‘मोनालिसा’ हे तैलचित्र आकाराने फार मोठे नसून दीड फूट लांब व दीड फूट रुंद इतकेच आहे. तथापि, मोनालिसाच्या मुखावरील स्मिताचे गूढ आजही सर्वांना आकृष्ट करते. आजही जगभरातील हजारो चित्रकार मोनालिसाचे चित्र समक्ष बघून त्याची प्रतिकृती रेखाटण्यासाठी पॅरिसला भेट देतात. त्यांच्यामुळेच मोनालिसाच्या चित्राच्या प्रतिकृती जगभर उपलब्ध आहेत. ‘मोनलिसा’च्या चित्राची एक भव्य प्रतिकृती संग्रहालयाच्या आवारात लावलेली आहे. लिओनार्डो द विंचीप्रमाणेच इतर जगप्रसिद्ध चित्रकार - शिल्पकारांच्या कलाकृती संग्रहालयात आहेत. त्यांच्या तंत्राचा, शैलीचा अभ्यास करून प्रतिकृती तयार करण्यासाठी कलाकारांना संमती दिली जाते.

आंद्रेआ देल सार्तो, प्रीमतीत्वो, चेल्लिनी यांच्यासारख्या जगप्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांनी हे संग्रहालय राजा फ्रान्सिस याने समृद्ध केलेले आहे. पुढील काळात अनेक वास्तुशिल्पींनी संग्रहालयाचे वेगवेगळे भाग आपापल्या पद्धतीने बांधले. 1546 ते 1878 या तीनशे वर्षांच्या कालावधीत लूव्रची वास्तू ही अनेक वास्तुतज्ज्ञांनी टप्प्याटप्प्याने साकारली. अशा वेगवेगळ्या वास्तुतज्ज्ञांनी वेगवेगळ्या कालखंडात बांधलेली असूनही ‘लूव्र’ची वास्तू ही श्रेष्ठ दर्जाची मानली जाते. कार्डिनल बाजारँ या चित्रकाराच्या संग्रहातील 2000 मौल्यवान चित्रे चौदाव्या लुईच्या काळात त्याच्या कॉल बेअर या मंत्र्याने संग्रहालयात दाखल केली. संग्रहालयाचा काही भाग 17 व्या शतकात लोकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला. तोपर्यंत हे संग्रहालय फक्त राजघराण्याचेच होते. 1793 मध्ये लूव्रचे रूपांतर शासकीय कलासंग्रहालयात करण्यात आले. 10 ऑगस्ट 1793 रोजी संग्रहालयाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. सम्राट नेपोलियन बोनापार्टने हे संपूर्ण संग्रहालय जनतेला पाहण्यासाठी खुले केले. अश्मयुगीन काळापासून ते एकविसाव्या शतकापर्यंतच्या 3 लाख 80 हजारांहून अधिक कलात्मक वस्तूंचा त्यात समावेश आहे. जगभरातील चित्रे, पुतळे, मूर्ती, वस्त्रे, शस्त्रे इत्यादी इत्यादी सर्व काही...

नेपोलियनच्या मृत्यूनंतर त्याचे आणि त्याच्या सम्राज्ञीचे रत्नजडित दागिने, भरजरी पोशाख, बंदुका, तलवारी, तोफा आणि इतर मौल्यवान वस्तू संग्रहालयात दाखल करण्यात आल्या. याच वस्तूंपैकी उच्च कोटीच्या हिर्‍याच्या मुकुटासह शुद्ध सोन्याच्या इतर दागिन्यांची चोरी गेल्या आठवड्यात झाली. संग्रहालयात सर्वत्र कडेकोट संरक्षण असते. त्यातूनही चोरी झाली, म्हणजेच अतिशय चलाख चोरांचे हे कृत्य असावे. लूव्र संग्रहालय चार मजल्यांचं आहे. ते एवढं मोठं आहे की, पूर्ण पाहायला आठ दिवस लागतात. मी कुटुंबीयांसह गेलो तेव्हा संग्रहालय सकाळी सुरू झाल्यापासून संध्याकाळी बंद होईपर्यंत खूप थोडे थोडे भाग बघून झाले. मोनालिसाच्या चित्रावर एका पर्यटकाने मे 2022 मध्ये केक फेकला होता, तर जानेवारी 2024 मध्ये एका पर्यटक महिलेने सूप फेकले होते. हे चित्र बुलेट काचेमध्ये बंदिस्त केलेले असल्यामुळे त्याला काही झाले नाही; पण तेव्हापासून तिथली संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली. संपूर्ण संग्रहालयात थोडी जरी वेगळी हालचाल झाली तर अत्याधुनिक संवेदकाद्वारे सगळी दारे आपोआप बंद होतात. कोणालाही बाहेर पडता येत नाही. असं असताना नेपोलियनच्या अतिमौल्यवान दागिन्यांची चोरी होऊच कशी शकते? ही मोठी धक्कादायक अशी गोष्ट आहे. सध्या संग्रहालयाच्या सीन नदीच्या बाजूने असलेल्या भागात बांधकाम चालू आहे. संग्रहालय बंद असलेल्या वेळेत सकाळी लवकर उदवाहनातून वर अपोलो या दालनात चोरांनी प्रवेश केला आणि फक्त सात मिनिटांत चोरी केली, असे फ्रान्स सरकारने अधिकृतपणे सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news