

जंगल आणि निसर्ग हा जणू श्वास असणारे, ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आलेले मारुती चितमपल्ली हे मराठी साहित्यसृष्टीला पडलेले सोनेरी स्वप्न. निसर्गाशी एकरूप झालेला हा अरण्यऋषी दीपस्तंभ होता. प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती यांच्याविषयीची अफाट तळमळच त्यांना अलौकिकापर्यंत घेऊन गेली. चितमपल्ली सरांना खुलवण्याची ताकद फक्त वन्यजीव आणि जंगल यांच्यातच आहे, असे अनेकजण म्हणत असत. त्यांच्या निधनाने साहित्यसृष्टीतील एका महान पर्वाची अखेर झाली आहे.
असे म्हणणारे सुप्रसिद्ध निसर्गकवी आणि ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आलेले ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने मराठी निसर्गसाहित्यातील एक पर्व संपले. अरण्यऋषी, रानयात्री या नावाने ओळखल्या जाणार्या चितमपल्ली सरांनी पक्षी, प्राणी आणि वन संसाधनांवर विपुल लेखन केले आहे. जंगल हा त्यांचा श्वासच जणू... त्यांची शाळा म्हणजे जंगलच होते. लहानपणी आईबरोबर जंगलच्या वाटा धुंडाळण्यापासून त्यांची निसर्गाप्रति असणारी असीम ओढ आणि कुतूहल वाढत गेले. त्यांच्या वडिलांनाही वाचनाची आवड होती. त्यांची शाळा सुरू झाली ती वयाच्या नवव्या वर्षी; पण आई, वडील आणि मामा यांच्याबरोबर फिरून जंगलाची ओढ लागली ती कायमची उर्मी देणारी ठरली. मारुती चितमपल्ली यांचा जंगलाच्या अभ्यासाचा पाया हा असा लहानपणीच रचला. बालपणी रानात हिंडताना वन्यप्राण्यांच्या अभ्यासाची ओढ त्यांना लागली.
चितमपल्ली यांचा जन्म सोलापुरात झाला. भारतीय वनसेवा विभागात दाखल झाल्यानंतर जंगल आणि वन्यप्राणी हेच या अरण्यऋषींचे नातेवाईक आणि मित्र झाले. त्यांना गुजराती, हिंदी, मराठी, तेलगू या भाषा येत होत्या. नोकरी करताना संस्कृत आणि इंग्रजी भाषाही शिकून घेतली. त्यांनी जंगलातील पशुपक्ष्यांवर लिखाण करायला सुरुवात केली तेव्हा या प्रकारचे लेखन मराठी प्रकाशनविश्वात नवे असल्याने ते छापायला नकार मिळाला. अखेरीस नागपूरच्या साहित्य प्रसार केंद्राने मारुती चितमपल्ली यांचे पहिले पुस्तक छापले. या पुस्तकाचे नाव होते ‘पक्षी जाय दिगंतरा.’
पहिल्या पुस्तकापासून त्यांचा हा लेखनप्रवास अथक सुरू होता. वयाच्या नव्वदीतही ते रोज सहा तास लेखन करत. भारतीय वनसेवेत असल्याने जंगल आणि वन्यप्राण्यांच्या सहवासात वावरलेल्या या अवलियाला माणसांचा गराडा नकोसा वाटायचा. कारण, पशुपक्ष्यांमधील निरासगपणा त्यांना आवडत असे. आपल्या अभ्यासातून त्यांनी मराठी निसर्गसाहित्याप्रति आगळीक जागृत केली. निसर्ग अध्ययनातून त्यांनी केलेल्या मांडणीतून अभ्यासकांचे भावविश्व विस्तारले. त्यांच्या साहित्यकृतींमुळे अनेक मनांत निसर्गाकडे पाहण्याचा एक वेगळा द़ृष्टिकोन तयार झाला. निसर्गमित्र, पक्षिमित्र तयार झाले, संवर्धनासाठी चळवळी उभ्या राहिल्या.
चितमपल्ली यांनी संतवाङ्मय, ज्ञानेश्वरी, त्यातील विराणी, महानुभाव पंथाचे लीळाचरित्र यासोबतच कित्येक भाषेतील निसर्गविषयक ग्रंथांचा अभ्यास केला. त्या काळात आजच्यासारखे आधुनिक अभ्यासाचे स्रोत अस्तित्वात नव्हते, तरीही त्यांनी आंतरिक ओढीला आपल्या व्यासंगाची जोड दिली आणि महत्प्रयासाने निसर्ग अभ्यासाचे नवे रंग वाचकांसमोर आणले. त्यांनी लिहिलेलं कुठलंही पुस्तक एकदा सुरुवात झाली की संपूच नये, असं वाटायचं. केवळ वाचनानंद नव्हे, तर अद्भुत आनंद देणारे लीलया लिखाण त्यांनी केले आहे.
त्यांचा दिनक्रम पहाटे पाच वाजता सुरू होत असे. त्यात व्यायामाने सुरुवात करून न्याहारीनंतर लेखनाला सुरुवात करत. त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर दीड-दोन तास पुस्तकांच्या गराड्यात राहून, आराम करून पुन्हा लेखनाच्या तयारीला लागत. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून पक्षिकोश आणि प्राणिकोश तयार झाले. वयाच्या 80 व्या वर्षीही त्यांना चष्मा किंवा लेखनिक यांची गरज कधी भासली नाही. भाषा आणि शुद्धलेखन यांच्याशी तडजोड करायची नाही, हे पक्के असल्याने आपले लेखन ते स्वतःच करत असत. वनसेवा विभागात नोकरी करताना त्यांनी कोकण, मराठवाडा, विदर्भ इथली जंगले पालथी घातली. माळढोक, जंगली कुत्री, मासे, गरुड, बगळे यासह पशुपक्ष्यांचे निरीक्षण करून त्यांच्या जीवनाचे बारकावे त्यांनी साहित्यातून लोकांसमोर मांडले. ‘आनंददायी बगळे’, ‘केशराचा पाऊस’, ‘घरट्यापलीकडे’, ‘चित्रग्रीव’, ‘जंगलाचे देणे’, ‘नवे गावच्या बांधावर’, ‘निळावंती’, ‘पक्षिकोश’, ‘मृगपक्षिशास्त्र’, ‘रातवा’, ‘रानवाटा’, ‘शब्दांचे लेणे’ अशा पुस्तकांतून जंगल आणि पशुपक्ष्यांवर लिहिले आहे. आपल्या संशोधन आणि लेखन या वाटचालीचा मागोवा घेणारे आत्मचरित्र ‘चकवा चांदण - एक वनोपनिषद’ हे नेहमीच्या आत्मचरित्रांपेक्षा वेगळी वाट चोखाळणारे ठरले. जीवनानुभवाशी निगडित हे शीर्षक आहे. त्यांच्या बहुतेक पुस्तकांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
सोलापूरमधल्या 79 व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. निसर्गाच्या विविध अंगांनी चित्रण करणे हा त्यांच्या लेखनाचा स्वभावधर्मच होता. राज्य शासनाच्या वन विभागात काम करता करता उपसंचालक म्हणून व्याघ्र प्रकल्पातून 1990 साली ते सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात मारुती चितमपल्ली यांचे भरीव योगदान राहिले आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी अनेक संस्थांमध्ये सहकार्य केले. दुर्गाताई भागवत आणि व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या लिखाणातून जंगलांचे चित्रण याआधी केले होते. त्यात कितीतरी अधिक भर मारुती चितमपल्ली यांनी घातली. वयाच्या ऐंशीव्या वर्षी सागरी जीवजंतू आणि कासवाच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून सहा महिने कोकणच्या किनार्यावर चितमपल्ली सरांंनी तळ ठोकला होता. ‘मत्स्यकोश’ लिहिण्यासाठी त्यांनी वार्धक्यात कोकणातील कोळी वसाहत गाठली. तिथे काही वर्षे मुक्काम ठोकला. समुद्रात कित्येक किलोमीटर आत होडी घालून मासेमारी केली. या ‘मत्स्यकोशा’त खार्या पाण्यातील 450 आणि गोड्या पाण्यातील 250 मासे व त्यांची विविध नावे, वैशिष्ट्ये, रंजक माहिती यांचा समावेश आहे. याखेरीज त्यांनी ‘प्राणिकोशा’साठी 15 वर्षे काम केले. देशभर जंगलातून माहिती मिळवली. पारधी, गोसावी, वडारी, आदिवासी लोकांकडून प्राण्यांविषयी माहिती मिळाली. ‘प्राणिकोशा’त भारतातील 450 हून अधिक प्राण्यांची माहिती, छायाचित्रे, विविध भाषेतील नावे आहेत. वाघाचे प्रकार, बिबट्याची, हत्तीची वैशिष्ट्ये, वानराची शैली, उंदराचे 100 हून जास्त प्रकार, वटवाघळाच्या 150 हून जास्त प्रकाराची माहिती आहे. ‘वृक्षकोशा’त महाराष्ट्रासह देशातील सुमारे 4,000 वनस्पतींची नावे, त्यांची वनस्पतिशास्त्रीय मांडणी, त्यांची विशेष वैशिष्ट्ये आदी माहिती आहे. कडुनिंबाचे 8 प्रकार, बिबा, बहावा, मोह, साग आदींचे महत्त्व व त्यांच्याशी संबंधित रंजक माहिती अशी मांडणी आहे.
प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती यांच्याविषयीची अफाट तळमळच त्यांना अलौकिकापर्यंत घेऊन गेली. चितमपल्ली सरांना खुलवण्याची ताकद फक्त वन्यजीव आणि जंगल यांच्यातच आहे, असे अनेकजण म्हणत असत. हा त्यांच्या निरंतन अभ्यासूपणाचा सन्मानच म्हणायला हवा. चितमपल्ली यांचे निसर्गज्ञान अफलातून होते. त्यांची निरीक्षणे कालातीत आहेत. अनेक वृक्ष पावसाचे संकेत देतात, असे ते सांगत. यासाठी उदाहरणे देताना ते म्हणत की, बहावा पूर्ण फुलला की, पाऊस चांगला पडतो. बिब्याच्या झाडाला फुले लागली तर त्या भागात दुष्काळ पडतो. सावळा नावाच्या माशाच्या पोटातील अंडकोशावर पावसाच्या 9 नक्षत्रांच्या खुणा असतात. मूलत: त्यांचा रंग काळा असतो. तो तांबडा असेल तर पाऊस चांगला पडतो. दुष्काळ पडणार असेल तर वानरे खाल्लेली पाने, फळे, फुलांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून लाडू तयार करून ठेवतात. काटेरी झाडांवर कावळ्यांनी घरटी बांधली तर त्या वर्षी दुष्काळ पडतो, याउलट आंबा, कडुनिंब यासारख्या सदाहरित वृक्षांवर घरटी बांधली तर पाऊस चांगला पडतो. कावळ्याने तीन-चार अंडी घातली तर उत्तम पाऊस होतो, एक अंडे घातले तर अवर्षण पडते. या सर्व गोष्टी कपोलकल्पित नसून, निरीक्षणातून त्यांनी आपले हेे ज्ञान सिद्ध केले होते. मराठी साहित्यविश्व अनेक साहित्यप्रभूंच्या योगदानाने समृद्ध झाले आहे. या साहित्याला प्रदीर्घ परंपरा आहे. या परंपरेतील मळलेल्या वाटेने न जाता निसर्गाच्या सान्निध्यात रमलेला हा अरण्यऋषी अनंताच्या प्रवासाला गेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.