Religious Exploitation Debate | अविवेकाच्या अंधारात श्रद्धेचा बाजार

Religious Exploitation Debate |
Religious Exploitation Debate | अविवेकाच्या अंधारात श्रद्धेचा बाजार
Published on
Updated on

अ‍ॅड. प्रदीप उमाप

महाराष्ट्र हा संतांचा, समाजसुधारकांचा आणि क्रांतिकारकांचा देश म्हणून ओळखला जातो. ज्या मातीने देशाला विज्ञानाची कास धरायला शिकवली आणि अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र कायदा केला, त्याच मातीत आज तंत्र-मंत्र, अघोरी विद्या आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण करणारी अशोक खरातसारखी प्रवृत्ती फोफावते, ही बाब राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला काळिमा फासणारी आहे.

नाशिकमधील स्वयंघोषित महाराज आणि ज्योतिषी अशोक खरात याचे नाव सध्या सबंध राज्यभरात चर्चेत आले आहे. विशेषतः राजकीय वर्तुळात खरातच्या दररोज समोर येणार्‍या ‘फाईल्स’नी खळबळ उडवून दिली आहे. निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकारी असल्याचे सांगत स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणार्‍या 67 वर्षीय खरातने श्रद्धेच्या नावाखाली भीतीचा एक अवाढव्य व्यापार मांडला होता. या व्यापारामध्ये प्रचंड मोठे अर्थकारण तर दडलेले होतेच; पण त्याबरोबरच स्वतःची कामवासना शमवण्यासाठीची शोषणव्यवस्थाही तयार झाली होती. मागील काळात आसारामबापूसारख्यांची प्रकरणे देशभरात गाजली होती. त्यांना मानणारा जनसमुदाय मोठा असल्याने अनेक वर्षे त्यांच्याकडून भक्ती आणि अध्यात्माच्या नावाखाली होणारे लैंगिक शोषणासारखे गुन्हे दबून राहिले. खरात हा प्रवचनकार, साधू नसल्याने त्याचा भक्तसंप्रदाय नसला, तरी राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांना त्याने आपल्या कौशल्याने मोहीत केले होते. भविष्य सांगणे, अंकशास्त्र आणि आपल्याकडे असलेल्या तथाकथित दैवी शक्तीचा वापर करून त्याने समाजातील सर्व स्तरांतील लोकांना भुरळ घातली.

या भुरळ घालण्याच्या प्रक्रियेत त्याने काही राजकारण्यांनाही आपल्या दरबारात नतमस्तक व्हायला लावले. पुरोगामीत्वाचा उद्घोष करणार्‍या नेत्यांनीही जाहीरपणाने खरातवर स्तुतीसुमने उधळल्याचे समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होणार्‍या व्हिडीओंमधून दिसून आले आहे. राजकीय नेत्यांची समाजमनात एक विशिष्ट प्रतिमा तयार झालेली असते. त्यांच्या आलिशान जीवनशैलीचे आकर्षण असणारा मोठा वर्ग असतो. राजकारणातील लाभ पदरात पाडून घेत पाहता पाहता संपत्तीचे इमले बांधणारे राजकारणी पाहताना सामान्यांना त्यामागचे गमक जाणून घ्यायचे असते. साहजिकच अशावेळी राजकारणी मंडळी जेव्हा एखाद्या बाबा-बुवाच्या दरबारात जातात, त्यांच्या खासगी भेटी घेतात, त्यांचे आशीर्वाद घेतलेले फोटो समाजमाध्यमात व्हायरल करतात तेव्हा त्यातून एक प्रकारचा संदेश समाजात जातो.

अशोक खरातसारख्या श्रद्धेचा बाजार मांडणार्‍यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना असते. त्यामुळे ते राजकीय सावजांच्या शोधात असतात. त्यांच्या साहाय्याने आणि बरेचदा वरदहस्ताने मग या भोंदूंचा ‘कारभार’ विस्तारू लागतो. वास्तविक पाहता, महाराष्ट्रात अंधशद्धेच्या नावाखाली होणारे शोषण आणि अघोरी प्रथांना लगाम घालण्यासाठी ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013’ हा क्रांतिकारी कायदा लागू झालेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी या कायद्यासाठी अनेक वर्षे दिलेला लढा महाराष्ट्राने पाहिला आहे; पण त्यांच्या पश्चात हा कायदा संमत झाला. डॉ. दाभोळकर हयात नसले, तरी त्यांनी दिलेली विवेकवादाची पणती तेवत ठेवणे, ही समाजाची आणि राजकारण्यांची जबाबदारी आहे; परंतु खरात प्रकरणामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे धागेदोरे गुंतल्याचे समोर येत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव यासंदर्भात सर्वांत प्रथम पुढे आले आणि अखेरीस त्यांना राजीनामा द्यावा लागला.

राजकारणीच नव्हे, तर पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खरातने सुमारे पाच कोटी रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले. मानवी मनातील मृत्यूच्या भीतीचा वापर करून एखाद्या व्यक्तीला कशाप्रकारे कंगाल केले जाऊ शकते, याचे विदारक उदाहरण म्हणून या प्रकरणाकडे पाहायला हवे. खरातने संबंधित बिल्डरला एका बनावट सापाचा धाक दाखवला होता. माझ्या सूचनांचे पालन केले नाही, तर नागदेवता कोपेल आणि सर्पदंशाने तुझा मृत्यू होईल, अशी भीती त्याने सदर व्यक्तीच्या मनात बसवली होती. या भीतीपोटी तक्रारदाराने खरातला एक आलिशान मर्सिडीजबेंझ कार घेऊन दिली. इतकेच नव्हे, तर ‘फिलॉसॉफर्स स्टोन’ ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते अशी आख्यायिका आहे , असा दगड मिळवण्यासाठी जगातील 21 देशांचा प्रवास करणे आवश्यक असल्याचे खरातने सांगितले. या प्रवासाचा संपूर्ण खर्च त्या विकसकाला सोसावा लागला.

धनदांडग्यांची, मध्यमवर्गीयांची आर्थिक लूट करून खरातने अमाप संपत्ती जमवली आहे. नाशिक जिल्ह्यातील मिरगाव येथे एक भव्य फार्म हाऊस बांधले आहे. खरात हा ‘ईशान्येश्वर महादेव मंदिरा’चा अध्यक्ष म्हणून मिरवत असे, ज्यामुळे समाजात त्याची एक धार्मिक प्रतिमा तयार झाली होती. याच प्रतिमेचा वापर करून त्याने अनेक राजकीय नेते आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढले होते; मात्र या धार्मिक मुखवट्यामागे बलात्कार, लैंगिक शोषणासारखे अत्यंत घृणास्पद गुन्हे राजरोसपणे खरात करत होता. एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीला जीवानिशी मारण्याची धमकी देऊन खरातने तिच्यावर नाशिकमधील आपल्या कार्यालयात वारंवार बलात्कार केला. 60 हून अधिक आक्षेपार्ह चित्रफिती, बेकायदेशीर शस्त्रसाठा यातून या भोंदूगिरीचे जाळे किती खोलवर पसरले होते, याची प्रचिती येते. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेला पेन ड्राईव्ह या प्रकरणाची व्याप्ती स्पष्ट करतो. खरातने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असावे, अशी शक्यता आहे. हे व्हिडीओ ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जात होते की, विकृत आनंदासाठी, याचा शोध घ्यावा लागणार आहे.

खरातच्या पापाचा घडा केवळ लैंगिक शोषणापुरता मर्यादित नाही. त्याच्या कार्यालयातून सापडलेला शस्त्रसाठा आणि मालमत्तेची कागदपत्रे पाहता हा एक मोठा गुन्हेगारी सूत्रधार असल्याचे स्पष्ट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना केली आहे. या तपास पथकाकडून आता खरातच्या घृणास्पद कृत्यांचे पदर एक-एक करून उलगडले जात आहेत. खरातच्या कार्यालयात काम करणार्‍या नीरज जाधव याच्या कॉल डिटेल्समधून समोर आलेले महिलांचे संपर्क क्रमांक आणि खरातच्या केबिनमधून जप्त करण्यात आलेले संशयास्पद द्रव पदार्थ तपासाला नवी दिशा देत आहेत.

या प्रकरणातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते, ती म्हणजे मानवी मनाची हतबलता आणि त्यातून निर्माण होणारी अंधश्रद्धा. मानवी मन हे मुळातच अनिश्चिततेला घाबरणारे असते. आयुष्यात एखादे संकट येते किंवा यशाचा मार्ग धूसर होतो, तेव्हा तर्क आणि विज्ञानाऐवजी अनाकलनीय शक्तींवर विश्वास ठेवण्याकडे माणसाचा कल वाढतो. भोंदूगिरीचे संपूर्ण साम्राज्य या हतबलतेवरच उभे असते. अशोक खरातच्या प्रकरणात अडकलेले लोकअशिक्षित नव्हते; परंतु त्यांच्या मनात असलेली अपयशाची भीती किंवा मृत्यूचा धाक इतका प्रबळ होता की, त्यांनी आपला विवेक गहाण ठेवला. भोंदूगिरीमध्ये भीती हे सर्वात मोठे आयुध असते. माणसाला एकदा का मृत्यूची किंवा अहित होण्याची भीती घातली की, तो स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. राजकारण्यांच्या बाबतीत ही हतबलता अधिक तीव्र असते. सत्ता टिकवणे, प्रतिस्पर्ध्याचा काटा काढणे, संपत्ती टिकवणे या गोष्टींसाठी अनेक नेते अशा मांत्रिक-ज्योतिषांच्या आहारी जातात. स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा भोंदूबाबांच्या उपायांवर विसंबून राहणे, हा त्यांच्यातील वैचारिक दिवाळखोरीचा पुरावाच म्हणावा लागेल. सत्तेतील नेते अशा अघोरी प्रथांचे समर्थन करतात किंवा त्यात सहभागी होतात, तेव्हा समाज अधिक अधोगतीकडे जातो. त्यांच्या एका कृतीमुळे अशा भोंदूंना समाजात जी अवाजवी प्रतिष्ठा मिळते, त्याची किंमत समाजाला मोजावी लागते. त्यामुळे अशा प्रवृत्तींना लगाम घालण्यासाठी केवळ कायदा पुरेसा ठरत नाही. समाज स्वतःहून अशा प्रवृत्तींना नाकारत नाही, तोपर्यंत खरातसारखे नवीन मुखवटे धारण करून समाजात वावरतच राहतील. संकटाच्या काळात माणूस जेव्हा तार्किक विचार करणे थांबवतो, तेव्हा खरातसारखी गिधाडे तिथे झेपावतात.

महाराष्ट्र हा संतांचा, समाजसुधारकांचा आणि क्रांतिकारकांचा देश म्हणून ओळखला जातो. ज्या मातीने देशाला विज्ञानाची कास धरायला शिकवली त्याच मातीत तंत्र-मंत्र, अघोरी विद्या आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण करणारी अशोक खरातसारखी प्रवृत्ती फोफावते, ही बाब शरमेची आहे. महाराष्ट्राने नेहमीच प्रबोधनाची मशाल हातात धरली आहे; पण खरातच्या या प्रकरणाने दाखवून दिले आहे की, अंधाराचे काही कोपरे अजूनही तसेच उरले आहेत. डॉ. दाभोळकरांनी आयुष्यभर ज्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संघर्ष केला, तो लढा अद्याप संपलेला नाही, हे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट होते. आता चेंडू राज्य सरकारच्या आणि एसआयटीच्या कोर्टात आहे. केवळ खरातला अटक करून चालणार नाही, तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे, जेणेकरून लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेण्याची हिंमत येणार्‍या काळात कुणी करणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news