

कॅनडामधील भारतद्वेष्टे जस्टिन ट्रुडो यांचे पर्व संपुष्टात येऊन मार्क कार्नी यांच्या युगाचा आरंभ झाला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ युद्धाने आणि वारंवार कॅनडाला अमेरिकेचे 51वे राज्य बनवण्याच्या विधानामुळे कॅनडाच्या जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. जनतेच्या या मनोवृत्तीचे अचूक आकलन करून कार्नी यांनी केवळ दीड महिन्याच्या कार्यकाळात देशात राष्ट्रवादाची लाट निर्माण केली आणि लिबरल पक्षाला विजयश्री मिळवून दिली. कार्नींच्या विजयामुळे भारत-कॅनडा संबंध पूर्ववत होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय पटलावर गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या विकासयात्रेला खिळ घालण्यासाठी विविध प्रकारची षड्यंत्रे रचली जाताना दिसून आली आहेत. आशिया खंडात चीनकडून चहुबाजूंनी भारताला घेरण्याचा प्रयत्न हा एक भाग झाला; पण अगदी अमेरिकेपासून ते अन्य पश्चिमी जगतातील राष्ट्रांपर्यंत अनेक घटकांकडून भारताची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले आणि सुरूही आहेत. मग, ते अगदी कोव्हिड काळात ‘न्यूयॉर्क टाईम्स’सारख्या प्रख्यात दैनिकाच्या माध्यमातून भारताची प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न असो किंवा अमेरिकेतील मानवाधिकार संघटनांच्या अहवालात भारताला जाणीवपूर्वक खालचा क्रमांक देणे असो, या सर्वांमध्ये कडी केली होती ती म्हणजे, कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी. एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येबाबत भारताला आरोपीच्या पिंजर्यात उभे करताना कॅनडाच्या पंतप्रधानांनी तेथील संसदेत कसल्याही पुराव्याअभावी बेछूट विधाने केली होती. इतकेच नव्हे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह काही प्रमुख अधिकार्यांचा नामोल्लेख या प्रकरणात ट्रुडोंनी केला. त्यातून भारत- कॅनडा संबंधांमध्ये कमालीचे वितुष्ट निर्माण झाले.
तथापि, नुकत्याच पार पडलेल्या कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील लिबरल पक्षाच्या विजयाने भारताशी संबंध सुधारण्याच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. याचे कारण म्हणजे, निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीदरम्यान कार्नी यांनी वारंवार सांगितले की, आगामी काळात भारताशी अधिक चांगले संबंध प्रस्थापित केले जातील. माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या दुराग्रहामुळे आणि विभाजनवादी गटांच्या दबावामुळे भारत-कॅनडा संबंध अतिशय वाईट टप्प्यावर पोहोचले होते; मात्र आता कार्नी यांच्या विजयामुळे दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा पूर्वपदावर येताना दिसू शकतात.
एका अत्यंत बेजबाबदार नेत्याप्रमाणे ट्रुडो यांनी निज्जर प्रकरण ज्यापद्धतीने ताणले, त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध अत्यंत बिघडले. भारत सरकारने या प्रकरणात हात असल्याच्या आरोपांचा ठामपणे निषेध केला होता; पण ट्रुडोंची बेतालशाही कायम राहिली. या पार्श्वभूमीवर ट्रुडो पर्वाचा अस्त होऊन कार्नी यांचे पुन्हा सत्तेवर येणे हे दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या द़ृष्टीने पडलेले एक मोठे पाऊल म्हणावे लागेल. आपल्या पूर्वसुरींपेक्षा वेगळे असणारे कार्नी आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मानित आर्थिक तज्ज्ञ आहेत. अत्यंत व्यवहार्यवादी राजकारणी आणि संतुलित वक्तव्य करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. निवडणूक काळात त्यांच्या ‘मजबूत कॅनडा, मुक्त कॅनडा’ या घोषणेने जनतेत चांगली पकड मिळवली. ट्रम्प यांच्या टॅरिफ युद्धाने आणि वारंवार कॅनडाला अमेरिकेचे 51वे राज्य बनवण्याच्या विधानांमुळे कॅनडाच्या जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. जनतेच्या या मनोवृत्तीचे अचूक आकलन करून कार्नी यांनी आपली निवडणूक रणनीती आखली आणि हे मुद्दे प्रभावीपणे मांडत पक्षाला पुन्हा सत्तेत आणले.
वास्तविक, जनमत चाचण्यांमध्ये लिबरल पक्ष पिछाडीवर होता; पण कार्नी यांच्या ठाम भूमिकांमुळे लिबरल पक्षाने सलग चौथ्यांदा सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीपूर्वी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पोलीवरे जनमत चाचण्यांमध्ये आघाडीवर होते; मात्र निकालानंतर त्यांनी पराभव स्वीकारला असून, त्यांना स्वतःची खासदारकीची जागाही राखता आली नाही. या निवडणुकीत एक ऐतिहासिक घटना घडली. ती म्हणजे, भारतीय वंशाचे 22 जण मुख्यतः पंजाबी वंशाचे उमेदवार कॅनडाच्या संसदेत निवडून आले. ही आजवरची सर्वाधिक संख्या आहे. यंदा एकूण 65 पंजाबी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भारतीय-कॅनेडियन समुदाय हा आता कॅनडामधील प्रभावशाली आणि निर्णायक मतदारवर्ग म्हणून उदयास आला आहे. विशेषतः ब्रॅम्पटन, मिसिसॉगा, सरे आणि व्हँकुव्हर परिसरात या समुदायाचा प्रभाव निर्णायक ठरतो आहे. या निवडणुकीत एनडीपी पक्षाचे नेते जगमीत सिंह यांना मोठा धक्का बसला आहे. खालिस्तान समर्थक म्हणून ओळखल्या जाणार्या सिंह यांना ब्रिटिश कोलंबियामधील बर्नाबी सेंट्रल मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. तसेच एनडीपी पक्ष केवळ 12 जागा जिंकण्याचे लक्ष्यही पार करू शकला नाही. एकूण 343 जागांवर उमेदवार उभे करणार्या या पक्षाचा हा अत्यंत निराशाजनक परफॉर्मन्स ठरला आहे. परिणामी, निवडणूक निकालानंतर जगमीत सिंह यांनी पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही गमावला आहे. यशस्वी केंद्रीय बँकर आणि अनुभवी गुंतवणूकदार असणार्या कार्नी यांना भारतीय बाजारपेठेशी अधिक चांगले संबंध निर्माण करायचे आहेत. त्यामुळे त्यांचे पुनरागमन आणि भारतविरोधी तत्त्वांमध्ये झालेली घट यामुळे कॅनडासोबतच्या व्यापार चर्चा नव्याने सुरू होणे, विद्यार्थ्यांसाठी व्हिसा सुविधा वाढवणे आणि स्थलांतर धोरणांमध्ये स्थैर्य निर्माण होण्याची आशा निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छांमध्ये मजबूत भागीदारीबाबत भारताची तयारी दिसून येते.
कॅनडामध्ये सुमारे 28 लाख भारतीय आणि भारतीय मूळ असलेले लोक वास्तव्यास आहेत. तात्पुरत्या नोकर्यांमध्ये तर काही विद्यार्थी आहेत. यापैकी अनेक जण कॅनडाचे कायमस्वरूपी नागरिक बनले आहेत. कॅनडामध्ये सध्या सुमारे 4.27 लाख भारतीय विद्यार्थी आहेत, जे तेथील शिक्षण व्यवस्था आणि रोजगार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील तणावामुळे हजारो भारतीय विद्यार्थी आणि स्थलांतरितांचे भवितव्य प्रभावित झाले होते. व्हिसा प्रक्रियेत विलंब, शिक्षणानंतरच्या रोजगाराबाबत चिंता आणि संभाव्य तणावपूर्ण वातावरणामुळे या ‘स्वप्ननगरी’ची प्रतिमा धूसर झाली होती. सध्याच्या परिस्थितीत कार्नी प्रशासनाने या वर्गासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. याचे कारण, हा वर्ग कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधी डॉलर्सचे योगदान देतो आणि कुशल मनुष्यबळाची उणीव दूर करतो. भारतानेही ट्रुडो काळातील कटुतेला मागे टाकून नव्या संबंधांसाठी सहकार्याची भूमिका घ्यायला हवी. कार्नी प्रशासन खालिस्तानी अतिरेकी व स्थलांतरासंदर्भातील कट्टर विचारसरणी यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर कितपत प्रभावीपणे काम करते, याचा वेध घेऊन भारताने आपली पुढील रणनीती ठरवायला हवी.
भारत-कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 2024 मध्ये सुमारे 11.36 अब्ज कॅनेडियन डॉलर्स म्हणजेच 69,368 कोटी रुपये इतका होता. 2023 मधील 10.74 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपेक्षा (सुमारे 65,723 कोटी) गतवर्षी काहीशी वाढ झाली होती. कॅनडाकडून भारतात खनिज इंधन, खतं, मांस व मासे आणि लाकूड व लाकडी उत्पादने आयात केली जातात, तर भारत औषधनिर्मिती, यंत्रसामग्री, तयार वस्त्र, जैविक रसायने आणि कृषी उत्पादनांची निर्यात कॅनडाला करतो. जगात बदलत चाललेली व्यवस्था आणि अमेरिकेतील राजकारणातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा यांच्यात हवामान बदल, शिक्षण आणि डिजिटल नवोन्मेष यासारख्या क्षेत्रांत सखोल सहकार्याची शक्यता आहे. कार्नी यांच्या विजयामुळे भारत-कॅनडा संबंधांतील तणावाचा बर्फ वितळण्यास सुरुवात होईल आणि विश्वासाच्या दिशेने वाटचाल होईल, अशी आशा आहे. माजी बँकर असलेल्या कार्नी यांनी परस्पर सन्मानाने दोन्ही देशांतील संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे म्हटले असल्याने बदलासाठीची पायवाट तयार झाली आहे.