Modern War Strategy | समृद्ध युद्ध पद्धतीकडे आगेकूच

march-towards-advanced-warfare
Modern War Strategy | समृद्ध युद्ध पद्धतीकडे आगेकूचPudhari File Photo
Published on
Updated on

ब्रिगेडियर हेमंत महाजन

भारतीय लष्कराने पारंपरिक लष्करी रचनेत एक मोठा आणि दूरगामी बदल सुरू केला आहे. सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि जलद आणि अचूक कारवाई करण्यासाठी लष्कराने दोन इन्फन्ट्री ब्रिगेडची पुनर्रचना केली आहे. या इन्फन्ट्री ब्रिगेडना भारतीय सैन्याने ’रुद्र ब्रिगेड’मध्ये रूपांतरित केले आहे.

आधुनिक युद्धाच्या बदलत्या स्वरूपात तंत्रज्ञान, वेग आणि लवचिकता या तीन गोष्टी अत्यंत निर्णायक ठरत आहेत. त्यामुळे एकात्मिक, सर्वसमावेशक, जलद प्रतिसाद देणार्‍या दलांची गरज वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी यंदाच्या ‘कारगिल विजय दिना’निमित्त रुद्र ब्रिगेड संकल्पनेचा ओनामा केला. भारतीय लष्कराच्या बदलत्या द़ृष्टिकोनाची ठळक साक्ष म्हणून याकडे पाहायला हवे. रुद्र ब्रिगेड म्हणजे एकाच संघटनेत पायदळ, यांत्रिक पायदळ, बख्तरबंद दल, तोफखाना, विशेष दल आणि मानवरहित हवाई प्रणाली यांचा संगम. ही केवळ एक लष्करी रचना नसून भविष्यातील युद्धनीतीला आकार देणारी, बहुआयामी लढाऊ यंत्रणा आहे. पारंपरिक पायदळ बटालियनला मर्यादित क्षेत्रात व पारंपरिक पद्धतीने लढण्याची सवय असते. सशस्त्र दल आणि तोफखाना यांची कामे वेगळी असतात; पण आधुनिक युद्धात वेळ व समन्वय हे दोन घटक सर्वात महत्त्वाचे असल्यामुळे विविध शाखांची स्वतंत्र तुकडी म्हणून लढण्याची पद्धत कमी परिणामकारक ठरते. रुद्र ब्रिगेड ही पोकळी किंवा उणीव भरून काढणार आहे.

या ब्रिगेडची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची लवचिकता. मैदानी भागात ही ब्रिगेड सशस्त्र रेजिमेंट, यांत्रिक पायदळ आणि स्वयंचलित तोफखाना घेऊन जलद आक्रमण करू शकते. डोंगराळ भागात मात्र ती पायदळ बटालियन, पर्वतीय तोफखाना आणि हलक्या वाहनांच्या सहाय्याने लढू शकते. एलओसी किंवा संवेदनशील सीमावर्ती भागात विशेष दल आणि पायदळ यांच्या समन्वयाने अचानक कारवाया करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे ही ब्रिगेड केवळ एक लढाऊ तुकडी नसून परिस्थितीनुसार बदलणारे युद्धतंत्र आहे. याचबरोबर भैरव लाईट कमांडो बटालियन नावाचे एक नवे, हलके पण अत्यंत घातक कमांडो युनिट तयार करण्यात आले आहे. ते शत्रूला अनपेक्षितपणे धक्का देण्यास सज्ज आहे. हे बदल केवळ संरचनात्मक नाहीत, तर भारताच्या संरक्षण क्षमतेला एका नव्या उंचीवर नेणारे आहेत.

रुद्र ब्रिगेडची निर्मिती ही इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप (आयबीजी) या संकल्पनेशी सुसंगत आहे. आयबीजी संकल्पना ही कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिनच्या चौकटीत बसते. कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिनचा मुख्य उद्देश म्हणजे सीमारेषेवर त्वरित लष्करी कारवाई करणे, शत्रूला प्रतिक्रिया देण्याची संधी न देता त्याच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर आघात करणे. भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही कल्पना अनेक वर्षे चर्चेत होती; परंतु तिची अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि एकात्मिक तुकड्या या गोष्टींची गरज होती, जी आता पूर्ण होत आहे. याचवेळी भैरव लाईट कमांडो बटालियन लहान आकार, जास्त हालचाल क्षमता आणि विशिष्ट प्रशिक्षण यामुळे या शत्रूच्या पुरवठा साखळ्या उद्ध्वस्त करू शकते. रुद्र ब्रिगेड आणि भैरव बटालियन यांच्या समन्वयातून सीमारेषेवरील लढाईचे स्वरूप पूर्णतः बदलू शकते.

भारताच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी, दहशतवादी कारवाया आणि सीमेपलीकडून होणारा तोफगोळ्यांचा मारा ही दीर्घकाळाची समस्या आहे. पूर्वेकडे चीनसोबतच्या सीमावादाने विशेषतः गलवाननंतर लष्कराची द़ृष्टी अधिक सजग आणि आक्रमक झाली आहे. दोन्ही सीमांवर भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्यामुळे एकाच प्रकारची लष्करी रचना सर्वत्र उपयोगी पडत नाही. रुद्र ब्रिगेडची लवचिक रचना हा यावरचा योग्य प्रतिसाद आहे. तांत्रिक द़ृष्ट्या पाहता अशा ब्रिगेडमध्ये सर्व शाखांचे एकत्रित प्रशिक्षण आवश्यक आहे. पायदळाला सहस्र दलासोबत, तोफखान्याला ड्रोन पथकाशी, विशेष दलाला यांत्रिक पायदळासोबत सराव करावा लागेल. यामुळे युद्धभूमीवर प्रत्येक घटकाला इतर घटकांच्या क्षमता, मर्यादा आणि युद्धतंत्र समजेल. अशा प्रकारचे क्रॉस-डोमेन प्रशिक्षण सध्या जगातील अग्रगण्य सैन्यदलांमध्ये आवश्यक मानले जाते. लष्कराच्या हवाई संरक्षण व्यवस्थेलाही आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि क्विक रिअ‍ॅक्शन सर्फेस-टू-एअर मिसाईलसारख्या स्वदेशी क्षेपणास्त्रांनी बळकट केले जात आहे. उदाहरणार्थ, एलएसीवर चीनच्या सैनिकांची हालचाल वाढली, तर रुद्र ब्रिगेडचे ड्रोन तत्काळ शत्रूची नेमकी स्थिती कळवतील, तोफा त्या ठिकाणी मारा करतील आणि विशेष दल घात लावून शत्रूला धक्का देतील. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींद्वारे हवाई संरक्षण मजबूत करण्यात आले आहे. या सर्व प्रणाली एआय आणि उपग्रह डेटा यांच्या साहाय्याने कार्यरत राहतील. तसेच शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर सतत लक्ष ठेवता येईल आणि हल्ल्यांची वेळ व ठिकाण अचूक ठरवता येईल. यामुळे सैनिकांचा धोका कमी होईल आणि लढाईतील परिणामकारकता वाढेल.

तथापि, अशा रचनेपुढे काही आव्हानेदेखील आहेत. पहिलं आव्हान म्हणजे समन्वयाचे. कारण, विविध शाखांची कार्यपद्धती वेगळी असल्यामुळे एकत्रित लढाईत समन्वय राखणे सोपे नसते. दुसरे म्हणजे रसदव्यवस्था. एकाच ब्रिगेडमध्ये विविध प्रकारची साधनं असल्याने पुरवठा व दुरुस्ती यंत्रणा गुंतागुंतीची होते. तिसरं म्हणजे प्रशिक्षण. अशा ब्रिगेडसाठी उच्च दर्जाचं, बहुप्रकारचं प्रशिक्षण आवश्यक आहे. जगात अशा प्रकारच्या एकात्मिक लढाऊ तुकड्या अनेक देशांत आहेत. अमेरिकन लष्करातील स्ट्रायकर ब्रिगेड, रशियन बटालियन टॅक्टिकल ग्रुप्स किंवा इस्रायली डिव्हिजनल टास्क फोर्स यांची उदाहरणं देता येतील. या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे, जलद हालचाल, उच्च अग्निशक्ती आणि परिस्थितीनुसार बदलणारी रचना. भारताची रुद्र ब्रिगेड ही याच पंक्तीत समाविष्ट झाली आहे.

भविष्यातील युद्ध फक्त पारंपरिक रणांगणावरच नसेल. सायबर हल्ले, माहिती युद्ध, ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्र प्रहार यामुळे युद्धाची दिशा व गती बदलत आहे. रुद्र ब्रिगेडमध्ये मानवरहित हवाई प्रणालीचा समावेश हा या बदलाची जाणीव दाखवतो. शत्रूवर हल्ला करण्यापूर्वी त्याची हालचाल, हत्यारे, ठिकाणे यांची नेमकी माहिती मिळाल्यास कारवाई अधिक प्रभावी होते. या संकल्पनेचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे भारतीय लष्कराची मानसिकता बदलणे. पारंपरिक, धिम्या गतीच्या दलांपासून जलद, आक्रमक आणि भविष्याभिमुख दलाकडे होणारी ही वाटचाल भारताच्या संरक्षण धोरणाला नव्या उंचीवर नेईल. सीमारेषेवरील प्रत्यक्ष कारवायांबरोबरच ही ब्रिगेड मानसिक दबाव निर्माण करण्याचे कामही करेल. शत्रूला हे लक्षात आले की, भारताकडे तत्काळ कारवाई करण्याची क्षमता आहे, तर त्याच्या आक्रमक हालचाली रोखल्या जाऊ शकतात. बदलत्या जागतिक आणि विभागीय परिस्थितीत भारताने आपली लष्करी शक्ती केवळ संख्येनेच नव्हे, तर गुणवत्तेनेही वाढवणे आवश्यकच आहे. यासंदर्भात रुद्र ब्रिगेड हा एक ठोस आणि निर्णायक पाऊल असून यामुळे भारतीय लष्कर 21व्या शतकातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news