

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनाकडून भरीव असा निधी भाषा प्रकल्पासाठी मिळेल, अशी अपेक्षा आहे. भाषेच्या संर्वधन, विकास आणि वाटचालीत महत्त्वाचे व पायाभूत ठरतील असे संस्थात्मक पातळीवरचे भाषाविषयक काम सुरू करता येणे शक्य आहे. भाषेच्या अंतरंगांचा व क्षमतांचा शोध घेणारे विद्यार्थी, अभ्यासक निर्माण होतील अशा वातावरणाची गरज आवश्यक आहे.
मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय ही जगभरातील मराठी भाषिकांच्या द़ृष्टीने आनंदाची बाब आहे. मराठीबरोबरच बंगाली, प्राकृत, पाली आणि आसामी या भाषांनादेखील अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून मराठी भाषिकांची ही मागणी प्रलंबित होती. भारतात विविध भाषांची थक्क वाटावी अशी विविधता आहे. संस्कृत, प्राकृत आणि देशी भाषांची संपन्न व समृद्ध परंपरा भारतभूमीत आहे. त्या त्या भाषेच्या वाटचालीस विकासास साहाय्य व्हावे म्हणून केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे धोरण सुरू केले. त्यानुसार 2004 साली तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम व ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. त्यानुसार त्या त्या राज्यांनी भाषाविषयक धोरण अंमलबजावणीत काहीएक कार्यवाही केली. संस्कृत भाषेचे विद्यापीठ स्थापन झाले. (ते आधीच होते) परंतु त्याचा विस्तार झाला. संस्कृत महाविद्यालये व जुन्या संस्कृत विद्येकडे शासनकर्त्यांनी लक्ष वेधले. दक्षिणेकडे भाषेची स्वतंत्र विद्यापीठे स्थापन झाली. तिरुअंनतपूरम येथे द्रविड भाषा अभ्यासाचे एक केंद्र सुरू करण्यात आले. तिथे कन्नड, तमिळ व मल्याळम भाषांचा अभ्यास सुरू आहे. द्रविडी भाषांचा तुलनात्मक अभ्यास, आदिवासी भटक्या समाजांच्या बोलींचा अभ्यास व द्रविडी भाषांच्या ऐतिहसिक वाटचालीचे संशोधन होत आहे.
राज्य शासनाने 2012 साली ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने मराठी भाषेसंबंधी सर्वांगीण अहवाल राज्य शासनास सादर केला. याबरोबरच या मागणीसाठी साहित्य संस्था व इतरही घटकांनी पाठपुरावा केला. काहीवेळा त्यास लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. या मागणीसाठी लाखो मंडळींनी केंद्र शासनास पत्रव्यवहार केला. लोकसभेत लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न मांडला. केंद्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे हा अहवाल सादर केल्यानंतर साहित्य अकादमीनेही यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. समाजातील सर्व घटकांकडून या मागणीस पाठिंबा मिळाला.
अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र शासनाने काही महत्त्वाचे निकष निश्चित केले होते. त्या त्या भाषेचे प्राचीनत्व, श्रेष्ठ वाङ्मयाची परंपरा, स्वतंत्र व स्वयंभू ग्रंथनिर्मिती व प्राचीन भाषेचा आधुनिक भाषेशी असणारा सांधा हे निकष मानले होते. तसे पाहता, भाषा उगमाविषयीच्या स्मृती या विरळ विरळ होत गेलेल्या असतात. भाषानिर्मिती उगमाचे संदर्भ क्षीण आणि विस्मृतीत गेलेले असतात. ते ग्रंथबद्ध वा लिपीबद्ध झाले तर त्या त्या भाषाकुळाचा व प्राचीनत्वाचा उगमशोध घेणे शक्य होते. याबरोबर हेही लक्षात घ्यावे लागते की, भाषानिर्मिती उगम स्थानांचा व भाषा-भाषांमधील आंतरसंबंधाचाही शोध घेणे गुंतागुंतीचे असते. मराठीत जुन्या काळात अशा नामवंत भाषा अभ्यासकांची, श्रेष्ठ अभ्यासकांची परंपरा लाभली होती. या अभ्यासकांनी मराठीच्या उगम वाटचालीबद्दल विविध मते नोंदवून ठेवली आहेत. अभिजात मराठी भाषा समितीने मराठी भाषा उगम वाटचाल प्रवासाचा अभ्यासपूर्ण शोध या अहवालरूपात घेतला आहे. सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीचा मराठीच्या उगमाच्या खाणाखुणांचा हा शोध आहे. मराठीतील आद्य लोकसाहित्याच्या खुणा, शिलालेख, ताम्रपट व अन्य भाषांतील ग्रंथांमधील मराठी भाषेच्या अस्तित्वाचा मागोवा या अहवालात आहे. सातवाहन काळातील ‘गाथासप्तशती’ या ग्रंथात मराठीच्या अस्तित्वाच्या सर्वात जुन्या खुणा आहेत. ‘गाथासप्तशती’मध्ये महाराष्ट्र प्रदेश व मराठी माणसाच्या स्वभावाची वर्णने आहेत. महाराष्ट्रातील प्रदेश, नद्या, शेतीची वर्णने, सरकी-कपाशीची शेती, कमळ उद्यानांची काव्यात्म अशी वर्णने ‘गाथासप्तशती’मध्ये आहेत. आरंभ काळात मराठीचे प्राकृत, संस्कृत, जैन-प्राकृत भाषांशी नाते होते. सुप्रसिद्ध साहित्यिक भालंचद्र नेमाडे यांच्या आगामी काव्यसंग्रहाचे शीर्षक ‘सट्टक’ असे आहे. ‘सट्टक’ म्हणजे नवव्या शतकातील प्राकृत भाषेतील लोकनाट्याचे एक नाव. अनेक नामवंत भाषा अभ्यासकांनी मराठीचे नाते प्राकृत भाषांशी असल्याचे सिद्ध केले आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी पाऊड (प्रकट) भाषा ही वाहती असल्याचे म्हटले आहे. ही भाषा सर्वांची व सर्वसामान्यांची होती. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मराठीचा उगमकाळ दुसर्या शतकात नोंदवला आहे. मराठी ही संस्कृतपासून दूर होती, असे त्यांचे म्हणणे होते. जैन कवींनी आठव्या शतकात ‘महाराष्ट्री’ भाषेत उत्तम रचना केली असून, मराठीतील श्रेष्ठ ग्रंथनिर्मितीमुळे अभिजात वाङ्मयाच्या द़ृष्टीने मराठीचा दुसरा क्रमांक लागतो, हे शिंदे यांनी 1923 साली नोंदविले आहे. महागाव (ता. गडहिंग्लज) येथे जन्मलेले व कोल्हापुरात शिक्षण झालेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषा अभ्यासक डॉ. अमृत घाटगे (1913-2003) यांनीही प्राकृत जैन महाराष्ट्रीय भाषेस अभिजाततेचा दर्जा होता, असे म्हटले आहे. डॉ. घाटगे यांनी संस्कृत-प्राकृत-इंग्रजी व मराठी बोलीभाषांचा पायाभूत अभ्यास केला आहे.
बाराव्या शतकात मराठीत प्रगल्भ आणि परिणत स्वरूपाच्या ग्रंथांची निर्मिती झाली. महानुभाव व वारकरी संतकवींच्या वाङ्मयनिर्मितीने महाराष्ट्राच्या वैभवशाली समृद्ध परंपरेचे चित्र दर्शविले. बाराव्या-तेराव्या शतकातील मराठीतील ग्रंथनिर्मितीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या काळातील मराठी वाङ्मयाची भाषा ही सर्वसमावेशक, तत्त्वचर्चाप्रधान, काव्यात्म व खास देशी शब्दकळा असणारी आहे. त्यामुळे ज्ञानदेव, नामदेवांच्या भाषेला ‘देशीकार लेणे’ म्हटले गेले.
अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर केंद्र शासनाकडून भरीव असा निधी भाषा प्रकल्पासाठी मिळेल, अशी अपेक्षा आहे. भाषेच्या संर्वधन, विकास आणि वाटचालीत महत्त्वाचे व पायाभूत ठरतील असे संस्थात्मक पातळीवरचे भाषाविषयक काम सुरू करता येणे शक्य आहे. भाषा-बोलीभाषा, प्राचीन साहित्य हस्तलिखितांचे संशोधन व प्रकाशनाचे काम हाती घेतले जाईल. भाषा क्षेत्रात निष्ठेने काम करणार्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठांमध्ये अभिजात भाषेची अध्यासन केंद्रे कार्यान्वित होतील. यामध्ये दुर्मीळ हस्तलिखिते, ग्रंथ जतन-संवर्धन क्षेत्र, भाषांतरविद्या, प्रकाशन व्यवसाय व डिजिटल मीडिया या क्षेत्रांत रोजगार कौशल्यसेवेच्या संधी निर्माण होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या द़ृष्टीने मराठीच्या क्षमतांचा विकास व कार्यप्रणाली विकसित होईल, अशी साधने निर्माण करणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, त्यासंदर्भातील धोरणात्मक व अंमलबजावणीत्मक चित्र फारसे दिसत नाही. भाषासाहित्याच्या संकलन, संशोधन विकासासाठी विद्यापीठांचा व मराठी विभागांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, यामध्ये एक उणीव अशी आहे की, महाराष्ट्रातील विद्यापीठांतील मराठी विभागांतील प्राध्यापकपदाच्या जागा वर्षानुवर्षे रिक्त आहेत. याकडे शासनाचे फारसे लक्ष नाही आणि हे चित्र फार केविलजनक आहे.
जगभरातील मूलभूत ग्रंथांची मराठीत भाषांतरे व्हायला हवीत. त्यासाठीची भाषा ही सुलभ व मराठी वळणाची असायला हवी. बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषासाहित्याच्या विकासासाठी काही चांगल्या बाबी करता येणे शक्य आहे. याद़ृष्टीने ‘तंजावरविद्या’ व ‘बडोदाविद्ये’संबंधी मराठी भाषाविषयक काम आजही अभ्यासकांच्या प्रतीक्षेत आहे. हे जग तंत्रज्ञानाचे जग आहे. त्यामुळे नवी तंत्रसाधनाला आवश्यक असणारी भाषा निर्माण करावी लागणार आहे. विविध प्रकारच्या कोशवाङ्मयाची निर्मिती हीदेखील काळाची गरज आहे. तसेच माध्यमांतील मराठी भाषा अधिक सक्रिय व साजेशी व्हायला हवी. आधुनिकीकरणाच्या टप्प्यावर खूप मोठा देशी शब्द संग्रह हद्दपारीच्या वाटेवर आहे. हा शब्दनिधी मराठीचे संचित आहे. त्याचे त्याचे शास्त्रीय संकलन व अभ्यास होणे गरजेचे आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आजघडीला वेगवेगळ्या भाषांमध्ये रूची असणार्या भाषा अभ्यासकांची वानवा आहे. भाषेच्या अंतरंगाचा व क्षमतांचा शोध घेणारी विद्यार्थी, अभ्यासक निर्माण होतील अशा वातावरणाची गरज आवश्यक आहे. विविध भाषासंस्था व भाषाविषयक एवढेच नव्हे, तर वाङ्मयीन नियतकालिकांची स्थिती क्षीण झालेली आहे. विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाने केलेले कार्य ऐतिहासिक होते. ते आता अस्तित्वातच नाही. महाराष्ट्रातील विखुरलेली दुर्मीळ हस्तलिखिते, ग्रंथ अजूनही प्रकाशित नाहीत. हे चित्र बदलायचे असेल आणि मराठीच्या क्षमतांचा अधिक सक्रिय विस्तार करण्यासाठी ‘जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी। की परिमळांमाजी कस्तुरी। तैसी भाषांमाजी साजिरी। मराठिया’ - असे मानणार्या परंपरेचा (फादर स्टीफन्स) आणि वैभवशाली मराठीच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी गरज आहे ती सामूहिक इच्छाशक्तीची.