Cannes Film Festival | ‘कान्स’चा मराठी चेहरा

Cannes Film Festival |
Cannes Film Festival | ‘कान्स’चा मराठी चेहरा
Published on
Updated on

कावेरी गिरी

फ्रान्समधील Cannes Film Festival म्हटले की, डोळ्यांसमोर उभे राहते, ते जगभरातील चित्रपटतार्‍यांचे ग्लॅमरस रेड कार्पेट, कॅमेर्‍यांची चमक आणि प्रतिष्ठेचा सर्वोच्च क्षण. अनेक दशकांपासून हा सोहळा केवळ हॉलीवूड किंवा बॉलीवूडपुरता मर्यादित नसून, जगभरातील प्रादेशिक चित्रपटसृष्टींसाठीही आपली ताकद दाखवण्याचे व्यासपीठ ठरला आहे. यंदाच्या ‘कान्स 2026’मध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, पुष्कर जोग आणि अंकिता प्रभू-वालावलकर यांच्या उपस्थितीने मराठी चित्रपटसृष्टीचा जागतिक चेहरा पुन्हा चर्चेत आला.

एकेकाळी मराठी सिनेमा हा मुख्यतः महाराष्ट्रापुरता मर्यादित मानला जायचा. कमी बजेट, मर्यादित प्रेक्षकवर्ग आणि वितरणाच्या अडचणींमुळे त्याची पोहोच मर्यादित होती; पण आज हे चित्र बदलत आहे. मराठी कथा, कलाकार आणि संवेदना आता जगाच्या रंगमंचावर पोहोचत आहेत. कान्समधील ही उपस्थिती केवळ ग्लॅमरचा भाग नसून, मराठी सिनेमाच्या बदलत्या प्रवासाची खूण आहे.

‘कान्स’ म्हणजे फक्त रेड कार्पेट नाही

प्रेक्षकांसाठी ‘कान्स’ म्हणजे रेड कार्पेटवरील फॅशन आणि सेलिब्रिटींची उपस्थिती; पण प्रत्यक्षात हा महोत्सव जागतिक चित्रपटसृष्टीचे महत्त्वाचं व्यासपीठ आहे. येथे जगभरातील चित्रपट सादर होतात, वितरक भेटतात, आंतरराष्ट्रीय सहनिर्मितीचे करार होतात आणि नवीन सिनेमाला जागतिक प्रेक्षक मिळतात. मराठी सिनेमासाठी ही संधी मोठी आहे. कारण, स्थानिक भाषेत सांगितलेल्या कथा आता जागतिक पातळीवर समजल्या जात आहेत. उपशीर्षक यांच्या माध्यमातून भाषा हा अडथळा राहिलेला नाही.

यंदाचे मराठी चेहरे आणि त्यांचे प्रतीकात्मक महत्त्व

यंदा ‘कान्स’मध्ये अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची उपस्थिती विशेष ठरली. मराठी प्रेक्षकांच्या पिढ्यान् पिढ्या मनावर राज्य करणार्‍या या जोडीने कान्सच्या रेड कार्पेटवर चालणे म्हणजे मराठी सिनेमाच्या प्रवासाला एक प्रकारची दाद मिळाल्यासारखे आहे. प्राजक्ता माळीने पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधत भारतीयतेचा ठसा उमटवला. तिची उपस्थिती केवळ अभिनेत्री म्हणून नाही, तर नव्या पिढीच्या आत्मविश्वासपूर्ण मराठी चेहर्‍याचे प्रतिनिधित्व करत होती. पुष्कर जोग आणि अंकिता प्रभू-वालावलकर यांच्यासारख्या कलाकारांनीही जागतिक व्यासपीठावर मराठी मनोरंजनविश्वाची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

ओटीटीमुळे खुललेली नवी दारे

मराठी सिनेमाच्या जागतिक प्रवासात ओटीटी प्लॅटफॉर्म्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर मराठी चित्रपट उपलब्ध झाल्याने जगभरातील प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचू लागले. पूर्वी मराठी चित्रपट पाहण्यासाठी महाराष्ट्रात असणे आवश्यक होते. आता अमेरिकेतील, युरोपमधील किंवा जपानमधील प्रेक्षकही मराठी कथा अनुभवू शकतात. या वाढत्या ट्रेंडिंगमुळे कान्ससारख्या महोत्सवांमध्ये मराठी सिनेमाविषयी उत्सुकता वाढली आहे.

‘लोकल’मध्येच दडलेली ‘ग्लोबल’ ताकद

आज जागतिक प्रेक्षकांना कृत्रिम भव्यतेपेक्षा प्रामाणिक कथा आकर्षित करतात. मराठी सिनेमा नेहमीच माणसांच्या नात्यांवर, ग्रामीण वास्तवावर, सामाजिक प्रश्नांवर आणि संवेदनशील कथांवर आधारित राहिला आहे. हीच त्याची ताकद आहे. जगाला आज महाराष्ट्रातील गाव, इथली माणसं, त्यांचे संघर्ष आणि संस्कृती जाणून घ्यायची आहे. त्यामुळे मराठी कथा लोकल असूनही ग्लोबल बनत आहेत.

ग्लॅमरच्या पलीकडचे महत्त्व

कान्समध्ये दिसणारी रेड कार्पेटवरील छायाचित्रे मोहक असतात; पण त्यामागे संधींची मोठी दुनिया असते. तिथे उपस्थिती म्हणजे नेटवर्किंग, चित्रपट खरेदीदारांशी भेट, भविष्यातील सहकार्य आणि जागतिक माध्यमांचे लक्ष. यंदाच्या ‘कान्स’मधील मराठी कलाकारांची उपस्थिती ही एक सुरुवात नाही, तर सुरू असलेल्या बदलाचे नवे चित्र आहे.

हा प्रवास आजचा नाही, तर...

मराठी कलाकारांची ‘कान्स’मधील उपस्थिती नवीन नाही; पण ती आता अधिक ठळकपणे दिसू लागली आहे. स्मिता पाटील यांसारख्या दिग्गज अभिनेत्रीने भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या हिंदी आणि आर्ट सिनेमातून अधिक परिचित असल्या, तरी त्यांची मुळे मराठी संस्कृतीत खोलवर रुजलेली होती. गेल्या काही वर्षांत छाया कदम यांचे नाव विशेषत्वाने पुढे आले. -ll We Imagine -s Light या चित्रपटामुळे त्यांची ‘कान्स’मध्ये उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. आंतरराष्ट्रीय समीक्षकांनी त्यांच्या अभिनयाची दखल घेतली. ही घटना मराठी कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news