

अमेरिकेत ’मराठी अस्तित्व’ हा मराठी भाषा आणि संस्कृती यांच्याबद्दल अभिमान वाढवणारा आगळावेगळा कार्यक्रम विविध शहरांमध्ये केला जात आहे. येथील सुमारे एक लाख मराठी कुटुंबांतील नव्या पिढीला या वैभवशाली ठेव्याची ओळख करून देणारा हा स्वागतार्ह उपक्रम म्हणावा लागेल. वॉशिंग्टन डीसी येथील मराठी कला मंडळाने त्याचे महाराष्ट्र दिनी आयोजन करून येथे मराठीचा अभिमान जागविण्याचे स्वागतार्ह काम केले.
अमेरिकेतून महाराष्ट्रात जातो, त्यावेळी आम्हाला मोठा सांस्कृतिक धक्का (कल्चरल शॉक ) बसतो. कारण, जिथे महाराष्ट्रीय संस्कृती, मराठी भाषा जपली जाईल, अशी अपेक्षा असते, तिथेच त्याची हेळसांड होताना पाहावे लागते. त्या तुलनेत आम्ही अमेरिकेत असूनही अधिक महाराष्ट्रीय आणि मराठी आहोत, अशी बोलकी प्रतिक्रिया आता अमेरिकेत स्थायिक झालेल्या; पण मूळ कोल्हापुरातील असलेल्या ऐश्वर्या हरेर या आयटी क्षेत्रातील महिलेकडून ऐकायला मिळाली. ‘मराठी अस्तित्व’ या आपल्या मूळ स्वत्वाची जाणीव करून देणार्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही खंत दखल घेण्याजोगी होती. वॉशिंग्टन डीसीच्या मराठी कला मंडळाचे अध्यक्ष मिलिंद प्रधान यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने याचे औचित्यपूर्ण आयोजन करून या विषयावर सर्वांनाच अंतर्मुख केले.
अमेरिकेत असणारे मराठीप्रेमी या भाषेकडे, त्या अनुषंगाने विकसित झालेल्या संस्कृतीच्या अमूल्य ठेव्याकडे किती आपुलकीने, प्रेमाने आणि अभिमानाने पाहतात, याचा अविस्मरणीय अनुभव ‘मराठी अस्तित्व’ने दिला. आपल्या या संस्कृतीच्या, परंपरेच्या वाटचालीचा अभिमान वाटावा अशा काही टप्प्यांचे स्मरण करताना अंगावर रोमांच उभे राहिले. नकळत भावनिक करून जाणार्या या अनुभवाची व्याप्ती केवळ करमणुकीपुरती न राहता हा ठेवा जपण्याची जबाबदारी आपल्या सर्व मराठी माणसांची आहे, याची जाणीव त्याने करून दिली. मराठीला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे हा कार्यक्रम करण्याची प्रेरणा या कलाकारांना मिळाली.
अमेरिकेत अलीकडे भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल असते. येथील एनआरआयची श्रीमंती बाजारपेठ भारतातील अनेक व्यावसायिक कलाकारांना कार्यक्रम सादर करण्यासाठी अधिक आकर्षक वाटू लागली आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत किंवा बॉलीवूड पद्धतीची करमणूक अशी सर्वसाधारण साचेबंद चौकट यातच हे सारे अडकले आहे. त्यामुळे येथील मूळ मराठीप्रेमी कलाकारांनी एकत्र येऊन या अतिशय वेगळ्या कार्यक्रमाची निर्मिती केली, हे अधिक कौतुकास्पद आहे.
मानसी जोशी बेडेकर आणि श्रेयस बेडेकर या उत्तम कलाकार असलेल्या दाम्पत्याने द़ृकश्राव्य माध्यमाच्या आधारे हा सांगितिक अनुभव दिग्दर्शित करताना महाराष्ट्राच्या, मराठीच्या इतिहासाचा जो अभ्यासपूर्ण धांडोळा घेतला, तो प्रवास ज्येष्ठांना महत्त्वाच्या पाऊलखुणांची आनंददायी उजळणी करून देणारा आणि नव्या पिढीला त्याची नवी ओळख करून देणारा होता. ‘मराठी अस्तित्व’ ही व्यक्तिरेखा इथे साकारण्यात आली असून ती प्रेक्षकांशी आपले मनोगत मोकळेपणे बोलून दाखवित आहे. ही व्यक्तिरेखा मानसी जोशी बेडेकर यांनी समर्थपणे उभी केली. वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि वळणांवर नेण्याचे काम त्यांची टिप्पणी करते. हे निवेदन आणि संहिता ही या कार्यक्रमाची ताकद आहे. महाराष्ट्रीयन भगवा फेटा परिधान केलेल्या मानसी यांचे निवेदन काहीसे काव्यमय, अंलकारिक असून त्या-त्या पाउलखुणांची समर्पक मोजक्या शब्दांत ओळख करून देण्याची किमया त्यांच्याकडे आहे. काही वेळा विनोदी अंगानेही त्या मार्मिक भाष्य करतात.
‘तुमच्या चेहर्यामागे असणारे स्वत्व आहे मी. प्रत्येक मराठी माणसाचे दायित्व आहे मी, तुमच्या नावे असणारा भगवा इतिहास आहे मी, नमस्कारातून हृदयात पोहोचणार्या संस्कृतीचा प्रवास आहे मी, तुम्हीच तुमच्या देवघरात जपलेला अनेक पिढ्यांचा संस्कार आहे मी, संतांनी पुण्यरूप दिलेला मराठी अस्तित्वाचा आकार आहे मी, मीच आहे श्रीकृष्णाने सांगितलेली गीता, मीच आहे तुकारामाची भिजलेली गाथा, मीच आहे ज्ञानेश्वर, मीच चोखामेळा, मीच आहे पांडुरंग आणि मीच तो विठ्ठल सावळा.’ एका अमूर्त व्यक्तिरेखेची ही सुरुवातीची अशी ही सुरेख ओळख प्रवासाची ओढ लावणारी होती.
महाराष्ट्र म्हटला की, समोर उभे राहतात संत ज्ञानेश्वर, त्यांचे पसायदान, संत तुकाराम, महाराष्ट्राचे दैवत पांडुरंग, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा पराक्रम. हे स्वराज्य व्हावे, ही तर श्रींचीच इच्छा होती; पण या इच्छापूर्तीसाठी अनेकांचा हातभार लागला. कित्येकांचे बलिदान कारणी लागले. मराठी इतिहासात असे कितीतरी मानाचे आणि अभिमानाचे क्षण आहेत की, त्यांचे आपण पाईक आहोत. त्या क्षणांचा साक्षी आहे, ते मराठीचे अस्तित्व. या अस्तित्वाच्या नजरेतून आपण हे सारे पाहतो. यात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासूनच्या अनेक घटनांची नोंद झाली आहे. लोकमान्य टिळक, त्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह अनेकांचे स्मरण इथे केले गेले आहे. यात दिग्गज समाजसुधारक, कलाकार, साहित्यिक, खेळाडू आदींचे धावते स्मरण करून दिले जाते. संगीत नाटके, मराठी चित्रपट यांचीही आठवण करून दिली जाते. पु. ल. देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, आदींच्या संदर्भानेही हा कॅनव्हास किती मोठा आहे, हे लक्षात येते. या प्रवासात भजने, संतवाणी, पोवाडे, लावण्या, कोळीगीते, ‘वद जाऊ कुणाला शरण ग’सारखे नाट्यगीत यांची योग्य सांगड घातली असून हा प्रवास कंटाळवाणा होणार नाही, याची खबरदारी घेतलेली आहे.
मराठी भाषा वेगवेगळ्या भागात कशी बोलली जाते, त्यात त्याचे सौंदर्य कसे दडलेले आहे, हेही मानसी बेडेकर यांनी त्या त्या बोली सादर करून आपल्या भाषेचे वैविध्य इथे सादर केले. न्यू जर्सीचे अक्षय अणावकर, सिटलच्या विभूती कविश्जवर आणि श्रेयस बेडेकर हे किती ताकदीचे गायक आहेत, हे यातून लक्षात आले. तबलावादक केतन सहस्रबुद्धे यांचीही कामगिरी लक्षवेधी होती. भारतातून आलेले की बोर्ड प्लेअर ‘सारेगम’ फेम सत्यजित प्रभू यांचाही यात संगीत संयोजक म्हणून सहभाग होता. तसेच नितीश कुलकर्णी आणि आशिष शानबाग यांचाही कलाकार म्हणून या यशात मोठा वाटा होता. अवधूत गुप्ते यांनी या कार्यक्रमासाठी प्रेरणादायी गीतही (थीम साँग) गाऊन आपला सहभाग नोंदविला.
अलीकडच्या काळात मराठी संस्कृती आणि भाषेची जी घसरण होत आहे, त्याविषयीची चिंताही यात व्यक्त करण्यात आली. आपल्या संस्कृती आणि भाषेचा अभिमान आपण बाळगून, हा ठेवा जपायला हवा, असे आवाहन करण्यात आले. सध्या अनेक संस्कृतींच्या गलबलाटात आणि इंग्रजीच्या प्रभावामुळे मराठी भाषा आणि संस्कृती धोक्यात आली आहे. अमेरिकेत अनेक मराठी कुटुंबांतही मुलांना मराठी येत नाही. पालकही त्याबाबत उदासीन असतात. अशा काळात येथील मराठी मंडळे हा ठेवा जतन करून पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. दरवर्षी मराठीतील दिवाळी अंक काढतात. मराठी शिकविण्याचे वर्ग घेतात. पाडवा, संक्रांत, होळी, दिवाळी, गणपती उत्सव साजरे करून हे वैभव जपण्याचा प्रयत्न करतात. ग्रेस एंटरटेन्मेंट निर्मित ‘मराठी अस्तित्व’ हा कार्यक्रम याच हेतूने अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये आयोजित केला जात आहे. महाराष्ट्रात मराठीला दुय्यम स्थान मिळत असताना तिच्याविषयीचा अभिमान नव्या पिढीमध्ये जागविण्याचा अमेरिकेतील हा प्रामाणिक प्रयत्न खचितच स्वागतार्ह आहे.