

पं. विजयशास्त्री जोशी, अध्यात्म अभ्यासक
भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी मातीची गणेशमूर्ती तयार करून तिचे यथासांग पूजन करावे आणि वाहत्या पाण्यात ती मूर्ती विसर्जित करावी, असे शास्र सांगते. समृद्धी, प्रज्ञा, धन, ज्ञान आणि विज्ञान वृद्धिंगत व्हावे म्हणूनच गणेश चतुर्थी भक्तिभावाने साजरी केली जाते. भारतातच नव्हे, तर चीन, थायलंड, जपान, कंबोडिया आणि अफगाणिस्तान येथेही गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेशोत्सवाची खरी ताकद ही त्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकीत आहे.
भाद्रपद महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी हा बुद्धिदाता, विघ्नहर्ता, लंबोदर, विनायक, वक्रतुंड, मंगलमूर्ती अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणार्या गणरायाच्या आगमनाचा दिवस. श्रीगणेश हा पराक्रम व प्रज्ञेचा अधिपती आहे. भगवान शंकराचा ज्येष्ठ पुत्र आणि स्कंद अथवा कार्तिकेयाचा भाऊ असणारा गणपती हा शंकरशक्तीचे मूर्तिमंत रूप असल्यामुळे त्याला ‘शंकर-पार्वतीपुत्र’ असेही म्हणतात. प्रत्येक शुभकार्यासमयी, मंगलकार्याची सुरुवात करताना सर्वांत आधी गणेशपूजन करावे, असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. गणेश पूजनाने माता आपल्या पुत्रांसाठी सद्गुण व संस्कार लाभावेत अशी प्रार्थना करतात.
गणेशोत्सवाच्या तयारीसाठी चार-सहा महिन्यांपासून मूर्ती कारागीर विविध आकारांच्या मातीच्या गणेशमूर्ती घडवू लागतात. घरोघरी तसेच आकर्षक सजावट केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या जातात. ‘मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात मूर्तींची वाजतगाजत मिरवणूक काढत गणरायाचे आगमन होते आणि पुढचे काही दिवस संपूर्ण वातावरण मांगल्याने, चैतन्याने, उत्साहाने भारावून जाते. प्राणप्रतिष्ठा विधी करून गणेशमूर्तीमध्ये दैवी सत्त्वाचे आवाहन केले जाते. मंत्रोच्चार, षोड्शोपचार पूजा विधी, प्रसादरूपाने गोड पदार्थ, फुले, नारळ, गूळ, अक्षता अर्पण केल्या जातात. दररोज सकाळ-संध्याकाळ आरत्या व पूजा विधी केले जातात. रिती-परंपरेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस यथासांग पूजा करून गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात भाविक जड अंतःकरणाने गणरायाला निरोप देतात. पाण्यात विलयन हे जीवनचक्राचे, नश्वरतेचे आणि पुनर्निर्मितीचे प्रतीक मानले जाते.
श्रीगणेशाच्या जन्माविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा देवी गौरी स्नानासाठी गेल्या असता त्यांनी आपल्या अंगावरील उटण्यापासून पांढर्या शुभ्र देहाचा पुत्र निर्माण केला आणि त्याला घराच्या प्रवेशद्वारावर रक्षणासाठी नेमले. देवी गौरीने आज्ञा केली की, कोणालाही घरात प्रवेश करू देऊ नकोस. त्याच वेळी भगवान शंकर घरी आले; पण बालगणेशाने त्यांना थांबविले. इवल्याशा बालकाच्या या कृतीने भगवान शिव रुष्ट झाले आणि त्यांनी गणेशाचे मस्तक छेदन केले. देवी गौरीला याची माहिती झाल्यावर ती अतिशय शोकाकूल झाली. ते पाहून भगवान शंकरानी आपल्या गणांना आज्ञा केली की, ज्या प्राण्याचे मस्तक उत्तराभिमुख निद्रेत असेल ते ताबडतोब घेऊन या. गणांनी शोध घेतला आणि फक्त एक हत्ती अशा प्रकारे निद्रिस्त अवस्थेत आढळला. त्याचे मस्तक आणून शंकराच्या चरणी अपर्ण केले. हेच गजमुख गणेशाच्या धडाशी जोडले आणि त्यातून गणपती प्रकट झाला. भगवान शिवांनी त्याला वर दिला की, सर्व मंगलकार्यात तू प्रथम पूजनीय असशील. तद्नुसार धर्मशास्त्रांमध्ये विवाह, प्रवास, यज्ञ, अध्ययन, मोहीम अशा सर्व उपक्रमांपूर्वी गणेशपूजन करावे, असे सांगितले गेले आहे.
श्रीगणेश हा ज्ञानस्वरूप आणि आनंदस्वरूप आहे. छोटा मूषक त्याचे वाहन आहे. गणपती हा मूलाधार चक्राचा अधिष्ठाता मानला जातो. अथर्वशीर्षामध्ये ‘त्वं मूलाधार स्थितोऽसी नित्यम्’ असे म्हटले आहे. ऐहिक व आध्यात्मिक मार्गातील सर्व अडथळे दूर करून लौकिक यशही प्रदान करणारी देवता म्हणून गणेशाला विघ्नविनायक म्हटले जाते. गणपतीचे बीजाक्षर ‘गं’ हे असून ‘ओम् गं गणपतये नमः’ हा गणेश उपासनेचा बीजमंत्र आहे. गणपती हा ॐकार किंवा प्रणव यांचा प्रतीक आहे. प्रणव हा हिंदू धर्मातील प्रधान मंत्र आहे. कोणतेही कार्य त्याविना संपन्न होत नाही. म्हणून प्रत्येक कार्यापूर्वी गणेश स्मरण करण्याची प्रथा आहे. गणेशाचा गजमुख हा प्रणवरूप असल्याने तोच श्रेष्ठ प्रतीक ठरतो. गणेशाचे दोन चरण हे ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती मानले जातात. उंदरावर आरूढ होणे म्हणजे अहंकाराचा पराभव. त्याच्या हातातील अंकुश हे जगावर प्रभुत्व व दैवी सार्वभौमत्वाचे चिन्ह आहे.
गणेश हा आदि देव आहे. उंदीर हा लहान जीव, तर हत्ती हा सर्वांत मोठा प्राणी. हत्तीचे मस्तक धारण करणे व उंदरावर स्वार होणे याचा अर्थ असा की, सृष्टीतील सूक्ष्म ते स्थूल अशा सर्व प्राण्यांचा अधिपती तोच आहे. तत्त्वसमूह, इंद्रियसमूह, भूतसमूह इत्यादींचे नेतृत्व करणारा असल्याने गणपतीला ‘गणाध्यक्ष’ म्हटले जाते. वैष्णव संप्रदायातही गणपतीची पूजा केली जाते. त्याला थुंबिक्कै आळवार हे नाव दिले आहे.
गणरायाविषयीच्या अनेक पौराणिक कथा शास्त्रपुराणांमध्ये सांगितल्या आहेत. यातील एका कथेनुसार गणेशास मोदक अतिप्रिय आहेत. एकदा गणेश पूजेच्या दिवशी त्यांनी भक्तांकडून भरपूर मोदकांचा प्रसाद स्वीकारला. रात्री उंदरावर आरूढ होऊन जात असताना मार्गात सर्प दिसला. उंदीर घाबरून ठेचकाळला. त्यामुळे गणेश जमिनीवर कोसळले. त्यांच्या पोटातून मोदक बाहेर पडले. गणेशाने ते पुन्हा पोटात भरले व त्या सर्पाने उदर बांधून घेतले. हे द़ृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला. तेव्हा रुष्ट होऊन गणपतीने आपल्या एका सुळेने चंद्रास घायाळ केले व शाप दिला की, गणेश पूजेच्या दिवशी जो कोणी चंद्रदर्शन करील त्यास अपकीर्ती लाभेल; मात्र त्या दिवशी चुकून चंद्रदर्शन झाले, तर स्यमन्तक मणि प्रसंगातील श्रीकृष्णाची कथा ऐकली अथवा सांगितली, तर दोषनिवृत्ती होते. आणखी एक कथाही अतिशय उद्बोधक आहे. त्यानुसार एकदा गणेश व त्यांचा भाऊ कार्तिकेय यांच्यात अग्रज कोण, याविषयी वाद झाला. त्यावेळी भगवान शंकरांनी सांगितले की, जो जगप्रदक्षिणा करून प्रथम परत येईल, तो अग्रज असेल. कार्तिकेय तातडीने आपल्या मोरावर आरूढ होऊन जगप्रदक्षिणेस निघाला. गणेशाने मात्र आई-वडील हेच साक्षात विश्व आहेत, असे म्हणत माता-पिता यांची प्रदक्षिणा घातली. भगवान शिवांनी ती मान्य केली आणि गणेशाला अग्रज स्थान दिले. माता-पित्यांचे स्थान हे ईश्वराहून थोर आहे, हा या कथेमध्ये दडलेला संदेश मौलिक आहे.
गणपती उपनिषद गणेशाला परब्रह्म मानते. ब्रह्मवैवर्तपुराणातील गणेश खंडांत त्यांच्या अनेक आख्यायिका वर्णिल्या आहेत. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लम्बोदर, विघ्नराज, विनायक, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, बालचंद्र, गजानन, वक्रतुंड, सुरपर्ण, हेरंब, स्कन्दपूर्वज, सिद्धिविनायक, विघ्नेश्वर अशी गणपतीची अनेक रूपे आहेत.
भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी मातीची गणेशमूर्ती तयार करून तिचे यथासांग पूजन करावे आणि वाहत्या पाण्यात ती मूर्ती विसर्जित करावी, असे शास्त्र सांगते. या व्रताला सिद्धिविनायक व्रत म्हटले जाते. हे व्रत जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी, अपकीर्ती निवारणासाठी, कीर्ती पुनःप्राप्तीसाठी केले जाते. कृष्णाला स्यमन्तक मणि चोरीच्या खोट्या आरोपातून मुक्त होण्यासाठी नारदांनी हे व्रत सांगितले होते. महाभारतातील युद्धकाळी कृष्णाने युधिष्ठिरालाही याच व्रताची शिकवण दिली. देवांनी अमृतप्राप्तीसाठी, दामयन्तीने पती नलप्राप्तीसाठी, रामाने सीता परत मिळविण्यासाठी, इंद्राने वृत्रासुरवधासाठी, भगीरथाने गंगावतरणासाठी, द्रौपदीने व साम्बाने अनारोग्य निवारणासाठी हे व्रत केल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. या व्रताचे पालन श्रद्धेने करणार्या साधकास इच्छित फलप्राप्ती व अखेरीस परमपद प्राप्त होते. समृद्धी, प्रज्ञा, धन, ज्ञान आणि विज्ञान वृद्धिंगत व्हावे म्हणूनच गणेश चतुर्थी भक्तिभावाने साजरी केली जाते. गणेश चतुर्थी केवळ भारतातच नव्हे, तर चीन, थायलंड, जपान, कंबोडिया आणि अफगाणिस्तान येथेही साजरी केली जाते. चीनमध्ये ‘कांगी टेन’ नावाच्या देवतेची पूजा केली जाते. इंडोनेशियाच्या चलन नोटेवर गणेशाची प्रतिमा आहे. तसेच कंबोडियात त्याला ‘प्राह केनेस’ या रूपात पूजले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, श्रीगणेश हे महाभारताचे लेखक आहेत. महान ऋषी व्यास यांनी महाभारताचे कथन गणेशाला केले आणि गणेशाने ते अविरतपणे लिहिले.
गणेशोत्सवात केवळ धार्मिकतेला प्राधान्य नसते, तर सांस्कृतिक कार्यक्रमांतून स्थानिक कलांना व्यासपीठ मिळते. नाटिका, लोकनृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला अशा अनेक कलांचे दर्शन या उत्सवकाळात होते. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार्या गणेश मंडळांना महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठे स्थान आहे. अनेक गणेश मंडळे सामाजिक समस्यांवर आधारित नाट्यमय सजावटी करतात. पर्यावरण, जलसंकट, भ्रष्टाचार, स्त्रीशक्ती, विज्ञानविषयक माहिती अशा विविध विषयांची मांडणी केली जाते. त्यामुळे हा उत्सव विचारप्रवर्तक ठरतो.
गणेशोत्सवाचा प्रवास दीडशे वर्षांहून अधिक झाला आहे. या काळात समाज, राजकारण, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान यात अनेक बदल झाले. या सर्व बदलांशी गणेशोत्सवानेही स्वतःला जुळवून घेतले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा यांच्याबरोबरच परदेशात राहणारे भारतीय समुदायही मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, दुबई, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित केले जातात. यामुळे हा उत्सव भारतीय ओळखीचा एक जागतिक सांस्कृतिक ब्रँड बनला आहे. गणेशोत्सवाची खरी ताकद ही त्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकीत आहे. त्यामुळे हा लोकोत्सव केवळ धार्मिक न राहता समाज उन्नतीचे साधन व्हावा, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.