

विवेक कुलकर्णी
वर्षानुवर्षांची मेहनत, देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी आणि निवड समितीचा विश्वास या सगळ्याचा परिपाक म्हणजे भारतीय संघाची कॅप; मात्र ही कॅप परिधान केल्यानंतर लगेचच आपली गुणवत्ता सिद्ध करणे, हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. अशा काही सुदैवी खेळाडूंपैकी एक म्हणजे राजस्थानच्या श्री गंगानगरचा छोरा मानव सुथार!
काही खेळाडू पदार्पणातच अशी छाप सोडतात की, त्यांचे नाव क्रिकेटच्या इतिहासात कायमचे कोरले जाते. मानव सुथारची गाल कसोटतील दहा बळींची कामगिरी याच परंपरेची नवी आठवण करून देणारी आहे. मानवने अफगाणिस्तानविरुद्ध आपल्या पहिल्याच कसोटीत ६/३३ अशी शानदार कामगिरी केली होती. आता गालमध्येही त्याने एकाच कसोटीत १० बळी घेत आपले उपद्रवमूल्य आणखी एकदा अधोरेखित केले. पहिल्याच षटकात बळी मिळवणाऱ्या सुथारने त्या सामन्यात आपल्या डावखुऱ्या फिरकीची चुणूक दाखवली. कसोटी पदार्पणाच्या पहिल्या डावात पाच बळी घेणारा तो भारताचा केवळ दहावा गोलंदाज ठरला; पण गालमध्ये त्याने दाखवलेली झेप यापेक्षा कितीतरी मोठी होती. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात चार बळी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने सहा फलंदाजांना बाद केले. म्हणजे सामन्यात तब्बल दहा बळी! त्याच्या फिरकीसमोर श्रीलंकेचा डाव कोसळला आणि भारताने १६५ धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. सुथारच्या या कामगिरीने त्याला परदेशात एका कसोटीत दहा बळी घेणाऱ्या भारतीय फिरकीपटूंच्या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवून दिले. विशेष म्हणजे, परदेशात दहा बळी घेणारा तो भारताचा सर्वांत युवा फिरकीपटू ठरला.
सुथारची ही कामगिरी पदार्पणातील महान कामगिरींची आठवण करून देणारी आहे. अर्थात, पदार्पणातच दिलेली सहा बळींची झलक आणि त्यानंतरच्या दुसऱ्याच कसोटीत दहा बळींचा धमाका, हा प्रवास तितकाच लक्षवेधी आहे. भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पणातच धमाका करणाऱ्या खेळाडूंची यादी मोठी आहे. त्यात सर्वांत आधी आठवण येते ती नरेंद्र हिरवाणीची. १९८८ मध्ये चेन्नई येथे वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करणाऱ्या या लेगस्पिनरने पहिल्या डावात ८/६१ आणि दुसऱ्या डावात ८/७५ अशी अविश्वसनीय कामगिरी केली होती. सामन्यात १६/१३६! कसोटी पदार्पणातील सर्वाधिक बळींचा हा विक्रम आजही अबाधित आहे.
हिरवाणीचा विक्रम कदाचित सहज मोडला जाणारा नाही; मात्र पदार्पणात मोठा ठसा उमटवणाऱ्या भारतीय गोलंदाजांची परंपरा पुढे सुरू राहिली. मोहम्मद निस्सारने १९३२ मध्ये इंग्लंडविरुद्ध पाच बळी घेतले. वामनकुमार, अबिद अली, दिलीप दोशी, अमित मिश्रा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल यांनीही कसोटी पदार्पणात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेऊन आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द दमदारपणे सुरू केली. सुथारनेही आता या यादीत आपले नाव ठळकपणे नोंदवले आहे.
फलंदाजांच्या बाबतीतही पदार्पणातच इतिहास घडवणाऱ्यांची कमतरता नाही. शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणात १८७ धावांची वादळी खेळी करत कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश केला. पृथ्वी शॉनेही पदार्पणात शतक झळकावत आपली ओळख करून दिली. यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्याच कसोटीत १७१ धावांची संयमी पण भव्य खेळी केली. काही खेळाडूंच्या पदार्पणात शतक दिसते, काहींच्या हातून पाच बळी येतात, तर हिरवाणींसारख्यांच्या बाबतीत विक्रमांची बरसात होते. पदार्पणाची शैली वेगवेगळी; पण संदेश एकच, ‘हा खेळाडू मोठ्या मंचासाठी तयार आहे.’
मानव सुथारच्या बाबतीत आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. तो केवळ चेंडू फिरवणारा पारंपरिक डावखुरा फिरकीपटू नाही. त्याच्याकडे चेंडूला फ्लाईट देण्याची, ड्रिफ्ट निर्माण करण्याची आणि वेगात सूक्ष्म बदल करण्याची क्षमता आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. २०२२-२३ रणजी मोसमात राजस्थानकडून अवघ्या सहा सामन्यांत ३९ बळी घेत त्याने लक्ष वेधले होते. त्यानंतर दुलीप ट्रॉफीत ७/४९ आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १२० धावांची शतकी खेळी अशा कामगिरींनी त्याचा अष्टपैलू चेहरा समोर आला.
अर्थात, लक्षवेधी कामगिरी केली की, पुढे जबाबदारीही वाढते, अपेक्षाही वाढतात. गाल येथील दहा बळींमुळे सुथारसमोर अपेक्षांचा डोंगर उभा राहणार आहे. इतिहास सांगतो की, पदार्पणात मोठी कामगिरी करणे जितके अवघड असते, तितकेच त्या कामगिरीनंतर सातत्य राखणेही कठीण असते. हिरवाणीचे उदाहरण त्यासाठी पुरेसे आहे. पदार्पणात १६ बळी घेऊनही त्यांची कसोटी कारकीर्द १७ सामन्यांवर थांबली. म्हणूनच सुथारसाठी गालमधील दहा बळी हे अंतिम लक्ष्य नसून ही सुरुवात असली पाहिजे. पहिल्या कसोटीत सहा, दुसऱ्या कसोटीत दहा, ही आकडेवारी सांगते की, या तरुण डावखुऱ्या फिरकीपटूमध्ये काहीतरी विशेष आहे. आता त्याच्याकडून अपेक्षा विक्रमांची नसून सातत्याची असेल. पदार्पणात चमकणारे अनेक आले आणि काही काळाने विस्मृतीतही गेले. काहींनी मात्र त्या पहिल्या ठिणगीचे रूपांतर प्रदीर्घ कारकिर्दीच्या प्रकाशात केले. मानव सुथारसमोर आता नेमके हेच आव्हान आहे. गालमधील दहा बळींनी त्याने क्रिकेटविश्वाला स्वतःची ओळख करून दिली आहे. पुढची अनेक वर्षे हेच सातत्य कायम ठेवण्यात तो यशस्वी ठरत राहणार का, याचे उत्तर आता त्याच्या हातातील चेंडूत असणार आहे.