

प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ
गेल्या काही वर्षांमध्ये या गणेशोत्सवाचे रूप पालटले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रसायनमिश्रित कृत्रिम रंगांचा वापर, सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक, थर्माकोल, निर्माल्य या सर्वांमुळे पाणी प्रदूषणाला प्रचंड हातभार लागण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे डीजे, डॉल्बींच्या खणखणाटामुळे ध्वनिप्रदूषणही वाढले. या सर्वांना फाटा देऊन हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक कसा करता येईल, याचा विचार होणे ही काळाची गरज आहे. खुद्द पंतप्रधानांनीही ‘यंदा शाडूच्या मूर्तींचे पूजन करा, या उत्सवात पर्यावरणाचा जागर करा’ असे आवाहन केले आहे. सामूहिक संकल्प करून त्याचे काटेकोर पालन केल्यास हा उत्सव निसर्गस्नेही ठरेल.
सार्वजनिक गणेशोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा विचार मांडण्यासाठी या उत्सवाची सुरुवात केली; मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या उत्सवाचे रूप पालटले. आखीव-रेखीव मूर्ती बसवण्याच्या हट्टापायी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, आरास करण्यासाठी प्लास्टिकचा अतिवापर केला जाऊ लागला. घरगुती गणेशमूर्तीही प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवल्या जाऊ लागल्या आणि घरोघरी त्याचीच पूजा केली जाऊ लागली. मधल्या काळात पर्यावरणाची होणारी अतोनात हानी, त्यातून बिघडलेले ऋतूचक्र, हवामान बदल यांविषयी बर्याच प्रमाणात चर्चा झाल्या, जनजागृती झाली. आम्हीही गेल्या काही वर्षांपासून याबाबत प्रबोधन आणि जनजागृती करत आहोत. या सर्वांमधून अलीकडील काळात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, यासाठी केल्या जाणार्या प्रयत्नांना काही प्रमाणात साथ मिळत आहे. अलीकडेच देशाच्या पंतप्रधानांनीही यंदा शाडूच्या मूर्ती पुजून जुन्या परंपरेचं पालन करा. या उत्सवात पर्यावरणाचा जागर होऊ द्या, असे आवाहनही यावेळी पंतप्रधानांनी केले आहे. दहा वर्षांपूर्वीही पंतप्रधानांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव करणार्या काही संस्थांची नावे घेतली होती आणि त्यामध्ये आमच्या ‘निसर्गमित्र’ या संस्थेचाही समावेश होता. आज ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल या सर्वांविषयी समाजातील बहुतेकांना जाण आहे. अशावेळी राज्यात सर्वदूर साजरा केला जाणारा गणेशोत्सव पर्यावरणपूरक कसा करता येईल, याविषयी प्रत्येकाने विचार करणे ही काळाची गरज आहे.
पूर्वीच्या काळी गणेशाची मूर्ती ही मृत्तिकेपासून म्हणजे शाडूच्या मातीपासूनच बनवली जात असे. कालौघात शाडूची उपलब्धता कमी झाली आहे. तसेच त्यापासून केल्या जाणार्या मूर्तींच्या किमतीही तुलनेने वाढल्या आहेत. गतवर्षी ८०० ते १००० रुपये ही शाडूच्या मूर्तींची किमान किंमत होती. या मूर्ती वजनानेही जड असतात. या तिन्ही मर्यादा लक्षात आल्यामुळेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा पर्याय पुढे आला आणि पाहता पाहता तो कमालीचा लोकप्रियही झाला. प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे कॅल्शियम सल्फेट. शाडूच्या मूर्ती तयार करण्याचे काम कष्टदायी आहे. त्यातुलनेने प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती बनवणे काहीसे सुलभ आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस कृत्रिमरीत्या तयार करण्यात येत असल्यामुळे त्याची उपलब्धता मुबलक आहे. तसेच या मूर्ती साच्यामध्ये तयार करण्यात येत असल्याने कष्ट कमी आहेत. तसेच त्या वजनाने हलक्या असल्यामुळे त्यांची ने-आण करणे, घरी त्या बसवणे या गोष्टीही सुलभ आहेत. परिणामी, प्लास्टरच्या मूर्ती तयार करण्याचे प्रमाण वाढत गेले; पण कालांतराने असे लक्षात आले की, त्या मूर्ती विसर्जित झाल्यावर पाणी दूषित होते. त्यामुळे त्याला पर्याय काय, हा विचार पुढे आला. त्यातूनच मग कागदाच्या लगद्यापासून मूर्ती तयार केल्या जाऊ लागल्या. अर्थात, आजही अनेक कारागीर शाडूच्या मूर्ती तयार करतात; मात्र अनेकदा त्यांना विक्रीची भ्रांत असते. हे लक्षात घेऊन आम्ही गेली काही वर्षे ‘निसर्गमित्र’तर्फे लोकांचे प्रबोधन करणे, त्या मूर्तींची विक्री करण्याची जबाबदारी स्वीकारणे असे उपक्रम राबवत आहोत. त्याला चांगला प्रतिसादही लाभत आहे; पण सार्वजनिक गणेशोत्सवासाठी बहुतेक ठिकाणी प्लास्टरच्याच मूर्ती वापरल्या जातात असे दिसून आले आहे.
उंच मूर्ती बसवण्याचा ट्रेंड हेही यामागचे एक कारण आहे. शाडूच्या मूर्ती वजनाला जड असतात. तसेच त्या एवढ्या मोठ्या उंचीच्या बनवता येत नाहीत. त्यामुळे प्लॅस्टरशिवाय पर्याय नसतो. वास्तविक, कोणत्याही ग्रंथात, वेदात इतक्या उंच मूर्ती असाव्यात, असे लिहिलेले नाही किंवा तशी परंपराही नाही; मात्र मंडळांच्या आपापसांतील इर्ष्येेमुळे हा ट्रेंड रूढ झाला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांचेही प्रबोधन होणे गरजेचे आहे. काही मंडळांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन बदलही केला, तरीही गणेश मंडळांची प्रचंड संख्या लक्षात घेता पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करणार्यांचे प्रमाण बरेच कमी आहे. काही गणेश मंडळे मोठ्या मूर्ती आणून त्या कायमस्वरूपी उत्सवमूर्ती म्हणून ठेवतात. दरवर्षीच्या गणेशोत्सवाला त्याची लहान आकाराची प्रतिकृती तयार करून तिची पूजा आणि विसर्जन केले जाते. उत्सव संपल्यानंतर ती मोठी मूर्ती जतन केली जाते. अशाप्रकारचा विचार इतरही मंडळांनी करणे गरजेचे आहे.
कोकणात तांबड्या मातीपासूनही मूर्ती तयार केल्या जातात आणि त्या सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या मूर्तीची स्थापना करणे हेदेखील पर्यावरणपूरक आहे. गणेशमूर्तीचे घरी बादलीमध्ये विसर्जन करणे हाही एक पर्याय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून गणपती विसर्जनाच्या दिवशी जागोजागी कृत्रिम कुंड, हौद विसर्जनासाठी तयार केले जातात. त्यामध्ये मूर्तीचे विसर्जन करण्याबाबतही आता लोकांमध्ये मतपरिवर्तन झाल्याचे दिसते. तिथेही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती एका वेगळ्या कुंडात आणि शाडूच्या मूर्ती वेगळ्या कुंडात विसर्जित केल्या जातात. शाडू विरघळ्यावर तो पुन्हा पुढल्या वर्षीसाठी वापरता येतो. त्यामुळे मातीचा पुनर्वापरही होतो, निर्मितीकारांचाही खर्च कमी होतो. त्यामुळे हा पर्याय सहजस्वीकारार्ह आहे. आणखी एक संकल्पना म्हणजे मूर्तींचे दान करा. याला अनेकांचा विरोध असतो. मूर्तीचे दान केल्यानंतर त्या मूर्तीचे योग्य पद्धतीने विसर्जन करावे अशी लोकांची अपेक्षा असते. ती गैर नाही; मात्र योग्य प्रकारे विसर्जन झाल्यास लोक सकारात्मक प्रतिसाद देतात असेही अनेक ठिकाणी दिसून आले आहे.
शाडू पाण्याचे प्रदूषण करत नाही. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात तळाशी साठून राहते. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (नॅशनल केमिकल लॅबोरेटरी - एनसीएल) मागे एक नवी संकल्पना मांडली होती. त्यानुसार प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विसर्जन करण्यापूर्वी त्या पाण्यात अमोनियम बाय कार्बोनेट टाकावे. मूर्तीच्या उंचीनुसार हे द्रावण तयार करून त्यात मूर्ती ठेवल्यास ती विरघळते. विरघळण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरतेशेवटी जो गाळ राहतो त्याला कॅल्शियम कार्बोनेट म्हणतात. या कॅल्शियम कार्बोनेटपासून खडू तयार करता येऊ शकतो. या संकल्पनेला ‘श्री’ पासून ‘श्रीगणेशा’ असे नाव दिले होते. गाळ तळाशी बसल्यानंतर वर राहणारे पाणी अमोनियम सल्फेट असते. रासायनिक विघटनानंतर राहणारे हे पाणी पिकांसाठी खत म्हणून वापरता येऊ शकते. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणून किमान त्याचे विसर्जन आपण पर्यावरणपूरक पद्धतीने करू शकतो. हा पर्यायही आता अनेक जणांकडून अवलंबला जात आहे. तो व्यापक प्रमाणात वापरला गेल्यास विसर्जनातून होणारे पाण्याचे प्रदूषण थांबवण्यास हातभार लागेल.
गणेशमूर्ती रंगवण्यासाठी वापरल्या जाणार्या कृत्रिम रंगांमुळे पाणी दुषित होते. गणपती विसर्जनानंतर पाण्यातील जलचर मृत्युमुखी पडतात. या रंगांमध्ये रसायनांचा वापर असल्यामुळे त्यांचे मिश्रण झालेले पाणी जलचरांबरोबरच सर्वच प्राणीमात्रांसाठी घातक आहे. हाच मुद्दा रंगपंचमी, धुळवड साजरी करतानाही भेडसावतो. त्यामुळे रासायनिक रंगांचा वापर किमान पातळीवर आला पाहिजे. त्याला पर्याय म्हणून आम्ही नैसर्गिक रंग वापरण्याविषयी प्रबोधन करण्यास सुरुवात केली. वनस्पतीजन्य रंगांमुळे प्रदुषण होत नाही. शेंदरी नावाच्या वनस्पतीपासून शेंदरी किंवा केशरी रंग तयार करता येतो. पालकापासून हिरवा, मेंदीपासून तपकिरी, झेंडूपासून केशरी रंग तयार करता येतो. रंगपंचमीला असे रंग मिळतात. पळस, पांगारा, काटेसावर या वनस्पतींपासूनही अतिशय सुंदर रंग तयार करता येतात. मंजिष्ठा आणि बीट यांच्या मुळापासून, डाळिंब व बेल यांच्या सालीपासून रंग तयार करता येतो. या सर्व गोष्टी निसर्गतः मिळतात. त्यापासून रंग तयार करून या रंगांचा वापर मूर्ती रंगवण्यासाठी केल्यास रासायनिक रंगांमुळे होणारे पाण्याचे प्रदूषण टाळता येते.
प्लास्टिक, थर्माकोलपेक्षा पुठ्ठा, कागद यांचा वापर करावा. तसेच विविध वनस्पती, फुले वापरून सजावट केल्यास ती अधिक जिवंत ठरते आणि पर्यावरणाची हानीही टाळली जाते. पाण्यात प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) आणि रासायनिक रंगांचे अवशेष विरघळल्यामुळे सीओडी अर्थात केमिकल ऑक्सिजन डिमांडचे प्रमाण वाढते. उत्सवादरम्यान ते २७.७ ते ६७.७ मिलिग्रॅम प्रतिलिटर इतके उच्च पातळीवर पोहोचल्याचे चाचण्यांमध्ये आढळले आहे. जलचरांच्या जगण्यासाठी पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण चांगले असणे आवश्यक असते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार, मूर्ती विसर्जनानंतर आणि सणाच्या कालावधीत पाण्याच्या स्रोतांमध्ये डीओ म्हणजेच डिझॉलव्हड ऑक्सिजनचे प्रमाण घसरून ३.४ ते ५.३ मिलिग्रॅम प्रतिलिटर दरम्यान आले. ऑक्सिजनची ही घट जलचरांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
महानगरपालिकांच्या अहवालानुसार, केवळ एका गणेशोत्सवात पुणे आणि मुंबईसारख्या प्रमुख शहरांमध्ये लाखो मूर्तींचे विसर्जन होते. या विसर्जनामुळे हजारो टन प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंगांचा थर जलस्रोतांच्या तळाशी साचतो. शहरांमध्ये पालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो टन निर्माल्य (फुले, हार व पूजा साहित्य) नद्या आणि तलावांमध्ये जाण्यापासून वाचवले जाते, तरीही मोठ्या प्रमाणावर कचरा थेट जलस्रोतांमध्ये विखुरला जातो. अलीकडील काळात अनेक लोक विसर्जनावेळी निर्माल्य बाजूला ठेवताहेत. काही ठिकाणी पालिका-महापालिकांकडून कचराकुंडीची व्यवस्था केली जाते. अशा कुंड्यांमध्ये निर्माल्य टाकताना प्लास्टिक पिशवी काढून मग टाकावे. प्लास्टिक विरहीत टाकल्यास त्या निर्माल्यापासून चांगल्यापैकी कंपोस्ट खत तयार होते. त्याचा वापर झाडांसाठी करता येतो.