

सुनील माळी
निमित्त आहे एका खासगी वाहिनीवर दाखवण्यात येणारी 'मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ही मालिका अर्धवट स्थितीत बंद करण्याचा निर्णय. 'टीआरपी कमी पडतोय', हे मालिका बंद करण्यासाठी दाखवले जाणारे कारण खरेही असेल. जोतिरावांच्या विलक्षण क्रांतिकारी अग्निफुलांगत विचारांची धग लागून अस्वस्थ झालेला समाज तसेच सनातनी वैदिक (सध्याच्या भाषेत हिंदू) धर्मीय यांचा दबाव ही मालिका बंद करण्याच्या निर्णयामागे नसेलही..., पण तरीही या मालिकेच्या निमित्ताने समाजातील बांधवांना हाक मारावीशी वाटते... बांधवहो, जोतिराव समजून घ्या...
एखाद्या समाजाचा किंवा सनातनी वैदिकांचा वाहिनीवरील मालिकाभंगामागे हात असेल, असे म्हणायचे नसतानाही त्यांच्याशी का बोलावंसं वाटतंय ? त्याला काही कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे 'मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ही मालिका सुरू होण्याआधी तिच्यातील काही अंश घेऊन मालिकेची जाहिरात (त्या क्षेत्रातल्या भाषेत टिझर) करण्यात येत होती तेव्हा ती पाहून अनेक व्हॉट्स अप ग्रुपवर चलबिचल सुरू झालेली दिसत होती. एका समाजाविषयी तेढ निर्माण होईल, अशी अतिरेकी दृश्ये त्यात दाखवली जातील का ?, त्यांचा समाजसुधारणेत वाटा नव्हता का ? आदी मुद्दे त्यात होते. तसेच मुलींच्या शाळेत शिकवण्यासाठी जाणाऱ्या सावित्रीबाईंवर सनातन्यांकडून शेण फेकण्यात आल्याची घटना मालिकेत दाखवताना एका समाजाचे विद्यार्थी-मुले शेण फेकत असल्याचे दाखवण्यात आल्याने त्याचा काही संघटनांनी निषेध केला होता. ही शेणफेक मुलांनी केल्याचे उल्लेख कुठेच नाही तसेच काही जणांनी शेणफेक केल्याच्या त्या घटनेने संपूर्ण समाजाची बदनामी होते आहे, असे त्यांचे म्हणणे होते. याचबरोबर ब्राह्मण समाजातील काहींनी भगवान परशुराव यात्रा किंवा मोर्चाचेही आयोजन केले. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्यावरील या मालिकेच्या निमित्ताने ब्राह्मण-ब्राह्मणेतर अशी कटुताही दिसून आली. या साऱ्या मुद्द्यांमुळेच जोतिराव-सावित्रीबाईंबाबत सध्याच्या समाजाशी हितगुज करावं, असं वाटतं. तसंच जोतिरावांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून काही सामाजिक विचारांची देवघेव करावी, असं मनापासून वाटतं.
जोतिरावांना कसं समजून घ्यायचं ?, याचं विवेचन करण्याआधी असलेलं सर्वात महत्त्वाचं सूत्र मांडणं आवश्यक आहे. ते सूत्र असं आहे - कोणत्याही महापुरूषाचे विचार-कार्य-जीवनपट-चरित्र यांचा उपयोग दोन धर्मांमध्ये-जातींमध्ये-समूहांमध्ये फूट पाडण्यासाठी करायचा नसतो तर सर्व मानव समाज एकत्र सांधला जावा, यांसाठी करायचा असतो. महापुरूषाचे नाव घेऊन कोणी समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आणि त्याच्या प्रयत्नांना खड्यासारखे समाजाबाहेर टाकणे योग्य असते...
याच सूत्राच्या प्रकाशात आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजीमहाराज, शाहू महाराज, अण्णा भाऊ साठे, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, महर्षि कर्वे, अबुल कलम आझाद आदींकडे आणि या लिखाणाच्या निमित्तानं जोतिराव फुल्यांकडे पाहावे लागेल.
ब्राह्मणांपासून ते दलितांपर्यंत आणि हिंदु-मुस्लिमांपासून ते ख्रिश्चन-बौद्धांपर्यंतचे सर्व समाज सांधण्यासाठी-एकत्र बांधण्यासाठी सर्वच महापुरूषांनी केवळ आपल्या जाती-धर्माचा विचार केला नाही तर सर्व समाजाचा केला आणि त्यात जोतिरावांचे नाव ठसठशीतपणानं घ्यायला हवं.
जोतिराव हे एकाच ध्येय्याने वेडे झालेले समाजक्रांतिकारक होते आणि ते वेड होते समाजातल्या दीनदलित वर्गाला वर आणण्याचे. जातिभेदाच्या अन्याय्य चक्रात पिसत असलेल्या या वर्गाला अमानवी वागणूक मिळत होती. शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवण्यात येत असल्याने आर्थिक गांजणूक त्यांच्या वाट्याला आलेली होती. 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' एवढेच जोतिरावांना अपेक्षित होते, पण त्या वेळच्या कर्मठ-सनातनी वर्गाने या मागणीकडे दुर्लक्ष करीत आपल्या स्वार्थासाठी या दीनदलितांवरील अत्याचार सुरूच ठेवले होते. या सनातनी वर्गात प्रामुख्याने ब्राह्मण समाज असल्याने फुल्यांच्या धगधगत्या शब्दगोळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर झाला. 'भटा-ब्राह्मणांकडून होणारा अन्याय' असे शब्द त्यांच्या लिहिण्या-बोलण्यात सातत्याने येत. त्यामुळे जोतिराव हे ब्राह्मणांच्या विरोधी होते, असा समज त्यावेळी तयार झाला आणि अर्धवट माहितीमुळे तो अजूनही टिकून असल्याने काही संपूर्ण अभ्यास केलेले निवडक वगळता विद्यमान बहुसंख्य ब्रह्मवृंदाचे मानसही तसेच झाले आहे. अर्थात जोतिरावांबाबत पुरेशी माहिती नसल्याने त्यांना तशा फुलेविरोधी मानसाबाबत दोषही देता येणार नाही.
जोतिराव हे ब्राह्मणद्वेषी नव्हते, मग काय होते ? जोतिरावांचा विरोध ब्राह्मण समाजाला कधीच नव्हता. त्या समाजातील ब्राह्मण्यग्रस्त म्हणजेच स्वार्थासाठी विषमतेला खतपाणी घालणाऱ्या, अन्याय करणाऱ्या मंडळींनाच त्यांचा विरोध होता. दुर्दैवाने, अशांची संख्या त्या समाजात त्यावेळी भरपूर असल्याने जोतिराव संपूर्ण समाजाच्याच विरोधी असल्याची हाकाटी पिटली गेली. वैदिक धर्माचे कर्ते-धर्ते ब्राह्मणच असल्याने त्या धर्मातील तत्त्वेही ब्राह्मणांच्या फायद्याची आणि शूद्र-अतिशूद्र वर्गावर सर्रास अन्याय करणारी अशी रचली गेल्याने त्या धर्मावरही जोतिरावांनी आसूड ओढले, त्यांच्यातील विसंगती-फोलपणा-हास्यास्पदपणा-अन्यायीपणा दाखवून दिला, एवढेच नव्हे तर 'सार्वजनिक सत्यधर्म' या नव्या धर्माची स्थापना केली. नवे मंत्र-नवे अभंग नव्हे अखंड रचले, जणू समतेचे नवे वेदच निर्माण केले. धर्मसंस्थापकाचे क्रांतिकारी काम त्यांनी केले.
... पण माझ्या मित्रांनो, हे सर्व करीत असताना जोतिरावांनी सरसकट ब्राह्मण जातीचा कधी द्वेष केला नाही. ते म्हणत...
ख्रिस्त-महंमद-मांग-ब्राह्मणाशी
धरावे पोटाशी बंधुपरि...
जोतिरावांना ब्राह्मणांचा द्वेष केला असता तर त्यांना भावाप्रमाणे पोटाशी धरावे, असे का म्हटले असते ?
जोतिरावांचे सातत्याने ब्राह्मणांना एकच कळकळीचे म्हणणे होते... तुम्ही शूद्रातिशुद्रांना समानतेची वागणूक द्या. तुम्ही पशुंना शिवता, पशूचे मूत्र पवित्र म्हणून वापरता, मग तुमच्यासारख्याच माणसांची सावलीही तुम्हाला का नको असते ? आम्हीही माणसेच आहोत ना ? पण त्यावेळच्या कर्मठ मंडळींना जोतिरावांच्या कळकळीने पाझर फुटला नाही.
जोतिराव आपल्या काव्यरचनांना अखंड असे म्हणत. त्यातील काही अखंडांमध्ये त्यांनी ब्राह्मण समाजाला थेट हाक दिली आहे.
ब्राह्मणांनो, तुम्ही दुर्जन का होता ? | मानवा छळिता जोती म्हणे ||
विश्वकल्याणाची भाषा करणारे ब्राह्मण आपल्या स्वार्थासाठी समाजातील दुबळ्या वर्गाला का छळत आहेत, असा प्रश्न जोतिरावांना पडतो आणि 'ब्राह्मणांनो, तुम्ही दुर्जन होऊ नका, छळू नका', असे आवाहन ते करतात.
वैदिक धर्मामध्ये 'अहं ब्रह्मास्मि...' चा घोष आहे. मीच ब्रह्म आहे, म्हणजेच प्रत्येक माणसाच्याच नव्हे तर प्रत्येक प्राणिमात्रांच्या अंतर्यामी परब्रह्माची तीच एक शक्ती आहे, असे उपनिषदे सांगतात. 'तूच ते तत्त्व आहेस' असे सांगणारा 'तत्त्वमसि' हा मंत्रही त्यांच्याकडून करण्यात येतो. त्याचा संदर्भ देत जोतिराव म्हणतात...
मांग आर्यांमध्ये पाहू जाता खूण |, एक आत्मा जाण दोघांमध्ये ||
दोघेही सारीखे सर्व खाती पिती | इच्छा ती भोगीती सारखेच ||
मांग आर्य दोघे शोभा मानवांत, | दोघे वर्तनात एकसहा ||
सर्व ज्ञानामध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ, | कोणी नाही भ्रष्ट जोती म्हणे ||
मांग आणि आर्य म्हणजेच ब्राह्मणांमध्ये एकच आत्मा आहे. दोघेही सारखेच खातात-पितात, मानवांमध्ये दोघांनाही आदराचे स्थान आहे, त्यामुळे मांग ते भ्रष्ट आणि ब्राह्मण तो श्रेष्ठ असे कधीही नसते आणि 'कितीही झाला भ्रष्ट तरी ब्राह्मण तिन्ही लोकी श्रेष्ठ' असे तर कधीच नसते. आत्मज्ञानच सर्वश्रेष्ठ ठरते, हा जोतिरावांचा विचार सुस्पष्ट आहे.
भ्रष्ट आर्य तुम्ही सद्गुणी का व्हाना, | म्लेंच्छा कित्ता द्याना, जगामाजी ||
आत्मपरीक्षणा तुम्ही द्यावा थारा, | मत्सरा आवरा, जोती म्हणे ||
जुलूम केल्याने भ्रष्ट झालेल्या ब्राह्मणांनो, तुम्ही सद्गुणी का होत नाहीत, असा आर्त प्रश्न जोतिराव त्यांना विचारतात. तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि मत्सराला आवर घाला, असेही बजावयाला ते विसरत नाहीत.
बंधु आर्य राया दयावान व्हाना, | जाळून टाकावा, मनुग्रंथ ||
वेदांती म्हणता तुम्हा कैचा भेद, | लावा पाहू दाद, मनुज्यांची, ||
सांडू नका ख्रिस्ती मुसलमानास |, मांगामहारास, शुद्रासह ||
निर्धाराने धरी सद्विवेकास |, कित्ता संतानास जोती म्हणे ||
'तुम्ही दुर्जन होऊ नका, सद्गुणी व्हा', असे म्हटल्यानंतर जोतिराव ब्राह्मणांना 'दयावान व्हा', असे सांगतात आणि विशेष हृदयस्पर्शी बाब म्हणजे त्यांना ते 'बंधू' म्हणून हाक मारतात. आमचे बंधू आर्य राया, तुम्ही दयावान व्हा आणि विषमता, अन्याय भरलेला मनुस्मृतीचा ग्रंथ जाळून टाका, म्हणजे समानता येईल. तुम्ही स्वतःला वेदान्ती म्हणवता, मग तुम्हाला जातिभेद कसा सुचतो, असा खडा सवालही ते करतात. माणसांची, मानवतेची दाद लावा, असेही त्यांचे आवाहन आहे. ख्रिश्चन-मुसलमान-मांग-महार-शुद्र आदींना तुम्ही दूर करू नका आणि सद्विवेकाची कास धरा, अशी जोतिरावांची सूचना आहे.
ब्राह्मणांकडून शूद्रातिशुद्रांवर शतकानुशतके अन्याय होत आला आहे. तो आता थांबवून या प्रदीर्घ काळ झालेल्या अन्यायाबाबत त्या समाजाची तुम्ही माफी मागा, असे खडे आवाहन जोतिराव ब्राह्मणांना करतात. ते म्हणतात,
स्वतः आर्यभटे कंबरा बांधा ना |, क्षमा ती मागा ना || जगापाशी ||
शूद्र दासां तुम्ही विद्या बंद केली || घ्या ना ती साऊली || अंत्यजाची ||
शूद्रादीकां तुम्ही आधी मुके द्यावे || सत्याने वागावे || मानवांशी ||
ब्राह्मणांनो, तु्म्ही कृतघ्न का होतां || इंग्रजां निंदिता || जोती म्हणे ||
ब्राह्मणांनी सर्व समाजाशी सख्य साधावे, सर्वांनी एकदिलाने, एकजुटीने राहावे, भेदभाव करू नये, हीच कळकळ जोतिरावांच्या या विचारांत दिसून येते. मग असे असेल तर ते ब्राह्मणविरोधी कसे ठरतात ?
ब्राह्मण समाजाकडून करण्यात येणारी पूजा-अर्चा आणि त्यातून बहुजनांचे होत असलेले शोषण याविरोधात जोतिरावांनी लढा दिल्याने आपल्या अर्थार्जनाच्या भवितव्याची भीती पुरोहित वर्गाला वाटली, तर बहुजन समाज शिकल्याने आपल्याला मिळणाऱ्या कारकुनांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंतच्या नोकऱ्यांमध्येही वाटेकरी येतील, याचेही भय त्यांना होते. आपल्या वर्चस्वाला धक्का लागल्याने या प्रस्थापित वर्गाने जोतिरावांना विरोध केला. मात्र याचा अर्थ सर्वच ब्राह्मण समाज जोतिरावांच्या विरोधात होता, असा अर्थ कोणी लावला, तर ते चुकीचे ठरेल. जोतिरावांना अनेक उदार, काळाची पावले ओळखणाऱ्या सुहृद ब्राह्मणांनी मनापासून साथ दिली. जोतिरावांनी त्या काळातील दलितांच्या मुलींसाठी पहिली शाळा १८४८ मध्ये सुरू केली ती भिडे वाड्यात म्हणजे भिडे नावाच्या ब्राह्मणाने त्यांना आपली जागा दिली, एवढा तपशील आपल्यापैकी अनेकांना माहिती असतो, पण त्यापुढची दुसरी शाळा सुरू करायला अण्णासाहेब वासुदेव चिपळूणकर यांनी आपल्या वाड्यात जागा दिली ती ३ जुलै १८५१ रोजी आणि तिला मदत केली ती केशवराव जोशी-भवाळकर यांनी. या शाळांच्या कार्यकारी मंडळात कोणकोण होते ते पाहा. अण्णा सहस्त्रबुद्धे, बापूरावजी मांडे, विष्णू मोरेश्वर भिडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री पंडित आदी. जोतिरावांनी पहिल्या सात-आठ वर्षांत अनेक शाळा सुरू केल्या. त्यांच्या शाळेची परीक्षा घेतली ती
सरकारी देशी शाळांचे पर्यवेक्षक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी आणि मुला-मुलींच्या प्रगतीबद्दल समाधानही नोंदवून ठेवले.
जोतिरावांना वेळोवेळी ब्राह्मण समाजातील अनेक धुरिणांकडून मदत झालेली आहे. त्यात वामनराव परांजपे, सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे, कृष्णाजीपंत सरंजामे यांच्याबरोबरच अगदी लोकमान्यांचे गुरू केरो लक्ष्मण छत्रे यांचाही उल्लेख करावा लागतो. छत्रे यांनी जोतिरावांच्या शाळेला महिना चार आणे मदत केली.
जोतिरावांना ब्राह्मण समाजाकडून केवळ शाळांसाठीच मदत झाली नाही तर जोतिरावांच्या उद्योगांमधील भागीदार म्हणूनही अनेक मातब्बर ब्राह्मण खांद्याला खांदा लावून उभे राहिले. खडकवासला धरण जोतिरावांनी बांधले असा काही ठिकाणी उल्लेख येतो, पण अनेक अधिकृत संदर्भांमध्ये तसा उल्लेख मिळत नाही. या धरणाला दगड पुरवण्याचे कंत्राट त्यांनी घेतल्याचे संदर्भ आहेत आणि त्यासाठी त्यांना भागीदार मिळाले होते ते सखाराम यशवंत परांजपे ही ब्राह्मण समाजातील मातब्बर असामी. कल्याण भागातील एका ब्राह्मण मामलेदाराच्या विधवा बहिणीचा पाय तारूण्यसुलभ भावनांमुळे घसरल्याने तिला गर्भ राहिला आणि जोतिरावांच्या संस्थेत तिने बाळाला जन्म दिला. जोतिरावांनी त्या बाळाचे केवळ संगोपनच केले नाही तर त्याला पुढे दत्तक घेतले. हा यशवंत पुढे डॉक्टर झाला, जोतिराव गेल्यानंतर आपल्या आईच्या म्हणजे सावित्रीबाईंच्या बोलावण्यासरशी पुण्यात येऊन प्लेगच्या साथीत प्लेगग्रस्तांसाठी हडपसरला ससाणेनगर परिसरात दवाखाना घातला.
विख्यात समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी जोतिरावांच्या कामाचे मोल जाणले होते आणि त्यांना मदतही केली. काही वेळा त्यांचे एकमेकांशी मतभेद होऊनही ते तुटेपर्यंत ताणले गेले नाहीत. तीच गोष्ट लोकमान्य टिळकांची. सनातनी ब्राह्मणी वर्गाला दुखावणे टिळकांना जमत नव्हते, पण जोतिरावांच्या कामाची त्यांना जाण होती.
सनातनी वैदिक धर्माचा पायाच विषमतामूलक तत्त्वांनी भरलेला असल्याने त्याला जोतिरावांनी विरोध केला आणि बहुसंख्य ब्राह्मण प्रस्थापित वर्ग या तत्त्वांना केवळ मानतच नव्हता तर त्यांचे आर्थिक-सामाजिक अस्तित्त्वच त्या धर्मावर अवलंबून होते. त्या धर्मालाच उखडून टाकण्याचा प्रयत्न जोतिरावांनी केल्याने हा वर्ग रूष्ट झाला आणि त्यांनी जोतिरावांवर सर्वच प्रकारांनी हल्ला चढवला. त्यात अगदी शारीरिक प्राणघातक हल्ल्याचाही प्रयत्न झाला. वैदिक धर्मामध्ये समानतेची तत्त्वे आणावीत, सर्वांनी बंधुभावाने-सलोख्याने राहावे, हा विचार जोतिरावांनी मांडला. त्यात सरसकट ब्राह्मण समाजाचा दुस्वास किंवा विरोध कुठेच नव्हता.
... त्यामुळेच 'मी सावित्रीबाई जोतिराव फुले’मालिका बंद होण्यामागे उजव्या विचारसरणीच्या मंडळींचा दबाव हे कारण असण्याची शक्यता व्यक्त होत आहे आणि तिला मिळालेल्या प्रतिसादावरून तिचा टीआरपी कमी असणे शक्यच नाही, असे मालिकाकर्त्यांकडूनही सांगण्यात येत आहे, पण तरीही त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे तो जोतिराव-सावित्रीबाईंचे मूलगामी, समाजाला सांधणारे विचार सर्वदूर पोहोचण्याची आणि त्यातही त्यांनी ज्या समाजातील प्रवृत्तींवर टीका केली त्या ब्राह्मण समाजाला नीटपणाने समजण्याची. ब्राह्मण बांधवांनो, आजच्या काळातील ब्राह्मण समाज हा पौरौहित्याच्या कामावर अवलंबून नाही तसेच सर्वांना राज्य घटनेमुळे समानतेचे तत्त्वही अमलात आणावे लागते आहे. त्यामुळे जोतिरावांसारख्या महापुरूषांची ऐतिहासिक कामगिरी, त्यांची शिकवण यांचा आदर राखत, समानता-बंधुता-स्वातंत्र्य यांचा उद्घोष करत सामाजिक ऐक्याची वाट चोखाळणेच योग्य नव्हे का ?...