Mahakali Caves | महाकाली लेणी

Mahakali Caves |
Mahakali Caves | महाकाली लेणी
Published on: 
Updated on: 

नीती मेहेंदळे

कान्हेरी हे प्राचीन काळापासून एक प्रमुख बौद्ध केंद्र होते आणि ते इसवी सनाच्या पंधराव्या शतकापर्यंत अस्तित्वात होते. महाकाली लेण्यांचे कान्हेरीशी सान्निध्य असे सुचवते की, येथे कदाचित बौद्ध भिक्कूंचा आणखी एक गट असावा, ज्याचा कान्हेरी येथील मोठ्या संघाशी काहीतरी संबंध असू शकेल.

पवई हा मुंबईच्या गजबजाटात असूनही नीटनेटका असलेला उच्चशिक्षित भाग. या पवईतून जोगेश्वरीला जोडणाऱ्या रस्त्यात डाव्या बाजूला एक टेकडी उठावलेली दिसते. तिला महाकाली टेकडी म्हणतात. पवईहून महाकालीवर जाताना कमालिस्तान स्टुडिओ उजवीकडे ठेवत टेकडी चढायची आणि माथा गाठायचा. माथ्यावर मुंबईच्या ५ लेणीसमूहांपैकी एक, महाकाली किंवा कोंडीविटे लेणी आहेत. स्कॉटिश प्रशासक आणि मानववंशशास्त्रज्ञ जे. एम. कॅम्पबेल (१८८२) यांचं मुंबई गॅझेटियरच्या व्यवस्थापनात मोठं योगदान आहे. त्यांनी या लेण्यांना 'कोंडीविटे' किंवा 'कोंडीवटी' लेणी असं संबोधल्याचा संदर्भ सापडतो. कारण, ती लेणी कोंदिवटी (आजच्या कोंडीविटा) गावाजवळ स्थित होती. या लेण्यांची निर्मिती इसवी सनाच्या दुसऱ्या ते सहाव्या शतकादरम्यान करण्यात आली असून या लेणी समूहात एकूण १९ लेणी आहेत. पैकी वायव्य दिशेला ४ लेण्यांचा आणि आग्नेय दिशेला १५ लेण्यांचा समूह आहे. वायव्य दिशेतील लेण्यांची निर्मिती ४ थ्या-५ व्या शतकात झाली असून आग्नेय गटातील लेण्यांचा समूह अधिक प्राचीन आहे. या समूहात खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आणि इतर वास्तूंचे अवशेषही आहेत. जोगेश्वरी लेण्यांप्रमाणेच हीदेखील एकाच खडकातून कोरलेली लेणी आहेत. ती काळाच्या ओघात झीज होण्यास प्रवण असणाऱ्या ज्वालामुखिजन्य बेसाल्ट खडकात कोरली गेली आहेत. ही लेणी अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.

कान्हेरी हे प्राचीन काळापासून एक प्रमुख बौद्ध केंद्र होते आणि ते इसवी सनाच्या पंधराव्या शतकापर्यंत अस्तित्वात होते. महाकाली लेण्यांचे कान्हेरीशी सान्निध्य असे सुचवते की, येथे कदाचित बौद्ध भिक्कूंचा आणखी एक गट (संघ) असावा, ज्याचा कान्हेरी येथील मोठ्या संघाशी काहीतरी संबंध असू शकेल. या दोन संघांमध्ये काही संबंध होता की नाही, हे निश्चितपणे सांगता येत नसले, तरी हा परिसर बौद्ध विहार आणि चैत्य उभारण्यासाठी अत्यंत अनुकूल होता आणि येथे बौद्ध स्तूप असल्याने बौद्ध धर्माचे पालन करणारे भिक्कू येथे राहत होते असे सूचित होते. या परिसराचा संपूर्ण भाग मूळतः मरोळ आणि मूळगाव यांसारख्या गावांचा समावेश असलेली एक जुनी वस्ती होती आणि येथे गोड्या पाण्याच्या अनेक टाक्या होत्या, ज्या काळाच्या ओघात नाहीशा झाल्या आहेत.

मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर लेणी १ ते ३ हा पहिला लेणीसमूह लागतो. यात एकमेकांना जोडलेल्या तीन गुंफा आहेत. मधली गुंफा ही मुख्य असून तिच्यात खांबांचा आधार असलेला ओटा आहे, तसेच पश्चिमेकडील बाजूस मूर्तीसाठी देवकोष्ठ असलेला एक आयताकृती कक्ष आहे. या आसनाच्या मागे असलेल्या भिंतीवर एक कोरलेला स्तूप आहे. ओट्याला चार खांब आणि दोन अर्ध-खांब आहेत, जे 'रेलिंग'ची नक्षी असलेल्या कठड्यावर उभे आहेत. खांबांचा भाग चौरस आकाराचा असून वरच्या भागात विशिष्ट नक्षीकाम केलेले आहे. खांबांचे शीर्षभाग अतिशय साधे व प्राथमिक स्वरूपाचे आहेत, जे या लेण्यांच्या निर्मितीकाळातील सुरुवातीचा टप्पा दर्शवतात. मुख्य कक्षाच्या प्रवेशद्वारावर, उंबरठ्याच्या वरच्या बाजूला 'चैत्य गवाक्ष' कोरले आहेत. दरवाजाच्या चौकटीवर विविध प्रकारचे नक्षीकाम केले आहे. या अपूर्ण राहिलेल्या मध्यवर्ती चैत्य लेण्याच्या दोन्ही बाजूंना गुंफा १ आणि ३ मध्ये जाण्यासाठी खांबांचे आधार असलेली प्रवेशद्वारे आहेत. ही प्रवेशद्वारे चैत्य गुहेच्या प्रवेशद्वारापेक्षा खालच्या पातळीवर असून चैत्य गुहेचे प्रवेशद्वार या दोन प्रवेशद्वारांच्या मधल्या भागात आहे.

गुहा ४ विहार लेणे असून त्यात प्रवेश करण्यासाठी चार खांब आणि दोन अर्धखांबांचा आधार असलेला एक व्हरांडा आहे. येथील खांब साधे, अष्टकोनी आकाराचे असून त्यांना कोणतेही शीर्षभाग नाहीत. येथून एका आयताकृती कक्षात जाण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. याच्या बाजूच्या भागांमध्ये दोन खांब आणि दोन अर्धखांबांचा आधार असलेले कक्ष आहेत. या कक्षांच्या आत प्रत्येकी तीन लहान खोल्या आहेत. डॉ. दुलारी कुरेशी यांच्या मते, अशा विहारांमध्ये सहसा या लहान खोल्या थेट मुख्य कक्षात उघडतात; परंतु येथे त्या एका उपकक्षात उघडतात आणि तो उपकक्ष मुख्य कक्षाला जोडलेला असतो. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोंडीविटेे येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लेणी म्हणजे ९ क्रमांकाचे लेणे. हे चैत्य लेणे असून हे या संपूर्ण समूहातील मुख्य लेणे आहे. या स्थळावरील ती कदाचित सर्वात जुनी निर्मिती असावी. या लेण्याचे आराखडा, नियोजन वेगळे असून ती या समूहातील सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक आहे. ते पूर्वाभिमुख असून त्याचा प्रवेश एका आयताकृती सभागृहातून होतो.

सामान्यतः अशा प्रकारच्या सभागृहांच्या प्रवेशद्वारापाशी स्तंभ असतात; मात्र येथे सभागृहाला कोणत्याही स्तंभांचा आधार नाही आणि त्याची पूर्व बाजू पूर्णपणे उघडी आहे. येथील गर्भगृह आणि स्तूप एका कोरलेल्या भिंतीने वेढलेले आहेत, जे इतर बहुतेक चैत्यगृहांच्या रचनेपेक्षा वेगळे आहे. या स्तुपाच्या भोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. सभागृहाच्या भिंती सुरुवातीला साध्या (कोरीव काम नसलेल्या) होत्या; परंतु नंतरच्या महायान कालखंडात त्यावर बुद्धाच्या मूर्ती कोरण्यात आल्या. जे. एम. कॅम्पबेल यांच्या मते, या गोलाकार मंदिरसदृश वास्तूशी साधर्म्य दर्शवणारी इतर केवळ दोनच उदाहरणे आहेत आणि ती दोन्ही बिहारमधील गयाजवळील बराबर टेकड्यांवरील 'लोमस ऋषी' व 'सुदामा' या गुहांमध्ये आढळतात. डॉ. दुलारी कुरेशी यांच्या मते, ही पश्चिम भारतातील सर्वात प्राचीन चैत्य वास्तू असावी. त्या पुढे नमूद करतात की, बिहारमधील लोमस ऋषी गुहेच्या रचनेपेक्षा यात एक महत्त्वाचा संरचनात्मक बदल दिसून येतो. लोमस ऋषी गुहेत सभागृहाचे प्रवेशद्वार बाजूला असते आणि सभागृह आडव्या दिशेने विस्तारलेले असते; मात्र येथे तसे नाही. येथे सभागृह आणि आतील कक्ष हे पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वाराच्या एका सरळ रेषेत आहेत. हे अजून एक वैशिष्ट्य!

स्तुपाभोवतीच्या या ८ इंच जाडीच्या भिंतीला मध्यभागी एक दरवाजा आणि दोन्ही बाजूंना जाळीदार खिडक्या आहेत. उजव्या जाळीदार खिडकीजवळ वरच्या पट्टीवर एक शिलालेख कोरलेला आहे. त्याची लिपी ब्राह्मी असून भाषा प्राकृत आहे. लेखाचा काळ इसवी सन पूर्व पहिल्या शतकाचा आहे. 'पथिकामाथे वाथवस बम्मनस गौतम गोतस, पितुलस देयधम विहारो स मातुकस' असा तो लेख असून त्याचा अर्थ 'पथिकाम इथे राहणाऱ्या गौतम गोत्राच्या पितुल नावाच्या ब्राह्मणाने आपल्या भावाबरोबर दिलेली देणगी' असा आहे. उजव्या बाजूला बुद्ध, त्यांचे सेवक आणि त्यांवर बौद्ध पौराणिक कथांची कथनशिल्पे असलेला एक कोरलेला फलक आहे, ज्याला 'बौद्ध लिटनी' (Buddhist Litany) असे म्हटले जाते. हा भाग नंतरच्या काळात कोरला गेला असावा.

गुहा ९, १० आणि ११ हादेखील ३ लेण्यांचा एक समूह आहे. या सर्व गुंफांचे प्रवेशद्वार त्यांच्या संबंधित अंगणाकडे तोंड करून आहे आणि या अंगणाला कोणत्याही खांबांचा किंवा भित्तिस्तंभांचा आधार नाही. गुंफा क्र. १३ लेण्यासाठी पायऱ्या चढून एका बंद अंगणात प्रवेश करावा लागतो आणि तिथून आणखी चार पायऱ्या चढून स्तंभांच्या आधाराने बनलेल्या व्हरांड्यात जाता येते. अंगणाच्या उजव्या बाजूला दगडाचा बाक आहे. ओसरीचे छत पेलणाऱ्या स्तंभांच्या शीर्षस्थानी गोलाकार 'आमलक' आकाराची नक्षी आहे. इथे मुख्य सभागृहात जाण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. हे सभागृह ८ x ८ मीटर चौरसाकृती असून सभागृहाच्या मध्यभागी एक उंच चौथरा आहे. हा चौथरा चार मध्यवर्ती स्तंभांवर आधारलेला आहे. या स्तंभांचा तळभाग गोलाकार आहे. त्यानंतरचा स्तंभदंड अष्टकोनी असून वरच्या दिशेने जाताना तो गोलाकार होतो आणि त्याच्या सर्वात वर 'आमलक' आकाराची नक्षी असलेला भाग आहे. गुहा १४ व १८ या लेण्यांमध्ये दोन पूर्ण स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ यांच्या आधारावर उभी असलेली ओसरी आहे. एका प्रवेशद्वारातून आयताकृती सभागृहात प्रवेश केला जातो. अठराव्या लेण्यात ओसरीच्या डाव्या आणि उजव्या भिंतींवर दगडाचे बाक आहेत. सभागृहाच्या मागील भिंतीत एक खोली आहे. खोलीच्या मागील भिंतीवर शिवलिंग ठेवून किंवा कोरून तिचे रूपांतर कदाचित शिवमंदिरात करण्यात आले असावे; मात्र आता ते शिवलिंग तिथे नाही. गुहा १९ ही एक मोठी गुंफा असून यात दोन पूर्ण स्तंभ आणि दोन अर्ध-स्तंभांवर आधारलेली मोठी ओसरी आहे. महाकालीच्या या १९ गुंफा म्हणजे एक महत्त्वाचा दस्तावेज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news