

अनिल न. मडके
खरे तर, सण आणि उत्सवात गाणी हा आनंदाचाच भाग असतो; पण जेव्हा डीजेसारख्या ध्वनी यंत्रणेच्या आवाजाची तीव्रता खूप वाढते, तेव्हा तो सहन तर होत नाहीच, त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याचे अनेक गंभीर दुष्परिणाम आरोग्यावर होतात, असे सिद्ध झाले आहे. दणदणाटी ध्वनी यंत्रणेच्या किती निकट आणि किती काळ आपण थांबतो, यावर त्याचे दुष्परिणाम अवलंबून असतात. मोठ्या आवाजाचा दीर्घकाळ किंवा वारंवार संपर्क यामुळे कान, हृदय, झोप यावर प्रतिकूल परिणाम होतात. या आवाजामुळे श्रवणदोष, निद्रानाश, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराची शक्यता वाढते.
प्रत्येक वर्षी गणेश उत्सव जवळ आला की, डीजेसारख्या दणदणाटी ध्वनी यंत्रणेचा वापर हा वादाचा आणि चर्चेचा विषय होतो. गणेश मंडळांचे उत्साही कार्यकर्ते, सामाजिक आणि पर्यावरणप्रेमी यांच्यात संघर्ष निर्माण होतो. डीजेचे काय करायचे, हा प्रश्न पोलिस आणि प्रशासन व्यवस्थेपुढेही असतो. उत्सवाच्या आनंदापेक्षा डीजेचा दणदणाट हाच अनेकाना प्रतिष्ठेचा वाटतो. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. पुण्यात विद्यानंद बापट यांच्या वक्तव्याने हा विषय चर्चेत आला आहे. ज्या पुण्यातून लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्याच पुण्यातून डीजेपेक्षा पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा उत्सव व्हावा, या विचाराने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय दृष्टिकोनातून डीजेच्या वापरातून काय दुष्परिणाम होतात, याचा वेध घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात केला आहे.
'आवाज वाढव डीजे, तुझ्या...' असं प्रेमळ- शपथवजा धमकीचं गाणं मध्यंतरी सर्वांच्या कानावर आदळत होतं. यातील 'डीजे' या शब्दाचा अर्थ आपण शक्यतो शोधण्याच्या फंदात पडत नाही. हा शब्द इ.स. १९३५ मध्ये अमेरिकेचे प्रसिद्ध रेडिओ समालोचक 'वॉल्टर विन्चेल' यांनी रेडिओ उद्घोषक मार्टिन ब्लॉक यांच्यासाठी पहिल्यांदा वापरला होता. मार्टिन हे गाण्यांच्या एकापाठोपाठ एक रेकॉर्ड्स बदलून श्रोत्यांना खिळवून ठेवायचे. १९५० च्या दशकात हा शब्द जगभर पसरला आणि पुढे सण-उत्सव-पार्ट्या यांचा एक अविभाज्य घटक बनला. शर्यतीत पळणाऱ्या घोड्यांना नियंत्रित करणाऱ्या घोडेस्वारांना 'जॉकी' (Jockey) असे म्हणतात. त्याचप्रमाणे जुन्या काळातील प्लास्टिकच्या गोल फिरणाऱ्या तबकड्यांवरून गाण्यांचा वेग आणि ताल कौशल्याने हाताळणाऱ्या कलाकारांनाही डिस्क जॉकी म्हणजे डीजे हे नाव देण्यात आलं. या प्लास्टिकच्या डिस्कची जागा आता जरी अत्याधुनिक लॅपटॉप्स, सॉफ्टवेअर्स आणि डिजिटल मिक्सर्स यांनी घेतली असली, तरीही 'डीजे' हे नाव आजही तसेच टिकून आहे.
आजकाल कुठलाही सण, मिरवणूक, विवाह समारंभ, यात्रा, एखादी राजकीय सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रम असेल, तर तिथे एखाद्या वेळी श्रोते, कार्यकर्ते किंवा प्रेक्षक कमी असतील; पण डीजे नाही असे होत नाही. डीजे हा मोठ्या क्षमतेच्या म्हणजे दणदणाट करणाऱ्या, कानठळ्या बसवणारा आवाज करणाऱ्या ध्वनियंत्रणांसाठी वापरला जातो. अशा मोठ्या ध्वनियंत्रणांना बोलीभाषेत (!) 'डॉल्बी' असेही म्हटले जाते.
'डॉल्बी' (Dolby) हा ऑडिओ आणि व्हिडीओ तंत्रज्ञानाशी संबंधित एक प्रसिद्ध ब्रँड आणि प्रणाली असून, हे नाव त्याचे संस्थापक रे डॉल्बी (Ray Dolby) यांच्यावरून ठेवले गेले आहे. त्यांनी १९६५ मध्ये लंडनमध्ये 'डॉल्बी लॅबोरेटरीज'ची स्थापना केली. पूर्वीच्या काळी ऑडिओ रेकॉर्डिंगमधील अनावश्यक पार्श्वभूमीचा आवाज कमी करणारी प्रणाली म्हणून डॉल्बी ओळखली जात असे. खरे तर, सण आणि उत्सव अशा प्रसंगी गाणी ऐकणे हा आनंदाचाच भाग असतो. तो सर्वांना आवडतोदेखील; पण जेव्हा या आवाजाची तीव्रता खूप वाढते, तेव्हा ते सहन होत नाही हे तर आहेच; पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे अनेक गंभीर दुष्परिणाम आरोग्यावर होतात. ते तत्काळ अनेकांच्या लक्षात येत नाहीत. अशा आवाज करणाऱ्या डीजेच्या किती निकट आणि किती काळ आपण थांबतो, यावर त्याचे दुष्परिणाम ठरतात. 'मोठा आवाज म्हणजे लगेच नुकसान' असे होत नाही; पण अशा मोठ्या आवाजाचा दीर्घ किंवा वारंवार संपर्क यामुळे कान, हृदय, झोप यावर प्रतिकूल परिणाम होऊन मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. सततच्या कमी-जास्त तीव्रतेच्या आवाजामुळे श्रवणदोष, कानात आवाज येणे, निद्रानाश, चिडचिड, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असे विकार वाढू शकतात.
कानांचे काय होते?
कानाच्या आतील भागात अतिशय सूक्ष्म संवेदनशील पेशी असतात. त्या ध्वनीचे कंप विद्युत संदेशांमध्ये परावर्तित होऊन ते मेंदूपर्यंत पोहोचतात. खूप मोठ्या आवाजामुळे या पेशींवर ताण येतो. मोठा आवाज आणि वारंवार किंवा दीर्घ संपर्क जितका अधिक, तितका श्रवणदोष वाढण्याची शक्यता अधिक. मोठ्या आवाजानंतर काही वेळ कान बंद झाल्यासारखे वाटणे, आवाज बोथट ऐकू येणे किंवा कानात शीळ, घंटा, भुणभुण यांसारखा आवाज येणे हे तात्पुरत्या श्रवणबदलाचे संकेत असू शकतात. बाहेर कोणताही आवाज नसताना आवाज ऐकू येण्याला 'टिनिटस' म्हणतात. अनेक वेळा हा त्रास काही तासांत कमी होतो; परंतु वारंवार तीव्र आवाजाचा संपर्क झाल्यास तो तसाच राहू शकतो. अत्यंत मोठ्या आवाजाच्या अगदी जवळ उभे राहिल्यास कानात वेदना, अस्वस्थता किंवा अचानक श्रवण क्षमता कमी होते; पण काही वेळा आंतरकर्ण यांना कायमचे नुकसान पोहोचू शकते. कानात दोष निर्माण झाल्याचे सुरुवातीला समजत नाही, हा कळीचा मुद्दा सर्वांनी समजून घ्यायला हवा. जेव्हा लक्षात येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
मानसिक आरोग्य : झोप आणि एकाग्रता
अचानक किंवा सतत मोठा आवाज यामुळे ताण येतो. चिडचिड, अस्वस्थता, बेचैनी किंवा मानसिक थकवा जाणवतो. अशा वातावरणात डोके दुखणे, डोके जड होणे, संवाद साधताना त्रास होणे एवढेच नव्हे, तर केवळ शांत बसणेदेखील कठीण वाटू लागते. रात्री उशिराच्या मोठ्या आवाजामुळे झोप लागत नाही. लागलीच तर वारंवार जाग येते. रात्री पुरेशी झोप न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो आणि एकाग्रता, स्मरणशक्ती, एकंदर कार्यक्षमता आणि मनःस्थिती या सर्वांवर परिणाम होतो. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा, अभ्यास किंवा ऑनलाईन वर्ग चालू असताना परिसरातील मोठा आवाज लक्ष विचलित करणारा असतो. वृद्ध व्यक्ती, बालके आणि आजारी व्यक्तींना आवाजाचा त्रास अधिक प्रमाणात जाणवतो. कारण, त्यांना विश्रांती आणि गाढ झोप यांची नितांत गरज असते.
हृदय आणि शरीर
मोठ्या आवाजामुळे काही व्यक्तींमध्ये हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, छातीत धडधड जाणवणे, घाम येणे असे परिणाम दिसतात. दीर्घकाळपर्यंत ध्वनी प्रदूषणाच्या संपर्कामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. व्यक्तीचे वय, त्या व्यक्तीला असलेले इतर आजार आणि ध्वनी प्रदूषणाचा संपर्क कालावधी यावर हे दुष्परिणाम अवलंबून असतात. गणेशोत्सव किंवा दहीहंडीच्या मिरवणुकांमध्ये डीजेचा अतिप्रचंड आवाज आणि दणदणाटामुळे वृद्ध तसेच तरुणांना अचानक हृदयविकाराचे झटके आल्याचे समोर आले आहे. हृदयविकाराचा झटका किंवा अन्य त्रासामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अतितीव्र आवाजामुळे रक्तदाब वाढणे, कानातून रक्त येणे, मेंदूवर ताण येणे किंवा मेंदूतून रक्तस्राव होणे यासारख्या जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात. गर्भवती महिलांनादेखील अनावश्यक मोठ्या आवाजाचा त्रास होतो. मानसिक तणाव, चिडचिड, निद्रानाश अशा दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. लहान मुलांचे कान अधिक संवेदनशील असतात. मुलांना त्यांची जाणीव होत नसते. त्यामुळे पालकांनी अशा मोठ्या आवाजाच्या स्पीकरजवळ मुलांना थांबण्यास मनाई केली पाहिजे.
समाज आणि पर्यावरणाचा विचार
केवळ आनंद उत्सव साजरा करण्यासाठी डीजेचा मोठा आवाज करताना खरे तर आसपासचे रहिवासी, परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, नवजात बालके, वृद्ध व्यक्ती, रात्रीची ड्युटी करून झोपलेले कर्मचारी किंवा आजारी रुग्ण यांचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. शाळा आणि रुग्णालयांच्या परिसरात शांतता राखणे अत्यंत आवश्यक असते. प्राणी आणि पक्ष्यांनाही ध्वनी प्रदूषणाचा फटका बसतो. पाळीव कुत्रा, मांजर हे घाबरू शकतात. अस्वस्थ होतात किंवा आवाजापासून दूर जाऊन लपण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या आवाजामुळे वन्यजीवांची हालचाल, त्यांचा संवाद आणि वर्तन यात अडथळा येतो. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा विचार केवळ माणसांपुरताच मर्यादित ठेवता येत नाही.
ध्वनी प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी केवळ पोलिसांची नाही. आयोजकांनी ध्वनिमापक वापरून आवाजाची पातळी कमीत कमी ठेवणे, निवासी भाग किंवा रुग्णालयाच्या दिशेने स्पीकर न ठेवणे आणि कार्यक्रमाची वेळ पाळणे आवश्यक आहे. उत्सव आणि आरोग्य यांना एकमेकांचे शत्रू मानू नये. मिरवणूक, सण किंवा कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असह्य आवाजाशिवाय साजरा होऊ शकतो. लक्षात घ्या, लाऊडस्पीकर आणि सार्वजनिक ठिकाणच्या मोठ्या आवाजाची उच्चतम क्षमता, वेळेचे बंधन, कायदेशीर परवानगी आणि मोठ्या आवाजावर निर्बंध ठेवण्यामागचा उद्देश हा एखादा उत्सव थांबवणे हा नसून नागरिकांचे आरोग्य, झोप आणि सार्वजनिक शांतता जपणे हा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. थोडीशी शिस्त, थोडीशी संवेदनशीलता आणि नियमांचे पालन यामुळे उत्सवाचा आनंदही टिकू शकतो आणि आरोग्याचे संरक्षणही होऊ शकते. मग, येत्या गणेशोत्सवापासून हे कराल? आपण 'श्रीगणेश' हे विद्येचे आराध्य दैवत मानतो. त्या विद्येला स्मरून काही संकल्प करूयात का?
कायद्यानुसार, विविध क्षेत्रांनुसार आवाजाच्या मर्यादा (डेसिबलमध्ये - dB)
दिवसा (सकाळी ६ ते रात्री १०) आणि रात्री (रात्री १० ते सकाळी ६) पुढीलप्रमाणे आहेत.
१) औद्योगिक क्षेत्र (Industrial Area) : दिवसा- ७५ डेसिबल. रात्री- ७० डेसिबल.
२) व्यापारी क्षेत्र (Commercial Area) : दिवसा- ६५ डेसिबल. रात्री- ५५ डेसिबल.
३) निवासी क्षेत्र (Residential Area) : दिवसा- ५५ डेसिबल. रात्री- ४५ डेसिबल.
४) शांतता क्षेत्र (Silence Zone - उदा. शाळा, रुग्णालयाचा परिसर इ.) : दिवसा- ५० डेसिबल. रात्री- ४० डेसिबल.
महत्त्वाचे नियम :
रात्री लाऊडस्पीकर बंदी : रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत, विनापरवाना लाऊडस्पीकर, वाद्ये किंवा जनरेटर वाजवण्यास पूर्ण बंदी असते. शांतता क्षेत्र : रुग्णालये, शाळा किंवा न्यायालयांचा १०० मीटर परिसर हे शांतता क्षेत्र मानले जाते. येथे हॉर्न वाजवणे किंवा मोठ्याने आवाज करणे बेकायदेशीर आहे.