

सोनम परब
गणपतीच्या आरतीचा स्वर, ढोल-ताशांचा वाढता गजर, गुलालाने भरलेले रस्ते आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पुढे सरकणारी विसर्जन मिरवणूक हे दृश्य महाराष्ट्राच्या उत्सव संस्कृतीइतकेच भारतीय चित्रपटांच्या पडद्यावरही परिचित झाले आहे. कधी नायकाच्या आयुष्यातील निर्णायक वळणाचा साक्षीदार, कधी संकटात श्रद्धेचा आधार, तर कधी मुंबईच्या चाळी-वस्त्यांतील सामूहिक जगण्याचा उत्सव म्हणून गणराया सिनेमात भेटत राहतो.
भारतीय चित्रपटांनी सण-उत्सवांकडे कथेला सजवणारी पार्श्वभूमी या साचेबद्धतेपलीकडे जात पाहिले. गणेशोत्सवाने तर चित्रपटांना श्रद्धेबरोबरच नाट्य, संघर्ष, जल्लोष आणि सामूहिक ऊर्जेची चौकट दिली. विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्राची गोष्ट सांगताना गणपती बाप्पा पडद्यावर येणे अगदी स्वाभाविक ठरले. चाळीतील छोटा गणपती असो, गिरणगावातील सार्वजनिक मंडळ असो किंवा हजारो भाविकांच्या गर्दीत निघालेली विसर्जन मिरवणूक असो, बॉलीवूड दिग्दर्शकांनी या उत्सवाची अनेक रूपे टिपली आहेत. काळ बदलला तसा पडद्यावरचा गणपतीही बदलला. जुन्या चित्रपटांत तो भक्तीचा आधार होता, पुढे तो नायकाच्या संकटाशी जोडला गेला आणि अलीकडच्या चित्रपटांत गणेशोत्सव मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रभावी दृश्यरूप बनला.
चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात पौराणिक आणि धार्मिक कथांचा मोठा प्रभाव होता. रामायण-महाभारतातील प्रसंग, संतचरित्रे आणि देवदेवतांच्या कथा प्रेक्षकांना परिचित असल्यामुळे निर्मात्यांसाठीही हा विषय जवळचा होता. गणेशाच्या जन्मकथेपासून त्याच्या विविध लीलांपर्यंतच्या कथांवर चित्रपट तयार झाले. ‘श्री गणेश महिमा’, ‘श्री गणेश विवाह’, ‘बाल गणेश’ यांसारख्या चित्रपटांनी गणेशाला थेट कथानायकाच्या रूपात पडद्यावर आणले. पुढे अॅनिमेशन तंत्र विकसित झाल्यानंतर मुलांसाठी तयार झालेल्या ‘बाल गणेश’सारख्या चित्रपटांनी गणपतीच्या कथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवल्या; मात्र हिंदी चित्रपटातील गणपतीचे खरे वैशिष्ट्य त्याच्या पौराणिक रूपापेक्षा सामाजिक रूपात अधिक दिसते. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला असलेले स्थान आणि मुंबई हे हिंदी चित्रपटसृष्टीचे केंद्र या दोन्ही गोष्टींचा त्यावर प्रभाव पडला.
चित्रपटाच्या कथेत एखादा निर्णायक प्रसंग उभा करायचा असेल, तर गणेशोत्सवाचे वातावरण दिग्दर्शकांना विलक्षण दृश्यशक्ती देते. ढोल-ताशांचा आवाज, गुलाल, गर्दी, आरती, मोठी मूर्ती आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष या सगळ्यामध्ये नायकाचा संघर्ष अधिक तीव्र करता येतो. म्हणूनच अनेक हिंदी चित्रपटांत गणेशोत्सवाचा प्रसंग कथानकाला वळण देताना दिसतो. अमिताभ बच्चनच्या ‘डॉन’मधील ‘मोरया रे बाप्पा मोरया रे’ हे त्याचे जुने आणि लोकप्रिय उदाहरण. या गाण्यात मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह आहे. रस्त्यावरची गर्दी, नृत्य आणि विसर्जनाच्या दिशेने जाणारा उत्सव यामुळे गाण्याला मुंबईचा स्वतंत्र ठसा मिळाला. त्या काळातील हिंदी चित्रपटातील गणेशोत्सव लोकजीवनाशी जोडलेला होता. ‘हमसे बढ़कर कौन’मधील ‘देवा हो देवा गणपती देवा’ने तर गणेशोत्सवातील हिंदी चित्रपटगीतांच्या परंपरेत स्वतंत्र स्थान मिळवले. अनेक वर्षे सार्वजनिक गणेश मंडळे, घरगुती उत्सव आणि विसर्जन मिरवणुकांत हे गीत ऐकू येत राहिले.
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वास्तव’मध्ये गणेशोत्सवाला वेगळीच धार मिळाली. मुंबईतील गुन्हेगारी विश्वाची कथा सांगताना गणपतीच्या मिरवणुकीचा वापर चित्रपटाचा नायक असणार्या 'रघू'च्या आयुष्यातील हिंसा, अस्थिरता आणि त्याभोवती सुरू असलेले सामान्य मुंबईकरांचे जग या दोन्ही गोष्टी एकाच पडद्यावर येतात. ‘शेंदूर लाल चढायो’ या आरतीने चित्रपटातील धार्मिक वातावरण अधिक परिणामकारक केले. एका बाजूला गुन्हेगारीच्या चक्रात अडकलेला माणूस आणि दुसर्या बाजूला विघ्नहर्त्याकडे आशेने पाहणारा समाज या विरोधाभासातून त्या दृश्याला अर्थ लाभला. नव्या पिढीच्या हिंदी चित्रपटांत गणेशोत्सव म्हटला की, ‘अग्निपथ’मधील ‘देवा श्रीगणेशा’ आठवते. अजय-अतुल यांच्या संगीतामुळे या गाण्यात मराठी ढोल-ताशांची ऊर्जा आणि हिंदी चित्रपटसंगीताची भव्यता एकत्र आली. ऋतिक रोशनवर चित्रित झालेल्या या गीतात उत्सव आणि कथानकाचा संघर्ष समांतर पुढे सरकतो. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची आराधना शांत, व्यक्तिगत भक्तीच्या चौकटीत राहत नाही. ती सामूहिक आवेगाचे रूप घेते. त्यामुळे हे स्वतंत्र भक्तिगीत प्रचंड गाजले.
‘एबीसीडी-एनीबडी कॅन डान्स’मधील ‘साड्डा दिल वी तू’ या गाण्यात गणेशोत्सव नृत्याशी जोडला गेला. पारंपरिक भक्ती, आधुनिक नृत्यशैली आणि रस्त्यावरचा उत्सव यांचे मिश्रण येथे दिसते. बदलत्या काळात गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलत गेले आहे. पारंपरिक आरत्या आणि ढोल-ताशांसोबत डीजे, आधुनिक नृत्य आणि मोठ्या प्रमाणावरील दृश्यरचना आली. हिंदी चित्रपटांनी हा बदल पटकन टिपला. ‘बँजो’सारख्या चित्रपटातही मुंबईच्या रस्त्यावरील संगीत संस्कृती, उत्सव आणि तरुणाई यांचा संबंध दिसतो. गणेशोत्सवातील बँजो पथके, वादक आणि स्थानिक कलाकार ही मुंबईच्या सांस्कृतिक जीवनाची अनेक वर्षांची खूण होती. चित्रपटाने या जगाकडेच कथाविषय म्हणून पाहिले.
हिंदी चित्रपटांत होळी किंवा दिवाळी भारतात कुठेही घडताना दाखवता येते; पण सार्वजनिक गणेशोत्सवाचा भव्य प्रसंग आला की, प्रेक्षकांच्या मनात मुंबईची प्रतिमा पटकन उभी राहते. लालबाग-परळच्या रस्त्यांची आठवण, गिरणगाव, चाळ संस्कृती, सार्वजनिक मंडळे, समुद्राकडे जाणार्या विसर्जन मिरवणुका आणि ढोल-ताशांचा नाद या सगळ्यामुळे गणेशोत्सवाला एक ठळक प्रादेशिक ओळख मिळाली आहे. त्यात आणखी एक सोय आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीत समाजातील अनेक स्तर एकाच चौकटीत आणता येतात. श्रीमंत-गरीब, नायक-खलनायक, पोलीस-गुन्हेगार, स्त्री-पुरुष, लहान मुले आणि वृद्ध सारे एका मिरवणुकीचा भाग होऊ शकतात. त्यामुळे लेखकाला कथा पुढे नेण्यासाठी आणि दिग्दर्शकाला मोठे दृश्य उभारण्यासाठी हा उत्सव उपयोगी पडतो.
मराठी चित्रपटातील गणराया
मराठी पडद्यावरील गणेशोत्सव अधिक नैसर्गिक वाटतो. आरतीसाठी जमलेले कुटुंब, मोदकांची तयारी, मखराची लगबग, गौरीचे आगमन, घरगुती विसर्जन किंवा सार्वजनिक मंडळातील कार्यकर्त्यांचे जग अशा तपशिलांतून उत्सव दिसतो. याचे उदाहरण म्हणजे अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘मोरया’. सार्वजनिक गणेश मंडळे ही केवळ १० दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांची व्यवस्था नसून स्थानिक तरुणाई, प्रतिष्ठा, नेतृत्व, स्पर्धा आणि राजकारण यांचीही केंद्रे कशी बनतात, हा पदर चित्रपटात येतो. मराठीत गणपतीवरील भक्तिपर चित्रपटांचीही मोठी परंपरा आहे. ‘अष्टविनायक’चा उल्लेख त्यात आवर्जून करावा लागतो. महाराष्ट्रातील अष्टविनायक परंपरा, श्रद्धा आणि तीर्थयात्रेच्या भावविश्वाला या चित्रपटामुळे लोकप्रिय सांस्कृतिक अभिव्यक्ती मिळाली. त्यातील ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’सारख्या गीतांनी चित्रपटाच्या पलीकडे जाऊन घराघरांत स्थान मिळवले. मराठी संगीतविश्वातील ‘गणराज रंगी नाचतो’, ‘प्रथम तुला वंदितो’, ‘गजानना श्री गणराया’ यांसारख्या रचना तर गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक स्मृतीचाच भाग झाल्या आहेत.
चित्रपटातील गणपती गीतांचा प्रवास पाहिला तर पूर्वी शब्द, आरतीची चाल आणि भक्तिभाव केंद्रस्थानी असे. पुढे मोठा ऑर्केस्ट्रा आला. त्यानंतर ढोल-ताशांचा जोर वाढला आणि आज गणपती गीत हे चित्रपटातील भव्य ‘सेलिब्रेशन साँग’ म्हणूनही तयार केले जाते. एकंदरीत रूपेरी पडद्यावरील गणपतीचा प्रवास हा भारतीय चित्रपटांच्या बदलाचाही इतिहास आहे. चित्रपटात गणेशमूर्तीसमोर उभा राहिलेला नायक बहुतेकदा आयुष्यातील एखाद्या वळणावर असतो. त्याला संकटातून बाहेर पडायचे असते, लढाई सुरू करायची असते, काही गमावल्याचे दुःख पचवायचे असते किंवा नव्याने सुरुवात करायची असते. ‘विघ्नहर्ता’ या गणेशाच्या लोकमानसातील प्रतिमेशी ही चित्रभाषा सहज जुळते. म्हणूनच पडद्यावरील गणेशोत्सव कितीही भव्य झाला, संगीत आणि तंत्रज्ञान कितीही बदलले, तरी ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर सुरू झाला की, प्रेक्षक क्षणभर भावनाशील होतो.