Lohagad Murder Mistry | चिंता तरुणाईची

Lohagad Murder Mistry |
Lohagad Murder Mistry | चिंता तरुणाईची
Published on
Updated on

डॉ. संजय गायकवाड, समुपदेशक-माईंड कोच

लोहगड किल्ल्यावर झालेला केतनचा मृत्यू हा अपघात नसून खून असल्याचे समोर आल्याने सबंध राज्यात खळबळ उडाली आहे. त्याच्या होणार्‍या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने केतनचा काटा काढल्याची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेसी आहे. मानसशास्त्रीय दृष्ट्या विचार करता हा सायकोपॅथीचा प्रकार असल्याचे दिसते. या प्रकरणामुळे आजच्या तरुण पिढीच्या बदलत्या मानसिकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल या तरुणाच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सुरुवातीला अपघात वाटणार्‍या या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास केल्यानंतर तो सिया म्हणजेच केतनच्या होणार्‍या पत्नीकडून केला गेलेला खून असल्याचे सकृतदर्शनी समोर आले आहे. वडिलांनी नवरा मुलगा पसंत करायचा आणि मुलींनी 'हो' म्हणायचे असा एक काळ समाजाने अनुभवलेला आहे. स्त्रियांना मतस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, निर्णयाधिकार असतात, हे मान्य नसणारी पुरुषप्रधान व्यवस्था आपल्याकडे अनेक वर्षे होती; परंतु गेल्या दोन दशकांमध्ये मुलींच्या शिक्षणाचा पाया रुंदावत गेला आणि त्यांच्या कर्तृत्वाची झलकही सर्वांनी पाहिली; पण इंटरनेट युगातील आजची पिढी ही पूर्वीच्या निकषांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. जेन झेड, जेन एक्स या पिढ्यांची जडणघडण अतिशय वेगळ्या आर्थिक, सामाजिक वातावरणात झालेली आहे. पूर्वीच्या पिढीच्या दृष्टीने चंगळवाद म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोष्टी दैनंदिन गरजेच्या बनून या पिढीचा विकास झालेला आहे. समाजातील मूल्ये, संस्कार, विचारधारा यांचा आलेख घसरत असताना ही पिढी मोठी झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारणांचा मानसशास्त्रीय दृष्ट्या विचार करताना बदललेले सामाजिक परिदृश्य लक्षात घेणे गरजेचे आहे. पारंपरिक निकषांमधून त्याचे आकलन केल्यास ते विसंगत किंवा अप्रस्तुत ठरण्याची शक्यता आहे.

स्वतःच्या होणार्‍या पतीला केवळ आपल्या प्रेमाच्या आड येतो म्हणून दरीत ढकलून देणे आणि त्याला अपघाताचे रूप देणे, ही घटना आजच्या तरुण पिढीतील गंभीर मानसिक विकृती आणि भावनिक अपरिपक्वता दर्शवणारी एक धोक्याची घंटा आहे. एखाद्या व्यक्तीची हत्या करण्याचा कट रचणे, हत्येनंतर पोलिसांसमोर खोटे अश्रू ढाळणे आणि केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप न होणे, ही लक्षणे अँटिसोशल पर्सनालिटी डिसऑर्डर किंवा सायकोपॅथीकडे संकेत करतात. यामध्ये व्यक्तीला सामाजिक नियम, कायदे आणि इतरांच्या भावना किंवा हक्कांबद्दल सदर व्यक्तीला कोणतीही पर्वा नसते. दुसर्‍याच्या वेदनेची किंवा जीवाची किंमत नसते. केवळ स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी ही माणसे कोणत्याही थराला जाऊ शकतात. स्वतःच्या आनंदासाठी इतरांशी खोटे बोलणे, फसवणूक करणे किंवा बनावट ओळख वापरणे यामध्ये त्यांना यत्किंचितही गैर वाटत नाही. सियाला हे लग्न मान्य नव्हते, तर ती घरात ठामपणे नकार देऊ शकली असती किंवा कायदेशीर मदत घेऊ शकली असती; परंतु समस्येवर परिपक्वतेने मार्ग काढण्याऐवजी वाटेतील अडथळाच संपवून टाकणे हा मार्ग निवडला गेला. याला मानसशास्त्रात ‘प्युअर कोपिंग मेकॅनिझम’ म्हणतात. या मनःस्थितीमध्ये कठीण प्रसंगात मेंदू योग्य निर्णय घेऊ शकत नाही. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असण्याच्या मानसिकतेला ‘ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर’ म्हटले जाते.

पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सिया एका बाजूला केतनसोबत लग्नाची खरेदी करत होती, गोड बोलत होती आणि दुसर्‍या बाजूला प्रियकरासोबत मिळून हत्येचा ‘प्लॅन बी’ रचत होती. एकाच वेळी दोन पूर्णपणे वेगळी आयुष्ये जगणे आणि चेहर्‍यावर कोणताही संशय येऊ न देणे, ही तीव्र मानसिक विकृती आणि ढोंगीपणाची परिसीमा आहे. अशा प्रकरणांमध्ये व्यक्तीचा जोडीदारावरील ताबा आणि मालकी हक्क इतका वाढतो की, त्यामध्ये विवेकबुद्धी पूर्णपणे नष्ट होते. सिया आणि चेतन यांच्यात झालेले हजारो फोन कॉल्स आणि केतनला मारण्याचे यापूर्वीचे अयशस्वी प्रयत्न पाहता हा रागाच्या भरात घेतलेला निर्णय नव्हता, तो एक थंड डोक्याने, नियोजनबद्ध केलेला कट होता, हे स्पष्ट होते.

आजच्या पिढीला काही जण ‘मॅगी जनरेशन’ असेही म्हणतात. कारण, या पिढीला यश असो, पैसे असो की स्वातंत्र्य, प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. इमिजिएट. ती मिळत नाही किंवा जेव्हा त्यांच्या मनाविरुद्ध काही घडते किंवा एखादी अडचण समोर येते, तेव्हा ती सोडवण्यासाठी संयम ठेवण्याऐवजी ती अडचणच मुळातून उपटून टाकण्याची हिंसक प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. यामध्ये पालकांची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे. आजच्या काळात मुलांना न मागता सारे काही देणे यालाच पालकत्व मानले जात आहे. यामुळे दोन चुकीच्या गोष्टी घडताहेत. एक म्हणजे, मुलांना वस्तूंचे मोल समजत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, नकार स्वीकारण्याची, पचवण्याची मानसिकताच विकसित होत नाही. सोशल मीडिया आणि इंटरनेटचा अतिवापर करणार्‍या मुलांमध्ये आगतिकता, आसुसलेपणा, अधाशीपणा, ओरबाडून सुख मिळवण्याची मानसिकता अनेकदा दिसून येते. त्याचवेळी ही पिढी इमेज कॉन्शस असल्यामुळे समाजात वावरताना त्यांच्यातील हे दुर्गुण किंवा विकृती दिसून येत नाहीत; पण कसोटीचे क्षण आले किंवा मनाविरुद्ध घटना घडल्या की, या विकृती समोर येतात. सियासारख्या अतिश्रीमंत घरातील तरुण-तरुणींना तर परिस्थितीशी तडजोड करण्याची शिकवणच दिली जात नाही. परिणामी, आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर परिणामांचा कसलाही विचार न करता मनात येईल त्याप्रमाणे कृती करून ही मुले मोकळी होतात.

सियाच्या प्रकरणाचा सर्वांत मोठा धडा म्हणजे, पालकांचा मुलांशी असणारा सुसंवाद वाढायला हवा. आपला विवाह ज्या मुलाशी लावून दिला जात आहे, तो मला मान्य नाही, हे मोकळेपणाने आपल्या पालकांना सांगायला हवे, असे सियाला का वाटले नाही? तेवढी मोकळीक त्यांच्या कुटुंबात का नव्हती? आपले एखाद्या मुलावर प्रेम आहे, हे मुलींना घरामध्ये सांगायला आजही भीती वाटण्यामागे कुटुंबांतर्गत वातावरणात सुसंवादाचा आणि मोकळेपणाचा अभाव हे महत्त्वाचे कारण आहे. ते असते, तर आज केतनसारख्या निष्पाप तरुणाचा बळी गेला नसता आणि सियाचे भवितव्यही अंधःकारमय झाले नसते. तरुणांमध्ये वाढत चाललेल्या क्रौर्याच्या मानसिकतेला मनोरंजनविश्वही जबाबदार आहे. आज ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसीरिज, चित्रपट पाहिल्यास त्यामध्ये अनैतिक संंबंध, हिंसा, नशेबाजपणा यांचा महापूर आलेला दिसतो. तरुण पिढी असे कार्यक्रम, चित्रपट सर्रास पाहत असते आणि बहुतेकदा पालकांना त्याची कल्पनाही नसते; पण सातत्याने अशा मालिका पाहिल्यामुळे विचार प्रक्रियेवर अतिशय नकारात्मक परिणाम होतात.

आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या प्रवाहांचा तरुण पिढीवरील वाढता प्रभाव. विवाहसंस्था, कुटुंबसंस्था यांमुळे भारतीय संस्कृतीची मुळे भक्कम राहिली; पण पश्चिमी जगाच्या अंधानुकरणातून लिव्ह इनसारखे घातक फॅड तरुणाईमध्ये वाढत चालले आहे. त्यातून तयार झालेल्या मानसिकतेचाही परिणाम अशा घटनांच्या रूपाने दिसून येतो. मुले घरात अत्यंत एकलकोंडी राहत असतील, पालकांशी काहीच शेअर करत नसतील आणि त्यांच्या वागण्यात सतत चिडचिड किंवा खोटेपणा दिसत असेल, तर वेळीच त्यांच्याशी संवाद साधा. लहानपणापासूनच मुलांना ‘नाही’ ऐकण्याची आणि परिस्थितीशी तडजोड करण्याची सवय लावा. प्रत्येक हट्ट पूर्ण झाल्यामुळे नकार पचवताना मुले हिंसक प्रतिसाद देऊ शकतात. मुला-मुलींचे विवाह ठरवताना बळजबरी करण्याऐवजी मानसोपचारतज्ज्ञांचे किंवा कौटुंबिक समुपदेशकांचे साहाय्य घेण्यात कमीपणा वाटून घेऊ नका. लोहगड हत्याकांड हे तरुणाईच्या ढासळत्या मानसिक स्वास्थ्याचे लक्षण आहे. आपण आताच त्यांच्या भावनिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही, तर केवळ सोशल मीडियाच्या आभासी जगात जगणारी ही पिढी वास्तवातील नाती आणि मानवी जीवनाची किंमत विसरून जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news