Career choice: मुलांना निवडू द्या त्यांचे करिअर

स्पर्धेत उतरताना आपण आपल्या मुलांना माणूस म्हणून घडवत आहोत की फक्त यशाच्या शर्यतीतील घोडा बनवत आहोत, हा प्रश्न गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे
Career choice
Career choice: मुलांना निवडू द्या त्यांचे करिअरPudhari Photo
Published on
Updated on

आजचा काळ स्पर्धेचा आहे, हे मान्य; पण या स्पर्धेत उतरताना आपण आपल्या मुलांना माणूस म्हणून घडवत आहोत की फक्त यशाच्या शर्यतीतील घोडा बनवत आहोत, हा प्रश्न गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मुलांचे शिक्षण, करिअर, भविष्य याबाबत पालकांची काळजी स्वाभाविक आहे; मात्र हीच काळजी जेव्हा अतिरेकी अपेक्षा, दबाव आणि सक्तीमध्ये बदलते, तेव्हा त्याचे परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर घातक ठरतात.

मुलांची आवड ओळखणे

लहानपणापासूनच प्रत्येक मूल वेगळे असते. कुणाला गाणी आवडतात, कुणाला चित्रकला, कुणाला गणित, कुणाला खेळ, तर कुणाला यंत्रांशी खेळायला आवडते. प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता असते. भाषिक, तर्कशुद्ध, संगीतमय, क्रीडा, सामाजिक, भावनिक इत्यादी.

मुलांच्या लहानपणापासूनच त्यांच्या आवडीनिवडी, कल, छंद यांकडे पालकांनी लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. सतत अभ्यास कर, मार्क्स आण, हे करू नकोस असे म्हणण्याऐवजी, मुलं काय करायला उत्सुक आहेत, हे समजून घेतले पाहिजे. त्यांच्या खेळण्यातून, प्रश्नांतून, कृतीतून त्यांच्या आवडी स्पष्ट होत असतात.

बुद्धी व कौशल्यांचा विकास : तुलना नव्हे, प्रोत्साहन हवे

आपल्या समाजात अजूनही तुलना करण्याची सवय खोलवर रुजलेली आहे. शेजाऱ्याचा मुलगा डॉक्टर झाला, तुझ्या वर्गातली मुलगी पहिली आली अशा तुलना मुलांचा आत्मविश्वास कमी करतात. मुलांना स्वतःशीच स्पर्धा करायला शिकवणे आवश्यक आहे.

एखादे मूल अभ्यासात सरासरी असेल; पण चित्रकलेत, नृत्यात, खेळात किंवा तंत्रज्ञानात प्रावीण्य दाखवत असेल, तर त्या दिशेने त्याच्या कौशल्यांचा विकास करणे गरजेचे आहे. आजच्या काळात करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डिझाईन, ॲनिमेशन, डिजिटल मार्केटिंग, स्पोर्टस्‌‍ सायन्स, मानसशास्त्र, समाजकार्य, उद्योजकता अशा अनेक क्षेत्रांमध्ये उज्ज्वल भवितव्य घडू शकते.

अभ्यासाचा आणि क्लासचा अतिरेक : धोक्याची घंटा

आज लहान वयातच मुलांच्या वेळापत्रकात शाळा, ट्युशन, क्लास, होमवर्क, स्पर्धा परीक्षा यांची गर्दी झालेली दिसते. खेळ, विश्रांती, कुटुंबासोबत वेळ घालवणे यासाठी वेळच उरत नाही. यामुळे मुलांवर प्रचंड मानसिक ताण येतो. बालमानसशास्त्र सांगते की, सातत्याने तणावाखाली असलेली मुले चिडचिडी, अंतर्मुख किंवा आक्रमक बनतात. काही मुले स्वतःला अपयशी समजून न्यूनगंडात जातात. म्हणूनच पालकांनी अभ्यासाइतकेच मानसिक स्वास्थ्यालाही महत्त्व दिले पाहिजे. यामधून तरुणवर्गदेखील सुटलेला नाही.

दबाव नव्हे, संवाद हवा

नुकतीच एका 26 वर्षीय अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. कारण, होतं पालकांचा अभिनय क्षेत्र सोडण्याचा दबाव. तिने आपले अभिनय क्षेत्र सोडून सरकारी नोकरी करावी, लग्न करावं, या दबावामुळे ती तणावाखाली गेली आणि टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर मनोरंजन क्षेत्रात मानसिक आरोग्य, कामाचा ताण आणि भावनिक आधार याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या. म्हणूनच पालकांनी मुलांवर कोणताही दबाव आणू नये, हे सांगणे जितके सोपे आहे तितकेच आचरणात आणणे कठीण आहे. आपण त्यांच्या भल्यासाठीच करतो, या भावनेतून अनेकदा पालक नकळत मुलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतात.

आज आत्महत्येच्या वाढत्या घटनांमागे सहनशक्तीचा अभाव, संवादाचा अभाव आणि अपेक्षांचा अतिरेक ही कारणे ठळकपणे दिसतात. लहानसहान गोष्टी मनाला लावून घेण्याची सवय, आपण अपयशी आहोत ही भावना, मुलांना टोकाचे पाऊल उचलण्याकडे ढकलू शकते.

मुलांशी लहानपणापासूनच सुसंवाद ठेवणे फार महत्त्वाचे आहे. त्यांच्या मनात काय चालले आहे, त्यांना कशाची भीती वाटते, कशाची आवड आहे, हे समजून घेण्यासाठी संवाद हवा. आठवड्यातून किमान एकदा, तरी मुलांना जवळ बसवून, मोबाईल बाजूला ठेवून, निवांत गप्पा मारणे आवश्यक आहे. जेणेकरून मोठे झाल्यानंतरही मुले आपल्याशी कोणतीही खंत, लाज न बाळगता खुल्या मनाने बोलतील.

पाल्यांवर लक्ष; पण नजरकैद नको

मुलांवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याचा अर्थ त्यांच्यावर संशय घेणे किंवा त्यांचे प्रत्येक पाऊल तपासणे असा होत नाही. त्याऐवजी पालकांनी सजग, संवेदनशील आणि समजूतदार असणे अपेक्षित आहे. आपली मुले कुठे जातात, कोणासोबत असतात, काय करतात, ते कोणता विचार करतात, हे जाणून घेणे आवश्यक आहे; पण ते प्रेमाने, विश्वासाने. पालक आणि पाल्यांमध्ये विश्वासाचे नाते असेल, तर मुले स्वतःहून आपल्या अडचणी सांगतात.

तरुण वयातील तणाव आणि समस्या

मोठे होताना मुलांना शैक्षणिक, सामाजिक, भावनिक अशा अनेक अडचणी येतात. करिअरची अनिश्चितता, प्रेमभंग, अपयश, मित्रमैत्रिणींमधील स्पर्धा या सगळ्यांचा ताण त्यांच्या मनावर येतो. या काळात पालकांशी संवाद नसेल, तर मुले एकटी पडतात. मुलांना फक्त यशासाठी तयार करणे पुरेसे नाही, तर अपयश पचवण्याची ताकदही देणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी मुलांना वाचवण्याऐवजी, कधी कधी त्यांना चुका करू देणे, त्यातून शिकू देणे महत्त्वाचे आहे. योग, ध्यान, खेळ, वाचन, निसर्गसान्निध्य - या गोष्टी मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. शाळा आणि पालकांनी मिळून अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

मुलांचे करिअर : त्यांचा निर्णय असू द्या

शेवटी एकच महत्त्वाची गोष्ट, मुलांचे करिअर हा त्यांचा आयुष्यभराचा प्रवास आहे, आपला नव्हे. पालक मार्गदर्शक असावेत, निर्णय लादणारे नकोत. योग्य माहिती, अनुभव, मार्गदर्शन देऊन मुलांना स्वतःचा मार्ग निवडू देणे हीच खरी पालकत्वाची कसोटी आहे.

जेव्हा मुलं त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करतात, तेव्हा त्यांच्यात आनंद, समाधान आणि यश आपोआप येते. आनंदी, आत्मविश्वासी आणि मानसिकदृट्या सक्षम पिढी घडवायची असेल, तर आजपासूनच मुलांना निवडू द्या त्यांचे करिअर!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news