Leopard spotting news | सावधान! बिबट्या फिरतोय...
मोहन एस. मते
राज्याच्या अनेक भागांमध्ये विशेषतः शहरांजवळच्या उपनगरांमध्ये भरवस्तीत बिबट्यांचे नागरिकांवर होत असलेले हल्ले, त्यांचा वावर ही आता चिंताजनक बाब झाली असून राज्याच्या वनसंरक्षण विभागापुढे हे एक मोठे आव्हान ठरले आहे. बिबट्या अचानकपणाने शहरांकडे का धाव घेत आहेत? त्यांच्या अन्नाची समस्या का निर्माण झाली आहे? मानव विरुद्ध वन्यजीव हा संघर्ष का तीव्र होत चालला आहे? आदी अनेक प्रश्नांची उत्तरे यानिमित्ताने जाणून घ्यावी लागतील.
बिबट्या हा मांजर कुळातील प्राणी आहे. बिबट्या त्याच्यापेक्षा कमी उंचीच्या प्राण्याला शिकार समजतो. त्यामुळे लहान मुले आणि जमिनीवर बसलेल्या व्यक्तींवर तो सहसा हल्ला करतो. बिबट्या हा हिंसक प्राणी असला, तरीही तो पर्यावरणाच्या द़ृष्टीने महत्त्वाचा आहे. बिबट्या हा अतिशय निर्भय आणि चपळ असा प्राणी आहे. वैशिष्ट्यपूर्ण कातडीसाठी तसेच अवयवांसाठी त्यांची शिकार होत असते. भारतीय बिबट्या हा रंगाने आफ्रिकन बिबट्यापेक्षा गडद ठिपक्यांचा असतो. भारतातील जंगलात राज्यस्थान, मध्य प्रदेश, दक्षिण भारत, उत्तर प्रदेश येथील जंगलात हा सर्रास दिसतो. आपापसातील अन्नाच्या स्पर्धेमुळे याचे वाघाशी वैर आढळूून येते. जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक असला, तरी आजघडीला तो मानवासाठी दहशतीचे कारण बनला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील ग्रामीण भागाबरोबरच वेगवेगळ्या शहरांजवळच्या उपनगरांमध्ये भरवस्तीत बिबट्यांचा वावर आणि त्यांचे नागरिकांवर होत असलेले हल्ले वाढत चालले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मानवी वस्तीमध्ये सर्रास आणि राजरोसपणे येणार्या बिबट्यांनी राज्याच्या वनसंरक्षण विभागापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. राज्यात मानव-बिबट्या संघर्ष अतितीव्र होत असल्याने राज्य सरकारने याबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या 25 वर्षांपासून राज्यातील नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह कोकण आणि मराठवाड्यात ज्या ज्या ठिकाणी ऊस शेती वाढत आहे, त्या ठिकाणी मानव-बिबट्या संघर्ष उग्र रूप धारण करत आहे. अलीकडच्या काळात पुण्याच्या वेशीवरील गावांमध्ये बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. वन विभागाने 2022 मध्ये बिबट्यांची गणना केली होती, तेव्हा राज्यात सुमारे 2,285 बिबटे असल्याचे आढळले होते. नैसर्गिक नियमानुसार, गेल्या तीन वर्षांमध्ये या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. आता बिबट्यांची जनगणना 2026 मध्ये होणार आहे. तोपर्यंत ही संख्या दुपटीपेक्षा अधिक होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ऊस, कापूस आणि द्राक्षांच्या शेतामध्ये बिबट्यांची मोठी पैदास होत आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर वन विभागातच 2 हजारांपेक्षा अधिक बिबटे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्यांपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसह स्पेशल टास्क फोर्स स्थापनेच्या घोषणा झाल्या. प्रत्यक्षात अद्याप टास्क फोर्स स्थापन झालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिबट्याचे हल्ले आता राज्य आपत्ती जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना वन विभागाला केल्या आहेत. त्यामुळे बिबट्या आता केवळ वन विभागाची जबाबदारी राहिली नसून, ती सार्वजनिक आणि सामूहिक जबाबदारी झाली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये गावागावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू होण्याच्या घटनाही आपण पाहिल्या आहेत. दुसरीकडे राज्यातील हरित क्षेत्र, वन क्षेत्र झपाट्याने कमी होत असल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी कुठेही आडोसा राहिलेला नाही. यामुळेच बिबट्यांचा मानवी वस्त्यांमधील वावर वाढल्याचे दिसत आहे. आठ वर्षांपूर्वी पुणे शहरात सिंहगड किल्ला परिसर, खडकवासला धरण, पानशेत परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता. मुंढवा परिसरातील केशवनगरमध्ये बिबट्याने सहा ते आठ जणांवर हल्ला करून त्यांना मोठ्या प्रमाणात जखमी केले होते. यावरून बिबटे आता संपूर्ण मानवी वस्तीमध्ये कुठेही सहज शिरकाव करत आहेत, हे लक्षात येऊ लागल्याने दक्षता घेणे आवश्यक ठरले आहे. अनेकदा शेतकरी आपल्या शेतात शेळ्या चारत असताना उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने झडप मारून शेळ्यांना ठार मारण्याचे प्रकारही घडले आहेत. वाड्या-वस्त्यांवर सातत्याने बिबट्यांचे दर्शन होत असले, तरी त्या परिसरात बिबट्या नक्की आहेत तरी किती, हा प्रश्न सर्व यंत्रणांना पडलेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नाशिक वन वृत्तात पूर्व भाग नाशिक, पश्चिम भाग नाशिक आणि अहिल्यानगरचा समावेश होतो. या परिसरात मानव-बिबट्या संघर्ष तीव्र बनला आहे. बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत. जानेवारी 2021 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत बिबट्यांच्या हल्ल्यात एकूण 83 जणांचा मृत्यू झाला, तर 289 जण जखमी झाले. याच कालावधीत नाशिक वन वृत्तात बिबट्याच्या हल्ल्याच्या तब्बल 25 हजार 606 घटनांमध्ये पशुधनाचे नुकसान झाले. 2021 मध्ये बिबट्यांनी एकूण 1,961 पशूंवर हल्ले केले होते. मागील वर्षी म्हणजे 2024 मध्ये ही संख्या चौपट म्हणजे 9हजार 305 वर पोहोचली. चालू वर्षात आतापर्यंत बिबट्याच्या पशुधनावरील हल्ल्याच्या 4,651 घटना घडल्या आहेत. तसे पाहता वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष हा गेल्या काही वर्षांत वाढीस लागला आहे. या संघर्षात नागरिक आणि बिबट्या अशा दोहोंनाही आपला जीव गमवावा लागत आहे. राज्याच्या अनेक भागांत हा खेळ वाढीस लागल्याने चिंता निर्माण झालेली आहे. अनेक वर्षांपासून जंगलांवर होत असलेल्या आणि वाढीस लागलेल्या मानवी अतिक्रमणामुळे बिबटे हे अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत.
माणसांवर बिबट्यांचे होत असलेले हल्ले वाढत असतानाच दुसरीकडे बिबट्यांची संख्याही घटत चालली आहे. वन्यजीव विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार 1998 मध्ये भारतात बिबट्यांची संख्या सुमारे 45,000 इतकी होती; मात्र 2015 मध्ये केवळ 7,900 इतकेच बिबटे शिल्लक राहिलेे. याचाच अर्थ 16 ते 17 वर्षांत बिबट्यांच्या संख्येत सुमारे 82 ते 83 टक्के घट झाली होती. तथापि, सध्या राज्याच्या 25 जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली असून, विदर्भातील 9, पश्चिम महाराष्ट्रातील 6, मराठवाडा 2, कोकण 3 आणि उर्वरित महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांचा यात समावेश आहे. बिबट्यांच्या अधिवासावर काँक्रीटचे मोठे जंगल उभे राहिल्यामुळे त्यांनी आता शहारांकडे धाव घेतली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बळी जाण्यामुळे केवळ त्या व्यक्तीचा अंत होत नाही, तर अख्ख्या कुटुंबाचे भावविश्व उद्ध्वस्त होते. तसेच समाजमनात सदोदित एक अनामिक दहशत निर्माण होते. भयमुक्त वातावरणाच्या मूलभूत अपेक्षेला यामुळे तडा जात आहे.
देशभरात 50 पेक्षा अधिक प्रकल्प वाघांच्या संवर्धनासाठी निर्माण केले गेले; पण बिबट्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी म्हणावे तसे कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. बिबट्या हा स्वत:ची जगण्याची तीव्र इच्छा ठेवून वावरत असतो. जगण्याची जिद्द भरपूर असल्याने पक्षी, कुत्रे खाऊन म्हणजे कोणत्याही स्थितीत तो जगण्याचीच धडपड करतो; पण मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे त्याला अन्न मिळणेच दुर्मीळ झाल्याने तो अन्नाच्या शोधात नकळत अनेक घरात घुसतो आहे. बिबट्याच्या मादीला पिलांना जन्म देण्यासाठी उसाच्या शेतीशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही. त्यातच बिबट्यांच्या नव्या पिढीला आता जंगलात राहणे माहिती नाही. या नव्या पिढीसाठी ससे, हरीण नव्हे, तर भटकी जनावरे आणि अन्य गोष्टी हे नवीन खाद्य झाले आहे. गावातील आणि उपनगरांच्या, शहरांच्या मोकळ्या असणार्या जागांवर कचरा पेट्यांवरील भटकी कुत्री, डुकरे आणि जनावरे हे जणू नवबिबट्यांसाठी फास्टफूड झाल्याने त्यांचा वावर कुठेही दिसतो आहे. गेल्या काही वर्षांत बिबट्यांच्या अशा हल्ल्यात 2500 ते 3000 हून अधिक पशुधनाचा बळी गेला आहे. शासनाला बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईपोटी लाखो रुपये द्यावे लागले आहेत.
ग्रामीण काय किंवा शहरी भाग काय, त्यांना उंदीर, कुत्रे, मांजर अशांचे अन्न सहज मिळत आहे. त्यामुळे बिबट्यासमोर कोणी अचानक आले, तर ते हल्लाच करतात. या सर्व पार्श्वभूमीवर बिबट्यांपासून बचावासाठी काय काळजी घ्यावी, याविषयी जनतेला मार्गदर्शन, सुविधा याबाबत संबंधित यंत्रणांनी मदत करणे महत्त्वाचे आहे. तशा प्रकारची जनजागृती खूप महत्त्वाची आहे. हल्लेखोर बिबट्याचा मागोवा घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहेत. कोणतीही घटना घडण्यापूर्वी पिंजरे लावणे गरजेचे असून निवारा केंद्रे, ट्रॅप कॅमेरे, ग्रामसुरक्षा दलाच्या पथकांमध्ये अधिक वाढ होणे अपेक्षित आहे. राज्यातील सर्व परिक्षेत्रातून याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाल्यास लोकांना दिलासा मिळेल. बदलती विकास धोरणे, वाढती लोकसंख्या, मर्यादित क्षेत्रफळ, अतिक्रमणे, अवैध व्यवसाय आदी कारणांमुळे वन क्षेत्र कमीच होत जाणार आहे. त्यामुळे भविष्यात वन्यप्राण्यांसोबत राहण्याची सवय करून घेणे, हाच एक पर्याय मानवासमोर असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे आणि जाणकारांचे मत आहे.
असे असले, तरी लोकवस्तीत येणार्या वाघ, बिबट्यांपासून मानवाचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळच नाही. सद्यस्थितीत राज्याला जलद कृती 24 वनाधिकारी आणि 220 वनरक्षकांची गरज आहे. 14 वन विभागांमध्ये प्रादेशिकचे 48 विभाग, 378 परिक्षेत्र आणि 5613 बीट असून, वन्यजीव विभागांचे 13 विभाग व 103 परिक्षेत्र ज्यामध्ये केवळ 970 बीट मोडतात. सध्या महाराष्ट्रात वन्यजीव विभागाचे 6 क्षेत्र संचालक कार्यरत आहेत. याशिवाय नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई (कांदळवन), छत्रपती संभाजीनगर येथे वन संरक्षक अशी पदे निर्माण करण्यात आली आहेत; मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनरक्षकांची पदे भरण्यात आलेली नाहीत. 9,785 वनरक्षकांवरच वन्यजीव विभागाचा कारभार हाकला जात आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिकमध्ये धुमाकूळ घालणारे बिबटे पकडण्याची घोषणा केली; मात्र वन विभागाकडे असलेली अपुरे साधने आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे या भागातील 2 हजार बिबटे वेळेच्या आत पकडणे शक्य होणार नाही.
बिबट्यापासून बचावासाठी बिबट्या निवारा केंद्राच्या पथकात वाढ व्हायला हवी. तसेच सर्व ठिकाणी जनजागृती करणे, विविध ठिकाणी प्रोजेक्टरच्या माध्यमातून वस्त्यांवर सुरक्षा विषयक फिल्म सतत दाखविणे या गोष्टी काळाची गरज ठरत आहेत. अशा लहान-मोठ्या उपाय योजनांचा प्राधान्याने विचार झाल्यास बिबट्याच्या आव्हानाला सामोरे जाण्यास मदत होईल. तथापि, देशात होत असलेला मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी होण्यासाठी आपल्याला सर्वसमावेशक विचारमंथन करावे लागेल.

