

प्राचीन काळापासून दर 12 वर्षांनी भरणार्या कुंभमेळ्याला हिंदू परंपरेमध्ये मानाचे स्थान आहे. कुंभमेळा हा केवळ धार्मिक मेळावा नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. हा मेळा लाखो लोकांना एकत्र आणतो आणि सामाजिक ऐक्याची प्रचिती देतो. हिमालयामध्ये जाऊन खूप वर्षे कठोर साधना, तपश्चर्या केलेले अनेक साधू, संत, महंत याला उपस्थित राहतात. अशा तपस्वींनी स्नान केलेल्या पाण्यामध्ये एक प्रकारची मांत्रिक शक्ती येते आणि त्यामध्ये आपण स्नान केल्यास त्यांचे पुण्य आपल्याला लागते, अशी धारणा आहे.
दर 12 वर्षांनी भरणारा कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखला जातो. भारतातील हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या चार शहरांमध्ये दर 12 वर्षांनी आयोजित होणार्या या मेळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. यंदा उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार्या कुंभमेळ्याला 30 ते 40 कोटी भाविक हजेरी लावतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सामान्यतः अशा प्रकारच्या धार्मिक परंपरांना पौराणिक कथांचा आधार असतो. कुंभमेळ्याचा उगम समुद्रमंथनाच्या कथेशी जोडलेला आहे. देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले. या मंथनातून लक्ष्मी, कौस्तुभ मणी, पारिजात वृक्ष, ऐरावत हत्ती, उच्छैशाव घोडा आणि कामधेनू यांसह अनेक ज्या अद्भुत गोष्टी उदयास आल्या, त्यापैकी एक म्हणजे अमृत कलश. वस्तुतः यातून विष आणि अमृत दोन्हीही उदयास आले. या हलाहलाच्या ज्वालांपासून जगाला वाचवण्यासाठी भगवान शिवांनी ते सर्व विष प्राशन केले. त्यामुळे त्यांना नीळकंठ म्हटले गेले.
जग त्यांच्या या दयाळूपणाबद्दल युगानयुगे कृतज्ञ राहील. परंतु, अमृत प्राशनाबाबत देव आणि दानवांमध्ये कोणताही करार होऊ शकला नाही. अशावेळी भगवान धन्वंतरींनी हा अमृतकलश समुद्रमंथनाचे प्रमुख भगवान इंद्र यांच्याकडे सुपूर्द केला; पण तो राक्षसांनी हिसकावला आणि ते पळून गेले. या अमृतासाठी देव-दानवांच्यात घनघोर संघर्ष झाला आणि भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून तो सोडवला. पण या संघर्षादरम्यान कलशातील अमृताचे काही थेंब पृथ्वीवर हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी पडले, अशी मान्यता आहे. अमृताचे थेंब पडल्यामुळे ही क्षेत्रे पवित्र झाली, असे मानून या ठिकाणी स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो, अशी धारणा तयार झाली. हे चार थेंब ज्या काळामध्ये सांडले तो काळ म्हणजे सिंहस्थाचा काळ. म्हणून 12 वर्षांनी तो काळ गणला जातो. त्यामुळे या चार ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभमेळा हा केवळ धार्मिक मेळावा नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. हा मेळा लाखो लोकांना एकत्र आणतो आणि सामाजिक ऐक्याची प्रचिती देतो.
कुंभमेळ्यामध्ये सर्वांत मोठे आकर्षण असते ते साधूंचे. आपल्या देशाला विविध सांस्कृतिक परिमाणे आहेत. आपल्याकडे पूर्वीच्या काळी आश्रमव्यवस्था होती. यामध्ये प्रामुख्याने चार आश्रम सांगितले गेले आहेत. त्यामध्ये बालब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. आपण आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर त्या-त्या गोष्टी कराव्यात, असा यामागचा उद्देश होता. लहानपणी आपण ब्रह्मचारी राहून अध्ययन करावे, गृहस्थाश्रमामध्ये आपण संसार-प्रपंच नीटनेटका करावा, पुढे मुले मोठी झाल्यानंतर वानप्रस्थाश्रमामध्ये हळूहळू आपण संसारातून लक्ष काढून घ्यावे आणि शेवटी संन्यास घ्यावा. संन्यासाचा अर्थ सर्व संगांचा परित्याग करणे. त्यानुसार असा परित्याग करणार्यांना साधू म्हटले गेले. गेल्या काही वर्षांमध्ये कुंभमेळ्याला प्रोफेशनल आणि हायटेक स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वीच्या काळी देशाच्या कानाकोपर्यातून हजारो साधू-संत पायी चालत येत होते. संत-महंत हत्ती, घोडे, उंट यांवरून यायचे. आज कुंभमेळ्यामध्येही शाही स्नानासाठी प्रमुख महंत मंडळी हत्तीवरून येतात; परंतु आज या सर्वांना संपर्क करणारी एक मोठी यंत्रणा तयार झाली आहे.
आज अनेक साधू हे संगणक वापरणारे आहेत. या साधूंमध्येही मोठी वैविध्यता असते. प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळे असते. यातील प्रत्येकाने वेगवेगळे हटयोग केलेले असतात. काही साधू एकाच पायावर उभा राहून तपश्चर्या करताना दिसतात. त्यांचे राहण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. वैष्णवपंथीय साधू हे उभे गंध लावतात, तर त्र्यंबकेश्वरला जाणारे शैवपंथीय साधू हे आडवे गंध लावतात. भारतभर असणार्या विविध आखाड्यांमधील महंत या कुंभमेळ्याला उपस्थित राहतात. त्यानंतर त्यांची एक बैठक भरते. यामधील प्रमुख महंतांना प्रथम स्नान करण्याचा मान असतो. कुंभमेळ्याचे पर्व हे वर्षभर सुरू असते. पुढील वर्षी शेवटचे स्नान झाल्यानंतर हा मेळा संपतो आणि वर्षभराच्या मुक्कामानंतर हे साधू परत फिरतात. यासंदर्भात अनेक पारंपरिक प्रथा आहेत. यादरम्यान अशी एक भावना असते, ती म्हणजे कुंभमेळ्यामध्ये हिमालयामध्ये जाऊन खूप वर्षे कठोर साधना, तपश्चर्या केलेले अनेक साधू, संत, महंत उपस्थित राहतात. त्यांचे तपसामर्थ्य खूप मोठे असते. या तपश्चर्येचे तेज त्यांच्या चेहर्यावर दिसत असते. अशा तपस्वींनी स्नान केलेल्या पाण्यामध्ये एक प्रकारची मांत्रिक शक्ती येते आणि त्यामध्ये आपण स्नान केल्यास त्यांचे पुण्य आपल्याला लागते, असे मानले जाते.
आजच्या काळात कुंभमेळ्यासंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केले जातात. विज्ञानयुगाशी त्याचा संबंध जोडून त्याकडे पाहिले जाते. परंतु आपण एकदा परंपरा मानली, श्रद्धा ठेवली की त्यानुसार येणार्या सर्व गोष्टींचा स्वीकार करणे गरजेचे असते. आज कुंभमेळ्यासाठी लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू, भाविक सहभागी होतात. हे सर्वजण सश्रद्ध भावनेने येतात. त्यांच्या भावनांची टिंगल करण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपल्याकडे शेकडो वर्षांपासून आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला हजारो-लाखोंच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत जातात. त्यांच्या भावनांचा, श्रद्धेचा आपण ज्याप्रमाणे आदर करतो, वारीमध्ये सहभागी होतो तशाच भावनेने कुंभमेळ्याकडेही पाहिले पाहिजे. आज इंडोनेशियामध्येही हिंदू मोठ्या प्रमाणावर आहेत; परंतु सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ भारतातच भरतो. त्यामुळेच यामध्ये सहभागी होणार्या श्रद्धाळूंचा आदर आपण करतो. शासनही प्रत्येक धर्माच्या, धर्मीयांच्या भावना जपण्याचा प्रयत्न करत असते. हीच खरी भारताची परंपरा आहे. कुंभमेळ्यादरम्यान जमलेल्या साधूंच्या आखाड्यामध्ये ध्वजारोहणाचा समारंभ असतो. या सर्वांमध्ये मिळून एक ध्वज उभा केला जातो आणि तो उभारला की कुंभमेळा सुरू झाला असे मानले जाते. हा ध्वज वर्षभर कायम असतो. वर्षभर हे धार्मिक वातावरण राहते. त्याभोवतीचे एक प्रकारचे वलय वर्षभर राहते. वर्षभरानंतर तो उतरवला की कुंभमेळ्याचे पर्व संपले, असे मानले जाते. माघ महिन्यात सूर्य मकर राशीत आणि गुरू मेष राशीत असताना येणारी अमावस्या अमृत योग प्रकट करते, असे शास्त्र सांगते.
महाकुंभाचे आयोजन हा भारताच्या विविधतेतील एकतेचा अनोखा उत्सव आहे. भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक चेतनेचे स्पंदन आहे. ‘एक भारत - सर्वोत्कृष्ट भारत -सर्वसमावेशक भारत’ हा संदेश जगाला देणारा अद्वितीय सोहळा आहे. श्रद्धा, परंपरा आणि हिंदू संस्कृती यांचा तो अद्वितीय संगम आहे. यंदाचा महाकुंभमेळा अनेक अर्थांनी खास असणार आहे. यावेळी तब्बल 144 वर्षांनंतर पूर्ण महाकुंभाचे आयोजन करण्यात येत आहे. प्रयागराज येथे या महासोहळ्यासाठी प्रचंड जय्यत तयारी केली गेली आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत समर्पकपणे करण्यात येत आहे. महाकुंभमध्ये एआय चॅटबॉटचा वापर डिजिटल असिस्टंट म्हणून केला जाणार असून त्यामुळे तेथे येणार्या भाविकांचे दैनंदिन जीवन सुसह्य होण्यासाठी अनेक प्रकारे मदत होणार आहे. हवामानाची माहिती, स्थानिक बातम्या, रहदारीची स्थिती किंवा शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती यासारख्या त्यांच्या प्रश्नांची जलद आणि अचूक उत्तरे देण्यास हा चॅटबॉट सक्षम असेल. याशिवाय एआय चॅटबॉट सरकारी योजना, सेवा आणि हेल्पलाईन नंबरची माहिती देऊ शकतो. यामुळे भाविकांच्या वेळेची बचत होईल आणि तत्काळ उपायही मिळतील.
उत्तर प्रदेश सरकारकडून सुमारे 7500 कोटी रुपयांहून अधिक निधी या महामहोत्सवासाठी खर्च करण्यात येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार 1882 च्या महाकुंभमध्ये, मौनी अमावस्येच्या दिवशी सुमारे 8 लाख भाविक संगमामध्ये स्नान करण्यासाठी आले होते. तेव्हा भारताची एकूण लोकसंख्या 22.5 कोटी होती. त्यावेळी कुंभ आयोजित करण्यासाठी फक्त 20288 रुपये खर्च आला होता. या तुलनेत यंदाचा महाकुंभ हा गर्दीचा आणि उलाढालीचा विक्रम प्रस्थापित करणार असे दिसते. यानिमित्ताने उत्तर प्रदेशच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनातून मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध झाला आहे. भारताची संत परंपरा, सर्व वर्ग-जातींचा मोठा समाज या महाकुंभात तरुण-तरुणी आणि महिलांच्या रूपाने सहभागी होतो. जीवनप्रवासात कळत-नकळतपणाने झालेल्या पापांचे प्रायश्चित्त करण्याचा आणि भविष्यात कोणतेही पाप न करण्याची प्रतिज्ञा घेणे ही महाकुंभाची शिकवण आहे. यातून आपली सांस्कृतिक जीवनमूल्ये प्रस्थापित केली जातात.