Kuda caves history | स्त्रियांच्या दानलेखांनी समृद्ध : कुडा लेणी

Kuda caves history |
Kuda caves history | स्त्रियांच्या दानलेखांनी समृद्ध : कुडा लेणी
Published on
Updated on

नीती मेहेंदळे

कोणत्याही लेण्यांचा काळ शोधायचा म्हणजे मदतीला येतात ते लेण्यांमध्ये असलेले शिलालेख. कुडा लेणी हा 26 बौद्ध लेण्यांचा समूह असून येथे सहा चैत्यगृहे कोरलेली आहेत; पण त्यापैकी एक अपूर्ण अवस्थेत आहे. या स्थळावर एकवीस ‘विहार’ लेणींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त येथे पाण्यासाठी अकरा टाक्यादेखील आहेत.

रायगड जिल्ह्यात सह्याद्रीची रांग कधी कधी रांगत पार समुद्राजवळ येऊन ठेपलेली दिसते. आणि एखाद्या प्राचीन बंदराजवळ असा डोंगर सामोरा आला की, त्यात बौद्ध लेणी असायचीच. आजच्या कुलाब्याच्या राजधानीचं ठिकाण अलिबाग असलं, तरी जवळच असलेलं चौल हे प्राचीन बंदर आणि दत्त मंदिराला लागून डोंगरात लेणी आहेतच. त्याला पकडून अजून पुढे दक्षिणेकडे धाव घेतली की, मांदाड लागतं. हेसुद्धा जुनं बंदर बरं का! साहजिक लेणी आहेतच जवळच्या डोंगरात. हे मांदाड म्हणजे रोमन व्यापार्‍यांनी ज्याचा उल्लेख ‘मंदगोरा’ असा केला होता आणि स्थानिक सत्ताधारी घराण्याने म्हणजेच महाभोजने ज्याला ‘मांडव’ असे संबोधले होते, त्या ‘मांदाड’ बंदराचा उल्लेख इसवी सनाच्या दुसर्‍या शतकातील टॉलेमीच्या ‘जिओग्राफिया’ या ग्रंथात आढळतो. तसेच, इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या मध्यावर रचल्या गेलेल्या ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’ या ग्रीक व्यापारी मार्गदर्शिकेतही या बंदराचा उल्लेख केलेला आढळतो. कुडा लेणी कुडा या आधुनिक गावाच्या वरील बाजूस, राजपुरी खाडीवर नजर ठेवणार्‍या एका टेकडीच्या पश्चिम उतारावर वसलेला, सव्वीस बौद्ध शैलगृहांचा एक समूह आहे. कुडा हे तसं अप्रसिद्ध गाव; पण या लेण्यांमुळे प्रकाशात राहिलेलं आहे. कुडा गुंफा या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा एक भाग आहेत आणि प्राचीन भारताची कला, स्थापत्यशास्त्र आणि धार्मिक प्रथांविषयी माहिती पुरवणारा एक स्रोतच आहेत.

कुडा लेणी ही कार्ले लेणींच्या समकालीन असल्याचे मानले जाते. म्हणजेच, त्यांचा कालखंड इ.स.च्या पहिल्या शतकाच्या उत्तरार्धातील असावा. महाडच्या परिसरातील कोळ लेणी स्थळेसुद्धा साधारणपणे कुडा लेणींना समकालीन आहेत. नंतरच्या काळातही कुडा लेण्यांवर काम होत राहिलं. इथली सर्व लेणी इ.स.पू. पहिल्या शतकापासून ते इ.स. सहाव्या शतकापर्यंतच्या काळातील आहेत. ‘थेर’, ‘पवित’ आणि ‘संघ’ या शब्दांच्या उल्लेखावरून असे सूचित होते की, हा गुंफासमूह ‘थेरवाद’ संप्रदायाला समर्पित होता. सुरुवातीच्या लेण्या ‘हीनयान’ संप्रदायाच्या आणि नंतरच्या लेण्या ‘महायान’ संप्रदायाच्या मानल्या जातात.

कोणत्याही लेण्यांचा काळ शोधायचा म्हणजे मदतीला येतात ते लेण्यांमध्ये असलेले शिलालेख. कुडा लेणी हा 26 बौद्ध लेण्यांचा समूह असून येथे सहा चैत्यगृहे कोरलेली आहेत; पण त्यापैकी एक अपूर्ण अवस्थेत आहे. या स्थळावर एकवीस ‘विहार’ लेणींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त येथे पाण्यासाठी अकरा टाक्यादेखील आहेत. प्रस्तूत लेण्यांमध्ये शिलालेखांचा समृद्ध साठा उपलब्ध आहे. येथे तब्बल 31 लहान-मोठे शिलालेख आहेत. त्यांची भाषा प्राकृत असून लिपी ब्राम्ही आहे. कुडा लेण्यांमधील बहुतेक प्रत्येक लेण्यात किमान एक शिलालेख तरी कोरलेला आढळतो. हे शिलालेख त्या काळातील ऐतिहासिक (म्हणजेच सातवाहन काळातील दख्खनच्या राजकीय इतिहास), सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विकासावर प्रकाश टाकणारे आहेत. या देणगीदारांमध्ये लोखंडाचा व्यापारी, वाणी, माळी, कारकून, वैद्य, माळी आणि एक मंत्री यांचा समावेश आहे. यावरून असे स्पष्ट होते की, हे लोक आर्थिकद़ृष्ट्या सुस्थितीत होते. कुडा येथील लेण्यांमध्ये ‘कुमार’ आणि ‘अमात्य’ यांनी देणग्या दिल्याचा उल्लेख आढळतो. हे कुमार आणि अमात्य कदाचित स्थानिक राजवंशातील राजपुत्र आणि मंत्री असावेत. सार्थवाह (व्यापारी प्रमुख), व्यापारी आणि श्रेष्ठी (श्रीमंत व्यापारी) यांनी या लेण्यांना देणग्या दिल्या. यावरून हेदेखील समजते की, त्या काळात ‘श्रेणी’ (व्यापारी संघटना) अस्तित्वात होत्या आणि लेण्यांच्या उत्खननामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. धार्मिक संस्थेला दिलेल्या देणगीचे वर्णन बहुधा ‘दान’ किंवा ‘देयधम्म’ या शब्दांनी केले आहे, असं दिसतं. हे दोन्ही शब्द ‘देण्याच्या धार्मिक कर्तव्या’ची आठवण करून देतात आणि म्हणूनच त्यांचा अर्थ अनेकदा ‘पुण्यकारक देणगी’ असा मानला जातो.

या शिलालेखांतून उपलब्ध होणार्‍या सामाजिक माहितीचा उपयोग, तत्कालीन प्राचीन भारतीय समाजाचे वर्णन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे. हे विहार स्वतःच एक परिपूर्ण संस्कृती होती, जिथे बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणी एकत्र राहत असत आणि भगवान बुद्धांची उपासना करत असत. थोडक्यात सांगायचे तर, कुडा हे एक असे सांस्कृतिक केंद्र होते, जिथे आपल्याला परस्पर सांस्कृतिक एकतेचे आणि बंधुभावाचे दर्शन घडते. कुडा लेण्यांच्या ठिकाणी सातवाहनकालीन मांडलिक ‘मांडवीय महाभोज’ याने कुडा लेण्यांना देणगी दिली होती. त्यांच्या शिलालेखांवरून आपण त्यांची राजकीय सत्ता, राज्यक्षेत्र आणि प्राचीन काळातील आर्थिक स्थिती समजते. शिवाय, महाभोज यांचे ‘हिप्पोकॅम्पस’ (समुद्री घोडा) हे बोधचिन्ह असलेले नाणे सापडल्यामुळे कुडा लेण्यांतील या चिन्हाचा राजेशाही संदर्भ आणि या स्थळाचा ‘भारत-रोमन’ व्यापारातील सहभाग या गोष्टींना आणखीच पुष्टी मिळते. या दानलेखांचा उपयोग बर्‍याच मुद्द्यांचा उलगडा होण्यासाठी झाला आहे.

भगवान बुद्ध आणि बोधिसत्त्व यांच्या शिल्पांच्या खाली काही शिलालेख (कोरीव लेख) आढळून येतात. ही शिल्पे दानवीरांनी अर्पण केली होती. हे दानशूर फारसे श्रीमंत नसून सामान्य नागरिक होते. धार्मिक पुण्यार्जनाची संकल्पना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. ‘रामदत्त’ नावाचा आणखी एक देणगीदार, ज्याने या गुंफांना देणगी दिली होती, तो जन्माने जैन होता, तरीही त्याने एका बौद्ध विहाराला (मठाला) देणगी दिली. यावरून असे सूचित होते की, धर्माधर्मांमधील भिंती किंवा निर्बंध शिथिल होते. आर्थिक व धार्मिकद़ृष्ट्या तत्कालीन स्त्रिया कशा स्वतंत्र होत्या, याचं उत्तम उदाहरण म्हणून कुडा लेणी म्हणता येईल. प्राचीन काळातील स्त्रियांचा सामाजिक दर्जा, त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य, तसेच देणगी देण्याबाबतची त्यांची उदारता आणि संघाप्रति असलेली त्यांची नितांत श्रद्धा यांविषयीची महत्त्वपूर्ण माहिती या दानलेखांतून प्राप्त होते. इथल्या लेणी क्रमांक 16 मधल्या भिंतीवर एक शिलालेख आहे,

सिधं थेराण भयत विजयाण

आंतिवासिणिय पवइतिकाय सपिलाय

देयधंमं लेणं सह सा लोहिताहि वेण्हूयाहि

सह च आंतिवासिणिय बोधिय.

त्याचा अर्थ : भदंत विजय याची शिष्या भिक्षुणी सपिला हिची लोहिता, वेण्हूया व सपिला हिची बोधि नामक शिष्या यांच्यासह दिलेली लेण्याची देणगी. अशाच तिथल्या इतर काही लेण्यांमध्ये कोरलेल्या लेखांवरून सिद्ध होतं की, केवळ स्थानिक राजकन्याच नव्हे, तर बौद्ध भिक्षुणी, उपासिका, वैश्य स्त्रिया, गृहिणी, ब्राह्मण स्त्रिया, शेतकर्‍याची पत्नी अशा अनेक स्त्रियांचा दानकर्त्या म्हणून उल्लेख आढळतो. ज्या अर्थी त्यांचं नाव दानकर्ती म्हणून येतं त्यावरून त्यांना तेवढं आर्थिक स्वातंत्र्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुडा येथील लेणी क्रमांक 1 आणि लेणी क्रमांक 6 या वास्तुकलेच्या द़ृष्टीने अत्यंत समृद्ध आहेत. या लेण्यांमधील हा वास्तू आणि मूर्तीकलांचा विकास म्हणजे एक प्रकारे सांस्कृतिक विकासही होय. या सर्व लेण्यांमध्ये सभागृहाच्या मागील बाजूस गर्भगृह उभारण्याचे एक समान वैशिष्ट्य दिसून येते. प्रस्तुत लेण्यांमधील इतर वास्तू वैशिष्ट्यांमध्ये विहारात भिंतीत कोरलेल्या आसनाची उपस्थिती आणि उपस्तंभांवर वाळूच्या घड्याळाच्या आकाराची नक्षी आढळणे यांचा समावेश होतो. सहाव्या लेणीचे प्रवेशद्वार हत्तींनी सुशोभित केलेले आहे. चैत्याच्या व्हरांड्यात बुद्धांच्या अनेक शिल्पकृती आहेत, ज्यावर कमळ, चक्र आणि नागांची चिन्हे कोरलेली आहेत. कुडाची लेणी, विहार आणि चैत्यगृहे यांमध्ये बोधिसत्त्वांच्या प्रतिमांचा समावेश झालेला आढळतो. राजकीय आश्रयामुळेच हे शक्य झाले असावे. कुडा येथील वास्तुशिल्पीय कामाची सुरुवात ‘एककक्षीय लेण्यांच्या’ निर्मितीने झाली. सुरुवातीच्या काळात कुडा येथे केवळ दोन भिक्खूंना राहण्याची सोय उपलब्ध होती. नंतरच्या काळात एककक्षीय रचना असलेल्या आणखी काही लहान निवासी गुहांची भर पडली.

शिलालेखांमधून आपल्याला तत्कालीन भौतिक आणि अभौतिक संस्कृतींची (मुख्यत्वे मूल्ये, नीतिमूल्ये, धर्म, सामाजिक संकेत) ओळख पटते. काही वेळा हे शिलालेख ‘दान’ या संकल्पनेचे आणि त्यातून मिळणार्‍या आध्यात्मिक पुण्याईचे सविस्तर विवेचन करतात. लेणी क्रमांक 6 मध्ये असे शिलालेख आहेत ज्यांत माता, पिता व सर्व जीवांना सर्वोच्च ज्ञान मिळावे, या उद्देशाने दान दिल्याचे उल्लेख आहेत. काही लेखांमध्ये जो दान तोडेल त्याला पंचमहापातकाचे पाप लागेल अशी शापवाणी सापडते. या सर्व बाबी आपल्याला तत्कालीन समाजाचे सामाजिक संकेत आणि नैतिक विचारसरणी यांची ग्वाही देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news