Kopeshwar temple | अनोख्या स्थापत्य शैलीचे कोपेश्वर मंदिर
कावेरी गिरी
आपल्या संस्कृतीत प्रत्येक सण आणि उत्सवाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे कोजागरी पौर्णिमा, ज्याला शरद पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा असेही म्हणतात. एका बाजूला कोजागरीची रात्र आणि दुसर्या बाजूला महाराष्ट्राच्या गौरवशाली शिल्पकलेचा कळस असलेले खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर! या दोन गोष्टींचा एकत्र विचार करणे म्हणजे एका अलौकिक, तेजस्वी आणि ऐतिहासिक क्षणाची अनुभूती घेणे होय...
कोजागरी पौर्णिमेची सर्वात मोठी वैज्ञानिक आणि आध्यात्मिक विशेषता म्हणजे या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी पूर्ण असतो. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो, असे मानले जाते. त्यामुळे त्याचा प्रकाश तेजस्वी आणि शीतल असतो, असे मानले जाते. आध्यात्मिक द़ृष्ट्या, चंद्राच्या या शीतल आणि तेजस्वी किरणांमधून ‘अमृतवर्षाव’ होतो, असे मानले जाते. या अमृतमय किरणांमुळे आरोग्य आणि मानसिक शांती लाभते. याच कारणामुळे या रात्री दुधाची आटवलेली खीर किंवा मसाला दूध तयार करून ते थेट चांदण्यात ठेवले जाते. खीर किंवा दुधात चंद्राचे किरण शोषले जातात आणि ते प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने शारीरिक रोग दूर होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते, अशी मान्यता आहे. ऋतू बदलाच्या वेळी येणार्या शारीरिक विकारांवर हे मसाला दूध एक नैसर्गिक उपायदेखील मानला जातो, तर या दिवशी केल्या जाणार्या व्रताला ‘कोजागरव्रत’ म्हटले जाते.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वसलेले खिद्रापूर हे गाव आहे. येथे असलेले कोपेश्वर मंदिर केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील प्राचीन शिल्पकलेचा आणि स्थापत्यशास्त्राचा एक अप्रतिम नमुना आहे. कोपेश्वर मंदिराला केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दि. 2 जानेवारी 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. याचे मूळ नाव कोप्पम (कोप्पद) होते. मोगल सरदार खिद्रखान मोकाशीने कोप्पम जिंकून घेतल्यानंतर त्यास खिद्रापूर असे नाव पडले. मंदिरात प्रवेश करताच नगारखाना, स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गाभारा अशी बांधकामाची रचना दिसते. मंदिराच्या गर्भगृहात दोन शिवलिंग आहेत. एक कोपेश्वर (महादेव) आणि दुसरे धोपेश्वर (विष्णू). याच कारणामुळे या मंदिरात इतर शिवमंदिरांप्रमाणे गाभार्यासमोर नंदी नाही. नंदी खिद्रापूरपासून 12 कि.मी. दूर असलेल्या यडूर (कर्नाटक) येथे असल्याचे म्हटले जाते. मंदिराच्या पायथ्याशी खुरशिला, त्यावर गजपट्ट, त्यावर नरपट्ट आणि त्यावर देवकोष्ट (चौकटीसारखी बांधणी) तसेच नक्षीकामाची सजावट पाहायला मिळते. याशिवाय पंचतंत्रातील कथा, तर उत्तरेकडील भागात घंटा वादिका, अहिनकुल (साप-मुंगूस), मिथुन शिल्प अशी देखणी शिल्पे कोरलेली आहेत, जी जैन मंदिराच्या वैशिष्ट्यांना अधोरेखित करतात. मंदिराचे शिखर गोपुरासारखे दिसत असल्याने येथे दक्षिणेकडील स्थापत्यशैलीचा स्पष्ट प्रभाव जाणवतो. मंदिराच्या भिंतींवर विष्णू, ब्रह्मदेव, चामुंडी, भवानी, काळभैरव, गणपती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
मंदिराच्या परिसरात एकूण 12 शिलालेख आढळतात. त्यापैकी 8 शिलालेख कन्नड भाषेत असून, एक संस्कृतमध्ये आणि एक देवनागरी लिपित आहे. नगारखान्याच्या दक्षिणेकडील विरगळावर लिहिलेला पहिला शिलालेख हा जुनी कन्नड, तर दुसर्या शिलालेखात कोपेश्वर मंदिराची स्थिती तसेच कुसुमेश्वर आणि कुटकेश्वर या देवस्थानांचा उल्लेख आढळतो. प्राचीन अद्भुत मंदिराची चार प्रवेशद्वार आहेत. या मंदिराला खास बनवतो तो स्वर्गमंडप. 48 खांब असून मंदिराच्या दर्शनी भागात 13 फूट व्यासाचे गवाक्ष आहे. त्या मापाची खालच्या बाजूस रंगशिला (चंद्रशीला) आहे. याभोवती 12 खांब वर्तुळाकृती आहेत. त्यामध्ये एक मोठा वर्तुळाकार झरोका (छिद्रे) आहे. हा झरोका केवळ प्रकाशासाठी नाही, तर एका विशेष खगोलीय घटनेसाठी बनवला गेला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कोजागरी पौर्णिमेच्या प्रकाशाचा खास सोहळा याच स्वर्गमंडपात अनुभवता येतो.
सभामंडपावर सहा दगडी गवाक्ष आहेत आणि हे वैशिष्ट्य असलेले असे हे एकमेव मंदिर मानले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील स्वर्गमंडपाची रचना. मंडपाच्या बाहेर मूळतः 24 हत्तींची शिल्परचना करण्यात आली होती. त्यापैकी सध्या 11 हत्ती येथे पाहायला मिळतात. मंदिरावर नर्तिका, वादक, लेखिका, शस्त्रधारी द्वारपाल तसेच सप्तमातृकांची प्रतिमा कोरलेल्या आहेत. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र जेव्हा पूर्ण असतो आणि त्याचा प्रकाश सर्वात तेजस्वी असतो, तेव्हा एक अभूतपूर्व सोहळा घडतो. या रात्री आकाशात वर आलेल्या चंद्राची किरणे थेट स्वर्गमंडपाच्या छतावरील त्या वर्तुळाकार झरोक्यातून आत प्रवेश करतात आणि थेट मध्यभागी असलेल्या रंगशिलेवर पडतात. वर्षातून एकदाच केवळ काही घटकांपुरता होणारा हा तेजोमय सोहळा कोपेश्वर मंदिराचे सौंदर्य आतून उजळून टाकतो. ही केवळ एक वास्तुकलेची किमया नाही, तर तत्कालीन खगोलशास्त्राचे आणि स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट ज्ञान दर्शवते.
कोजागरी पौर्णिमा आणि खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर हे दोन्ही भारतीय संस्कृतीतील दिव्यता आणि सौंदर्याचे प्रतीक आहेत. खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर हे स्थापत्य आणि खगोलशास्त्राच्या अद्भुत ज्ञानाचा साक्षीदार आहे, जिथे कोजागरीच्या रात्री चंद्राचा प्रकाश थेट रंगशिलेवर पडून पावित्र्याचा आणि कलात्मकतेचा एक अपूर्व सोहळा साजरा होतो. हा दुर्मीळ संगम आपल्याला आठवण करून देतो की, भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्म, विज्ञान आणि कला यांचा किती सुंदर समन्वय साधलेला आहे. कोजागरीच्या टिपूर चांदण्यामध्ये खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराला भेट देणे, हे प्रत्येक आस्थावान व्यक्तीसाठी एक अलौकिक आणि अविस्मरणीय अनुभव देणारे ठरते.

