

नीती मेहेंदळे
सह्याद्रीच्या घाट वाटांवर लेणी असणं हे महाराष्ट्राच्या अनेक स्थापत्य लक्षणांपैकी एक म्हणता येईल. पुणे - मुंबई बोरघाटाहून जवळ, कर्जत रेल्वे स्थानकापासून सुमारे चार मैलांवर कोंदिवडे नावाचं गाव आहे. जवळ असलेल्या राजमाची किल्ल्याच्या डोंगरात जन्म घेतलेली उल्हास नदी या गावापाशी वेटोळं घालून असते. कोंदिवडे गावापासून थोडं दक्षिणेस या राजमाची डोंगराच्या पोटात 'कोंडाणे' लेण्यांचा समूह दडलेला आहे.
'कोंडाणे' लेणी कार्ला किंवा भाजा लेण्यांपासून वायव्येस स्थित आहेत. हा संदर्भ देण्यामागे एक प्राचीन दस्तावेज दडलेला आहे. तो म्हणजे कोंडाणे लेण्यांचा काळ. त्यांचं स्थापत्य भाजा लेण्यांच्या स्थापत्याशी खूपच मिळतंजुळतं आहे. त्याशिवाय एक कारण म्हणजे, कोंडाणे येथे सापडलेला शिलालेख. या कर्जतजवळच्या डोंगररांगेत अनेक बौद्ध लेणी सापडली आहेत. अजूनही सापडत आहेत. कल्याण व सोपारा या प्राचीन बंदरांपासून बोरघाटामार्गे तेर, पैठण आणि जुन्नर शहरांना जोडणारा हा सगळा प्राचीन व्यापारी मार्ग असल्याने इतकी लेणी असणं साहजिक आहे. जेम्स फर्ग्युसन यांच्या 'केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया' या १८८० मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांची प्रथम लेखी दखल घेतली असं म्हणता येईल. त्यात त्यांनी 'या लेण्यांकडे सर्वप्रथम सुमारे ३० वर्षांपूर्वी दिवंगत विष्णू शास्त्री यांनी लक्ष वेधलं होतं आणि त्यानंतर लगेचच ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी मिस्टर लॉ यांनी यांना भेट दिली होती' असं म्हटलंय. या लेण्यांविषयी विष्णू शास्त्री यांनी मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष जॉन विल्सन यांना दिलेल्या वृत्तांताचा सारांश असा आहे- 'कोंडाणे गावाजवळ लेणे फार चांगले आहे. येथील मुख्य ठिकाणी आत जाण्यासाठी मोठा दरवाजा आहे आणि त्याला लाकडाची कमान आहे. आत बुद्धाच्या देवस्थानाचा वाटोळा घुमट आहे आणि तो मुख्य सभा मंडप वेहेरचे सभा मंडपासारखा उंच आहे व दरवाजाचे बाजूस बुद्धांच्या मूर्ती (यक्षमूर्ती) आहेत आणि त्या मूर्तीचे वरचे बाजूस एक ओळ अक्षरांची कोरलेली आहे, तिला अकरा किंवा बारा अक्षरे फार चांगली आहेत. मुख्य सभा मंडपाच्या शेजारी दुसरा लहान सभा मंडप आहे. तसेच येथे जाण्याचा रस्ता फार अवघड आहे. येथे जायचे असल्यास चांगल्या रस्त्याने जावे म्हणजे पालखीत बसून जाता येईल.' म्हणजे ही १८५० च्या आसपासची घटना असावी. हा झाला लेण्यांचा अर्वाचीन इतिहास.
ही लेणी एका तीव्र उताराच्या कड्यावर खोदली आहेत आणि त्यांच्यासमोर असलेल्या दाट जंगलामुळे त्या सहजपणे दृष्टीस पडत नाहीत. या लेण्यांच्या समूहात १६ बौद्ध लेणी आहेत असा जेम्स फर्ग्युसन यांच्या ग्रंथात संदर्भ आहे; पण आजमितीला त्यातली एकूण आठ लेणी व एक मोठं पाण्याचं टाकं आज अस्तित्वात आहेत. पावसाळ्यात चैत्यगृहासमोर मोठा धबधबा असतो. अशाप्रकारच्या लेण्यांची निर्मिती वर्षावासात राहण्यासाठी झाली होती.
कोंडाणे येथील विहार निश्चितच अधिक अलीकडच्या काळातील वाटतो. याउलट, भाजा येथील चैत्यगृहाशी रचना आणि आकारमानाच्या दृष्टीने अत्यंत साम्य असलेले येथील चैत्य इतकं जीर्ण झालं आहे की, त्यांपैकी कोणतं चैत्यगृह आधी पूर्ण झालं असावं, हे ठरवणं आता अवघड आहे. पहिलं लेणं मोठ्या आकाराचं चैत्य लेणं असून ते अंदाजे नऊ मीटर उंचीचं आहे. चैत्यगृहात असलेले ३२ स्तंभ अष्टकोनी आहेत. मुख्य गाभ्याभोवती असलेल्या सर्व तीस स्तंभांचे तळभाग आणि दर्शनी भागाची शोभा वाढवणाऱ्या दोन अनियमित स्तंभांपैकी एका स्तंभाचा तळभागही जीर्ण झाला आहे. त्यामुळे आता त्यातील बहुतेकांच्या केवळ मूळ जागाच निश्चित करता येतात. या दोन स्तंभांच्या मधल्या मोकळ्या जागेत सुरुवातीला सुमारे १० ते १२ फूट उंचीचा लाकडी पडदा किंवा दर्शनी भिंत बसवलेली होती, ज्यामध्ये आत जाण्यासाठी दरवाजे होते. इतर प्राचीन लेण्यांप्रमाणेच येथेही ही रचना असावी असं दिसतं. इतर सुरुवातीच्या लेण्यांप्रमाणेच हा पडदा स्तंभांना जोडलेला असावा. बेडसे आणि कार्ले येथील लेण्यांची गणना कदाचित सर्वात प्राचीन लेण्यांमध्ये केली जाते, जिथे लवकर खराब होणाऱ्या लाकडी साहित्याऐवजी खडकातच हे पडदे कोरलेले आढळतात. म्हणजे कोंडाणे लेणी कदाचित सर्वात जुन्या लेण्यांपैकी असावीत.
पिंपळपानाच्या आकारातील कमानी कोरलेल्या येथे दिसून येतात. या कमानीभोवती मुखदर्शनावर मोठं कोरीव काम केलेलं दिसतं. ते संपूर्ण लाकडाचं होतं. चैत्याकार गवाक्ष, वेदिकापट्टी, नक्षीदार जाळी, हाती धनुष्य-बाण असलेले नृत्य कलाकार आदींचे शिल्पपट हे सुबक कोरीवकाम या चैत्यगृहाचं खास वैशिष्ट्य. या शिल्पांवर वस्त्रप्रावरणं, अलंकार आणि तत्कालीन वेगळी केशभूषाही उठून दिसते. चैत्यकमानीच्या दोन्ही बाजूंस सात शिल्पपट कोरलेले असून त्यामध्ये स्त्री व पुरुष शिल्पं कोरलेली आहेत. दोन्ही बाजूस असलेल्या या शिल्पपटांच्या खालीच चैत्याच्या बाहेरच्या भिंतीवर भग्नावस्थेतील यक्षाचं शिल्पं कोरलेलं आहे. त्याच्या फेट्यावर रेशमी वस्त्रातील बुट्टीसारखे सुंदर नक्षीकाम आहे. त्याचे कान सामान्यतः असतात त्यापेक्षा वेगळे दिसतात, म्हणजे काहीसे पक्ष्याच्या पंखासारखे असावेत, हे वैशिष्ट्य! याचा अर्थ हा यक्ष नक्कीच. अशाप्रकारचे लेणीरक्षक यक्षमूर्ती कोरायची पद्धत जवळपास सर्व बौद्ध लेण्यांमध्ये दिसून येते. त्याजवळ डाव्या भिंतीवर मौर्यकालीन लिपीतील इ.स.पू. पहिल्या शतकातील एक ओळीचा शिलालेख कोरलेला दिसतो. हा दानलेख असून या लेखाची लिपी ब्राह्मी व भाषा प्राकृत आहे. ज्याचा मजकूर असा आहे- 'कण्हस अन्तेवासिन बलकेन कता'
ज्याचा अनुवादित अर्थ, 'कण्हचा शिष्य बलक याने केलेलं काम' असा आहे. लेखाच्या अक्षरवाटिकेवरून लेण्यांचा काळ समजायला मदत झाली, तर कोंडाणे लेण्यांचा काळ इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाचा किंवा त्याहूनही प्राचीन असावा असं इतिहास संशोधकांचं मत आहे. या समूहात अजूनही काही शिलालेख सापडले आहेत.
आत भव्य स्तूप असून त्याचं शिखर नेहमीपेक्षा अधिक उंच आहे. त्याची हर्मिका भाजा येथील स्तुपाप्रमाणेच सामान्य उंचीच्या दुप्पट आहे. या लेण्याच्या डाव्या बाजूला सात आणि दक्षिण बाजूला सहा स्तंभ अजूनही शिल्लक आहेत. हे स्तंभ आतल्या दिशेने झुकलेले आहेत (जसे भाजा आणि बेडसे येथील स्तंभांप्रमाणे) आणि हे या बांधकामाच्या प्राचीनतेचे लक्षण आहे. डाव्या बाजूच्या एका स्तंभाच्या वरच्या भागावर स्तूप कोरलेला आहे. कार्ले आणि इतर ठिकाणांप्रमाणेच येथेही गजपृष्ठाकृती छत असलेल्या या चैत्यगृहात अर्धवर्तुळाकार लाकडी वासे बसवलेले आहेत; परंतु ते आता अस्तित्वात नाहीत. इथे लाकडी कामाचा एकमेव शिल्लक अवशेष म्हणजे दर्शनी कमानीमधील जाळीदार पडद्याचा काही भाग म्हणता येईल. या लेण्याच्या दर्शनी भागाचं स्वरूप भाजा येथील लेण्याच्या दर्शनी भागाशी खूप मिळतंजुळतं आहे.
लेणे क्र. २ हे चैत्यगृहाखालोखाल दुसरं महत्त्वाचं लेणं आहे. व्हरांडा, सभागृह आणि त्याच्या तिन्ही भिंतींमध्ये खोल्या अशी या विहाराची रचना आहे. एका पट्टीवर दोन ओळींचा धम्म लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. याच पट्टीवर वरच्या भागात अजून एक शिलालेख कोरण्यात आला आहे. हे दोन्ही दानलेखच आहेत. दीर्घिकेच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर चार अर्धस्तंभ आणि त्याच्यावर वेदिकापट्टी कोरलेली असून त्यांच्यावर अर्धउठावातील प्रमाणबद्ध स्तूप कोरलेला आहे. स्तुपाच्या भोवती पिंपळपानाकार चैत्यकमान व स्तुपाच्या वर हर्मिका आणि यष्टी कोरलेली आहे. व्हरांड्यात पाच अष्टकोनी खांब आणि दोन भिंतीच्या टोकांना आयताकृती, अनेकदा मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना असतात, तसे खांबासारखे भाग अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना होती. ओसरीच्या एका टोकाला एक उंचवट्याची कोनाडावजा जागा आहे आणि तिथे 'चैत्य कमानी'च्या खाली अर्ध उठावातील एक लहान स्तूप आहे; या गुहा खोदल्या गेल्या तेव्हा कदाचित हाच पुजला जात असावा. आतल्या बाजूला मुख्य कक्ष असून त्यात १५ खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग चौरस आकाराचा आहे. मध्यभाग अष्टकोनी असून व तळभाग नष्ट झाले आहेत; पण तेही कदाचित चौरस असावेत. छतावर तुळया खांबांच्या माथ्यावरून आडव्या गेल्या आहेत. मुख्य मंडपात जाण्यासाठी तीन रुंद दरवाजे आहेत आणि सभागृहात तिन्ही भिंतींत प्रत्येकी सहा याप्रमाणे एकूण १८ खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत भिक्षूंसाठी ओटा केला आहे. यापैकी १४ खोल्यांच्या दरवाजांवर 'चैत्य कमानी' कोरलेल्या आहेत.
'क्रमांक ४' ही नऊ खोल्यांची एक रांग आहे. त्यापलीकडे एक जलाशय आहे. त्यानंतर खडकाच्या एका मोठ्या ओसरीसारख्या भागाखाली दोन कक्ष आहेत आणि शेवटी एक लहान पाण्याची टाकी आहे. विहारांच्या व्हरांड्यांच्या छतांवर रंगीत चित्रे होती, हे आज शिल्लक अवशेषांवरून समजतं. लेणे क्र. ८ हे लेणं डाव्या बाजूच्या कोपऱ्यात आहे. या लेण्यातील सभागृहाचा उपयोग भोजन मंडप म्हणून, तर छोट्या खोलीचा उपयोग धान्य कोठार म्हणून होत असावा. या लेण्याच्या जवळ लेणी समूहातील एकमेव विस्तीर्ण पाण्याचं टाकं आहे. बोरघाटातून होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वाहतुकीमुळे या लेण्यांना महत्त्व मिळालं असावं. हीनयान (थेरवाद) काळात कोरली गेलेली कोंडाणे लेणी म्हणजे प्राचीन इतिहासातील व्यापारी राजमार्गावरील इतिहासातील महत्त्वाचा दस्तावेज होय.