Kol Caves | शिलालेख जपणारी कोळ लेणी

Kol Caves |
Kol Caves | शिलालेख जपणारी कोळ लेणी
Published on
Updated on

नीती मेहेंदळे

रायगड जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगेच्या बरोबरीने अनेक लहान-मोठ्या टेकड्या आहेत. या टेकड्यांमध्ये पाले गावातली गोवा महामार्गाला लागून असणारी गांधारपाले लेणी, सोनगडाच्या रस्त्यात असलेली मोहोप्रे गावाजवळची मोहोप्रे लेणी आणि कोळ गावाजवळच्या टेकड्यांमधली कोळ लेणी अशा ३ लेणी समूहांचा समावेश आहे. त्यातली एक म्हणजे कोळ लेणी.

महाड शहरापासून दक्षिण दिशेला साधारण चारेक किलोमीटरवर कोळ नावाचं एक साधं गाव आहे; पण या गावाला प्राचीनत्व लाभलंय ते गावाच्या ईशान्येला असलेल्या टेकड्यांमधल्या लेण्यांमुळे. 'कोळ लेणी' हा या कोळ गावाच्या दक्षिणेला टेकडीवर स्थित दोन लहान लेण्यांचा समूह आहे. पहिल्या समूहात फक्त दोन लेणी आहेत. कोळ लेण्यांचा दुसरा समूह आग्नेयेकडील टेकडीवर असून त्यात सात लेण्यांचा समावेश असून पहिल्या लेण्यांपासून डोंगरातच तो एक किलोमीटर अंतरावर आहे. अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर आपण जंगलात लपलेल्या या दुसऱ्या लेणी समूहापाशी थडकतो. इथे लेणी अधिक व सुस्थितीत असल्याने मार्गही त्यामानाने सुकर आहे. दुसऱ्या समूहात ब्राह्मी लिपीतले तीन शिलालेख आढळतात. ते चांगल्या स्थितीत असून अजून तरी वाचण्यायोग्य आहेत.

ही लेणी व त्यांमधले शिलालेख पाहताना एक सरळ लक्षात येतं की, बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रवास करणाऱ्या बौद्ध भिख्खूंना निवारा मिळावा, हा या लेण्यांच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश होता आणि लेण्यांवरील शिलालेख हे दानलेख असून लेणी खोदण्यासाठी देणगी देणाऱ्या दानशूर व्यक्तींची नावे नमूद केलेली आहेत. दानकर्ते याच परिसरातले निवासी असावेत. तथापि, सदर लेण्यांमध्ये सातवाहन काळाचा कोणताही निर्देश दिसत नाही; मात्र ब्राम्ही लिपीची धाटणी आणि या परिसरातील लेण्यांचा काळ या लक्षणांवरून इतिहासकारांच्या मते, या लेण्यांची निर्मिती इसवी सन पूर्व पहिल्या शतकात झाली होती. हा काळ सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीचा कार्यकाळ होता. त्या काळात भारतात बौद्ध धर्माची भरभराट होत होती. सातवाहन राजे हे सम्राट अशोकाचे मांडलिक राजे मानले जात असत. म्हणून या लेण्यांची निर्मिती सातवाहन काळात झाली आहे, असे मानता येईल. सम्राट अशोकाच्या काळापासून ते इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. 'द इंडियन अँटिक्वरी'चे (The Indian Antiquary) संस्थापक जेम्स बर्जेस यांच्या १८८२ मध्ये लिहिलेल्या 'केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया' या ग्रंथात या लेण्यांचा उल्लेख आढळतो. ते म्हणतात, 'कोळ' हे महाडच्या आग्नेयेस आणि सावित्री नदीच्या पलीकडील तीरावर वसलेले एक छोटेसे गाव आहे. या गावाच्या मागील बाजूस असलेल्या टेकडीवर लेण्यांचे दोन छोटे समूह आढळतात: पहिला समूह गावाच्या ईशान्येस असून त्यात काही पडक्या कक्षांचा (cells) समावेश आहे. हे कक्ष आकार किंवा शैलीच्या दृष्टीने फारसे वैशिष्ट्यपूर्ण नाहीत. दुसरा समूह आग्नेयेस असून त्यात एक कक्ष आहे, जो इतर कक्षांच्या तुलनेत काहीसा मोठा आहे; मात्र या सर्व लेण्यांचे खोदकाम अपूर्ण असल्याचे दिसते आणि काळाच्या ओघात त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तरीही या दुसऱ्या समूहात तीन छोटे शिलालेख आढळतात.

दोन समूहांपैकी पहिला समूह पंधरा मिनिटांच्या चढाईनंतर टप्प्यात येतो. शेवटच्या लेण्यांजवळच्या भागात काही खोदीव अस्पष्ट पायऱ्या लागतात. कोळची लेणी म्हणजे अर्धवट अवस्थेतला लेणी प्रकार म्हणता येईल. या पहिल्या समूहात अशा दोन अपूर्ण लेण्यांचा समावेश आहे. पैकी पहिल्या लेण्यात दर्शनी थोडा मोकळा विहाराचा भाग असून त्याच्या दोन बाजूंना भिख्खूंसाठी तीन निवासी कक्ष केले आहेत. ते अतिशय अरुंद, जेमतेम झोपता येईल इतके लहान आहेत. शेजारच्या दुसऱ्या लेण्याबाहेर एक पाण्याचं चौकोनी कोरडं टाकं आहे. या लेण्यातही भिख्खूंसाठी निवासी कक्ष खोदण्याचा प्रयत्न झालेला दिसतो; पण हेही लेणे पूर्णावस्थेत नाही. या दोन्ही लेण्यांमध्ये फक्त विहार व निवासी कक्ष आहेत. दुसऱ्या लेणी समूहात सात गुंफा असून त्या एकाला लागून एक अशा सलग एका पाषाणात खोदल्या गेल्या आहेत. त्यांतली पहिली गुंफा हे भिख्खूंचे एक छोटे निवासस्थान आहे. सध्या ही गुहा मातीने भरलेली असून यात एक अस्पष्ट शिलालेख आहे. भिख्खूंच्या निवासासाठी या गुहा बांधण्यात आल्या होत्या. गुहा कोरणाऱ्या कारागिराचे नाव त्यावर कोरलेले आहे; परंतु ते सध्या अस्पष्ट आहे.

दुसरे लेणे ही मुख्य विहार गुहा आहे. ही जागा उपासनेचे ठिकाण असण्याची शक्यता आहे. कारण, ती मातीने भरलेली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या गुहेत काही नाणी, वस्तूही सापडल्या होत्या. या गुंफेच्या कमानीचे प्रवेशद्वार स्पष्टपणे दिसते. त्याची उंची साधारणपणे २० फूट असावी. गुहेच्या आत डाव्या बाजूला एक खोली आहे. या खोलीत एखादी मूर्ती असू शकते. या लेण्याच्या डाव्या बाजूला भिंतीच्या वरच्या बाजूला एक शिलालेख आहे. त्यावर असे लिहिले आहे : 'थारत गहपतिपुतस सेठीस संघरखितस देयधंमं लेणं'. याचा अर्थ 'थारत गृहपतीचा मुलगा श्रेष्ठी संघरखित याने दिलेली लेण्याची पुण्यकारक देणगी' असा आहे. या उल्लेखावरून असे समजते की, ही मुख्य गुहा असून ती बौद्ध धर्माशी संबंधित आहे. या लेखात 'गहपती' शब्द आला आहे. त्यावरून तो कुटुंबप्रमुख असल्याचे सूचित होते. यावरून तत्कालीन समाजात कुटुंबव्यवस्था दृढ होती, या निष्कर्षाला पुष्टी मिळते.

तिसऱ्या लेण्याच्या मुख्य गुहेच्या डाव्या बाजूला भिख्खूंचे छोटे निवासस्थान आहे. या गुंफांचा उद्देश भिख्खूंना विश्रांती आणि ध्यानासाठी जागा उपलब्ध करून देणे हा होता. आत एक लहान दरवाजा आणि झोपण्यासाठी दगडात बांधलेला ओटाही दिसतो. चौथी गुंफाही अजून एक निवासी गुंफा असून या गुंफेच्या समोरील भिंतीच्या वरच्या भागात एक शिलालेख कोरलेला आहे. त्यावर ‘आघासकसा गमिकयस सिवदतस लेण देयधम’ असा उल्लेख आहे. याचा अर्थ असा की, 'आघासकस' गावातील 'शिवदत्त' नावाच्या उपासकाने ही गुहा दान केली होती. पाचवी गुंफादेखील भिख्खूंचे निवासस्थान आहे. काळ्या पाषाणात कोरलेली ही गुहा उंचावर स्थित असल्याचे दिसते. गुहेच्या प्रवेशद्वारापाशी एक दरवाजा आणि खिडकी आहे. या गुंफेत बसण्याचे कक्षासन केलेले असून तिच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर एक ठसठशीत शिलालेख कोरलेला आहे. ज्यात ‘भद्र उपासकस दुहुतुय धंमसिरिय सिवदतस बितियकाय लेण देयधम’ असे कोरले आहे आणि त्याचा अर्थ ‘भद्र उपासकाची कन्या आणि शिवदत्ताची पत्नी 'धम्मसिरी' हिने दान केलेली गुहा’ असा आहे.

सहाव्या व सातव्या गुंफांमध्ये काही कोरलेली चिन्हे दिसतात; परंतु ही गुहा बऱ्याच अंशी जमिनीखाली गाडली गेली आहे. येथे भिख्खूंचे वास्तव्य असण्याची शक्यता आहे. या साध्या गुंफा असून त्यांमध्ये कोणतीही नक्षीकाम किंवा शिलालेख नाहीत. हेही निवासी कक्ष आहेत. या गुहांशेजारील टेकडीवर आणखी काही गुहा आहेत. हे शिलालेख धम्मसिरी या स्त्रीने दान केले आहेत. यावरून त्या काळात स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य होते, तसेच निर्णय घ्यायची मुभा होती व स्त्रियांना त्या काळात मानाचे स्थान होते असे प्रतीत होते. सावित्री नदीच्या काठाशी असलेल्या या लेण्यांची आज दुरवस्था आहे. मातीचे साठलेले ढीग काढून लेण्यांचं संवर्धन केल्यास शिलालेखांप्रमाणे आणखी काही दस्तावेज हाती लागण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news