देवभूमीची स्पंदने

देवभूमीची स्पंदने
देवभूमीची स्पंदने
Published on: 
Updated on: 

विजय जाधव

केरळम्‌ एक चित्र आहे, निसर्गाच्या हिरव्याकंच कॅनव्हासवर चितारलेले. हा एक रंगोत्सव आहे. येथील संस्कृती समृद्ध आणि सात्विक आहे. ही सात्विकता नकळतपणे आपल्यातही उतरते. देवभूमीची ही खरी ताकद आहे. राज्याने उपलब्ध साधनसामग्री आणि मानवी प्रयत्नांचा अतूट मेळ घातलाय. शेवटच्या स्तरापर्यंतचा माणूस संधी मिळेल तिथे जोडलाय. कोणताही सण-उत्सव सर्व धर्मीयांच्या सहभागाशिवाय साजराच होऊ शकत नाही. दुजाभावाला अजिबात थारा नाही.

'गॉड्स ओन कंट्री' या अद्‌भूत आणि हृदयाला हात घालणाऱ्या टॅगलाईनने ओळखल्या जाणाऱ्या देवभूमी केरळच्या (आजचे केरळम्) अंतरंगात नेमके काय दडलेय, गेली पाच दशके ही भूमी वेगळेपण का राखून आहे, इथला माणूस, त्याची मातृभूमीबद्दलची कमालीची आस्था कशामुळे टिकून आहे, जागतिक पर्यटनाच्या नकाशावर डौलाने मिरवणाऱ्या या राज्याची बलस्थाने काय आहेत, या साऱ्या प्रश्नांची उत्सुकता केरळम्‌च्या भूमीवर पाऊल टाकताना नक्कीच होती.

केंद्रीय पत्रसूचना कार्यालयाने निवडक मराठी पत्रकारांसाठी घडवून आणलेल्या अभ्यासदौऱ्यात देवभूमीच्या यशामागचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला... त्यातून समोर आले, ती ही उत्सुकता आणखी ताणणारे, भ्रम-संभ्रम आणि नकळत बनवल्या गेलेल्या गृहितकांना छेद देणारे वास्तव. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि मर्यादांचा बागुलबुवा न करता येथील माणसाने अत्यंत प्रामाणिकपणे आपले एक विश्व मोठ्या परिश्रमाने, निर्धाराने उभे केले आहे. धर्म-वंश-जातिभेदाची सारी बंधने तोडून टाकून ही देवभूमी उभी केली आहे. निसर्गाने उदारहस्ते उधळण केलेली आणि मानवी हस्तक्षेपापासून अलिप्त असलेली ही भूमी.

गेली अनेक दशके डाव्या विचारसरणीचा पगडा या राज्यावर राहिला. आजही आहे; मात्र या विचारसरणीने विकासाच्या वाटा कधी अडवल्या नाहीत, तर त्या अधिक समृद्ध केल्या. त्याच्या पाऊलखुणा जागोजागी अनुभवायला मिळतात. १९८०-९० च्या दशकातील ही गोष्ट. तत्कालीन पर्यटनमंत्री पी. एस. श्रीनिवासन यांनी या भूमीला सातासमुद्रापार नेण्याचा संकल्प केला. केरळचे ब्रँडिंग करायचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यासाठी संपन्न, बहुआयामी संस्कृती, माणसाचे समुद्राशी असलेले रोजच्या जगण्यातील नाते, बॅक वॉटरमधून उभे राहिलेले, पूर्णत: निसर्गावर अवलंबून असलेले एकजिनसी मानवी जीवन याचा सुंदर मिलाफ घालायचे ठरवले. या विकासाच्या निकडीतून 'गॉड्स ओन कंट्री' चा जन्म झाला! वॉल्टर मेंडेज हे त्या टॅगलाईनचे जन्मदाते. प्रचंड कल्पनाशक्ती असलेला माणूस. एका जाहिरात संस्थेचा क्रिएटिव्ह डायरेक्टर. बहुविध संस्कृती, संपन्न निसर्ग, वर्षभर हिरवे राहणारे डोंगर-दऱ्या, नारळ, सुपारीच्या बागा, चहा-कॉफीचे मळे, बॅक वॉटरचे जाळे, कांदळवने, स्वच्छ समुद्रकिनारे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निःस्तब्ध शांतता. या भूमीच्या उत्कटतेचा शोध घेत त्यांनी केरळम्‌च्या काळजालाच हात घातला!

वॉल्टर मेंडेज यांनी तीन पर्याय शोधले. 'व्हेअर द सीजन नेव्हर एंड', 'पॅराडाईज अनटच्ड' आणि, 'गॉड्स ओन कंट्री' हे ते तीन पर्याय. कम्युनिस्टांनी यापैकी 'गॉड्स ओन कंट्री' हा जादुई पर्याय निवडला! देवभूमी केरळम्‌! ब्रँडिंगसाठीही सुनियोजित मोहीम राबवली गेली. परिणामी, जगातील २५ अव्वल पर्यटन स्थळांच्या यादीत केरळम्‌ जाऊन बसले. पर्यटनाने एका उद्योगाचे रूप घेतले. केरळम्‌चे हिल स्टेशन, दक्षिण भारताचे काश्मीर आणि विस्तीर्ण चहा कॉफीच्या मळ्यांनी बहरलेले मुन्नार, डोंगर उतारावरील मसाल्याची शेती, जीव लावून जपलेली उद्याने, पूर्वेचे व्हेनिस अशी ओळख असलेले ॲलप्पी बॅक वॉटर, भुरळ पाडणाऱ्या तरंगत्या हाऊस बोट, वायनाडची समृद्ध समुद्र जंगले. अनेक लढाया, भारतातील वसाहतींची सुरुवात ठरलेला, पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश वसाहतवादाच्या खुणा गौरवाने मिरवणारा आणि काटेकोर जपणारा फोर्ट कोची, वास्को- द- गामाने येथेच पहिले पाऊल ठेवले. अखेरचा श्वासही याच भूमीत घेतला. त्याचे निवासस्थान, त्याला जेथे दफन केले होते ती जागा (सध्या तिथे चर्च आहे.), पोर्तुगीजांनी त्यांच्या या पुत्राचा देह थडग्यातून बाहेर काढला आणि तेरा वर्षांनंतर तो त्याच्या मायदेशी नेला. वरकला येथील सुंदर किनारा, मंद धुक्याची चादर ओढून घेतलेले अनेक हिल स्टेशन्स. पद्मनाभस्वामी यांचे मंदिर, आद्य शंकराचार्यांचे जन्मस्थान, नारायणगुरूंचे पवित्र स्थान, अनेक भव्य राजवाडे, प्राचीन वास्तू, चर्चेस, मशिदी ही या राज्याची संस्कृती.

एकही खड्डा नसलेले रस्ते, आश्चर्य वाटावे अशी स्वच्छता आणि शांतता हा मंत्र मानून वर्तन करणारे नागरिक ही खरी राज्याची समृद्धी. मुख्यमंत्र्यांपासून शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाला आपल्या या प्रदेशाबद्दल सार्थ अभिमान तर आहेच; पण तो व्यक्त करण्याची कोणतीही संधी ते दवडत नाहीत. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वातूनच केरळीयन असण्याचा गंध दरवळत राहतो. तो आणखी जवळून अनुभवायचा असेल, तर पद्मनाभस्वामी मंदिराला भेट द्यावी, कोची फोर्टवरील ज्यू वसाहतीत फेरफटका मारायला हवा, एर्नाकुलमच्या कुंद वातावरणाची मुग्धता अनुभवायला हवी. तेरा विविध जाती-धर्मांचा समुदाय या राज्यात गुण्यागोविंदाने राहतो. त्यांतील हव्या त्या माणसाशी संवाद साधावा, चिनी फिशिंग नेटमधून होणारी मासेमारी गंमत म्हणून समजून घ्यावी, चहाच्या मळ्यात कोवळी पाने खुडणाऱ्या श्रमिक महिलांशी हितगुज साधावे. संवादादरम्यान राज्याचे पर्यटन सचिव बिजू यांनी व्यापक पर्यटनाचे, त्यामागच्या कष्टाचे अनेक धागे उलगडले. राज्याने उपलब्ध साधनसामग्री आणि मानवी प्रयत्नांचा अतूट मेळ घातलाय. शेवटच्या स्तरापर्यंतचा माणूस संधी मिळेल तिथे जोडलाय. कोणताही सण-उत्सव सर्व धर्मीयांच्या सहभागाशिवाय साजराच होऊ शकत नाही, दुजाभावाला अजिबात थारा नाही. बिजू सांगतात, 'ही युनिटी हेच केरळम्‌चे सौंदर्य. हीच आमची शक्ती'! राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या भेटीची आणि गप्पांची संधी मिळाली. गोव्याचा हा अस्सल मराठी माणूस. केरळम्‌च्या मातीत रमला आहे. केरळम्‌च्या विविधतेतील एकतेबद्दल तेही अनेक किस्से सांगतात. त्यांनी अनेक उपक्रम राबवत राजभवनाला लोकभवन बनवले आहे. पत्रसूचना कार्यालयाचे दक्षिण विभागाचे महासंचालक पलानीचामी हेही असेच. ते मूळचे तामिळनाडूचे. इथल्या भाषेचे रंग उलगडताना संस्कृत भाषा कशी दक्षिणेकडील भाषांची जननी आहे, हे सांगतात.

केरळम्‌ एक चित्र आहे. निसर्गाच्या हिरव्याकंच कॅनव्हासवर चितारलेले. केरळ एक रंगोत्सव आहे. सण, उत्सवात इथल्या माणसाची रंगबाजी अधिक उजळते. रंगांच्या उधळणीत जीवनगाणे गात राहणे, हा या मातीचा श्वास.

केरळम्‌च्या लोकजीवनाला सण, उत्सवांचे तोरण बांधले आहे. कोचीपासून अलेप्पी, कोट्टायम, तिरुवनंतपूरमपर्यंत अनेक शहरांतून प्रवास केला. अनेक ठिकाणी टेम्पल फेस्टिव्हल सुरू होता. तिरुवनंतपूरमजवळ हाऊस बोटीचा अनुभव घ्यायला जाताना जवळच्या गावात कृष्ण मंदिरात हा उत्सव सुरू होता. राधा-कृष्णाच्या रंग-वेषभूषेतील बालकांचे घोळके लक्ष वेधून घेत होते. ही भूमी अशा शेकडो उत्सवांची. कृषी संस्कृतीशी त्याची नाळ जोडलेली. ओणम त्यांपैकीच प्रमुख सण. अस्सल केरळी खाद्यसंस्कृतीने या नैसर्गिक श्रीमंतीला सात्विक स्वाद दिला आहे. खास केळीच्या पानावर रांगोळीसारख्या मांडणीने चितारलेली किमान पंधरा पदार्थांची, अनेक चवींची मेजवानीच ती! कला, संस्कृतीचे समृद्ध दालन हे आणखी एक वैशिष्ट्य. कथकली, मोहिनीअट्टम, कोडियाट्टम, चित्रकला, हस्तकला, सिनेमा या साऱ्यांनी खास केरळी संस्कृतीची वैशिष्ट्ये जीवापाड जपली आहेत.

मानवी विकास निर्देशांक सर्वाधिक, साक्षरता सर्वाधिक ही मानवी विकासाची परिमाणे आधुनिक केरळम्‌चे सौंदर्य आणखी खुलवतात. एका विचारापलीकडे दडलेले सत्य हेच आहे. ही गोष्ट आहे निसर्गाची. ती नाकारून पुढे कसे जाता येईल?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news