

काश्मीरमध्ये मागील चार दशकांमध्ये दहशतवादाचे जे थैमान राहिले त्यामध्ये काश्मिरी नागरिकांचा, तरुणांचा पाठिंबा हा महत्त्वाचा घटक होता. किंबहुना त्या आधारावरच पाकिस्तान नवनवीन षड्यंत्रे रचत राहिला; परंतु पहलगाममधील घटनेनंतर हळहळलेला काश्मीर, काश्मिरी नागरिकांकडून स्वयंस्फूर्तपणे पाळला गेलेला बंद, दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधातील तीव्र नारे यातून बदललेल्या काश्मीरचे दर्शन घडले आहे. पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवादही स्थानिकांच्या पाठिंब्यामुळेच कायमचा गाडण्यात यश आले. आज तीच स्थिती काश्मीरमध्ये आहे.
पहलगाम येथे 26 पर्यटकांच्या हत्याकांडानंतर संपूर्ण देशातून हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. यामध्ये काश्मीर खोर्याचाही समावेश आहे. काश्मीरमधील मोठ्या प्रमाणावरील जनता दहशतवाद्यांविरोधात आणि पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करत आहे. गेल्या साडेतीन दशकांत पहिल्यांदाच जनतेतून इतक्या व्यापक प्रमाणामध्ये एकजुटीने निषेधाचे सूर पाहायला मिळत आहेत. हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. काश्मीर खोर्यातील दहशतवादाचे काऊंटडाऊन सुरू असे याचे वर्णन केले जात आहे.
1980 च्या दशकात पंजाबमध्ये फुटीरतावादाने आणि दहशतवादाने कळस गाठला होता. त्यावेळी संपूर्ण पंजाब अशांत, अस्वस्थ आणि भयग्रस्त बनला होता. पहलगाम आणि रियासीमध्ये झालेल्या हल्ल्यांप्रमाणेच त्यावेळी पंजाबमध्ये दहशतवाद्यांनी प्रवाशांना बसमधून उतरवून वेचून ठार केले होते; परंतु या घटनेचा पंजाबच्या जनतेवर अतिशय खोलवर परिणाम झाला. लोकांत संतापाची लाट उसळली आणि पाहता पाहता पंजाबमध्ये दहशतवादाविरोधात वातावरण तयार झाले. पुढे जाऊन पंजाब पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दहशतवाद्यांचा बिमोड करण्यास सुरुवात केली.
1990 च्या दशकांत खलिस्तानी दहशतवादाने क्रौर्याची परिसीमा गाठलेली असताना तो वेगाने अस्तंगत होत गेला. दहशतवादाला कंटाळलेल्या आणि पीडित लोकांनी एकत्र येऊन खलिस्तानी लोकांचे अक्षरशः कंबरडे मोडले. स्थानिकांच्या पाठिंब्यामुळे सुरक्षा दलांना दहशतवाद्यांची ठिकाणे कळू लागली, त्यांची ओळख पटू लागली. साहजिकच दहशतवाद्यांना मिळणारे पाठबळ कमी झाले अणि त्यांचा पाया उखडला गेला. दहशतवादाचा सामना करणार्या जम्मू-काश्मीरमध्ये आता साडेतीन दशकांनंतर पहिल्यादांच 1990 मध्ये असलेल्या पंजाबसारखी स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दहशतवादाचा नि:पात करण्याची संधी गमावता कामा नये. काश्मीर खोर्यात ज्यारितीने जनता उभी राहत आहे, ती पाकिस्तानसाठी सणसणीत चपराक आहे. पाकिस्तान बॅकफूटवर जात आहे.
आज काश्मीरच्या प्रत्येक घरात पहलगामच्या हल्ल्याची चर्चा होत आहे. काश्मिरी तरुण आणि तरुणी मारेकर्यांना दहशतवादी म्हणत आहेत. या हत्याकांडाला कोणीही पाठीशी घालताना दिसत नाही. काश्मीर खोर्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठातील विद्यार्थीदेखील कोणतेही भय न बाळगता पाकिस्तानच्या विरोधात उघडपणे बोलत आहेत. त्यांच्या मते, पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांची हत्या करणारे मुस्लिम असूच शकत नाहीत. ज्यांनी हत्या केली, त्यांना इस्लामचे नाव घेण्याचा अधिकार नाही. हत्या करणारे मारेकरी काश्मीरच्या अस्मितेचे आणि मानवतेचे शत्रू आहेत आणि त्यांना गोळीनेच उत्तर द्यावे, असा सूर तरुणाईतून निघत आहे. थोडक्यात, आज काश्मीर स्वत:च्या डागाळलेल्या प्रतिमेवरून चिंतेत आहे.
अनेकांच्या मते, याची कारणे अर्थकारणाशी जोडलेली आहेत. कारण, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे पारडे जड झाले, त्यांच्या कारवाया वाढू लागल्या, तर त्याचा थेट परिणाम पर्यटनावर आणि पर्यायाने तिथल्या रोजगारावर व व्यापारावर होणार आहे. यात काश्मिरी समाजाचे प्रचंड नुकसान होऊ शकते. त्यामुळेच काश्मिरी जनता इतक्या एकजुटीने पहलगामविरोधात एकवटली आहे. क्षणभरासाठी हे मत ग्राह्य धरले, तरी हे परिवर्तन सकारात्मक आहे. ते देश म्हणून भारतासाठी हिताचे आहे. आपण प्रत्येक वेळी कारणांच्या शोधात राहिलो आणि पूर्वग्रहदूषितपणाने परिस्थितीकडे पाहू लागलो, तर अनेकदा सत्यशोधनाची प्रक्रिया सापेक्षरीत्या पूर्ण होऊ शकत नाही.
लक्षात घ्या, जगाचा दहशतवादाचा इतिहास असे सांगतो की, कोणताही दहशतवादी हल्ला हा स्थानिकांच्या पाठिंब्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 1993 मध्ये मुंबईमध्ये झालेले बॉम्बस्फोट असतील, रेल्वेमधील साखळी बॉम्बस्फोट असतील किंवा अगदी 26/11 चा दहशतवादी हल्ला असेल या सर्वांमध्ये स्थानिकांचा सहभाग उघड झाला आहे. पहलगामच्या हल्ल्यामध्येही काश्मीर खोर्यातील काही राष्ट्रविरोधी तत्त्वांनी दहशतवाद्यांना सहकार्य केलेले असणार आहे. मागील काळातही अगदी सुरक्षा यंत्रणांवर दगडफेक करण्यापासून दहशतवाद्यांना घरात आश्रय देण्यापर्यंत अनेक प्रकारचे सहकार्य काश्मीरमधील तरुणांनी, जनतेने केले आहे; पण 2019 नंतर परिस्थिती बदलत गेली आहे. या बदलाकडे आपण सकारात्मकतेनेच पाहिले पाहिजे. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर बदलतोय. पश्चाताप ही कोणत्याही सुधारणेची पहिली व महत्त्वाची पायरी असते. गुन्हेगारी मानसशास्त्रही असे सांगते की, सुधारणेसाठीची संधी दिल्यास सराईत गुन्हेगारांचेही मतपरिवर्तन होते. आज काश्मीरमधील बहुसंख्य जनतेला ही बाब कळून चुकली आहे. आजवर पाकिस्तानच्या आणि काश्मीरमधील फुटिरतावाद्यांच्या आमिषांना, द्वेषमूलक प्रचाराला बळी पडून आपल्या अनेक पिढ्या बरबाद झाल्या. रक्तपात, हिंसाचाराने विकासाच्या संधी निसटून गेल्या. परिणामी, उर्वरित देश पुढे निघून गेला आणि आपण मागे राहिलो, या वास्तवाचे भान त्यांना आले आहे. त्यामुळेच आज काश्मीरमधील प्रत्येक भागातून पहलगामचा निषेध होताना दिसत आहे.
काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात केलेले भाषण या सर्वांमधील कडी म्हणावे लागेल. काश्मीरच्या वर्मावरच घाव बसला असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीर खोर्यात यंदा प्रथमच कथुआपासून कुपवाडापर्यंत संपूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे, कोणत्याही राजकीय पक्षाने या बंदचे आवाहन केलेले नव्हते. हा उत्स्फूर्त बंद पाकिस्तान आणि दहशतवादाविरोधात होता. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही या बंदमध्ये सरकारची कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. आजवर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बंदचे आवाहन केले जायचे आणि जनता आपल्या सुरक्षा यंत्रणांच्या आदेशांना झुगारून दहशतवाद्यांचे आदेश मानत असे; पण आज याच दहशतवाद्यांविरोधात काश्मिरी तरुण, महिला, वृद्ध सर्व जण एकजुटीने रस्त्यावर उतरताना दिसले. जम्मूच्या रियासी जिल्ह्यातील पूर्वाश्रमीचा दहशतवादी महंमद कल्लू ऊर्फ शाकीर याने देखील मशिदीत बोलताना निष्पाप लोकांना मारणे इस्लाम धर्माच्या विरोधात असल्याचे म्हटले. पर्यटकांना आई, बहीण, पत्नी, मुली नसतात का? अशा प्रकारचे प्रश्न काश्मीर खोर्यात प्रथमच विचारले जात आहेत.
हा बदल आपण समजून घेतलाच पाहिजे. जनतेच्या मनात उमटलेल्या या भावनांचा आदर करत आणि त्यांना सोबत घेत काश्मीरमधील दहशतवादाला, फुटीरवादाला आणि पाकिस्तानच्या विचारांना गाडण्याची सुवर्णसंधी सरकारला लाभली आहे. पंजाबमध्येदेखील दहशतवाद अशाच प्रकारे संपविण्यात आला. तत्कालीन पोलिसप्रमुख के.पी.एस. गिल यांनी स्थानिक माहितीच्या आधारे एकेक खलिस्तानींना शोधून काढून कंठस्नान घातले होते. आज तीच स्थिती काश्मीरमध्ये आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन काळजीपूर्वक पावले टाकायला हवीत आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवायला हवे. सुरक्षा दले बंदुकीच्या नळीने दहशतवाद्यांना नियंत्रित करू शकत असली, तरी त्याला मर्यादा आहेत. याउलट जनतेची भक्कम साथ राहिली, तर अलगाववाद आणि दहशतवाद यांविरुद्धची लढाई सुकर, परिपूर्ण आणि अंतिम उद्दिष्ट साध्य करणारी ठरेल.
श्रीनगरच्या जामा मशिदीत पहिल्यांदाच पहलगामच्या सामूहिक हत्याकांडाचा आणि पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला. असा अनुभव यापूर्वी कधीही आला नव्हता. मिरवाईज उमर फारूख यानेही प्रथमच या हत्याकांडाची निंदा केली. अशा प्रकारची भूमिका यापूर्वी त्यांनी कधीही घेतली नव्हती. काश्मीरमध्ये अनेकदा प्राणघातक हल्ले झाले आहेत; मात्र आता जनतेत याबाबत तीव्र चीड दिसत आहे. या असंतोषाला योग्य दिशा देणे गरजेचे आहे. या माध्यमातून काश्मीर विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करू शकेल.
पहलगामच्या हल्ल्यात हुतात्मा झालेला टुरिस्ट गाईड आदिल शेख यांचे स्मरण करणे गरजेचे आहे. सामान्य कुटुंबातील हा कर्ता मुलगा गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे आणि काश्मीरची जनताही शोकमग्न झाली आहे. जनतेचा जीव वाचविण्यासाठी धडपड करणारे असे तरुण काश्मीर खोर्यात तयार करावे लागतील. केंद्र सरकारने गेल्या वर्षी गुज्जर बकरवाल यांना नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या समुदायाच्या मदतीने राज्यातील फुटिरतावाद संपविण्यासाठी बराच हातभार लागू शकतो. या समुदायाची जंगलावर हुकूमत आहे. गुज्जर बकरवाल समुदायातील तरुणांना पोलिस किंवा लष्करात सामील करून दहशतवाद्यांना चोख उत्तर देता येऊ शकते. खोर्यातील सध्याच्या सकारात्मक वातावरणाचा परिणाम कमी होणार नाही, हे सरकारने पाहिले पाहिजे.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा तपास यंत्रणाने या हल्ल्यात सहभागी असलेल्या किंवा पाकिस्तानात बसून काश्मीरमध्ये कटकारस्थान करणार्या एक डझनापेक्षा अधिक दहशतवाद्यांची घरे नष्ट केली आहेत. आता काश्मीरमध्ये व्यापक सुधारणांचा काळ आला आहे. काश्मीरमधील जनतेच्या मतपरिवर्तनाला दुसरा एक पैलू आहे तो म्हणजे भिकेकंगाल झालेला पाकिस्तान. आज भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनलेला असताना पाकिस्तान जगभरात हातात कटोरा घेऊन मदतीची भीक मागत फिरत आहे. यातील संदेश काश्मिरी जनतेने ओळखला आहे. पाकिस्तानची बिकट स्थिती पाहून काही काश्मिरी जनतेच्या मनात असलेले पाकिस्तानप्रेम कमी झाले आहे. असे नसते, तर काश्मीरमध्ये सलग तीन दिवस पाकिस्तानच्या विरोधात आंदोलन झालेच नसते. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा बंधुता, सलोखा प्रस्थापित करण्यासाठी सरकारबरोबरच जनतेची देखील भूमिका महत्त्वाची राहणार आहे. काश्मिरी जनतेने ही एकजूट आणि दहशतवादविरोधी भूमिका कायम ठेवत स्वयंस्फूर्तरीत्या सुरक्षा दलांना मदत केली पाहिजे, तरच या नंदनवनावर गेल्या साडेतीन दशकांपासून स्वार झालेला दहशतवादाचा राक्षस कायमचा गाडला जाईल.