

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या वादळी व्यक्तिमत्त्व असलेल्या अध्यक्षासाठी व्हाईट हाऊसमध्ये प्रेस सेक्रेटरी म्हणून काम करणे जोखमीचे; पण तितकेच आव्हानात्मक आहे. कॅरोलाईन लेव्हीट या आतापर्यंतच्या या पदावरील सर्वात तरुण अधिकारी असून, अत्यंत आत्मविश्वासाने ही जबाबदारी सांभाळत आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या कॅरोलाईन यांचा व्हाईट हाऊसपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे.
कॅरोलाईन लेव्हीट हे नाव व्हाईट हाऊससंदर्भात अलीकडच्या काळात अधिक महत्त्वाचे झाले असल्यास आश्चर्य नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर त्यांची प्रेस सेक्रेटरी म्हणून या अवघ्या 27 वर्षे वयाच्या सोनेरी केसांच्या, स्मार्ट आणि चुणचुणीत युवतीची त्यांनी केलेली निवड किती सार्थ आहे हे आता स्पष्ट झाले आहे. व्हाईट हाऊसच्या इतिहासातील सर्वात तरुण सेक्रेटरी म्हणून नव्हे, तर ट्रम्प यांच्यासारख्या वादळी व्यक्तिमत्त्वाची असंख्य धोरणे, उलटसुलट वादाचे विषय होत असताना त्यांचे तगडे समर्थन देशी-विदेशी पत्रकारांच्या आडव्यातिडव्या, आक्रमक, बोचर्या प्रश्नांवर आत्मविश्वासाने करण्याचे कौशल्य असाधारण म्हणायला हवे. देखण्या चेहर्याबरोबरच हजरजबाबीपणा, अफाट वक्तृत्व, अभ्यास, बहुश्रुतता, काहीसा फटकळपणा इत्यादींच्या जोरावर उपस्थित पत्रकारांना त्या साहसाने सामोर्या जात असतात. ट्रम्प यांच्या माध्यमांबाबतच्या लढाऊ पवित्र्याशी त्यांची शैली मिळतीजुळतीच आहे.
ट्रम्प प्रशासन मीडिया बॅटल्सच्या धुमश्चक्रीत सापडले असतानाच्या सध्याच्या काळात एक आदर्श खंदी समर्थक (आयडियल प्रोटोगॉनिस्ट) म्हणून कॅरोलाईन यांच्या इतकी दुसरी लायक सेक्रेटरी सापडणे अवघड आहे. ‘अनपोलॉजिटेकली कॉम्बॅटिव्ह आणि नो-नॉन्सेन्स स्पोकपर्सन’ असे त्यांचे वर्णन अगदी सार्थ ठरते.
अलीकडील एका ‘प्रेस ब्रिफिंग’मध्ये फ्रेंच राजकीय नेते रॅफाईल ग्लुक्समन यांच्या मागणीचा विषय एका पत्रकाराने उपस्थित केला. अमेरिकेला फ्रान्सने भेट म्हणून दिलेला स्वातंत्र्यदेवीचा पुतळा अमेरिकेकडून परत घ्यावा; कारण त्या मूल्यांशी ही महासत्ता आता प्रामाणिक राहिलेली नाही, असे त्यांचे म्हणणे होते. हा पुतळा अमेरिका परत करणार का? असा पत्रकाराचा प्रश्न होता. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता कॅरोलाईन म्हणाल्या ‘पुतळा बिलकूल परत करणार नाही. केवळ अमेरिकेमुळे फ्रेंच नागरिकांना त्यांच्या देशात जर्मन बोलावे लागत नाही, याबद्दल त्यांनी आमच्या देशाशी कृतज्ञ राहिले पाहिजे.’ इतिहासातील हा दाखला देत त्यांनी या प्रश्नाची हवाच या उत्तराने काढून घेतली. ट्रम्प यांच्याप्रमाणे प्रखर राष्ट्रवादही त्यांच्या उत्तरातून व्यक्त झाला.
व्हाईट हाऊसशी निगडित पत्रकारांची अधिकृत संघटना ओव्हल ऑफिसमधील प्रेस ब्रिफिंगला कोण उपस्थित राहील, हे आतापर्यंत ठरवत होती किंवा एअर फोर्स वनच्या ट्रम्प यांच्याबरोबरच्या दौर्यात कोण सहभागी होणार, याचाही निर्णय घेत होती; पण हा निर्णय आता व्हाईट हाऊस घेईल, हे सांगून या संघटनेची मक्तेदारी या सेक्रेटरीने मोडून काढली. पारंपरिक माध्यमे ही ट्रम्प यांच्याप्रमाणे त्यांच्या टीकेची लक्ष्य आहेत. ही माध्यमे खोटा प्रचार करतात, असा दावा करून नवीन माध्यमातील पॉडकास्टर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, स्वतंत्र पत्रकार आणि इतर अनेकांना आता संधी देण्यात आली आहे. व्हाईट हाऊसच्या ‘प्रेस क्रेडेन्शिअल’साठी 12 हजारांहून अधिक जणांनी ही संधी हवी आहे. सध्या रोटेशन पद्धतीने निवड केली जाते.
ट्रम्प हे पारंपरिक माध्यमांबद्दल प्रतिकूल मत व्यक्त करीत असले, तरी ते जवळजवळ रोज पत्रकारांच्या प्रश्नांना तोंड देत असतात. त्या तुलनेत कॅरोलाईन यांचे प्रेस ब्रिफिंग आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा होते. त्या सर्वांना प्रश्न विचारण्याची संधी देतात. ट्रम्प समर्थक उजव्या विचारसरणीच्या पत्रकारांना प्रश्न विचारण्याला प्राधान्य मिळते. जो बायडेन यांच्या राजवटीत त्यांना डावलण्यात आले होते हा त्यांचा त्यावरचा युक्तिवाद असतो. ‘सीएनएन’च्या महिला वार्ताहराशी (केटलॅन कॉलिन्स) त्यांचे अनेकदा खटके उडालेले आहेत. टॅरिफच्या वादग्रस्त प्रश्नावरही, त्या टॅरिफ म्हणजे अमेरिकनांच्या द़ृष्टीने करकपात आहे, यावर भर देतात. यावर उत्तरे देताना त्यांना तारेवरची बरीच कसरत करावी लागते. हार्वर्ड विद्यापीठ फ्री स्पीचच्या नावाखाली ज्यूविरोधी वातावरण तापवत असल्याने ट्रम्प यांनी त्यांचे सरकारी अनुदान आणि सरकारी करातून सुटकेची सवलत रोखून धरली आहे, असे त्या ठणकावून सांगतात.
ट्रम्प यांच्यावरील आणि त्यांच्या धोरणांवरील निष्ठा हे त्यांचे महत्त्वाचे शक्तिस्थान. देशाच्या इतिहासातील सर्वात पारदर्शी अध्यक्ष, अमेरिकन जनतेच्या कल्याणाचा ध्यास घेतलेला नेता, असे ट्र्म्प यांचे वर्णन त्या वारंवार करीत असतात. ट्रम्प यांनी कॅरोलाईन यांची जाहीर स्तुती करताना त्या ‘स्मार्ट आणि टफ’ असल्याचे म्हटले आहे. मात्र, ट्रम्प यांच्या धोरणांचे समर्थन करताना त्यांना कधीकधी मोठ्या संघर्षालाही तोंड द्यावे लागते. असोसिएटेड प्रेसने दाखल केलेल्या खटल्यात व्हाईट हाऊसमधील ज्या तीन अधिकार्यांची नावे आहेत, त्यात त्यांचेही नाव आहे. ट्रम्प यांनी ‘गल्फ ऑफ मेक्सिको’चे नवे नामकरण ‘गल्फ ऑफ अमेरिका’ असे केले असताना या वृत्तसंस्थेने हा बदल स्वीकारण्यास नकार दिला. म्हणून व्हाईट हाऊसमधील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास ‘एपी’ला बंदी घालण्यात आली. त्याविरोधात हा खटला सुरू आहे.
‘गुड आफ्टरनून एव्हरीबडी’ अशी आपल्या ब्रिफिंगची सुरुवात करणार्या कॅरोलाईन यांचा व्हाईट हाऊसपर्यंतचा प्रवासही तसा संघर्षमय आहे. न्यू हॅम्पशायरमधील अटकिन्सन या छोट्या शहरात एका परंपरावादी कुटुंबात जन्माला आलेल्या या मुलीने आपल्या आई-वडिलांचे कष्ट पाहिले होते. तिच्या वडिलांचे आईस्क्रीम शॉप आणि यूज्ड ट्रकची डीलरशिप होती. जगण्यासाठी मेहनत आणि श्रम केल्याशिवाय पर्याय नाही, हे तिच्या लक्षात आले होते. ट्रम्प यांच्या विचारसरणीवर तिची नितांत श्रद्धा होती. आपल्या वर्गात प्राध्यापकाने ट्रम्प यांच्यावर टीका केल्याचा राग येऊन तिने 2017 मध्ये आपल्या विद्यापीठाच्या वृत्तपत्रात निषेध करणारे पत्र पाठविले होते. मॅसॅच्युसेट येथील सेंट्रल कॅथॉलिक हायस्कूलमध्ये शिक्षणात हुशार विद्यार्थिनी म्हणून ती ओळखली जाऊ लागली. कॅथॉलिक पंथाचा मोठा प्रभावही तिच्यावर कायम राहिला. ‘ब्रॉडकास्ट जर्नालिझम’मध्ये पत्रकार होण्याचे या युवतीचे स्वप्न होते, ‘फॅमिली कॅमकॉर्डर’वर ‘मेक बिलिव्ह न्यूजकास्ट’चे प्रयोग तिने तिच्या भावासमवेत करून पाहिले. कॉलेजमध्ये सॉफ्टबॉल आणि इतर क्रीडा प्रकारात तिला स्कॉलरशिप्स मिळाल्या. परंपरावादी धोरणांची खंदी समर्थक असलेल्या या युवतीने कॉलेजमध्ये पहिला ब्रॉडकास्टिंग क्लब स्थापन करून ट्रम्प यांच्या धोरणाची स्तुती करणारे संपादकीय लिहून रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणात उडी घेण्याची पहिली तयारी दाखविली. कॅमेर्यासमोर राजकीय स्थितीचे विश्लेषण करण्याचा अनुभव तिथे घेता आला. उन्हाळी सुट्टीत ‘फॉक्स न्यूज’मध्ये शिकाऊ पत्रकारितेसाठी तिने अर्जही केला होता; पण नशिबाने तिच्यासाठी नवी संधी तयार ठेवली होती.
‘फॉक्स न्यूज’मधील अल्पकालीन इंटर्नशिप आणि पुढे व्हाईट हाऊसमधील अध्यक्षीय पत्रव्यवहाराच्या कार्यालयापर्यंतच्या कामाचा अनुभव हा ट्रम्प यांच्या विश्वात प्रवेश करण्यास पुरेसा होता. अगदी सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत अध्यक्षांच्या नावाने त्यांना पत्रे लिहावी लागत. पदवी घेतल्यानंतर 2019 मध्ये तिने वॉशिंग्टन डी सीत आपले बस्तान बसविले. कायली मॅकनानी या महिला प्रेस सेक्रेटरीच्या हाताखाली असिस्टंट प्रेस सेक्रेटरी म्हणून काम करताना ‘मेनस्ट्रीम मीडिया’ला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे कौशल्य या तरुणीने आत्मसात केले. 2020 मध्ये ट्रम्प पराभूत झाल्यावरही त्यांनी हार मानली नाही. ट्रम्प यांच्या एका पाठिराख्याच्या प्रचाराच्या कम्युनिकेशन डायरेक्टरची जबाबदारी सांभाळली. 2022 मध्ये तर कॅरोलाईन न्यू हॅम्पशायरमधून संसदेच्या निवडणुकीत उतरल्या. रिपब्लिकन प्रायमरीत जिंकूनही अंतिम निवडणुकीत पराभव वाट्याला आला; पण त्यामुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षेला मात्र अजिबात तडा गेला नाही. गर्भवती असतानाच्या काळात ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेत राष्ट्रीय पातळीवर प्रेस सेकेटरीपदाचीही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली.
त्या एका मुलाची आई असून, संसार आणि करिअर व्यवस्थित सांभाळत आहेत. पती आणि आईचा पाठिंबा असल्याचे त्या सांगतात. जुलै 2024 मध्ये जन्म दिलेल्या मुलाला त्या लाडाने निको म्हणतात. आपल्यापेक्षा 32 वर्षे वयाने मोठ्या असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रातील विकसक निकोलस रिको यांच्याशी विवाह केल्याबद्दल समाजमाध्यमांमध्ये अनेक गॉसिपला त्यांना सामोरे जावे लागले. तथापि, त्याला त्यांनी न जुमानता दोघांची समान विचारसरणी, मूल्ये, प्रेम आणि परस्परांविषयी आदर, यामुळे हा विवाह केल्याचे त्या सांगतात. मुलाला जन्म दिल्यानंतरच्या चौथ्या दिवशी त्या कामावर हजर होत्या. गेल्यावर्षी जूनमध्ये निवडणूक प्रचारात ट्रम्प यांच्यावर प्राणघातक गोळीबाराचा हल्ला झाला होता, त्या दिवशीची आणीबाणी लक्षात घेऊन त्यांनी हे धाडस केले. बाळंतपणासाठीही त्यांनी अल्प कालावधीची सुट्टी घेतली होती. ‘वंडर वूमन’ या शीर्षकाच्या त्यांच्यावरील लेखात त्यांनी या प्रसंगाचा संदर्भ दिला आहे. प्रेस सेक्रेटरी म्हणून काम करणे हे मोठ्या जोखमीचे आहे. पाच ते सहा तासांपेक्षा जास्त झोप त्या घेत नाहीत. 24 बाय 7 हे कामाचे स्वरूप. त्यासाठी सतत तयारी करावी लागते.
धोरणात्मक बाबींचा अभ्यास करावा लागतो. विविध माध्यमातील बातम्या , संपादकीय लेखन नजरेखालून घालावे लागते. ब्रिफिंग साठी व्हाईट हाउस मधील धोरणविषयक तज्ञांच्या तुकडीशी चर्चा करावी लागते. ट्र्म्प यांच्याशी त्यांची धोरणे आणि त्यातील बारकावे समजावून घेण्यासाठी बोलावे लागते. आपली भाषणे , कार्यकारी आदेश , त्याच्याबाबतची अचूकता याबाबत ट्र्म्प कमालीचे दक्ष असतात. त्यांना जे सांगायचे आहे , तेच कॅरोलाइन यांना ठामपणे सांगावे लागते. त्यांचे वैशिष्ठ्य हे की , त्या ब्रिफिंगच्या वेळी भारंभार टिपण्यांचे ओझे बाळगत नाहीत. अगदी मोजकी कागदपत्रे आणि स्मरणशक्ती यावर त्यांची भिस्त असते.बहुसंख्य पत्रकारांना त्या ओळखत असल्याने त्यांना त्या पहिल्या नावाने संबोधतात.कधीकधी फ़टकळ राहूनही वातावरण हसते खेळते राहील , असा त्यांचा प्र्यत्न दिसतो .
व्हाईट हाउस प्रेस सेक्रेटरी सतत प्रसिध्दीच्या प्रकाशझोतात असल्याने त्यांच्या भविष्याविषयीच्या महत्वाकांक्षाही मोठ्या असतात , हे इतिहासाचे दाखले आहेत . उदाहरणार्थ साराह हकबी सँडर्स या 2022 मध्ये अर्कान्सस या आपल्या राज्यातून रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर गव्हर्नर म्हणून विजयी झाल्या. त्या 2017 ते 2019 या कालावधीत ट्र्म्प यांच्या प्रेस सेक्रेटरी होत्या , न जाणो कॅरोलाइन कदाचित या मार्गाने राजकीय जीवनात एखादे अधिकारपद मिळवितीलही .त्या वयाने तरुण आहेत . मॅगा समर्थकांचा त्यांना पाठिंबा आहे , पुर्वीचा निवडणूक लढविण्याचा त्यांना अनुभव आहे , आपल्या रॅपिड फायर डिलिव्हरीच्या आणि पत्रकारांच्या प्रश्नांना हजरजबाबी पणे उत्तरे देण्याच्या कौशल्यामुळे कॉन्झर्वेटिव्ह मिडिया मध्ये (फॉक्स न्युज ) कॉमेंटेटर म्हणूनही त्या आपले साम्राज्य निर्माण करु शकतील. टकर कार्लसन ने ही वाट चोखाळने शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. हे काहीही असले तरी कॅरोलाइन सध्या माध्यमावर ट्र्म्प यांच्या रुपाने अधिराज्य गाजवत आहे , हे नि:संशय !
ब्रिफिंगला जाण्यापूर्वी कॅरोलाईन आपल्या स्टाफसमवेत देवाची प्रार्थना करायला विसरत नाहीत. आपली कामगिरी निर्विघ्नपणे पार पडावी. त्यासाठी आत्मविश्वास प्राप्त व्हावा. ट्रम्प यांना अभिप्रेत असलेले नरेटिव्ह सादर करण्यासाठी अचूक शब्द सुचावेत, यासाठी त्या या आध्यात्मिक मार्गाने जातात. देवाने प्रत्येकाला काही ना काही उपजत देणगी दिली असते. मला त्याने ‘पब्लिक स्पिकिंग’चे कौशल्य दिले आहे, असे त्या मानतात. कॉलेज जीवनात सॉफ्टबॉल, हॉकी आदी खेळ खेळल्याचा राजकीय जीवनात त्यांना लाभच झाला आहे. मैदानावरील खेळ आणि राजकारणातील खेळ यांच्यातील साम्य त्यांनी शोधले आहे. सांघिक भावना, कठोर परिश्रम आणि स्वत:ची स्वत:शी स्पर्धा करणे हे त्यातूनच त्यांना शिकता आले. ‘एव्हरी डे इज अ न्यू गेम अँड चॅलेंज इन धिस जॉब’ असे त्या आवर्जून सांगतात. कॅरोलाईन यांचा उल्लेख ‘आयर्न स्टमक’ असा केला गेला आहे. टीकेने निराश न होता निर्धाराने आपले काम करण्याचा हा गुण समजला जातो.