Anti-Drone Technology | ड्रोनभेदी प्रणालीची ‌‘ज्वाला‌’

Anti-Drone Technology |
Anti-Drone Technology | ड्रोनभेदी प्रणालीची ‌‘ज्वाला‌’
Published on: 
Updated on: 

ब्रिगेडियर हेमंत महाजन

भारताच्या संरक्षण क्षेत्रात स्वदेशी संशोधन आणि उत्पादनाला गेल्या काही वर्षांत महत्त्व प्राप्त झाले आहे. संरक्षण साहित्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, देशांतर्गत कंपन्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देणे आणि लष्कराच्या गरजांनुसार आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे, या उद्दिष्टांवर सरकार भर देत आहे. ‌‘ज्वाला एमके-१‌’सारख्या प्रणालींची निर्मिती या प्रयत्नांचा भाग आहे. ड्रोनचा शोध घेऊन त्याला हवेतच नष्ट करण्यासाठी विकसित केलेली ही प्रणाली भारताच्या काऊंटर-ड्रोन संरक्षण क्षमतेत महत्त्वाची भर घालणारी ठरणार आहे.

युद्धाचे स्वरूप बदलत आहे. पूर्वी आकाशातील वर्चस्व मिळवण्यासाठी लढाऊ विमाने, बॉम्बवर्षाव करणारी विमाने आणि क्षेपणास्त्रांवर भर दिला जात असे. आता काही हजार रुपयांपासून ते काही लाख रुपयांपर्यंत किमतीचे ड्रोनही रणांगणावर मोठे नुकसान घडवू शकतात. कमी खर्चात तयार होणारे हे ड्रोन शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेला आव्हान देत आहेत. त्यांना रोखण्यासाठी मात्र अनेकदा कोट्यवधी रुपये खर्चाची क्षेपणास्त्रे वापरावी लागतात. युद्धातील हा आर्थिक असमतोल आता जगभरातील संरक्षण दलांसमोर मोठे आव्हान बनला आहे. भारताने या आव्हानाला उत्तर देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. स्वदेशी संरक्षण उत्पादक कंपनी आयजी डिफेन्सने राजस्थानमधील पोखरण फायरिंग रेंजवर ‌‘ज्वाला एमके-१‌’ या स्वायत्त सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली. ड्रोनचा शोध घेऊन त्याला हवेतच नष्ट करण्यासाठी विकसित केलेली ही प्रणाली भारताच्या काऊंटर-ड्रोन संरक्षण क्षमतेत महत्त्वाची भर घालू शकते.

ड्रोन हल्ल्यांचे बदलते स्वरूप

अझरबैजान - आर्मेनिया, रशिया - युक्रेन युद्धापासून पश्चिम आशियातील संघर्षांपर्यंत ड्रोनचा वापर सातत्याने वाढला आहे. टेहळणी, लक्ष्य निश्चित करणे, शत्रूच्या ठिकाणांची माहिती गोळा करणे आणि थेट हल्ला करणे अशा अनेक कामांसाठी ड्रोन वापरले जात आहेत. विशेषतः आत्मघातकी ड्रोन आणि एफपीव्ही ड्रोनमुळे युद्धभूमीवरील धोक्याचे स्वरूप बदलले आहे. कमी उंचीवरून, वेगवेगळ्या दिशांनी आणि अनेकदा एकाच वेळी येणाऱ्या ड्रोनचा माग काढणे संरक्षण यंत्रणांसाठी कठीण ठरते. या समस्येचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आर्थिक आहे. शत्रूने तुलनेने स्वस्त ड्रोन पाठवला आणि तो पाडण्यासाठी संरक्षण दलाला महागडे क्षेपणास्त्र वापरावे लागले, तर युद्धाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती झाली की, संरक्षण दलांच्या क्षेपणास्त्र साठ्यावर ताण येतो.

महागड्या हवाई संरक्षण यंत्रणांचा वापर प्रत्येक छोट्या ड्रोनविरोधात करणे व्यावहारिक ठरत नाही. त्यामुळे कमी खर्चात मोठ्या संख्येने उपलब्ध करून देता येतील, अशा पर्यायी संरक्षण प्रणालींची गरज निर्माण झाली आहे. भारतासाठी हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. पाकिस्तानकडून सीमावर्ती भागांत ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे आणि अमली पदार्थ पाठवण्याच्या घटना घडल्या आहेत. जम्मू-काश्मीरपासून पंजाबपर्यंतच्या सीमाभागांत ड्रोनच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सुरक्षा यंत्रणांसाठी आवश्यक बनले आहे. भविष्यात एकाच वेळी अनेक ड्रोनच्या सहाय्याने हल्ले करण्याचे तंत्र वापरले गेले, तर पारंपरिक संरक्षण यंत्रणांवर मोठा ताण येऊ शकतो. अशा परिस्थितीत स्वदेशी काऊंटर-ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट होते.

क्षेपणास्त्राच्या तांत्रिक रचनेत ड्युअल पल्स सॉलिड रॉकेट मोटर आणि एअरोडायनॅमिक फिन कंट्रोल या दोन घटकांना महत्त्व आहे. ड्युअल पल्स रॉकेट मोटरमुळे उड्डाणादरम्यान आवश्यक त्या टप्प्यांवर ऊर्जा उपलब्ध करून देता येते. त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करताना क्षेपणास्त्राला अधिक प्रभावीपणे गती आणि नियंत्रण राखता येते. एअरोडायनॅमिक फिन कंट्रोलमुळे उड्डाणाच्या दिशेत बदल करणे शक्य होते. ड्रोन सतत दिशा बदलत असेल, तर त्याचा पाठलाग करण्यासाठी ही क्षमता उपयुक्त ठरू शकते. या क्षेपणास्त्रात प्री-फ्रॅगमेंटेड हाय एक्स्प्लोझिव्ह वॉरहेड आणि प्रॉक्सिमिटी फ्यूजचा वापर करण्यात आला आहे. प्रॉक्सिमिटी फ्यूजमुळे लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचल्यावर स्फोट घडवता येतो. त्यामुळे क्षेपणास्त्राने ड्रोनला थेट धडक देणे आवश्यक राहात नाही. स्फोटातून निर्माण होणारे तुकडे लक्ष्याला निष्प्रभ करू शकतात. हवेत वेगाने हालचाल करणाऱ्या छोट्या ड्रोनविरोधात ही पद्धत महत्त्वाची ठरू शकते. थेट धडक देण्याची अट नसल्यामुळे लक्ष्य नष्ट करण्याची शक्यता वाढवण्यास मदत होऊ शकते.

आधुनिक युद्धात शस्त्राची परिणामकारकता ठरवताना त्याची किंमत आणि त्यातून होणारे नुकसान यांचा विचार करावा लागतो. एखादा शत्रू हजारो स्वस्त ड्रोन तयार करू शकत असेल, तर प्रत्येक ड्रोनविरोधात अत्यंत महागडे क्षेपणास्त्र वापरणे दीर्घकाळ परवडणारे नाही. युक्रेन आणि पश्चिम आशियातील संघर्षांनी हा प्रश्न अधिक ठळक केला आहे. ड्रोनचा वापर करून शत्रूच्या महागड्या संरक्षण यंत्रणांना सतत सतर्क ठेवणे आणि त्यांचा दारूगोळा खर्च करायला लावणे, हादेखील युद्धनीतीचा भाग बनत आहे. ‌‘ज्वाला एमके-१’ची उपयुक्तता याच पार्श्वभूमीवर तपासावी लागेल. कंपनीने ही प्रणाली किफायतशीर आणि स्वदेशी असल्याचे म्हटले आहे. तिचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता आले आणि आवश्यक त्या ठिकाणी तैनात करता आले, तर भारताच्या हवाई संरक्षण व्यवस्थेला एक अतिरिक्त पर्याय उपलब्ध होऊ शकतो. विशेषतः लष्करी तळ, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, सीमावर्ती चौक्या आणि संवेदनशील नागरी ठिकाणांच्या सुरक्षेसाठी अशा प्रणालींचा विचार होऊ शकतो. अर्थात, क्षेपणास्त्राची किंमत किती असेल, एका यंत्रणेतून एकाच वेळी किती लक्ष्यांचा सामना करता येईल, प्रत्यक्ष परिस्थितीत तिची अचूकता किती आहे आणि विविध प्रकारच्या ड्रोनविरोधात ती किती प्रभावी ठरते, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे केवळ चाचणी यशस्वी झाली म्हणून या प्रणालीची संपूर्ण युद्धक्षमता सिद्ध झाली, असे मानणे घाईचे ठरेल.

भारताच्या संरक्षण क्षेत्रात स्वदेशी संशोधन आणि उत्पादनाला गेल्या काही वर्षांत महत्त्व प्राप्त झाले आहे. संरक्षण साहित्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, देशांतर्गत कंपन्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देणे आणि लष्कराच्या गरजांनुसार आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे, या उद्दिष्टांवर सरकार भर देत आहे. ‌‘ज्वाला एमके-१’सारख्या प्रणालींची निर्मिती या प्रयत्नांचा भाग आहे. तथापि, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेची कसोटी केवळ देशात एखादे शस्त्र विकसित झाले की पूर्ण होत नाही. त्याची विश्वासार्हता, उत्पादनक्षमता, देखभालीची सोय, सुट्या भागांची उपलब्धता आणि प्रत्यक्ष युद्धातील कामगिरी या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. ड्रोनचे तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्याने काऊंटर ड्रोन प्रणालीही सतत अद्ययावत करावी लागेल. आजच्या ड्रोनला रोखणारी यंत्रणा उद्याच्या अधिक वेगवान, लहान किंवा झुंडीने हल्ला करणाऱ्या ड्रोनसमोर अपुरी पडू शकते. त्यामुळे ‌‘ज्वाला एमके-१’ची पुढील चाचणी, लष्करी मान्यता आणि प्रत्यक्ष वापरासाठीची तयारी या टप्प्यांना विशेष महत्त्व असेल. या प्रणालीची कामगिरी समाधानकारक ठरल्यास भारताला ड्रोनविरोधी संरक्षणासाठी स्वदेशी पर्याय मिळू शकतो.

भविष्यातील युद्धात आकाशावर नियंत्रण मिळवण्यासाठी महागडी लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे यांच्याबरोबरच छोट्या ड्रोनचा मुकाबला करणारी अचूक, वेगवान आणि किफायतशीर शस्त्रप्रणालीही आवश्यक असेल. पोखरणमधील ‌‘ज्वाला‌’ची चाचणी या बदलत्या युद्धवास्तवाशी जुळवून घेण्याच्या भारतीय प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

‌‘ज्वाला एमके-१‌’ची रचना व क्षमता

आयजी डिफेन्सने विकसित केलेली ‌‘ज्वाला एमके-१‌’ ही भारतातील पहिली स्वायत्त काऊंटर-अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टीम (सीयूएएस) सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली असल्याचा कंपनीचा दावा आहे. पोखरण येथे झालेल्या चाचणीत या प्रणालीच्या क्षमतेची पडताळणी करण्यात आली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्राची कार्यकारी मारक क्षमता पाच किलोमीटरपर्यंत आहे. या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातील स्वयंचलित लक्ष्यशोध आणि लक्ष्यभेदनाची यंत्रणा. शत्रूच्या संभाव्य ड्रोनची ओळख पटवणे, त्याचे वर्गीकरण करणे आणि त्याला निष्प्रभ करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडणे, यासाठी एकात्मिक मिशन ऑटोनॉमी आर्किटेक्चरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक टप्प्यावर

मानवी हस्तक्षेपाची गरज कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्ष युद्धस्थितीत ही स्वायत्त यंत्रणा किती वेगाने आणि अचूकपणे काम करते, हे तिच्या चाचण्यांमधून स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.