

अनिल टाकळकर, ज्येष्ठ पत्रकार
अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स न्यायालयातील न्यायमूर्ती फ्रँक कॅप्रियो यांनी न्यायाधीशाच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देऊन न्यायदानाची नवी व्याख्या प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. कायदा आणि करुणा (कंपॅशन) हातात हात घालून न्यायदान कसे करू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले. ’जगातील सर्वात दयाळू न्यायाधीश’ म्हणून ओळखले जाणार्या कॅप्रियो यांच्या निधनाने जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे. दयाळूपणा हा सर्वोच्च न्याय आहे, याची आठवण त्यांची कार्यशैली जगाला यापुढेही करून देत राहील.
अमेरिकेतील प्रॉव्हिडन्सच्या न्यायालयात 96 वर्षांचे वृद्ध गृहस्थ आरोपी म्हणून उभे होते. सुरकुतलेल्या चेहर्यावरचा ताण त्यांना लपवता येत नव्हता. गाडी नियम मोडून काहीशी वेगात चालविल्याच्या आरोपाबद्दल हा खटला भरण्यात आला होता. एरव्ही आपण गाडी नियमात असलेल्या वेगानुसार चालवतो, असे ते म्हणाले; पण यावेळी नेमके काय झाले, हे समोर बसलेले न्यायमूर्ती फ्रँक कॅप्रियो यांना जाणून घ्यायचे होते. आपल्या 63 वर्षांच्या कॅन्सरग्रस्त मुलाला दर दोन आठवड्यांतून एकदा रक्त द्यावे लागते. त्यासाठी ते डॉक्टरच्या क्लिनिककडे घाईने निघाले होते. वेळेत हे रक्त मिळणे आवश्यक होते. हे उत्तर ऐकताच कॅप्रियो सद्गतीत झाले. शंभरीच्या जवळपास असलेला एक पिता 63 वर्षांच्या मुलाची किती काळजी घेत आहे, हे पाहून त्यांना भरून आले. ‘तुम्ही खरोखरच एक चांगला माणूस आहात. तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो! हा खटला मी (कोणतीही शिक्षा न देता) निकाली काढत आहे’ असा निकाल देऊन त्यांनी न्यायदानातील करुणतेचा आणि माणुसकीचा प्रत्यय आणून दिला. ‘कायदा हा न्याय मिळवून देण्यासाठी असतो; पण करुणेविना दिलेला न्याय म्हणजे खरा न्याय नव्हे’ अशी श्रद्धा असलेले कॅप्रियो केवळ अमेरिकेतच नव्हे, तर सर्व जगभरात ‘नायसेस्ट जज इन द वर्ल्ड’ म्हणून ओळखले जात होते. अशा या जगावेगळ्या माणुसकी जपणार्या न्यायमूर्तीच्या 21 ऑगस्टला झालेल्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्या सकारात्मकतेने ते आपले जीवन जगले ती सकारात्मकता त्यांनी स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धैर्याने लढा देताना अखेरच्या क्षणापर्यंत दाखविली.
सामान्यत: न्यायालये म्हटले की, कठोर निर्णय आणि कायदे आठवतात. आपल्या देशात खटले वर्षानुवर्षे चालत असल्याने न्यायदान हा चेष्टेचा विषय झाला आहे. न्यायाधीश म्हटले की, गंभीर चेहरे नजरेसमोर येतात. इथे वेळेत न्याय मिळेल की नाही, याविषयीच शंका असते. या सर्व पारंपरिक प्रतिमेला कॅप्रियो यांनी तडा देऊन न्यायदानाचा चेहरामोहरा बदलून टाकला. होर्ड आयलंडमधील म्युनिसपल कोर्टमध्ये तब्बल सुमारे 40 वर्षे प्रमुख न्यायमूर्ती म्हणून काम करताना कायदा आणि करुणा हातात हात घालून कसे काम करता येते, याचा वस्तुपाठ घालून दिला. न्याय ही केवळ एखाद्याच्या शिक्षेपुरती निगडित प्रक्रिया नाही. त्यातील प्रत्येक प्रकरणाकडे क्षमाशील, खुल्या मनाने आणि सहानुभूतीच्या नजरेतून पाहिले पाहिजे, असे त्यांना मनापासून वाटत असे. त्यामुळे आरोपी म्हणून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, त्याच्या परिस्थितीला समजावून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांनी केला. सर्वसामान्य व्यक्तींना त्यांच्यापुढील सुनावणी हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. त्यांचे म्हणणे बारकाईने ऐकून घेतले जात होते. अनेकदा हलक्याफुलक्या विनोदाने ते न्यायालयातील तणावग्रस्त वातावरण खेळीमेळीयुक्त करीत. संवादातून ही माणसे मोकळेपणामुळे आपल्या अडचणी मांडत. एकदा न्यायालयात आलेल्या जोडप्यांपैकी पत्नीने ‘गाडी माझे पती चालवत होते; पण तिकीट मला मिळाले, अशी तक्रार केली. त्यावर कॅप्रियो हसून म्हणाले, ‘सो यू केम हिअर टू थ्रो हिम अंडर द बस’ (म्हणजे तुम्ही इथे पतीला दोषी ठरविण्यासाठी आला आहात.) ‘कम्पॅशन इन द कोर्ट’ या आपल्या पुस्तकात कायद्याच्या मागे असणार्या माणसाचा शोध त्यांनी घेतला आहे. त्याची कहाणी, सुख- दु:खे त्यांनी समजावून घेतली आहेत. न्यायाधीश फक्त एखाद्याला दोषी किंवा निर्दोषी ठरविणारे नसतात, तर ते समाजच्या विश्वासाचे संरक्षक असतात. हे सूत्र सांगण्यावर त्यांचा भर आहे. कॅप्रियो यांच्या निकालांमध्ये प्रतिबिंबित झालेला मानवी द़ृष्टिकोन किंवा करुणा न्यायाला कमजोर करणारी ठरली नाही. उलट न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास तिने अधिक द़ृढ केला. त्यांनी लोकांना भयापोटी नव्हे, तर आदराने कायद्याचे पालन करण्याची प्रेरणा दिली.
फ्रँक कॅप्रियो यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडियावरील त्यांची सक्रियता. इन्स्टाग्रामवर त्यांचे 34 लाखांवर फॉलोअर्स होते. इतर बाकीची माध्यमे लक्षात घेतली, तर ही संख्या अडीच कोटींच्या घरात जाते. भारत, पाकिस्तान, चीनपासून जर्मनी, फ्रान्स, इटली आदी युरोपीय देशापर्यंत ते लोकप्रिय होते. वेगवेगळ्या देशांमधील अनेक अनोळखी आबालवृद्ध त्यांना आवर्जून पत्रे लिहीत. छोट्या-मोठ्या गिफ्ट पाठवत. कोर्टात आल्यावर हा प्रचंड फॅन मेल नजरेखालून घालणे हा त्यांचा उत्साह वाढविणारा होता. याशिवाय त्यांच्या न्यायालयातील सुनावणी ‘कॉट इन प्रॉव्हिडन्स’ या यू ट्यूब चॅनेलवर दाखविली जात असल्याने लाखो लोकांना त्यांची कार्यशैली, मिश्कील टीकाटिप्पणी भावली.
त्यांच्या न्यायालयात प्रामुख्याने वाहतूक नियमभंगाचे खटले येत असत. अमेरिकेत हा नियमभंग करणार्यांना तिकीट दिले जाते. म्हणजे नियम तोडल्याबद्दलची ही कारवाई असते. यातील प्रत्येक खटल्यात आरोपीला सन्मानाने वागविले जायचे. नियमभंगाचे कारण शोधण्याचा इथे प्रयत्न होत असे. अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल ते दयाळू वृत्ती दाखवत. परिस्थितीने अडचणीत असलेल्यांविषयी ते क्षमाशील असायचे. मानवी स्वभावाची विविध रूपे यानिमित्ताने पुढे आली. अनेकदा कॅप्रियो आरोपी महिलेबरोबर आलेल्या छोट्या मुलांना किंवा मुलींना आपल्याजवळ बोलवत आणि नियमभंगाचा व्हिडीओ दाखवून ‘आई दोषी की निर्दोष आहे,’ असे विचारत. असल्यास किती दंड करू, असाही प्रश्न विचारत. त्यांच्या उत्तरावर मिश्कील टिपण्णी करून दंडाची रक्कम कमी करत, तर काहींना परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण माफी देत असत. आपल्या आईच्या स्मरणार्थ फिलोमिना फंड त्यांनी उभा केला होता. ऐपत नसलेल्यांना त्या फंडातून दंड देण्याची सुविधा ते देत. एकाचा दंड तर एका भारतीय व्यक्तीने गरजू घटकांसाठी पाठविलेल्या 100 डॉलर्सच्या देणगीतून त्यांनी भरला होता.
त्यांच्या न्यायालयात आलेला एक आरोपी दुसर्या महायुद्धात भाग घेतलेला लष्करी अधिकारी होता. त्याच्या देशप्रेमाची दखल घेत त्याच्या शंभरीतील पदार्पणाचे त्यांनी कौतुक केले होते. आरोपी म्हणून आलेल्या एका गर्भवतीने आपल्या मुलाचे नाव फ्रान्सिस्को असे त्यांचेच नाव ठेवणार असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे, तर त्याच्या जन्मानंतर त्याला घेऊन ती न्यायालयात त्यांना भेटली होती. डोनट विक्री करणार्या तरुण कंबोडियन स्थलांतरित दाम्पत्याच्या निस्सीम प्रेमाची आणि त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना उत्स्फूर्त मदत करणार्या कम्युनिटीची हृद्य आठवण त्यांनी त्यांच्या एका व्हिडीओत सांगितली होती. मुलीच्या कॉलेजची फी भरण्यासाठी एक पिता दोन नोकर्या करीत आहे, हे समजल्यावर त्यांनी त्याचा दंड माफ केला. पती निधनाच्या दु:खात असलेल्या महिलेची आर्थिक अडचण बघून त्यांनी तिलाही दंड देण्यापासून वाचवले. अर्धवेळ काम करून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांबाबतही त्यांनी अनेकदा सहानुभूती दाखविली.
कॅप्रियो यांच्यावर आई-वडिलांनी जे संस्कार केले, जी मानवतेची मूल्ये रुजविली, त्यातून त्यांचे क्षमाशील व्यक्तिमत्त्व विकसित झाले. त्यांचे वडील अँटोनियो इटलीतून आलेले स्थलांतरित फळ विक्रेते आणि दूध विक्रीचा व्यवसाय करून ते चरितार्थ चालवत. दुधाचा रतीब घालण्यासाठी त्यांनाही भल्या पहाटे उठावे लागे. कुटुंबाला हातभार लावावा म्हणून त्यांनी बूटपॉलिश, पेपर टाकणे, भांडी घासणे, साफसफाई इत्यादी कामे केली. वडिलांच्या इच्छेनुसार ते 1965 मध्ये कायद्याचे पदवीधर झाले. 1985 मध्ये ते न्यायमूर्ती झाले. प्रामाणिकपणा, दुसर्याच्या व्यथा जाणून घेणे, मदत करणे हे बाळकडू त्यांच्याकडून त्यांना मिळाले. कुटुंब समाजाचा अविभाज्य घटक असून त्याची पाळेमुळे घट्ट असतील, तर कोणत्याही संकटांना तोंड देता येते, हा त्यांचा विश्वास. विन्स्टन चर्चिल हे त्यांचे दुसरे श्रद्धास्थान. इंग्लंडच्या कठीण काळात ‘नेव्हर गिव्ह अप’चा नारा त्यांनी दिला. कितीही अवघड आव्हाने आली, तरी आपले ध्येय, स्वप्ने, प्रयत्न सोडू नका असे ते सांगतात.
अखेरच्या काळातही त्यांनी दुर्धर आजाराशी धैर्याने सामना केला. ज्या शानदार पद्धतीने, मूल्याधिष्ठित पद्धतीने जीवन जगले, ती सकारात्मकता त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपली. मृत्यूच्या 19 तास आधी त्यांनी जो व्हिडीओ केला, त्यातही त्यांचा प्रार्थनेवरील, आशेवरील विश्वास दिसून आला. ‘आपण आयुष्यात अनेक बाबी गृहीत धरण्याची चूक करतो. एखादा दिवस कसा येईल, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे जे काही आयुष्य लाभले आहे, ते अर्थपूर्ण रीतीने जगा, लोकांशी प्रेमाने, चांगले वागा. आपले कुटुंबीय, आप्तेष्ट यांची काळजी घ्या. तुम्हाला मिळालेला प्रत्येक क्षण हा देवाचा आशीर्वाद असल्याने त्याचा आनंद घ्या’, असे त्यांनी या व्हिडीओत तळमळपूर्वक म्हटले आहे.
करुणा, माणुसकी, सहृदयता या त्रिसूत्रीवर कॅप्रियो यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली. मृत्यूपश्चातही आपली संपत्ती समाजासाठी दान केली. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’चे नारे अलीकडे वारंवार कानावर पडतात. ते प्रत्यक्षात यावयाचे असेल, तर त्यासाठी कायदा, न्यायव्यवस्था, विविध पातळ्यांवरील नेतृत्व आणि इतर विविध क्षेत्रांत त्यांच्यासारखे गुण असणार्यांची आवश्यकता आहे. जग न्यायालयाला कठोरतेचे प्रतीक मानते; पण प्रॉव्हिडन्समध्ये न्यायाला करुणेचे अधिष्ठान या न्यायमूर्तींनी दिले. शिक्षा करणे हा शेवट नसतो, तर नव्या संधीची ती सुरुवात असते, हे त्यांनी निदर्शनास आणून न्यायदानाची नवी व्याख्या अस्तित्वात आणली. कायद्याचा आत्मा हा माणुसकी आहे. आपण फक्त कायद्याची भाषा बोलत राहिलो; पण ते करताना त्याच्या हृदयाची भाषा समजून घेतली नाही, तर ती व्यक्ती न्यायाधीश न राहता एखादे यंत्र राहील. न्याय ही केवळ यंत्रणा नसून समाज आणि माणूस यांच्यातील ते एक सजीव नाते आहे, हेच कॅप्रियो यांनी दाखवून दिले आहे. ते केवळ न्यायमूर्ती नव्हते, ते मानवतेचे पुरस्कर्ते होते, करुणेचे प्रतीक होते. दयाळूपणा हा सर्वोच्च न्याय आहे, याची सतत आठवण त्यांची कार्यशैली जगाला सदैव करून देत राहील.