Jogeshwari Caves: जोगेश्वरी लेणीसमूह

पवईजवळ डोंगरात असलेल्या महाकाली किंवा कोंडीविटे लेण्यांच्या दक्षिणेस काही अंतरावर जोगेश्वरी लेणी सापडतात
Jogeshwari Caves
Jogeshwari Caves
Published on
Updated on
नीती मेहेंदळे

मुंबईत पाच लेणीसमूह आहेत, अशी नोंद मुंबई गॅझेटमध्ये आहे म्हणून नाही, तर मुंबईच्या आताच्या वाढत्या पसाऱ्यात त्यांचं अस्तित्व कसंबसं टिकून आहे, असंच म्हणायला पाहिजे. त्यापैकी कान्हेरीच्या डोंगराची व्याप्तीच मोठी आहे आणि ती तशी लोकवस्तीपासून दूर असल्यामुळे त्यांचं नियोजन चांगलं करता आलं आहे. उरलेल्यांपैकी दोन एकमेकांपासून थोड्याच अंतरावर आहेत. पवईजवळ डोंगरात असलेल्या महाकाली किंवा कोंडीविटे लेण्यांच्या दक्षिणेस काही अंतरावर जोगेश्वरी लेणी सापडतात. सापडतातच म्हणायचं कारण, ही लेणी अगदी लपलेल्या स्थितीत आढळतात.

एका लहान टेकडीमध्ये कोरलेली ही लेणी आजूबाजूच्या परिसरापेक्षा खूपच खालच्या पातळीवर आहेत. स्थानिक देवता जोगेश्वरीदेवीच्या नावावरून त्यांना जोगेश्वरी लेणी म्हणतात, तसेच त्यांना आंबोली लेणीही म्हटलं जातं. मुंबईच्या शहरीकरणामुळे ही लेणी इमारतींनी पूर्णपणे वेढली गेली आहेत आणि त्यांनी लेण्यांना चहुबाजूंनी अगदी त्यांच्या छतापर्यंत कोंडून टाकलं आहे. काही भागात तर अतिक्रमण केलेलंही दिसून येते. ते धोकादायक आहे.

भारतातील या प्रकारच्या प्रमुख हिंदू (ब्राह्मणी) लेण्यांपैकी हा तिसरा लेणीसमूह मानला जातो. या श्रेणीतील इतर दोन समूह म्हणजे वेरूळ येथील 'धुमार लेणी' आणि एलिफंटा येथील मोठं लेणं. अनेक बाबतीत ही लेणी त्या लेण्यांसारखीच असली, तरी येथील सभागृह चौकोनी आहे (इतर लेण्यांमधील सभागृहं तारकाकृती आहेत). तसेच, इथलं गर्भगृह अगदी मध्यभागी असून त्याच्या भोवती एक प्रदक्षिणापथ आहे, जो समान अंतरावर असलेल्या स्तंभांद्वारे मुख्य भागापासून वेगळा केला गेला आहे. या लेण्यांमधील सभागृहाचा आकार एलिफंटा लेण्यातील सभागृहाइतकाच असला, तरी इथल्या बाजूचे मंडप आणि प्रांगणं इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत की, या तिन्ही लेण्यांमध्ये लांबीच्या दृष्टीने जोगेश्वरी लेणी भारतातील सर्वात जुन्या हिंदू लेण्यांपैकी एक असण्यासोबतच सर्वात मोठीदेखील आहेत.

पाशुपत शैव पंथाला समर्पित असलेल्या आणि आजही अस्तित्वात असलेल्या प्राचीन लेणी-मंदिरांपैकी जोगेश्वरी हे एक प्रमुख ठिकाण आहे. दुसरं म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या जोगेश्वरी लेणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. कारण, ती पश्चिम महाराष्ट्रातील भव्य बौद्ध लेणी आणि त्यानंतरच्या काळातील एलिफंटा लेण्यांची भव्यता यांना जोडणारा दुवा ठरतात. भारतातील हिंदू शैलीतील खडकात कोरलेल्या वास्तुकलेच्या परंपरेत जोगेश्वरी लेण्यांना 'आद्य' मानलं जातं.

या लेण्यांबाबतची सर्वात रंजक बाब म्हणजे, येथील जोड-रचनांची पद्धत अशी आहे की, मूळ आराखड्यातील बौद्ध विहाराची वैशिष्ट्ये यात जवळपास नाहीशी झाली आहेत आणि जर मधल्या काळातील इतर उदाहरणं उपलब्ध नसती, तर या लेण्यांची रचना कोणत्या शैलीतून आली, हे शोधणं कठीण झालं असतं. केवळ महाराष्ट्रातच १,२०० हून अधिक खडकात कोरलेली मंदिरं आहेत. त्यांचा आकार लहान देवस्थानांपासून ते भव्य मंदिर-संकुलांपर्यंत विविध प्रकारचा आहे. ही परंपरा ख्रिस्तपूर्व पहिल्या आणि दुसऱ्या शतकात बौद्ध देवस्थानांच्या निर्मितीने सुरू झाली. एकंदरीत, ही लेणी नंतरच्या काळातील उभारलेल्या मंदिरांशी अधिक मिळतीजुळती आहे. जोगेश्वरी लेण्यातील वास्तुकला आणि ती अपूर्ण असणं या गोष्टींवरून यात काहीच शंका राहत नाही की, या तिन्ही लेण्यांमध्ये ही सर्वात अर्वाचीन लेणी आहेत.

प्रस्तुत लेणी सहाव्या ते आठव्या शतकात कोरली गेली असावीत; पण त्यांच्या कालखंडाबाबत अभ्यासकांमध्ये अजूनही मतभेद आहेत. इसवी सन पाचव्या शतकात बौद्ध वाकाटक राजवटीच्या काळात या वास्तूंनी आपल्या निर्मितीचा कळस गाठला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजिंठा येथील लेणी; मात्र या प्रदेशातील हिंदू धर्मीयांनी ही पद्धत स्वीकारण्यास सहाव्या शतकापर्यंत वाट पाहावी लागली. अजिंठा लेण्यांच्या निर्मितीला राजाश्रय देणाऱ्या बौद्ध वाकाटक राजा 'हरिषेण'च्या मृत्यूनंतर काही अभ्यासकांच्या मते अजिंठ्यातील अनेक कारागिरांनी आपली कला इतरत्र सादर करण्याच्या उद्देशाने तो परिसर सोडला. त्यातील काही लोक पश्चिमेकडे हिंदू कलचुरी राज्याकडे गेले आणि त्यांनी हिंदू गुहा मंदिरांची पहिली मोठी निर्मिती सुरू केली, सर्वप्रथम जोगेश्वरी येथे आणि त्यानंतर एलिफंटा येथे, तर काही अभ्यासकांच्या मते, कोकणातील मौर्य राजवटीच्या आश्रयाखाली ही लेणी कोरली गेली असावीत. प्रसिद्ध इतिहास संशोधक स्टेला क्रॅमरीश यांनीदेखील नमूद केलं आहे की, 'जोगेश्वरी, मंडपेश्वर, वेरूळचे लेणे क्र. २९ आणि एलिफंटा यांमधील वास्तूरचना जवळपास सारखीच आहे.'

अजून एक मतप्रवाह सांगतो की, वेरूळ येथील 'धुमार लेणं' आठव्या शतकाच्या पहिल्या २५ वर्षांत खोदलं गेलं आणि त्यानंतर लगेचच एलिफंटा येथील मोठी लेणी तयार झाली, तर जोगेश्वरी लेण्यांचा काळ त्या शतकाच्या उत्तरार्धात निश्चित केला जाऊ शकतो. म्हणजे या लेण्यांचा निर्मितीचा काळ आठव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणता येईल. तसे असल्यास कैलास लेण्यांच्या निर्मितीच्या काळातच खोदले गेलेले हे तिन्ही लेणी समूह स्तंभांच्या रचनेवर आधारित ब्राह्मणी लेण्यांचं प्रतिनिधित्व करतात आणि या प्रकारच्या लेण्यांची मालिका इथे संपते असा निर्देश करतात. कारण, या मालिकेत अशा लेण्यांचा समावेश होतो जिथे बौद्ध लेण्यांची मूळ वैशिष्ट्य जवळपास पूर्णपणे पुसली गेली आहेत आणि पुढील काळातील शैलींची वैशिष्ट्यं वेगाने विकसित होत आहेत.

जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस यांच्या 'केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया' या महत्त्वपूर्ण ग्रंथात म्हटलंच आहे, 'ही लेणी अजिबात बौद्ध विहारासारखी दिसत नाहीत. त्याऐवजी ही रचना पट्टण, सोमनाथ आणि अंबरनाथ येथील नंतरच्या काळातील संरचनात्मक मंदिरांच्या शैलीची पूर्वसूचक दिसते.' या लेण्यांची दोन प्रवेशद्वारं असावीत. त्यातले मुख्य प्रवेशद्वार सध्याच्या आराखड्यातील दक्षिणेकडील असावं असं वाटतं. तिथलं अंगण आपल्याला अपूर्ण अवस्थेतच राहिल्याचं दिसतं; पण ही बाजू मुख्य दर्शनी भाग म्हणून नियोजित केली असावी यात शंका वाटत नाही.

पूर्वेकडील एका अरुंद व वळणावळणाच्या मार्गावरून अंशतः खोदलेल्या एका अंगणात प्रवेश करता येतो. येथे लेण्यांचा व्हरांडा असून तो 'एलिफंटा' शैलीतील दहा खांब आणि भिंतीला लागून असलेल्या अर्धखांबांवर आधारलेला आहे. या खांबांच्या शीर्षभागावर आधारक आहेत, ज्यावर रामेश्वर आणि बदामी येथील मोठ्या लेण्यांप्रमाणे झाडांच्या पाना-फुलांखाली उभी असलेली स्त्री मूर्ती आणि खुजे सेवक कोरलेले आहेत. हा व्हरांडा सुमारे १२० फूट लांब आहे आणि त्याच्या मागील बाजूस तीन दरवाजे व दोन खिडक्या आहेत, ज्यातून मुख्य सभागृहात पाहता येतं. हे सभागृह साधारणपणे ९२ फूट चौरस आकाराचे असून त्यात चौरस रचनेत वीस खांब आहेत. या रचनेच्या मध्यभागी सुमारे २४ फूट चौरस आकाराचं गर्भगृह आहे. या गर्भगृहाला चार दरवाजे असून ते सर्वतोभद्र आहे. आत चौरस आकाराच्या पीठावर मोठं शिवलिंग स्थापित आहे.

ही रचना एलिफंटा आणि वेरूळ येथील 'धुमार' लेण्यासारखीच आहे. प्रवेश-मंडपाच्या भिंती आणि त्याच्या दोन्ही टोकांना असलेल्या खोलगट भागांच्या भिंती एकेकाळी विविध आकृत्यांनी सुशोभित होत्या; परंतु खडक झिजल्यामुळे आणि गुंफेची जागा सखल व दमट असल्यामुळे कोरीव कामाच्या खुणा जवळपास नष्ट झाल्या आहेत. मंडपाच्या मागील भिंतीच्या मध्यभागी अत्यंत नक्षीदार असं प्रवेशद्वार आहे, ज्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या द्वारपालांच्या प्रतिमा आहेत, तसेच इतर भागांत नाजूक कोरीव कामाच्या खुणा आहेत, ज्यांची केवळ काही झलक पाहायला मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news