IPL 2025 : उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे ‘लाँचपॅड’!

 ipl-platform-as-launchpad-for-cricketers
उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे ‘लाँचपॅड’.Pudhari File Photo
Published on
Updated on
विवेक कुलकर्णी

2008 पासून आजवर असंख्य क्रिकेटपटूंसाठी लाँचिंग पॅड ठरत आलेले आयपीएलचे व्यासपीठ जणू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय रोवण्याकरिता स्टेपिंग स्टोनच ठरत आले आहे. या आयपीएलचीच गरज म्हणून स्पर्धेत सहभागी सर्वही आठही संघांनी नवनवी गुणवत्ता शोधण्यासाठी टॅलेंट सर्च मोहीम राबवली आणि याच माध्यमातून आजच्या घडीला नावारूपास आलेले बुमराहसारखे मोहरे गवसले आहेत.

बावीस वर्षांचा रॉबिन मिंज... गतवर्षी एका रस्तेमार्ग अपघातामुळे त्याची पदार्पणाची संधी हुकलेली... पण यंदा तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसून येतोय... मुंबईच्या संघाने अवघ्या 65 लाख रुपयांत करारबद्ध केलेल्या रॉबिन मिंजला ओळखले जाते ते त्याच्या रांगड्या फलंदाजीसाठी... भले त्याचा व्यावसायिक क्रिकेटमधील अनुभव केवळ 2 प्रथमश्रेणी आणि 7 टी-20 सामन्यांपुरता मर्यादित असेल... पण डाव्या हाताने फलंदाजी करणार्‍या या उमद्या क्रिकेटपटूच्या ताफ्यातील एकाहून एक सरस फटक्यांची मालिका खर्‍या अर्थाने न्यारीच... योगायोगाने रॉबिन मिंज धोनीप्रमाणे झारखंडचा... आणि योगायोगाने धोनीप्रमाणेच पल्लेदार फटके मारणारा... डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्याच्या तळपत्या बॅटीने चेंडू सीमापार टोलावला जातो, त्याचवेळी प्रचिती येते, हा छोरादेखील धोनीप्रमाणेच वेगळा आहे... आणखी एक कमालीचा योगायोग म्हणजे रॉबिन मिंज धोनीप्रमाणेच यष्टिरक्षणही करतो... इतके कमी की काय म्हणून धोनीप्रमाणेच गगनचुंबी हेलिकॉप्टर शॉटही लगावतो!

जेमतेम 13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी हादेखील आयपीएल टॅलेंट सर्च मोहिमेचेच आणखी एक फाईंड... वैभवने आपल्या तडाखेबंद फटक्यांच्या बळावर अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतलेय... तो आयपीएल करार मिळवणारा सर्वात युवा छोकरा... क्रिकेटमधील या नव्या खेळाडूची जवळपास बर्‍याच फ्रँचायझींना कल्पना होती... याचमुळे एकावर एक बोली लागत गेली, ऑक्शन रंगत गेला आणि सरतेशेवटी राजस्थान रॉयल्सने त्याला करारबद्ध केले ते चक्क 1.1 कोटीला! हा तोच वैभव सूर्यवंशी आहे, ज्याने गतवर्षी युवा कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 58 चेंडूंत शतक फटकावले... 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक त्याच्याच खात्यावर... शिवाय अंडर-19 आशिया चषकातील 2 अर्धशतके, बिहारतर्फे अंडर-19 वयोगटात त्याने झळकावलेले त्रिशतक हे त्याच्या पराक्रमाचीच साक्ष देणारे... राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या नजरेत वैभव सूर्यवंशीच्या गुणवत्तेची चुणूक भरली अन् त्यानेही वैभवच्या गुणवत्तेवर कौतुकाची स्तुतिसुमनेही उधळलेली!

मुंबई संघाला सईद मुश्ताक अली टी-20 चषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा सूर्यांश शेडगे हादेखील असाच आणखी एक हरहुन्नरी खेळाडू... विदर्भ विरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत अवघ्या 12 चेंडूंत नाबाद 36, तर मध्य प्रदेशविरुद्ध फायनलमध्ये 15 चेंडूंत नाबाद 36 धावांची तुफानी खेळी साकारली आणि सर्वांचेच लक्ष वेधून घेतले... याशिवाय गोलंदाजीतही वरचष्मा गाजवताना त्याने 9 सामन्यांत 8 बळी घेतले ते वेगळेच... 22 वर्षीय सूर्यांशसाठी हा आयपीएलचा दुसरा हंगाम असला तरी अद्याप तो राखीव खेळाडूंमध्येच आहे... पण ज्यावेळी या पठ्ठ्याला मैदान गाजवण्याची संधी मिळेल, त्यावेळी तो प्रतिस्पर्ध्यांवर अक्षरश: तुटून पडण्यात कसर सोडणार नाही, याची खात्री त्याच्या आजवरच्या सर्व आजी-माजी प्रशिक्षकांना, संघ सहकार्‍यांना वाटतेय, यातच सारे काही आले!

प्रियांश आर्य हा दिल्लीचा आक्रमक फलंदाज यापूर्वीच प्रकाशझोतात आलाय तो दिल्ली लीगमध्ये त्याने फटकावलेल्या एका षटकातील त्या 6 टोलेजंग षटकारांमुळे... त्यावेळी प्रियांशने आपल्या विस्फोटक खेळीत अवघ्या 50 चेंडूंतच 120 धावांची आतषबाजी केली... आणि इतके कमी की काय म्हणून आयुष बडोनीसह थोडीथोडकी नव्हे, तर 286 धावांची भागीदारीही साकारली! दिल्ली प्रीमियर लीगमध्ये त्याने 199 च्या स्ट्राईक रेटने 10 सामन्यांत 608 धावा बदडल्या आणि स्पर्धेतील टॉप स्कोअररदेखील राहिला... त्याची बॅट नंतर सईद मुश्ताक अली स्पर्धेतही चांगलीच तळपली... 9 सामन्यांत 325 धावा आणि 177 चा स्ट्राईक रेट, ही आकडेवारीही खूप काही सांगून जाणारी... यंदा पंजाबने त्याला 3.4 कोटी रुपये मोजत करारबद्ध केले आणि अर्थातच सार्‍या नजरा त्याच्यावरही असतील!

20 वर्षीय लेगस्पिनर विप्रज निगम हा अष्टपैलू खेळाडू एकीकडे मोक्याच्या क्षणी बळी मिळवून देण्यासाठी सक्षम... त्याचप्रमाणे तळाच्या क्रमवारीत येऊन मोठमोठे फटके मारण्यातही माहीर... यंदा हा हरहुन्नरी युवा खेळाडू आयपीएलचे मैदान गाजवण्यासाठी संधीच्या प्रतीक्षेत दिसून येतोय... दक्षिण आफ्रिकन भूमीतील 28 वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज रायन रिकेल्टन यंदा मुंबई इंडियन्सतर्फे आयपीएलचे मुलूखमैदान गाजवण्यासाठी महत्त्वाकांक्षी दिसतोय... दक्षिण आफ्रिकन भूमीत संपन्न झालेल्या आफ्रिकन टी-20 लीगमध्ये एमआय केपटाऊनतर्फे त्याने 177.41 च्या स्ट्राईक रेटने धमाकेदार डाव साकारले... पॉवर प्लेमध्ये टोलेजंग, आक्रमक फलंदाजी हे त्याचे खास वैशिष्ट्य...

डावखुरा सीमर अश्वनी कुमार हा तर यंदाच्या आयपीएलचे सरप्राईज पॅकेजच ठरतोय... वानखेडे स्टेडियमवर केकेआर संघाचा धुव्वा उडवताना त्याला साथ मिळाली ती आणखी एक विस्फोटक खेळाडू रायन रिकेल्टनचीच!

एमआय केपटाऊनतर्फेच धमाकेदार खेळी साकारणारा आणखी एक कॉर्बिन बॉश हाही मुंबई इंडियन्सचेच आणखी एक फाईंड... बॉश डेथ ओव्हर्समधील घातक गोलंदाज आहेच. शिवाय, मोठे फटके मारण्यातही सक्षम... अगदी तळपायाचा अचूक वेध घेणारे यॉर्कर टाकणारा लंकन गोलंदाज कोण, असा प्रश्न विचारला तर साहजिकच उत्तर येईल लसिथ मलिंगा... पण याच परंपरेत घडलेला एक नवा लंकन गोलंदाज यंदा समोर येतोय तो म्हणजे इशान मलिंगा... या स्पीडस्टारला सनरायजर्स हैदराबादने करारबद्ध केलेय आणि संधी मिळेल त्यावेळी हा हिराही चमकण्यासाठी अर्थातच महत्त्वाकांक्षी असेल. यंदाच्या आयपीएलचा पहिला दिवस गाजविणारा पी. विघ्नेश हा केरळमधील रिक्षाचालकाचा मुलगा आहे, तर अश्वनी कुमार हा शेतकर्‍याचा मुलगा आहे.

आता प्रश्न येतो, ही टॅलेंट सर्च मोहीम राबवली तरी कशी जाते? याचे उत्तर दडलेय ते प्रत्येक फ्रँचायझींनी नियुक्त केलेल्या आपल्या स्वतंत्र टॅलेट सर्च प्लॅनिंगमध्ये!

आयपीएल सुरू होते साधारणपणे मार्च-एप्रिलपासून... पण त्यासाठीचा टॅलेंट हंट प्रोग्राम मात्र कित्येक महिन्यांआधीच सुरू झालेला असतो... आयपीएल निवडीसाठी अगदी छोट्या-मोठ्या शहरांत कॅम्प घेतले जातात... आणि ज्यांना इच्छा आहे ते यात भागही घेऊ शकतात... प्रामुख्याने 18 ते 23 वयोगटातील युवा गुणवत्ता हेरली जाते... त्यासाठी अगदी तळागाळापर्यंतचा गुणवत्तेचा शोध... निवड प्रक्रिया... प्रशिक्षण असे अनेक टप्पे ओघानेच आले... तूर्तास या सर्व प्रक्रियेवर देखरेख असते ती नॅशनल क्रिकेट अकादमीची... आता जशी एनसीएची टॅलेंट सर्च मोहीम आहे, तशाच मोहिमा बहुतांशी फ्रँचायझीही राबवतात... राजस्थान रॉयल्स आणि कलर्स यांची

संयुक्त मोहीम हे याचे असेच उदाहरण... राजस्थानने या माध्यमातून पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत ‘क्रिकेट का टिकट’ ही मोहीम राबवलीय आणि त्यातून असंख्य गुणवान खेळाडूही हेरलेत... टी. ए. सेकर, किरण मोरे, प्रवीण आमरे यांचाही अशी गुणवत्ता हेरण्यातील वाटा महत्त्वाचा...

टॅलेंट स्काऊटिंग प्रक्रियेत अगदी अनुभवी प्रशिक्षक जॉन राईटसारख्या व्यक्तींनीदेखील मोलाची मदत केलीय आणि त्यामुळेही आयपीएल नव्या खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ म्हणून नावारूपास येत आलीय... पार्थिव पटेल, आर. विनय कुमारसारखे निवृत्त खेळाडूही मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट स्काऊटचा एक भाग ठरत आले आहेत... यातही काही कसर राहू नये म्हणून आयपीएलमधील विविध फ्रँचायझी निवड चाचणीचे आयोजन करतात आणि त्यात सहभागी प्रत्येक खेळाडूची निश्चितपणाने चाचणी घेतली जाते, त्यांना आजमावून पाहिले जातेय... दडपणाखाली कोणता खेळाडू आपला नैसर्गिक खेळ साकारण्यात यशस्वी होतो... पॉवर प्लेमध्ये कोण बेडरपणे गोलंदाजांवर तुटून पडतो... गोलंदाजीत प्रतिस्पर्ध्यांना सळो की पळो कोण करून सोडतं, यावर या स्काऊटिंगमध्ये बारीक लक्ष असतं... आणि यातूनच बांधली जाते आयपीएलच्या संघांची मोट!

ही मोट बांधताना त्यांच्यासमोर लक्ष्य एकच असते... ते म्हणजे मॅचविनर्स शोधण्याचे... घोड्यांच्या शर्यतीत जसे जिंकणारे घोडेच सर्वात महत्त्वाचे, त्याचप्रमाणे आयपीएलमध्येदेखील मॅचविनर्सच महत्त्वाचे! आता ही टॅलेंट स्काऊट मोहीम फक्त भारतापुरतीच मर्यादित नाही, तर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्याची क्षितिजे विस्तारली गेली आहेत... जगाच्या कानाकोपर्‍यात जिथे जिथे लीग, टी-20 स्पर्धा सुरू असतात, त्या हर एक स्पर्धेवर या स्काऊटस्ची घारीची नजर असते... उदाहरणच द्यायचे तर टी. ए. सेकर यांनी अशाच आपल्या टॅलेंट सर्च मोहिमेतून टिपलेले दोन ऑस्ट्रेलियन धुवाँधार खेळाडू... ते म्हणजे दस्तुरखुद्द डेव्हिड वॉर्नर व ग्लेन मॅक्सवेल! चेन्नई सुपर किंग्जने तर यंदा अशा दोन टॅलेंट ट्रायल्स घेतलेल्या... यातील एक चेन्नईत, तर दुसरी कोईम्बतूरमध्ये... तामिळनाडूचा माजी फलंदाज ए. बी. कार्तिक हा चेन्न्नईचा टॅलेंट स्काऊट... आश्चर्य म्हणजे सामना कुठेही असो... तिथे यातील कोणते खेळाडू अधिक प्रभावी ठरतील, याचेही डेटा अ‍ॅनालिसिस यात प्राधान्याने केले जाते...

तयारीत कुठेही कमी नको म्हणून मॉक ऑक्शनचाही सराव केला जातो... संघाची स्ट्रॅटेजी त्या माध्यमातून घोटवली जाते अन् कुठे, कोणत्या खेळाडूला निवडायचे, याचाही होमवर्क केला जातो! आज वस्तुस्थिती अशी आहे की, अशा या टॅलेंट सर्च मोहिमेमधून संधी मिळालेले खेळाडूच सध्याच्या घडीला स्टार्स म्हणून झळकताहेत... प्रतिस्पर्ध्यांना चारीमुंड्या चित करताहेत... जसप्रित बुमराह असेल... हार्दिक पंड्या असेल किंवा वरुण चक्रवर्ती... हे सारे आयपीएलच्या टॅलेंट सर्च मोहिमांचेच फाईंड! अर्थात आयपीएल सुरू झाल्यानंतर या सर्व मोहिमा बाजूला पडतात आणि सुरू होतो तो आयपीएलचा रंगारंग माहोल! यंदाची आयपीएलही त्याला अपवाद असण्याचे कारणच नाही!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news