women's world cup | भारताच्या विश्वविजेत्या रणरागिणी!

women's world cup
women's world cup | भारताच्या विश्वविजेत्या रणरागिणी!
Published on
Updated on

विवेक कुलकर्णी

तो क्षण... जेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौरने विजयी धाव घेतली, तेव्हा नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर मैदानावर केवळ एक चषक उंचावला गेला नाही, तर कोट्यवधी भारतीयांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. अनेकदा अंतिम फेरीत पोहोचून हुकलेली संधी अखेर साधली गेली. कोट्यवधी चाहत्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. हा विजय केवळ एका स्पर्धेपुरता मर्यादित नव्हता, तो होता प्रत्येक मुलीच्या स्वप्नांचा!

भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूची यशोगाथा नवे स्फुरण देणारी आहे. अमनजोत कौरची घरची परिस्थिती इतकी खालावली होती की, खेळण्यासाठी साधी बॅटही तिच्याकडे नसायची. त्यामुळे तिला खेळायलाही घेतले जात नसे; पण सुतारकाम करणार्‍या तिच्या वडिलांनी राहिलेल्या लाकडातून बॅट तयार करत जणू तिच्या स्वप्नांना नवसंजीवनी दिली. शेफालीचे वडील सोनारकाम करणारे. मुलांमध्ये तिला खेळता यावे, यासाठी तिची वेषभूषाही त्यांनी मुलांप्रमाणे केलेली. पंजाबच्या मोगाची रहिवासी, भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला खरं तर तिच्या आईने स्वयंपाक शिकून घेण्यास आणि मुलींप्रमाणे सलवार कमीज रोज घालण्याची सूचना केलेली; पण क्रिकेटपटूच व्हायचे, या ध्यासाने जंगजंग पछाडलेल्या हरमनप्रीतने आपल्या आईचे मनही बदलण्यात यश मिळवले. जिद्दीने, संघर्षाने तिने एकेक पायरी सर केली आणि आता वर्ल्डकप जिंकून देण्यातही यश मिळवले.

जेमिमा रॉड्रिग्जची कहाणी, तर अक्षरश: डोळ्यांत अंजन घालणारी. ख्रिश्चन असल्याने आणि रील्स करत असल्याने कधी काळी तिला बरेच ट्रोल केले गेलेले. या उद्विग्नतेतूनच तिच्या मनात नैराश्येचे, क्रिकेट सोडण्याचे विचार सातत्याने मनात यायचे; पण ती जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीशी लढत राहिली आणि एक दिवस असाही आला, ज्यावेळी भारताच्या विश्वचषक विजयात तिचाही सिंहाचा वाटा राहिला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकहाती सामना जिंकून देण्याची तिची धमक तिच्यात एक रणरागिणीही लपलेली आहे, इतका दाखला देण्यासाठी पुरेशी होती.

मूळ शिमल्याची रेणुका सिंग अवघ्या 3 वर्षांची होती, त्यावेळी तिचे पितृछत्र हरपले. सारी जबाबदारी तिच्या आईवर येऊन पडली. परिस्थिती प्रतिकूल होती आणि जबाबदारी मोठी होती; पण या संकटाच्या काळात तिची आई अजिबात डगमगली नाही. त्या माऊलीने घरच्या घरीच क्लासेस घेणे सुरू केले आणि घर सांभाळले. मुलींना इतके खंबीर बनवले की, एक दिवस त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचेही नाव उज्ज्वल करतील. राधा यादव ही हरहुन्नरी क्रिकेटपटूदेखील अशाच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे आलेली. कांदिवलीत एका संकुलाबाहेर तिच्या वडिलांचा भाजी व दुधाचा स्टॉल असायचा. यातूनच कष्टातून दिवस काढत त्यांची कन्या एक दिवस वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य होईतोवर मोठी झाली.

मूळ बुंदेलखंडची असणारी क्रांती गौड ही एका पोलीस कॉन्स्टेबलची कन्या; पण वडिलांना अचानक नोकरी गमवावी लागली आणि त्यानंतर अगदी एकवेळच्या जेवणाचीही भ्रांत निर्माण झाली. तिच्या आईला क्रांतीला पुरेसे पैसे देता यावेत, यासाठी आपले सोनेही गहाण ठेवावे लागले; पण हे कुटुंबही अजिबात डगमगले नाही. त्यांनी मजल दरमजल प्रवास करताना प्रतिकूल परिस्थितीतवर मात करण्यात अजिबात कसर सोडली नाही.

दीप्ती शर्मा ही मूळची आग्रा येथील रहिवासी. दीप्तीला तिच्या क्रिकेट करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी तिच्या भावाने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि सर्व लक्ष तिच्या कारकिर्दीवर देण्याचा निर्णय घेतला. आज त्याच्या या निर्णयाचेही खर्‍याअर्थाने चीज झाले आहे. अगदी अंतिम क्षणी संघात पाचारण केलेल्या आसामच्या उमा छेत्रीला जवळपास क्रिकेट सरावाची कोणतीही सोय नसल्याने चक्क 16 किलोमीटरची पायपीट करावी लागायची; पण तिनेही कधी जिद्द सोडली नाही. ‘आधी हाताला चटके, मग मिळते भाकर’ ही उक्ती यातील प्रत्येक खेळाडूसाठी खरी ठरली. यातील प्रत्येक खेळाडूने जिद्दीने लढत एकेक पाऊल निर्धाराने, महत्त्वाकांक्षेने पुढे ठेवले आणि सरतेशेवटी एक दिवस असा आला, ज्यावेळी विजयश्रीने त्यांच्या गळ्यात यशाची माळ घातली.

तसे पाहता, कोणतीही मोठी स्पर्धा दुखापती आणि अनपेक्षित आव्हान सर केल्याशिवाय पूर्ण होत नाही. या विश्वचषकातही भारतीय संघाला या वादळाचा सामना करावा लागला. मधल्या टप्प्यात प्रतीका रावळसारखी बहरात असलेली खेळाडू दुखापतीमुळे बाहेर फेकली गेली, हा भारतासाठी मोठा धक्का होता; पण तिची गैरहजेरीही जाणवू नये, इतक ा अप्रतिम खेळ भारताच्या रणरागिणींनी प्रत्यक्ष मैदानात साकारला आणि एकेक प्रतिस्पर्ध्यास मजल दरमजल प्रवासात सातत्याने चीत केले. स्पर्धेच्या मध्यात पत्करावे लागलेले लागोपाठ तीन पराभव डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे होते; पण खर्‍याअर्थाने हाच कदाचित भारतासाठी वेकअप कॉल ठरला. याचे कारण म्हणजे, त्यानंतरच्या प्रत्येक सामन्यात भारताने सर्वस्व पणाला लावले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि विजय अक्षरश: खेचून आणला.

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला नमवताना भारतीय महिला क्रिकेटपटूंनी जो संघर्ष साकारला, तो निव्वळ अवर्णनीय होता. एरव्ही ऑस्ट्रेलियन संघ व्यावसायिकता नसानसात भिनलेला शेवटच्या चेंडूपर्यंत लढणारा संघ म्हणूनच ओळखला जातो. महिला संघातही हे गुण आपसूकच आलेले आहेत; पण त्या दिवशी भारतीय महिला संघाच्या जिद्दीने हे आव्हानही पार केले. जेमिमा रॉड्रिग्जचा त्या सामन्यातील तडाखा ऑस्ट्रेलियन महिला संघ आता क्वचितच कधी विसरू शकेल.

निर्णायक अंतिम लढतीतही फारसे वेगळे चित्र नव्हते. दक्षिण आफ्रिकेसारखा कसलेला संघ समोर उभा ठाकलेला होता. सामन्याच्या प्रत्येक टप्प्पात, प्रत्येक आघाडीवर हा संघ भारताला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार, हे साहजिकच होते. त्यांची कर्णधार क्लॉरा जणू एकेक इंच भूमीत निकराने लढत संघाला विजयाच्या दिशेने आगेकूच करून देत होती, त्यावेळी क्षणभर तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींच्या काळजात धस्स झाले होते; पण दीप्तीच्या एका अफलातून चेंडूवर क्लॉराचा अंदाज सपशेल चुकला आणि अमनजोतने पहिले दोन प्रयत्न फसल्यानंतरही चेंडूवर पूर्ण लक्ष ठेवत तिसर्‍या प्रयत्नात झेल टिपला अन् भारताला मोठा दिलासा मिळाला. खरं तर, अमनजोतने टिपलेला हा केवळ झेल नव्हता, तर तिने तो टिपलेला विश्वचषक होता. सरतेशेवटी भारताने जेतेपदावर थाटात आपले नाव कोरले आणि नवा इतिहास रचला गेला.

हा विश्वचषक विजयही खर्‍या अर्थाने नव्या युगाची सुरुवात ठरत आहे. हा विजय देशातील लाखो मुलींसाठी प्रेरणा आहे, ज्या हातात बॅट घेऊन मैदानावर उतरण्याचे स्वप्न पाहतील. हा विजय त्या प्रत्येक पालकासाठी आहे, जो आपल्या मुलीला खेळाडू बनवण्यासाठी पाठिंबा देईल. हा विजय केवळ एका विश्वचषकाचा नाही, तर भारतीय महिला क्रिकेटच्या एका नव्या, तेजस्वी युगाच्या आरंभाची वर्दी आहे. भारतीय महिला संघ अर्थातच या जेतेपदाचा खराखुरा हक्कदार आहे. ब्रेव्हो टीम इंडिया!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news