Paramveer Dhirga | प्रेरणादायी ‘परमवीर दीर्घा’

Paramveer Dhirga
Paramveer Dhirga | प्रेरणादायी ‘परमवीर दीर्घा’Pudhari file Photo
Published on
Updated on

शरयू माने

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा आपण एका गुलामगिरीचे चिन्ह राष्ट्रपती भवनात बाळगत होतो; पण 2025 च्या विजयदिनी या गुलामगिरीचे जोखड आपण झुगारून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका निर्णयाने हे घडले.

विजय दिवस ही आपल्या राष्ट्राची अस्मिता आहे. भारतात हा विजय दिन 1971 पासून साजरा होतो. याच दिवशी म्हणजे 16 डिसेंबरला भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला, त्याच वेळी पाकिस्तानचे तुकडे करून स्वतंत्र बांगला देश निर्माण केला. हा विजय दिवस दरवर्षी साजरा केला जात असला, तरी 2025 चा विजय दिवस हा काहीसा आगळावेगळा ठरला. आपल्या देशवासीयांचं फारसं लक्ष या घटनेकडे गेलेले दिसत नाही. 1971 पासून या दिवसाला एक अस्तित्व, एक महत्त्व प्राप्त झालेले आहे; मात्र 2025 च्या विजय दिवसाला एक अतिशय वेगळं महत्त्व आहे. त्याचा संदर्भ सापडतो, तो भारताच्या पारतंत्र्यांमध्ये. ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षं राज्य केलं. आपला देश सोडून जाताना त्यांनी दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी भारतात ठेवून दिल्या. एक म्हणजे इंग्रजी आणि दुसरी म्हणजे क्रिकेट! त्याशिवाय त्यांनी जी गोष्ट भारतात रुजवली, ठसवली ती म्हणजे भारतीयांची दास्यत्वात राहण्याची हाडीमासी खिळलेली सवय. भारत सोडून ब्रिटिश निघून गेले; पण अनेक ब्रिटिश अधिकार्‍यांच्या प्रतिमा राष्ट्रपती भवनात गेल्या महिन्यापर्यंत लागलेल्या होत्या.

भारताला ब्रिटिशांच्या दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अहिंसक स्वातंत्र्यसैनिकांनीसुद्धा आपलं आयुष्य स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात अर्पण केलं. असं असतानाही ब्रिटिश अधिकार्‍यांच्या गौरवार्थ लावलेल्या त्यांच्या प्रतिमा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 78 वर्षं झाली, तरी भारताच्या राष्ट्रपती भवनात विलसत होत्या, ही खरी तर लाजिरवाणी गोष्ट होती. गुलामगिरीचा हा कलंक भारताच्या पंतप्रधानांनी मिटवून टाकण्याचा निर्णय घेतला आणि अंमलबजावणीही तातडीनं केली.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये भारतीय सेनेनं चीन आणि पाकिस्तानबरोबरच्या युद्धात अतुलनीय असा पराक्रम गाजवला. त्यांच्या पराक्रमाला सॅल्युट करणारा हा क्षण आहे. राष्ट्रपती भवनामध्ये त्यादिवशी परमवीर गॅलरीचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. राष्ट्रपती भवनातील ब्रिटिश अधिकार्‍यांच्या प्रतिमा हटवून त्या जागी आपल्या शूरवीर अशा परमवीर चक्रप्राप्त सैनिकांच्या प्रतिमा लावण्यात आल्या. त्या गॅलरीचं ‘परमवीर दीर्घा’ असं नामकरण करण्यात आलं. मातृभूमीसाठी अपार पराक्रम गाजवणार्‍या शूरवीरांच्या सन्मानार्थ भारत सरकारनं हे महत्कार्य केलेलं आहे. तिथं आधीपासून अस्तित्वात असलेल्या ब्रिटिश अधिकार्‍यांच्या प्रतिमा हटवणं हा समस्त भारतीयांच्या आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे. भारतीयांच्या वसाहतवादी मनोदुर्बलतेतून मुक्तता मिळण्याचा हा क्षण आहे. भारतीयांची संस्कृती, समृद्धी आणि वारसा यांचा नव्याने स्वीकार करून सरकारनं एक महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे.

‘परमवीर दीर्घा’ मध्ये ज्या 21 शूरवीर सैनिकांचा आणि अधिकार्‍यांचा प्रतिमा लावून सन्मान करण्यात आलेला आहे, त्यांच्या प्रतिमेखाली त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे खर्‍या अर्थाने हा विजय दिवस 2025मध्ये साजरा करण्यात आला. देशाच्या पुढील सर्व पिढ्यांसाठी परमवीर दीर्घा प्रेरणादायी ठरणार आहे. परमवीर चक्र हे आपल्या प्राणांची बाजी लावून राष्ट्रासाठी लढणार्‍या सैनिकांच्या सन्मानार्थ प्रदान करण्यात येते. परमवीर चक्राचे मानचिन्ह कांस्य धातूपासून बनवण्यात येते. त्यावर मधोमध देशाचे बोधचिन्ह असते. त्यात दोन कमलपुष्पे असतात. हे परमवीर चक्र अशा पद्धतीने एक संस्मरणीय पदक ठरले. या पदकामुळे देशाच्या सैन्याच्या शौर्याला एक झळाळी मिळाली. सैनिकांच्या राष्ट्राविषयीच्या अतीव भक्तीला अभिवादन करणारे हे पदक ख्यातकीर्त झाले. या पदकावर जी रचना आहे ती भारतीयत्वाचे, भारतीय संस्कृतीचे एक गौरवशाली प्रतीक आहे. हे पदक ज्या शूरवीराला प्राप्त हाते, त्याच्या कुटुंबियांना आनंद वाटतो, एक विलक्षण अभिमान वाटतो.

परमवीर चक्राची रचना सावित्रीबाई खानोलकर यांनी केली. मूळ युरोपियन असलेल्या सावित्रीबाई भारतीय सेनेतील अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर भारतातील कला, संस्कृती, परंपरा याच्याशी त्या एकरूप झाल्या. भारतीय संस्कृतीचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाच्या वीरांना सन्मानार्थ मानचिन्ह देता यावे म्हणून सरकारने मेजर जनरल हिरालाल अटल यांच्यावर उत्तरदायित्व सोपवले. अटल यांनी सावित्रीबाईंची ख्याती ऐकली होती. त्यांनी पदकाच्या निर्मितीसाठी सावित्रीबाईंना पाचारण केले. त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. त्या सरकारच्या विश्वासाला पात्र ठरल्या. त्यांनी आकर्षक पदकाची निर्मिती केली. परमवीर चक्राचा गोलाकार व्यास 34.9 आहे. मध्यभागी राष्ट्रीय चिन्ह आहे. वज्राच्या चार चिन्हांनी ते वेढलेलं आहे. भारतीय संस्कृतीमधील उदात्त आणि महान तत्त्वांचा त्यात समावेश आहे.

परमवीर दीर्घा या गॅलरीमध्ये पूर्वी ब्रिटिश अधिकार्‍यांच्या प्रतिमा लावलेल्या होत्या. त्या हटवण्याचा आणि तिथं भारतीय शूरवीर सैनिकांच्या प्रतिमा लावण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. 1947 पासून ते 1999 पर्यंत शत्रूशी लढणार्‍या, अतुलनीय पराक्रम गाजवणार्‍या शूरवीरांच्या प्रतिमा या गॅलरीत लावण्यात आलेल्या आहेत. मेजर सोमनाथ शर्मा यांच्यापासून ते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यापर्यंत वीरांच्या प्रतिमा गॅलरीत समाविष्ट आहेत. 21 वीरांपैकी 14 जणांना परमवीर चक्र मरणोत्तर बहाल करण्यात आले. शौर्य, धैर्य, निष्ठा, त्याग या गुणांचा विचार परमवीर चक्र देताना केला जातो. देशाच्या भावी पिढ्यांना ही गॅलरी प्रेरणादायी ठरणारी आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून एक नवी मुक्ती याचं एक प्रतीक म्हणून ही गॅलरी आदर्श ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news