

संजीव ओक
जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेच्या काळात भारत हा मोठा बाजार राहिलेला नाही, तर तो विश्वासार्ह जागतिक पुरवठा केंद्र म्हणून पुढे आला आहे. ही ओळख अचानक मिळालेली नसून, दीर्घकालीन धोरणात्मक बदलांची ती फलश्रुती आहे.
गेल्या काही वर्षांत भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेत मूलभूत बदल झाला आहे. एकेकाळी स्वस्त श्रम आणि उदयोन्मुख बाजार या चौकटीत अडकलेला भारत आज जागतिक पुरवठा साखळीतील निर्णायक घटक म्हणून पाहिला जातो आहे. अमेरिका, युरोप, जपान, आखाती देश या सर्वांच्या धोरणांमध्ये भारत हा पर्याय नाही, तर अपरिहार्य भाग बनत चालला आहे. व्यापार करार, कूटनीती, पायाभूत सुविधा, उत्पादन क्षमता आणि राजकीय स्थैर्य यांच्या एकत्रित परिणामातून भारताने ही नवी ओळख मिळवली आहे. आजचा भारत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वेगळ्या उंचीवर उभा आहे. ही उंची लोकसंख्या, भूगोल किंवा बाजाराच्या आकारामुळे प्राप्त झालेली नाही. तर ती भारताने सातत्याने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे मिळालेली आहे. जागतिक अर्थव्यवस्था अस्थिरतेत अडकलेली असताना, भारत हा स्थैर्याचा आधार ठरतो आहे. याच कारणामुळे भारताचे महत्त्व व्यापारापुरते मर्यादित न राहता, धोरणात्मक आणि भू-राजकीय पातळीवर वाढले आहे.
जागतिक पुरवठा साखळीतील ताणतणाव हा या बदलाचा केंद्रबिंदू. कोरोना महामारीनंतर एकाच देशावर अवलंबून असलेल्या उत्पादन साखळ्यांची मर्यादा जगासमोर उघडी पडली. चीनकेंद्रित उत्पादन मॉडेल जोखमीचे ठरू लागले. त्याचवेळी अमेरिका-चीन संघर्ष, युक्रेन युद्ध, तांबड्या समुद्रातील तणाव, यामुळे पुरवठा साखळी अधिकच अस्थिर झाली. अशावेळी जगाला सक्षम पर्याय हवा होता आणि तो पर्याय म्हणून भारत जागतिक नकाशावर पुढे आला. भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची विविधता आणि प्रमाण. उत्पादन क्षेत्रात भारत आज इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, वाहन उद्योग, रसायने, अभियांत्रिकी वस्तू, संरक्षण उपकरणे अशा अनेक क्षेत्रांत जागतिक पुरवठादार म्हणून उभा राहत आहे. औषधनिर्मितीत भारत आधीच जगाची फार्मसी म्हणून ओळखला जातो. आता इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातही भारत दीर्घकालीन गुंतवणुकीचे केंद्र बनत आहे.
या बदलामागे निव्वळ उद्योगांचा प्रयत्न नाही, तर राज्यकर्त्यांची स्पष्ट दिशा आणि धोरणे आहेत. उत्पादनाशी जोडलेली प्रोत्साहन योजना, पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक, बंदरांची क्षमतावाढ, लॉजिस्टिक खर्चात घट या सगळ्यांचा एकत्रित परिणाम भारताच्या बाजूने आहे. जागतिक कंपन्यांसाठी भारत हा स्वस्त पर्याय नव्हे, तर सुरक्षित आणि दीर्घकालीन भागीदार ठरतो आहे. भारताचा वाढलेला आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा दुसरा पैलू म्हणजे कूटनीती. भारताने कोणत्याही एका गटाशी पूर्णतः बांधील न राहता, बहुपर्यायी संबंध जोपासले. अमेरिका, युरोप, रशिया, आशिया, आफ्रिका या सर्वांशी संवाद कायम ठेवत भारताने स्वतःला ‘स्विंग पॉवर’ म्हणून सिद्ध केले. त्यामुळे जागतिक निर्णय प्रक्रियेत भारताकडे दुर्लक्ष करणे आता कोणालाही परवडणारे राहिलेले नाही. याच पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका व्यापार कराराकडे पाहावे लागेल. अमेरिकेने भारतावरील आयात शुल्क कमी करणे हा आर्थिक निर्णय नव्हता. तो भारताच्या वाढत्या महत्त्वाची दिलेली अप्रत्यक्ष कबुली होती. युरोपशी करार करून भारताने अमेरिकेला स्पष्ट संकेत दिला की, भारताकडे पर्याय उपलब्ध आहेत. या बदललेल्या वास्तवामुळे अमेरिकेला माघार घ्यावी लागली.
युरोपसाठीही भारताचे महत्त्व झपाट्याने वाढले आहे. हरित संक्रमण, डिजिटल अर्थव्यवस्था, डेटा संरक्षण, उच्च दर्जाचे उत्पादन या सर्व क्षेत्रांत युरोपला विश्वासार्ह भागीदार हवा आहे. चीनवरील अवलंबन कमी करण्याचा युरोपचा प्रयत्न भारताच्या बाजूने गेला. त्यामुळे भारत-युरोप संबंध केवळ व्यापारापुरते न राहता, धोरणात्मक भागीदारीकडे झुकले आहेत. जागतिक आर्थिक संस्थांची आकडेवारीही या बदलाची साक्ष देते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, जागतिकवाढीचा मोठा हिस्सा पुढील दशकात आशियातून येणार आहे आणि त्यात भारताची भूमिका निर्णायक असेल. अमेरिका आणि युरोप स्थिर वाढीच्या टप्प्यात असताना, भारत वेगवान वाढीचा केंद्रबिंदू ठरतो आहे. हीच बाब जागतिक गुंतवणूकदारांचा भारताकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन बदलते आहे.
भारताचे जागतिक पुरवठा केंद्र म्हणून महत्त्व वाढत असताना, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे, भारत हा उत्पादन करणारा देश म्हणून मर्यादित राहिलेला नाही, तर तो मूल्यनिर्मिती करणारा देश बनतो आहे. संशोधन, डिझाईन, सेवा, तंत्रज्ञान आणि उत्पादन यांचा संगम भारतात होत आहे. यामुळे भारताची भूमिका केवळ ‘बॅकएंड’पुरती मर्यादित राहत नाही. अर्थात, या नव्या ओळखीबरोबर भारतासमोरील आव्हानेही वाढली आहेत. जागतिक पुरवठा केंद्र बनणे म्हणजे सातत्याने गुणवत्ता, वेळेची शिस्त, नियमपालन आणि पर्यावरणीय जबाबदारी पाळणे. भारताला हे आव्हान स्वीकारावे लागेल. सवलतींवर आधारित स्पर्धा दीर्घकाळ टिकत नाही; उत्पादकता आणि नवोन्मेष हाच खरा मार्ग आहे. तरीही, आजचा भारत आत्मविश्वासाने पुढे जात आहे. जागतिक व्यापारात भारताकडे आता ‘मागणारा’ म्हणून पाहिले जात नाही; तो ‘अटी ठरवणारा’ घटक बनतो आहे. हीच भारताच्या वाढलेल्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाची खरी ओळख आहे.
भारत आज केवळ उदयोन्मुख अर्थव्यवस्था राहिलेला नाही; तो जागतिक पुरवठा साखळीचा विश्वासार्ह कणा बनतो आहे. अमेरिका, युरोप आणि इतर शक्तींना भारताशी करार करावे लागत आहेत; कारण पर्याय कमी होत चालले आहेत. ही स्थिती भारताला मिळालेली संधी आहे. धोरणात्मक शहाणपण, स्थैर्य आणि दीर्घकालीन द़ृष्टिकोन राखला, तर भारत ही नवी ओळख टिकवू शकतो. जागतिक व्यासपीठावर भारताने आता फक्त उपस्थित राहायचे नाही; दिशा ठरवायची आहे आणि तो क्षण आता आलेला आहे. भारत-युरोप-अमेरिका या त्रिकोणात भारत आता केंद्रस्थानी आला आहे. जागतिक पुरवठा साखळीला स्थैर्य देणारा, पर्याय उभे करणारा आणि अटी ठरवणारा देश म्हणून भारताची ओळख पक्की होत चालली आहे.