युद्धभूमीवरच्या झुंजार रणरागिणी!

indian-women-lead-army-contingent
युद्धभूमीवरच्या झुंजार रणरागिणी!Pudhari File Photo
Published on
Updated on
अंजली महाजन, महिला प्रश्नांच्या अभ्यासक

पाकिस्तानचे भारतविरोधी मनसुबे बेचिराख करणार्‍या ‘ऑपरेशन सिंदूर’ची बित्तंबातमी देण्यासाठी माध्यमांसमोर आलेल्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह ‡या दोन रणरागिणींच्या करारीपणातून भारतीय सैन्यदलातील स्त्री शक्तीचे दर्शनही जगाला घडले. या दोघींनी जगासमोर भारताची बाजू ठामपणे मांडली. पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला छेद दिला. आज देशाच्या कानाकोपर्‍यातील तरुणींसाठी, महिलांसाठी त्या ‘आयडॉल’ बनल्या आहेत.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चालवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची चर्चा दीर्घकाळ होत राहणार आहे. विशेषतः या ऑपरेशनची बित्तंबातमी देण्यासाठी माध्यमांसमोर आलेल्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन रणरागिणींच्या करारीपणातून भारतीय सैन्यदलातील स्त्री शक्तीचे दर्शन जगाला घडले. या दोघींनी जगासमोर भारताची बाजू ठामपणे मांडली, पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला छेद दिला. या दोन्ही रणरागिणी आज भारतीय सैन्यात उच्च पदांवर कार्यरत आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यातील तरुणींसाठी, महिलांसाठी त्या ‘आयडॉल’ बनल्या आहेत. सोफिया कुरेशी यांच्या घरात पिढ्यान् पिढ्या लष्करी परंपरा आहे. व्योमिका सिंह यांच्या कुटुंबात आधी कोणीही लष्करात नव्हते.

सोफिया या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करणार्‍या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्या आर्मी कम्युनिकेशन क्षेत्रातील तज्ज्ञ असून त्या सिग्नल कोअरमध्ये सेवा देत आहेत. कर्नल सोफिया या अशा पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यांनी बहुराष्ट्रीय सैन्य सराव मोहिमेचे नेतृत्व केले आहे. त्या अनेक वर्षे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रस्थापनेसाठीच्या मोहिमांमध्ये सहभागी राहिल्या आहेत. दुसरीकडे, विंग कमांडर व्योमिका सिंह या विशेष प्रशिक्षित हेलिकॉप्टर पायलट आहेत. त्या चेतक आणि चिता यासारख्या विशिष्ट प्रकारच्या हेलिकॉप्टरना दुर्गम आणि आव्हानात्मक भागांमध्ये उड्डाण करणार्‍या पायलट आहेत. त्या सशस्त्र दलांमध्ये सहभागी होणार्‍या पहिल्या महिलांपैकी एक असून, गेली 21 वर्षे त्या भारतीय हवाई दलात सेवा देत आहेत.

कर्नल सोफिया कुरेशी या सिग्नल कोरमध्ये सेवा देतात आणि त्या लष्करी संप्रेषण (आर्मी कम्युनिकेशन) क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. 2006 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेंंतर्गत काँगोमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी तेथे महिलांना आणि लहान मुलांना हिंसेपासून वाचवण्यासाठी सैन्य प्रशिक्षक (मिलिटरी टीचर) म्हणून काम केले. यापूर्वी 2001-02 या काळात त्यांची पंजाब सीमेजवळ तैनाती झाली होती. त्यांच्या समर्पित सेवेबद्दल त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांच्याकडून प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा शहरात झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. 1999 मध्ये सोफिया यांनी भारतीय सैन्यातील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून कठोर प्रशिक्षण घेतले आणि त्याच वर्षी त्यांना सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळाली. त्यांच्यातील प्रतिभेमुळे आणि समर्पणामुळे लवकरच त्यांना सैन्यात महत्त्वाचे स्थान मिळाले. लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी 2016 मध्ये बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय तुकडीचे नेतृत्व करून प्रसिद्धीच्या झोतात आल्या. या सरावाचे नाव ‘सराव फोर्स 18’ होते. या सरावात 18 देशांच्या लष्करी तुकड्यांनी भाग घेतला होता आणि त्या सर्व तुकड्यांपैकी सोफिया कुरेशी या एकमेव महिला अधिकारी होत्या. सोफिया या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय तुकडीचे नेतृत्व करणार्‍या भारतीय सैन्यातील पहिल्या महिला अधिकारी बनल्या. कोणत्याही क्षेत्रात धैर्य, समर्पण आणि कठोर परिश्रमाने यश मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

‘व्योमिका’ म्हणजे ‘आकाशाची स्वामिनी’. व्योमिका यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सहाव्या इयत्तेत असताना शाळेत नावांच्या अर्थांबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी त्यांना समजले की ‘व्योमिका’ म्हणजे आकाशाची स्वामिनी. त्याच क्षणी त्यांनी ठरवले की, आपण पायलट व्हायचं; पण यासाठी प्रयत्न सुरू करताना असे आढळले की, फक्त अविवाहित पुरुषच वायुसेनेत पायलट होऊ शकतात. तेव्हा त्यांना तीव्र धक्का बसला; पण इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी त्यांना यूपीएससीमार्फत शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधून महिला पायलट होण्याची संधी मिळू शकते, हे समजले. त्यांनी परीक्षेला बसून यश मिळवले आणि प्रशिक्षण घेऊन आपल्या सैनिकी प्रवासाची सुरुवात केली.

व्योमिका सिंह या चेतक आणि चीता या प्रकारच्या हेलिकॉप्टरच्या विशेष प्रशिक्षित पायलट आहेत. आतापर्यंत त्यांनी समुद्रसपाटीपासून 18,000 फूट उंचीपर्यंत 2500 तासांहून अधिक उड्डाण केलं आहे. त्यांनी अनेक वेळा अतिकठीण अशा बचाव आणि मदत मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशातील कठीण भूप्रदेशात आणि प्रतिकूल हवामानात व्योमिका यांनी एक धाडसी बचाव मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. या मिशनमुळे अनेकांचे प्राण वाचले आणि व्योमिका खर्‍याअर्थाने रिअल लाईफ आयडॉल ठरल्या. 2021 मध्ये त्यांनी माऊंट मणिरंग (21,650 फूट) या उंच शिखरावर त्रिसेवा महिला पर्वतारोहण मोहिमेत भाग घेतला होता. आपल्या सेवाकाळात व्योमिका यांनी अनेकदा असे निर्णय घेतले की, ज्यामध्ये ड्युटीपेक्षा मानवतेला प्राधान्य दिले.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारने जेव्हा या दोन रणरागिणी प्रसारमाध्यमांसमोर आल्या तेव्हा लिंगभेद, धर्मभेद विरहीततेचा संदेशही जगाला गेला.

भारतीय सैन्य दलांमध्ये महिलांचा सहभाग 1888 मध्ये इंडियन मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसच्या स्थापनेपासून सुरू झाला. दुसर्‍या महायुद्धादरम्यान, 1942 मध्ये विमेन्स ऑक्सिलरी कॉर्प्सची स्थापना झाली, ज्यामध्ये महिलांना प्रशासकीय आणि संप्रेषणात्मक भूमिकांसाठी भरती करण्यात आले. पुढे 1992 मध्ये भारतात महिलांना अधिकारी पदावर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने 1992 नंतर भरती झालेल्या महिलांना पर्मनंट कमिशनसाठी पात्र ठरवले गेले. आज 11 ऑर्म्ड व सर्व्हिस विभागात आर्मी मेडिकल कोर, डेंटल कोर, एज्युकेशन कोर, इंजिनिअर कोर, इंटेलिजन्स, सिग्नल्स, लॉ ब्रँच, आर्मी एअर डिफेन्स, आर्मी एव्हिएशन इत्यादींमध्ये महिलांना पर्मनंट कमिशन दिले जाते. देशाच्या संरक्षण क्षेत्रात महिलांचे योगदानही महत्त्वाचे आहे.

कॅप्टन याशिका त्यागी

सोफिया आणि व्योमिका यांच्या गौरवोद्घोषामध्ये कॅप्टन याशिका त्यागी यांच्यासारख्या झुंझार रणरागिणीचेही स्मरण करणे औचित्याचे ठरेल. त्या भारतीय लष्कराच्या कोअर ऑफ एअर डिफेन्स आर्टिलरीमध्ये अधिकारी होत्या. त्यांना शेरनी इन कॉम्बॅट म्हणून ओळखले जाते. कारगिल युद्धादरम्यान गर्भवती असतानाही लडाखच्या उच्च उंचीवरील रणभूमीवर सेवा दिली होती. अशा रणरागिणी म्हणजे भारताची शक्तिपीठे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news