Indian Batsmen | चिंता फिरकीपुढील शरणागतीची

Indian batsmen spin weakness
Indian Batsmen | चिंता फिरकीपुढील शरणागतीची
Published on
Updated on

नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवामुळे टीम इंडियाने आपल्या चाहत्यांची घोर निराशा झाली आहे. दुसरीकडे या सामन्यामुळे एक महत्त्वाचा विषय चर्चेत आला आहे, तो म्हणजे भारतीय फलंदाजांची फिरकी गोलंदाजीवर खेळण्याची क्षमता कमी झाली आहे. यामागचेे कारण गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या सहा कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने 87 विकेटस् गमावल्या असून त्यापैकी 60 फिरकीपटूंनी, तर 27 वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. ही बाब प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या निर्णय क्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. यामागचे एक कारण टी-20 केंद्री धोरणे कारणीभूत आहेत.

भारतीय क्रिकेट संघ हा एकेकाळी फिरकी गोलंदाजांना घाम फोडणारा संघ म्हणून ओळखला जात असे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, मोहम्मद अझरुद्दीन, सुनील गावसकर या सर्वांनी आपल्या कारकिर्दीत जगातील अनेक फिरकी गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत धावांची बरसात केली. योग्य तंत्र, पायांची चपळता आणि संयम यांच्यामुळे त्यांना फिरकी गोलंदाजांना सहजगत्या निष्प्रभ करता येते; मात्र अलीकडच्या काळात हा प्रवाह अद़ृश्य झाला आहे की काय, असा प्रश्न विचारला जात आहे. याचे कारण, भारतीय क्रिकेट संघ फिरकी गोलंदाजांसमोर कमजोर पडत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. परदेशातील अनोळखी धावपट्ट्यांवर असे घडणे एकवेळ समजण्याजोगे ठरू शकते; पण घरच्या मैदानावर भारतीय फलंदाज स्पिनर्ससमोर नांगी टाकत असतील, तर त्याचे समर्थन कदापि करता येणार नाही.

कोलकात्यातील अलीकडच्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेसमोर भारतीय संघ केवळ 124 धावांचे लक्ष्यही पार करू शकला नाही. संपूर्ण दुसर्‍या डावात 93 धावांवर भारतीय संघ बाद झाल्याचे पाहून चाहत्यांच्या संयमाचा पारा सुटला. त्यामुळेच भारतीय फलंदाज स्पिन खेळण्याची मूलभूत कला विसरू लागले आहेत का, हा प्रश्न आता गंभीरपणे उपस्थित होत आहे. दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ या दिशेनेच वळते. कारण, गेल्या काही वर्षांत भारतीय फलंदाजांच्या घरच्या मैदानावरील स्पर्धांतील कामगिरीत सातत्याने घसरण झालेली दिसते. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची धोरणे, त्यांचे प्रयोग आणि नव्या युगातील भारतीय क्रिकेटमधील बदल यांचे विश्लेषण महत्त्वाचे ठरते. गंभीर यांच्या कोचिंग अंतर्गत भारताने काही वेळा उत्कृष्ट कामगिरी केली असली, तरी कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची तत्त्वे आणि धोरणे अनेकदा तणाव निर्माण करणारी ठरली आहेत. फलंदाजीची चुकीची क्रमवारी आणि फलंदाजांच्या तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्यात आलेले अपयश हे सर्व मुद्दे भारतीय क्रिकेटसाठी चिंतेचा विषय ठरले आहेत.

न्यूझीलंडने गेल्या वर्षी भारताला घरच्या मैदानावर 0-3 ने हरवले होते, तेव्हा एजाज पटेल, मिशेल सॅन्टनर आणि ईश सोढी यांच्या त्रिकुटाने भारतीय फलंदाजांना अक्षरशः शरणागती पत्करायला लावली होती. एजाज पटेलने 15 आणि मिशेल सँटनरने 13 बळी घेतले होते. अगदी तशीच परिस्थिती आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेली दिसली. सायमन हार्मर आणि केशव महाराज यांनी फिरकी प्रभावीपणे वापरून भारताला गुडघे टेकायला लावले. पुण्यात खेळल्या गेलेल्या 2017 च्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाज अशाच प्रकारे हतबल झालेले दिसले होते. पहिल्या कसोटीत भारत 105 आणि 107 धावांवर बाद झाला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज स्टीव्ह ओ’कीफने वळण घेणार्‍या खेळपट्टीचा फायदा घेत 12 बळी घेतले होते. परिणामी, भारतीय फलंदाजांना त्यांच्याच मैदानात हार मानण्यास भाग पडले. ऑस्ट्रेलियाने तो कसोटी सामना 333 धावांनी जिंकला होता. भारतीय संघाच्या 20 पैकी 17 फलंदाजांचे बळी फिरकी गोलंदाजांनी घेतले होते.

2015 मध्ये नागपूरमध्ये खेळलेला कसोटी सामना भारताने जिंकला असला, तरी भारतीय फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर धडपडताना दिसले होते. फिरकी गोलंदाजीमुळे भारतीय संघ अनुक्रमे 215 आणि 173 धावांवर गारद झाला होता. त्या सामन्यात सायमन हार्मर, इम्रान ताहिर आणि डीन एल्गर यांनी मिळून 12 बळी घेत भारतीय फलंदाजांना अस्वस्थ केले होते. तो सामना अवघ्या तीन दिवसांत संपला होता. गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या सहा कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने 87 विकेट गमावल्या असून त्यापैकी 60 फिरकीपटूंनी, तर 27 वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत.

ताज्या पराभवाचे विश्लेषण करताना पहिला मुद्दा असा दिसतो की, भारतीय फलंदाजांना सुरुवातीपासूनच सूर गवसलेला दिसला नाही. आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांपुढे खेळताना पहिल्या फळीतील सर्वच फलंदाजांची कामगिरी कमकुवत झाल्याने उर्वरितांवर दबाव वाढत गेला. भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांच्या चेंडूंवर खेळताना पिचकडे पुढे जात नाहीत, मागे जात नाहीत आणि मधल्या स्थितीत अडकून जातात. स्पिन खेळण्याचे हे सर्वात मोठे धोकादायक स्वरूप आहे. संयम हरवणे, सुरुवातीपासून शॉटस् खेळण्याची घाई करणे, स्ट्राईक रोटेशन न करणे ही सर्व आधुनिक आणि विशेषतः टी-20 क्रिकेटमधून आलेली रणनीती आणि मानसिकता आहे. सध्याचे भारतीय फलंदाज बहुतेक वेळा नेटमध्येही वेगवान गोलंदाजीवर खेळण्यावर भर देतात. फिरकीविरुद्ध लांब सत्रांचा सराव करण्याची परंपरा जवळजवळ संपली आहे. याचे कारण टी-20 मध्ये कमी चेंडूंत अधिक शॉट खेळणे आवश्यक असते; पण कसोटी क्रिकेट हा पूर्णतः संयमाचा खेळ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय संघ व्यवस्थापनाची धोरणात्मक गोंधळलेली द़ृष्टी. कोलकात्याच्या सामन्यात खेळपट्टी फिरकीसाठी उपयुक्त असली, तरी चार स्पिनर्स उतरवणे हा अतिरेक होता. जडेजा आधीच प्रमुख स्पिनर आहे. अक्षर पटेल हा जवळजवळ त्याच प्रकारच्या शैलीतील गोलंदाज आणि फलंदाज आहे. तिसरा आणि चौथा स्पिनर म्हणून वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव पुरेसे होते; पण संघातील संतुलन बिघडवून साई सुदर्शनसारख्या चांगल्या फॉर्मात असलेल्या फलंदाजाला बाहेर बसवणे हा मोठा धोरणात्मक चुकीचा निर्णय ठरला. फलंदाजांच्या क्रमातील प्रयोगदेखील तितकेच अयोग्य होते. वॉशिंग्टन सुंदरला तिसर्‍या क्रमांकावर पाठवणे हा निर्णय कसोटीच्या तत्त्वांना धरून नव्हता. तिसर्‍या क्रमांकावर स्थिर, तांत्रिकद़ृष्ट्या कुशल फलंदाज हवा असतो. सुंदर हा परिपूर्ण ऑलराऊंडर असला, तरी त्या ठिकाणी त्याचे संरक्षणही गरजेचे होते. हा मुद्दा संघ व्यवस्थापन समजून घेऊ शकला नाही, असे दिसते.

तिसरी मोठी बाब म्हणजे गंभीर यांचे खेळाडूंवरील खुले टीकेचे धोरण. सामन्यानंतर त्यांनी पटकन फलंदाजांवर टीका करताना त्यांना फिरकी गोलंदाजीवर कसे खेळायचे हे माहीत असायला हवे, अशी टिप्पणी केली; पण फलंदाजांना योग्य तंत्र शिकवणे, त्यांचे दोष समजावणे, त्यांच्या पायांच्या मूव्हमेंट सुधारणे हे काम प्रशिक्षकाचेच आहे. खेळाडूंचे दोष सांगणे हा उपाय नव्हे. दोष दुरुस्त करणे हे प्रशिक्षकाचे कर्तव्य आहे. भारताचा घरच्या मैदानातील रेकॉर्ड गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली संमिश्र राहिला आहे. बांगला देश आणि वेस्टइंडीजविरुद्ध मिळालेल्या विजयांपेक्षा न्यूझीलंडविरुद्धचा 0-3 चा पराभव आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पिछाडी अधिक ठळक आहे. परदेशातील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही भारताच्या कामगिरीत मोठे चढउतार राहिले होते.

स्पिन खेळणे ही कला आहे. ती पिढ्यान् पिढ्या भारतीय क्रिकेटमध्ये जपली गेली होती; पण आता या कलाकुसरीवर धूळ बसू लागली आहे. या समस्येचे एक महत्त्वाचे मूळ म्हणजे युवा पिढीचे प्रशिक्षण. आजचे युवा क्रिकेटपटू नैसर्गिकरीत्या टी-20 शैलीकडे झुकतात. त्यांना कसोटीच्या कष्टप्रद, संयमी स्पिन सरावापेक्षा धावांची बरसात आवडते. प्रशिक्षक, निवड समिती आणि वरिष्ठ खेळाडू यांनी एकसंध धोरणाने ही दिशा सुधारण्याची गरज आहे. नेटमध्ये मोठ्या फेर्‍या, पुढे जाऊन खेळणे, चेंडूला स्पिनसाठी वेळ देणे, स्ट्राईक रोटेट करणे हे सगळे पुन्हा रुळांवर आणणे गरजेचे आहे. क्रिकेटविश्वातला सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरदेखील रणजी खेळायचा. तथापि, आजच्या कसोटी संघातील बहुतेक फलंदाज देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास टाळाटाळ करतात. कोलकात्यातील पराभव हा भारतीय क्रिकेटसमोरील मोठ्या संकटाचा घंटानाद आहे. नवी पिढी, नवे प्रशिक्षक, नवी पद्धत या सर्वांनी एकत्र काम केले, तर भारतीय फलंदाज पुन्हा जागतिक क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांवर तुटून पडताना दिसतील, यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news