मास्टरस्ट्रोक!

आयसीसी चॅम्पियन्स चषकात भारताने वर्चस्व
India WON the ICC Champions trophy 2025
आयसीसी चॅम्पियन्स चषकात भारताने वर्चस्व.Pudhari File Photo
Published on
Updated on
विवेक कुलकर्णी

प्रशिक्षक गौतम गंभीर नेहमी म्हणतो की, फलंदाज सामने जिंकून देतात. पण, गोलंदाज स्पर्धा जिंकून देतात! यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स चषकात फलंदाजी-गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर भारताने चांगलेच वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, द. आफ्रिका असे तगडे संघ खांद्याशी खांदा लढवून इंच इंच भूमी लढवत असताना भारताने मिळवलेले यश म्हणजे जेतेपदाचा मास्टरस्ट्रोकच!

ही घटना आहे 1989 ची. 16 वर्षांचा सचिन पाकिस्तानविरुद्ध खेळत होता. पावसाचा व्यत्यय आला आणि खेळ थांबवावा लागला. पाकिस्तानने त्या लढतीत भारताला 158 धावांचे आव्हान दिले होते. शेवटच्या 30 चेंडूंत भारताला 70 धावांची आवश्यकता होती. सचिन चौकार-षटकारांची आतषबाजी करत होता. याचवेळी पाकिस्तानचा महान फिरकीपटू अब्दुल कादीर सचिनकडे येत म्हणाला, ‘हिंमत असेल तर माझ्या गोलंदाजीवर षटकार मारून दाखव!’ सचिन चटकन उत्तरला, ‘आपण तर महान गोलंदाज आहात! मी आपल्याला षटकार कसा मारू शकेन?’ ...पण, नंतर झाले असे की, सचिनने याच कादीरच्या एकाच षटकात 4 षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने चक्क 28 धावा कुटल्या! त्यानंतर पूर्ण सामन्यात अब्दुल कादीरचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता! सचिनने त्या घटनेत जणू एकच धडा शिकवला... ‘मी नाही, माझी बॅट बोलेल, माझी बॅटच रिझल्टही देईल!’... गत आठवड्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अपराजित राहात आयसीसी चॅम्पियन्स चषकावर आपली मोहोर उमटवली आणि याचमुळे सचिनच्या ‘त्या’ करारी बाण्याची आवर्जून आठवण झाली!

तसे पाहता भारताने या विजयासह एकाच दगडात अनेक पक्षी मारले. सर्वप्रथम त्यांनी 12 वर्षांपासून चालत आलेला चॅम्पियन्स चषकातील जेतेपदांचा दुष्काळ संपुष्टात आणला. दुसरीकडे, एका वर्षाच्या आतील दुसरे आयसीसी जेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाचा दोन चॅम्पियन्स चषकांचा विक्रम मागे टाकला. शिवाय 25 वर्षांपूर्वीचा न्यूझीलंडचा हिशेबही चुकता केला. हा न्यूझीलंडचा तोच संघ होता, ज्यांनी 2000 मधील चॅम्पियन्स चषकात भारताला चीतपट करत अपेक्षाभंग केला होता. इथे मात्र रोहित सेनेने त्याची सव्याज परतफेड केली. आयसीसी इव्हेंटस्समधील भारताचे हे एकूण सातवे जेतेपद. भारताने आतापर्यंत दोन वन डे विश्वचषक, दोन टी-20 विश्वचषक आणि तीन चॅम्पियन्स चषक स्पर्धा जिंकल्या आहेत. भारताच्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये हे सर्व चषक संघाच्या पराक्रमाची साक्ष सांगताहेत... अजून खूप पल्ला गाठायचाय, याची आठवणही करून देताहेत. अर्थातच 2026 टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल, त्यावेळी ही सर्व जेतेपदे भारतीय संघाचे मनोबल उंचावणारीच ठरतील!

भारताने आजवर जी सात जेतेपदे मिळवली, त्यात प्रत्येकाचे काही ना काही खास वैशिष्ट्य आहे. भारताने पहिला-वहिला विश्वचषक जिंकला, त्यावेळी कपिलने झिम्बाब्वेविरुद्ध 5 बाद 17 वरून जो झंझावात साकारला, त्याच्या संख्यात्मक आठवणी आजही भारतीय रसिकांच्या मनात गुंजन घालत असतात. कपिलने त्यावेळी 303 धावा आणि 12 विकेटस् असे अष्टपैलू योगदान दिलेले. 2002 चॅम्पियन्स चषकात सेहवागने सर्वाधिक 271 धावा केल्या म्हणूनच आपण जेतेपदावर मोहोर उमटवू शकलो. 2007 मधील टी-20 विश्वचषकात गौतम गंभीरच्या तीन अर्धशतकांसह 227 धावा आणि आर.पी. सिंगचे 12 बळी निर्णायक ठरले. 2011 विश्वचषकातील खराखुरा हिरो युवराज सिंगने एकीकडे फलंदाजीत 362 धावांची आतषबाजी केली तर दुसरीकडे 15 बळी घेत मालिकावीर पुरस्कारावर कब्जा केला. 2013 चॅम्पियन्स चषकात शिखर धवनने 363 धावांसह मालिकावीर पुरस्कार मिळवला तर जडेजाने 12 विकेटस् घेत या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यानंतर 2024 टी-20 विश्वचषकात जसप्रित बुमराहने 15 बळी घेत प्रतिस्पर्धी संघांचे कंबरडे मोडले. शिवाय, अर्शदीपने 17 बळींसह त्याला समयोचित साथ दिली. यंदाच्या चॅम्पियन्स चषकात मात्र भारताच्या पाचही विजयांत वेगवेगळ्या खेळाडूंनी जबाबदारी उचलली, ती पार पाडली आणि भारतीय संघ याच बळावर पाहता पाहता जेतेपदावर आरूढ झाला! ऑस्ट्रेलिया-पाकिस्तानविरुद्ध विराट, बांगला देशविरुद्ध शुभमन, न्यूझीलंडविरुद्ध वरुण तर फायनलमध्ये पुन्हा किवीज संघाविरुद्ध रोहित सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.

यंदा सारा मामला एकजिनसी खेळाचा होता. त्यामुळे ना कोणी भारतीय खेळाडू मालिकावीर पुरस्कार मिळवू शकला, ना कोणी भारतीय खेळाडू स्पर्धेत सर्वाधिक धावा जमवू शकला आणि ना कोणी गोलंदाज स्पर्धेत सर्वाधिक बळी घेऊ शकला..! उदाहरणादाखल पाहायचे तर स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या त्या न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने... त्याने ओतली रास चार सामन्यांत 263 धावांची... मालिकावीर पुरस्कार पटकावला तोही रचिन रवींद्रनेच... शिवाय, सर्वाधिक 10 बळी घेतले न्यूझीलंडचाच आणखी एक खेळाडू मॅट हेन्रीने... पण, यानंतरही जेतेपदाचा मानकरी ठरला तो भारतच! अन् याचे कारण होते संघाचा एकजिनसी खेळ!

सांघिक खेळावर भर द्या, अशी गुरुकिल्लीच जणू कोच गौतम गंभीरने दिली असावी, अशा थाटात भारतीय खेळाडूंनी हल्ले-प्रतिहल्ले चढवले आणि त्यानंतर भारताचे स्पर्धेवर वर्चस्व असणार, हे तोवर अधोरेखितच झालेले... आश्चर्य म्हणजे पूर्ण स्पर्धेत भारतीय संघात केवळ एकच बदल केला गेला! 15 सदस्यीय पथकातील 12 खेळाडूंच्या बळावरच भारतीय संघ चॅम्पियन्स चषकातील जगज्जेता ठरला. प्रत्येक सामन्यात दरवेळी वेगवेगळे खेळाडू कसे वर्चस्व गाजवत गेले, याचा विराटने केलेला उल्लेख लक्षवेधी होता. विराट म्हणाला, पूर्ण स्पर्धेत प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी अस्मान गाजवले. मागील काही कालावधीत आम्ही काही स्पर्धांमध्ये संधी असूनही गोड शेवट करू शकत नव्हतो. पण, इथे त्याची कसर भरून निघाली! आपल्याला या स्पर्धेसाठी कशी वेगळी तयारी करावी लागली, याचे विवेचन करताना के. एल. राहुल म्हणाला, मी या स्पर्धेत वेगवेगळ्या भूमिका वठवत होतो आणि त्या अनुषंगाने मला वेगळी तयारी करावी लागली. या स्पर्धेत मी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळायचे असल्याने या क्रमांकावर यापूर्वी कोणते फलंदाज कशा पद्धतीने खेळायचे, याचाही मी अभ्यास केला आणि त्याचा मला पुरेपूर लाभ झाला!

हार्दिक पंड्या जे म्हणाला ते यापेक्षाही अफलातून होते. तो सहजच बोलून गेला, हे वर्षच मुळात मला खूप काही शिकवणारे आणि आव्हाने देणारे ठरते आहे. पण, मी मनाने खंबीर आहे. मला आव्हानांपासून पळ काढणे अजिबात पसंत असत नाही. त्यापेक्षा मी यश कसे खेचून आणता येईल, यावर भर देत असतो आणि यश कसे खेचून आणायचे, यासाठी यंदाची चॅम्पियन्स चषक सर्वोत्तम उदाहरण ठरावे! या चॅम्पियन्स चषकात प्रशिक्षक या नात्याने गंभीरचे योगदानही अर्थातच विशेष लक्षवेधी ठरले. मुळात श्रीलंकेविरुद्ध वन डे मालिकेत 0-2 फरकाने पराभव, न्यूझीलंडविरुद्ध आणि त्यानंतर बोर्डर-गावसकर चषकात मिळालेले पराभव.. यामुळे अर्थातच वातावरण गंभीरसाठी अतिशय प्रतिकूल होते. त्यातच यंदा संघात पाच फिरकीपटू निवडल्याने या निर्णयावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले... पण, गंभीरने धीरोदात्त राहणे पसंत केले. धूळ कितीही उडाली तरी ती केव्हा तरी खाली बसतच असते, यावर त्यांचा कमालीचा विश्वास.... अन् झालेही तसेच... स्पर्धा सुरू झाली... धूळ खाली बसली आणि फिरकीपटूंचे साम्राज्यही सुरू झाले!

यशस्वी जैस्वालला संघातून बाहेर करत त्याच्याऐवजी गूढ फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संधी दिली आणि तोही एक्स फॅक्टर ठरला... न्यूझीलंडविरुद्ध साखळी सामन्यात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल आणि न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये चार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल व रवींद्र जडेजा जलद गोलंदाज शमीच्या साथीने उतरले आणि पंड्याकडे शमीचा नव्या चेंडूवरील साथीदार म्हणून जबाबदारी सोपवली गेली. त्यानेही ती सार्थपणे पार पाडली.

के.एल. राहुलच्या निवडीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. 2023 विश्वचषकातील अंतिम लढतीत संथ गतीने फलंदाजी करत भारताच्या पराभवाचे एक कारण ठरलेल्या के.एल. राहुलने येथे मात्र फलंदाजीत कात टाकली असेल, अशा थाटात प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने एकापेक्षा एक सरस उत्तुंग षटकार खेचले. शिवाय फायनलसह अनेक लढतीत नाबाद राहात गंभीरना फिनिशर म्हणून जो रोल अपेक्षित होता, तो हुबेहूब वठवला... विराट कोहली सेमीफायनलमध्ये संकटमोचक ठरला तर पाकिस्तानविरुद्ध किंगमेकर ठरला... आता इतके सारे संघ सहकारी असे जिद्दीस पेटत संघर्षमय खेळ साकारत असताना रोहित मागे राहिला असता तर तो नेता कसला? त्यानेही या स्पर्धेत बरेच तीर मारले. न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये त्याने पैलतीरी नेलेली भारताची विजयी नौका किवीज संघ आता स्वप्नातही विसरणार नाही. ज्याप्रमाणे कधी काळी शेन वॉर्नच्या स्वप्नात समोर सरसावत उत्तुंग षटकार खेचणारा सचिन यायचा, त्याचप्रमाणे आपल्या आव्हानाची कधी लक्तरे पाडून गेली, ते अद्याप न कळलेल्या न्यूझीलंडसाठी रोहित पुढील कित्येक कालावधीसाठी असाच स्वप्नात कर्दनकाळ म्हणून येत राहील... पराभवाची भळभळती जखमी आणखी ताजी करून देत जाईल!

फलंदाजी-गोलंदाजीतील कल्पक बदल, विनिंग टीमवर ढळू न दिलेला विश्वास, संयम व आक्रमणाचा उत्तम मिलाफ या सार्‍याचा परिपाक म्हणजेच यंदाचे चॅम्पियन्स चषकातील जेतेपद! गंभीर, रोहितमधील ट्युनिंग जमते आहे, ही आणखी एक आशा अपेक्षा उंचावणारी बाब... गंभीरची रणनीती यंदा खर्‍या अर्थाने मास्टरस्ट्रोक ठरली... जेतेपद मिळवून देणारा मास्टरस्ट्रोक! ब्रेव्हो गंभीर! ब्रेव्हो टीम इंडिया!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news