

2016 मध्ये आपण पायदळ पाठवले. 2019 मध्ये आपण लढाऊ विमाने वापरली. 2025 मध्ये आपण नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून क्षेपणास्त्रे डागली. पाकिस्तानला हा स्पष्ट संदेश होता. परंतु पाकिस्तानने या हल्ल्यानंतर प्रतिहल्ले करण्याची भूमिका घेतली. तथापि, भारताने हे सर्व हल्ले कुचकामी ठरवण्यात यश मिळवले आहे. अद्यापही भारत संयम बाळगून आहे; लाहोर, इस्लामाबद, रावळपिंडीमध्ये केलेले ताजे हल्ले ही फक्त झलक आहे.
सहा मे 2025 च्या मध्यरात्री भारताने केवळ पाकव्याप्त काश्मीरमध्येच नव्हे, तर पाकिस्तानातील सात शहरांमध्ये प्रिसिजन एअरस्ट्राईक केला आणि यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दिलेल्या प्रत्युत्तरादाखल ही कारवाई करण्यात आली होती. 2016 मधील सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 मधील बालाकोट हवाई हल्ले हे नियंत्रण रेषा पार करून झाले होते; परंतु यावेळी आपण त्याहून अधिक आत पाकिस्तानच्या भूभागात घुसून हल्ला केला आणि संघर्षाची पातळी थोडीशी वाढवली. 2016 मध्ये आपल्या कमांडो टीम्स तात्पुरत्या तंबूंमध्ये असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण छावण्यांवर हल्ला करण्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. हे तात्पुरते अड्डे होते, कायमस्वरूपी रचना नव्हती. 2019 मध्ये आपण बालाकोटवर हल्ला केला तिथेे दहशतवादी गटांची ठोस व मजबूत पायाभूत रचना होती. आता 2025 मध्ये आपण आणखी एक पाऊल पुढे टाकले. मुरीदके आणि बहावलपूरमधील दहशतवादी मुख्यालयांवरच थेट हल्ला केला. दुसरे असे की, 2016 मध्ये आपण पायदळ पाठवले. 2019 मध्ये आपण लढाऊ विमाने वापरली. 2025 मध्ये आपण नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून क्षेपणास्त्रे डागली. खरे पाहता हा पाकिस्तानला स्पष्ट संदेश होता. तुम्ही दहशतवादी कारवाया अशाच सुरू ठेवल्या, तर पुढच्या वेळी लाहोर किंवा रावळपिंडीमध्येसुद्धा भारत कारवाई करू शकतो; पण पाकिस्तानने आपल्या मूळ स्वभावानुसार प्रतिहल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय सैन्याने केवळ निष्प्रभच केले नाही तर रावळपिंडी, इस्लामाबाद, लाहोर, सियालकोट यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भारतीय सैन्याने धमाका घडवून आणला. लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम भारताने अचूकतेने उद्ध्वस्त केली, त्यावरून 1999 च्या कारगिल युद्धातील भारत आणि आजचा भारत यामधील अंतर पाकिस्तानच्या लक्षात आले असावे.
1971 नंतर प्रथमच आपण नियंत्रण रेषा ओलांडलीच; पण आंतरराष्ट्रीय सीमाही पार केली आणि थेट पाकिस्तानमध्ये घुसून टार्गेट केले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानमध्ये विशिष्ट ठिकाणी असलेली दहशतवादी नेटवर्क्सची पायाभूत रचना आपण लक्ष्य केली होती. या अड्ड्यांविषयी भारताकडेही आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांकडेही माहिती होती. ‘इंटरनॅशनल इंटेलिजन्स फोरम’नेदेखील या तळांच्या अस्तित्वाची पुष्टी केली होती; पण पाकिस्तानच्या कारवाया वाढल्या तेव्हा भारतानेही आपल्या मर्यादांची कक्षा रुंदावली आणि तडाखेबंद प्रहार केले. सद्यस्थितीत पाकिस्तान सार्वजनिक व्यासपीठांवर मोठा गहजब करेल आणि स्वतःला हल्लापीडित म्हणून सादर करून आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल. याचे कारण त्यांचा लष्करप्रमुख असीम मुनीर याला आपल्या जनतेसमोर एक मजबूत नेता म्हणून सादर करायचं आहे. दुसरी शक्यता म्हणजे पाकिस्तान क्षेपणास्त्र हल्ले वाढवू शकतो. या माध्यमातून भारताप्रमाणेच आम्हीही कमी नाही, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न पाकिस्तानचा असू शकेल. तिसरी शक्यता म्हणजे, सध्या सुरू असलेल्या संघर्षाची पातळी पाकिस्तानकडून वाढवली जाऊ शकते.
पाकिस्तान लष्कराचा जनसंपर्क विभाग भारताच्या हल्ल्यांमध्ये महिला व मुलांचा मृत्यू झाल्याचा प्रचार करत आहे. तसेच जाणीवपूर्वक मशिदींवर हल्ले झाले आहेत असा कांगावा करत आहे. यामागे जगभरातील मुस्लिमांमध्ये रोष निर्माण करण्याचा उद्देश स्पष्ट आहे. जागतिक पटलावर भारत इस्लामी रचनांवर हल्ला करत असल्याचा अपप्रचार करून भारताची प्रतिमा डागाळण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे; पण त्यामध्ये त्यांना यश येणार नाही.
सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या कारवाईनंतर पाकिस्तानी लष्कराने भारतातील सर्वसामान्य नागरीक किंवा सीमाभागातील लोकवस्तीवर हल्ले करण्याचा प्रयत्न का केला? याचे कारण, भारतात दहशतवादी तळ नाहीत. त्यामुळे पाकिस्तान लष्करी तळांवर किंवा देशातील महत्त्वाच्या केंद्रांवर लक्ष्य साधण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप तरी पाकिस्तानचा एकही हल्ला यशस्वी झालेला नाही; पण जर त्यांनी भारतीय लष्करी तळांवर हल्ला केला, तर आपल्याला त्यांच्या लष्करावर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार असणार आहे. येणार्या काळातील दोन्ही देशांत सुरू असलेला संघर्ष वाढणार की तणावग्रस्त स्थिती कायम राहणार, हे पाकिस्तानच्या कृतीवर अवलंबून असेल. एक गोष्ट निश्चित आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतरच्या कारवायांनी पाकिस्तान आतून-बाहेरून भेदरला आहे; पण ही केवळ झलक आहे. पिक्चर अभी बाकी हैं..!
(अनुवाद : प्रियांका जोशी)