India and Canada relation | नव्या पर्वाची पायाभरणी

India and Canada relation
India and Canada relation | नव्या पर्वाची पायाभरणी
Published on
Updated on

प्रा. विजया पंडित

भारताने गेल्या काही महिन्यांमध्ये विविध देशांबरोबरच्या संबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि खास करून व्यापार करार करण्यासंदर्भात आघाडी घेतली आहे. याच शृंखलेचा एक भाग म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांचा नुकताच पार पडलेला कॅनडा दौरा.

भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांना मोठी पार्श्वभूमी असली, तरी जस्टिन ट्रुडो यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. भारतासारख्या जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणार्‍या देशावर बेछूट आरोप करणार्‍या ट्रुडोंमुळे कमालीच्या ताणल्या गेलेल्या संबंधांना त्यांच्या पश्चात कूटनीतीच्या पातळीवर नवी दिशा मिळताना दिसत आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांनी नुकताच केलेला कॅनडा दौरा हा दोन्ही देशांतील ‘डेडलॉक’ तोडण्याच्या दिशेने टाकलेले एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरला आहे. डोव्हाल आणि कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नताली ड्रोइन यांच्यात ओटावा येथे झालेली ही प्रदीर्घ चर्चा द्विपक्षीय संबंधांच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

तीन वर्षांपूर्वी 2023 मध्ये खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर ट्रूडो यांनी भारतावर केलेले आरोप ‘हास्यास्पद’ ठरवत भारताने फेटाळले होते; मात्र त्यानंतर दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध ऐतिहासिक तळाला पोहोचले होते. कॅनडात फोफावलेली खलिस्तानी चळवळ आणि तिथल्या राजकारणात त्यांना मिळणारे कथित पाठबळ हा भारतासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. निज्जर प्रकरणावरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला होता की, दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदूतांना मायदेशी धाडले होते. या पार्श्वभूमीवर अजित डोव्हाल यांचा ओटावा दौरा ‘बॅकचॅनेल’ डिप्लोमसीचा उत्तम नमुना मानला जात आहे. या बैठकीत राजकीय चर्चेबरोबरच सुरक्षा आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. दोन्ही देशांनी आता ‘सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी संपर्क अधिकारी’ (लिअँझन ऑफिसर्स) नियुक्त करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारण, यामुळे अमली पदार्थांची तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क आणि प्रामुख्याने सीमापार दहशतवादाबद्दलची माहिती रिअल टाईममध्ये शेअर करणे शक्य होईल. खलिस्तानी नेटवर्कच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारताला आता कॅनडाच्या यंत्रणांकडून अधिक ठोस सहकार्य मिळण्याची शक्यता या दौर्‍यामुळे निर्माण झाली आहे.

कॅनडातील सत्तासमीकरणांत होत असलेले बदलही या बैठकीच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी हे पुढील महिन्यात भारत दौर्‍यावर येण्याची शक्यता आहे. या दौर्‍याची पायाभरणी करण्यासाठीच डोव्हाल यांनी ओटावा दौरा केल्याचे सांगितले जात आहे. ट्रूडो यांच्या काळातील कट्टर भूमिकेला बगल देत कार्नी प्रशासन भारताशी पुन्हा आर्थिक आणि व्यापारी संबंध सुधारण्यास उत्सुक असल्याचे दिसते. व्यापाराच्या मोठ्या कराराआधी सुरक्षेच्या आघाडीवर दोन्ही देशांनी करार पूर्ण करणे, हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मोठा विजय मानला जात आहे. भारताने युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत नुकतेच केलेले व्यापार करार पाहता कॅनडाही आता भारताच्या ‘टेंप्लेट’नुसार मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी जलद गतीने पूर्ण करण्यास उत्सुक आहे. सुमारे 18 लाख भारतीय वंशाच्या लोकांचा ‘लिव्हिंग ब्रिज’ हा दोन्ही देशांतील सांस्कृतिक आणि आर्थिक नात्याचा कणा असून, कार्नी यांच्या माध्यमातून या पुलाला पुन्हा एकदा राजकीय बळकटी मिळणार आहे.

कॅनडा हा भारतासाठी आर्थिक, व्यापारी आणि धोरणात्मक अशा तिन्ही स्तरांवर महत्त्वाचा आहे. हा देश जगातील मोठा युरेनियम पुरवठादार आहे. भारताच्या अणुऊर्जा प्रकल्पांसाठी कॅनडाकडून होणारा युरेनियमचा पुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच, नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलासाठीही दोन्ही देशांत महत्त्वाचे करार होणार आहेत. भारत आपल्या डाळींच्या गरजेसाठी मोठ्या प्रमाणावर कॅनडावर अवलंबून आहे. 2024-25 या वर्षात कॅनडाकडून झालेल्या आयातीत डाळींचा वाटा एक अब्ज डॉलर्सहून अधिक होता. याव्यतिरिक्त पिकांसाठी आवश्यक असलेले पोटॅश खत मोठ्या प्रमाणात कॅनडाकडून येते. दुसरीकडे कॅनडातील पेन्शन फंडांनी भारताच्या पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट आणि रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात 75 अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. भारताला 2026-30 दरम्यान आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेण्यासाठी कॅनडाच्या या भांडवलाची मोठी गरज आहे.

भारत आणि कॅनडा यांच्यातील एकूण वस्तू आणि सेवांचा व्यापार सुमारे 12 ते 15 अब्ज डॉलर्सच्या आसपास स्थिरावला आहे. भारतासाठी कॅनडा हा दहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून, व्यापाराचे पारडे भारताच्या बाजूने झुकलेले दिसते. नोव्हेंबर 2025 च्या एका महिन्यात भारताने कॅनडाला 38.5 कोटी डॉलर्सची निर्यात केली, तर 32.7 कोटी डॉलर्सची आयात केली. यामुळे 5.7 कोटी डॉलर्सचे व्यापार अधिक्य भारताच्या वाट्याला आले. भारताकडून कॅनडाला प्रामुख्याने औषधे, लोखंड व पोलाद उत्पादने, हिरे-मोती, दागिने आणि सागरी उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. विशेषतः औषध निर्माण क्षेत्रात भारताने आपली पकड घट्ट केली असून, नोव्हेंबर 2025 मध्ये या क्षेत्रात 37 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली.

भारतातून शिक्षणासाठी कॅनडाला जाणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. कॅनडातील एकूण परदेशी विद्यार्थ्यांपैकी सुमारे 40टक्के विद्यार्थी भारतीय आहेत. हे विद्यार्थी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी अब्जावधी डॉलर्सचे योगदान देतात. दुसरीकडे कॅनडातील भारतीय दरवर्षी भारतात मोठ्या प्रमाणावर परकीय चलन पाठवतात आणि ते भारताच्या विदेशी गंगाजळीसाठी आधार ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news