

इंडिया कॉलिंग, डॉ. सुकृत खांडेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाची देशभर घोडदौड चालू आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारने नुकतीच बारा वर्षे पूर्ण केली. नरेंद्र मोदींनी सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम करून पंडित नेहरूंनाही मागे सारले आणि दुसरीकडे भाजप विरोधकांची इंडिया नामक आघाडीची फरफट बघायला मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम व पुद्दुचेरी या पाच राज्यांतील निवडणुकीनंतर देशातील विरोधी पक्षांचे धाबे दणाणले आहे. विधानसभा निवडणुकांमधे भाजपची विजयी मालिका चालूच आहे. विरोधी पक्षांना असलेली सत्ता गमवावी लागते आहे आणि सर्वात गंभीर म्हणजे विरोधी पक्षातील आमदार-खासदारांचीही भाजपाच्या दिशेने रिघ लागली आहे. अशा पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कॉन्स्टिट्युशन क्लबमधे इंडिया आघाडीची बैठक झाली. एकशे पंचेचाळीस वर्षाची परंपरा असलेल्या काँग्रेसने मन मोठे ठेवावे व प्रादेशिक पक्षांना सन्मानाने वागवावे असा या बैठकीत सूर होताच; पण सर्वांनी मिळून भाजपविरोधात एकजूट ठेवली नाही, तर आपल्याला भविष्य नाही, याचीही जाणीव इंडियातील घटक पक्षांना झाली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 'इंडिया'ची बैठक झाली होती. त्यानंतर दोन वर्षात 'इंडिया'ची बैठक बोलावावी असे कुणाला वाटले नाही. राहुल गांधींपासून ते ममता बॅनर्जींपर्यंत, एमके स्टॅलिनपासून ते अखिलेश यादव यांच्यापर्यंत सारे नेते आपापल्या राज्यात मशगूल होते. राहुल गांधी हे लोकसभेत विरोधी पक्षनेते झाले, यातच ते समाधानी राहिले. दुसरीकडे भाजपचा आलेख सतत उंचावत राहिला. जेव्हा ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांचा पराभव झाला तेव्हा 'इंडिया'तील नेत्यांना बैठकीची गरज भासू लागली. त्यापूर्वी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे- शरद पवारांना तसेच दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना सत्ता गमवावी लागली तेव्हा कुणाला 'इंडिया'ची तातडीची बैठक बोलवावी असे वाटले नव्हते. दि. ८ जून रोजी दिल्लीत झालेल्या 'इंडिया'च्या बैठकीत काँग्रेस, समाजावादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमॉक्रॅटीक पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), सीपीआय एम, सीपीआय, सीपीआय एमएल (लिबरेशन), क्रांतिकारी समाजावादी पक्ष, इंडियन युनियन मुस्लीम लीग, व्हीसीके, एमडीएमके, केरळ काँग्रेस, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष, भारत आदिवासी पक्ष, लोकदल,फॉरवर्ड ब्लॉक, शेतकरी कामगार पक्ष उपस्थित होते. उद्धव ठाकरे हे बैठकीला ऑनलाईन हजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शप) सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
लोकसभा निवडणुकीनंतर गेली दोन वर्षे इंडिया आघाडी सक्रिय नव्हती. मग, पुढील तीन वर्षे म्हणजेच २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सक्रिय राहील का? काँग्रेससह बहुतेक पक्षांचे नेते हे 'मेरी मर्जी' असे वागणारे आहेत. बहुतेक नेत्यांना अहंकार आहे. भाजपने त्या त्या राज्यात प्रादेशिक पक्षांचा बाजा वाजवला, तरी आपली शक्ती फार मोठी असल्याचा आव हे नेते आणतात किंवा तसे भासवतात. जोपर्यंत 'इंडिया'चे नेते जमिनीवर येत नाहीत तोपर्यंत जनतेची नाडी त्यांना समजणार नाही. दिल्लीतील बैठकीला तेवीस राजकीय पक्षांचे नेते होते; पण चर्चा झाली ती ममता यांच्या उपस्थितीची व स्टॅलीन यांच्या गैरहजेरीची. मोठा जनाधार असलेले नेते म्हणून त्यांची देशाला ओळख आहे; पण त्या दोन्ही नेत्यांचा व त्यांच्या पक्षांचा पराभव झाला. इथेच इंडिया आघाडीच्या पायाला धक्का लागला.
ममता बॅनर्जी यांची देशभर 'दीदी' म्हणून ओळख आहे. त्यांनी बंगालमधील कम्युनिस्टांचे सरकार उलथवले. काँग्रेसला संपवले. चाळीस वर्षे ममता या पश्चिम बंगालच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होत्या. भाजपने त्यांना सत्तेवरून हटवले. त्यांचा पराभव झालाच शिवाय त्यांच्या पक्षाचे निवडून आलेले ८० पैकी ५८ आमदार त्यांना सोडून गेले. त्यांच्या पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी त्यांचे नेतृत्व नाकारले. सत्ता असताना हेच खासदार- आमदार दीदींचा अहोरात्र जप करीत होते. दीदींची मर्जी संपादन करण्यासाठी त्यांच्या घराचे उंबरे झिझवत होते. सत्ता गेल्यावर त्यांना ममता नकोशा झाल्या. त्या एकदम त्यांना भ्रष्टाचारी, दहशतवादी वाटू लागल्या. त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना तर बंडखोरांनी खलनायक ठरवले. निवडणुकीत ४१ टक्के मते मिळविणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो असलेल्या ममता एकाकी पडल्या; पण इंडिया आघाडीच्या बैठकीला पोहोचताच सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचे मनोभावे स्वागत केले. त्यांना हा मोठा दिलासा होता. सोनिया गांधींनी तर त्यांना आलिंगन देऊन प्रेम भावना व्यक्त केली. पश्चिम बंगालमध्ये त्यांना काँग्रेसची व काँग्रेसला त्यांची गरज आहे, हेच या बैठकीत दिसून आले.
काँग्रेस पक्ष हा तामिळनाडूत द्रमुकचा कित्येक वर्षे मित्र होता. यावर्षीही काँग्रेसने द्रमुकशी युती करून विधानसभा निवडणूक लढवली; पण थलपती जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले तेव्हा काँग्रेसने द्रमुकला सोडून टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला. दुखावलेल्या स्टॅलिन यांनी काँग्रेसशी संबंध तत्काळ तोडलेच शिवाय लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून आमच्या पक्षाच्या खासदारांना विरोधी बाकांवर काँग्रेसपासून दूर ठेवा अशी विनंती केली. इंडिया आघाडीत काँग्रेस आहे तोपर्यंत आम्ही येणार नाही, अशी भूमिका द्रमुकने जाहीर केली. द्रमुक सत्तेवर होती तोपर्यंत काँग्रेस त्या पक्षाबरोबर होती; पण पराभव झाल्यावर 'गरज सरो वैद्य मरो' अशी वागणूक काँग्रेसने द्रमुकला दिली.
लोकसभेत मोदी सरकारने महिला आरक्षणाला जोडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणले. विरोधकांनी एकजुटीने या दुहेरी हेतूच्या विधेयकाला विरोध केला आणि १७ एप्रिल २०२६ रोजी ते विधेयक फेटाळले गेले. विरोधकांची एकजूट काय करू शकते, हे भाजपला कळून चुकले; पण या पराभवाचा वचपा भाजपने मे २०२६ मधील विधानसभा निवडणुकांमध्ये काढला. तृणमूल काँग्रेस व द्रमुकच्या खासदारांनी लोकसभेत त्या विधेयकाला कडाडून विरोध केला होता. त्या दोन्ही पक्षांचा पराभव झालाच व त्यांच्या राज्यात सत्ता गमवावी लागली.
गेल्या दहा वर्षांत केंद्रात व राज्यात जशी भाजपची ताकद वाढू लागली तेव्हा विरोधी पक्षांनी एकाच मंचावर एकत्र येण्याचे ठरवले. दि. २३ जून रोजी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक बोलावली. त्याला पंधरा विरोधी पक्षांचे नेते हजर होते. १७- १८ जुलै २०२३ रोजी बंगळुरू येथे दुसरी बैठक झाली त्याला २६ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. त्याच बैठकीत इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) असे नामकरण करण्यात आले. सप्टेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात नितीश कुमार यांनी इंडियाला रामराम करून एनडीएमध्ये प्रवेश केला. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबईत आणि १ जून २०२४ रोजी दिल्लीत बैठक झाली. ४ जून २०२४ रोजी केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन झाल्यापासून इंडिया आघाडी सुस्तावली होती.
नितीश कुमार यांच्यानंतर केजरीवाल व स्टॅलिनसारखे नेते 'इंडिया'ने गमावले. नवे मुख्यमंत्री थलपती विजय यांना 'इंडिया'ने निमंत्रण दिलेले नव्हते व तेही 'इंडिया'कडे फिरकले नाहीत. आता संसद अधिवेशनात नियमित समन्वय ठेवण्याचे इंडियाच्या बैठकीत ठरले आहे. कॉक्रोच जनता पार्टीला सोशल मीडियावर सव्वा दोन कोटी तरुणांचे समर्थन मिळते याचा अर्थ देशातील तरुणांचा व विद्यार्थ्यांचा विरोधी पक्षांवरील विश्वास कमी झालाय काय, हा कळीचा मुद्दा आहे. मोदी द्वेषातून एकत्र आलेली विरोधकांची आघाडी असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'इंडिया'चे एका वाक्यात वर्णन केले आहे. हेच 'इंडिया' आघाडीमागचे खरे कारण आहे.