

महेश कोळी, संगणक अभियंता
देशाची राजधानी नवी दिल्ली येथे 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी होणार्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’कडे संपूर्ण आशिया खंडाचे विशेषतः पश्चिमी प्रगत राष्ट्रांचे लक्ष लागून राहिले आहे. याचे कारण, जागतिक तंत्रज्ञानाच्या नकाशावर ‘ग्लोबल साऊथ’चे नेतृत्व सिद्ध करणारी एक महत्त्वाची घटना आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या महाकाय विश्वात भारताच्या वाढत्या प्रगतीचा उद्घोष यानिमित्ताने होणार आहे.
गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या जगाने अनेक स्थित्यंतरे पाहिली, पण ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) नावाच्या लाटेने मानवी संस्कृतीच्या पायालाच हात घातला आहे. चॅटजीपीटीच्या आगमनानंतर सुरू झालेली ही धाव आता अशा वळणावर येऊन ठेपली आहे, जिथे तंत्रज्ञान हे केवळ साधन न राहता जागतिक राजकारणाचे एक अस्त्र बनले आहे. अशा धुमसत्या वातावरणात 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित होणारी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ भारताच्या वाढत्या ताकदीची साक्ष देणारी ठरेल. ग्लोबल साऊथमध्ये होणारी ही पहिलीच जागतिक स्तरावरील परिषद असल्याने संपूर्ण जगाच्या नजरा सध्या भारताकडे लागल्या आहेत. या परिषदेत गुगलचे सुंदर पिचाई, ओपन एआयचे सॅम ऑल्टमन, एनव्हिडियाचे जेन्सन हुआंग आणि अँथ्रोपिकचे डारिओ अमोदेई यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे; परंतु ही केवळ कॉर्पोरेट जगातील मांदियाळी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेची आखणी ‘तीन सूत्रे’ आणि ‘सात चक्रे’ यांवर आधारित करण्यात आली आहे. ‘लोक’ (पीपल), ‘ग्रह’ (प्लॅनेट) आणि ‘प्रगती’ (प्रोग्रेस) ही तीन मुख्य सूत्रे असून, त्यातून शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि शाश्वत विकास यांसारख्या सात महत्त्वाच्या क्षेत्रांचा (चक्रे) ऊहापोह केला जाणार आहे.
विशेष म्हणजे, या परिषदेचा परिघ चर्चेपुरता मर्यादित नसून यामध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आराखडा मांडला जाईल. 17 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणारा ‘एआय कॉम्पेंडियम’ हा अहवाल आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील एआयच्या वापराची यशोगाथा सांगणारा असेल. ‘एआय फॉर ऑल’ आणि स्त्रियांसाठीची ‘एआय बाय हर’ यांसारखी पारितोषिके हा तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे प्रतीक ठरणार आहेत. तंत्रज्ञानाच्या जगात सध्या ‘एजीआय’ (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स) म्हणजे मानवासारखी बुद्धिमत्ता असणारे यंत्र हा एक चर्चेचा आणि भीतीचा विषय बनला आहे. सॅम ऑल्टमन यांच्यासारखे दिग्गज 1000 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची भाषा करत असताना भारताची भूमिका अधिक वास्तववादी आहे. एरिक श्मिट आणि योशुआ बेंगिओ यांच्यासारख्या संशोधकांनी स्पष्ट केल्याप्रमाणे सध्याचे एआय मॉडेल्स माहितीच्या बाबतीत प्रगत असले, तरी तर्कशक्ती आणि दीर्घकालीन स्मृतीच्या बाबतीत अद्यापही बाल्यावस्थेत आहेत. एआय हे नजीकच्या भविष्यातील वास्तव नसून एक दीर्घकालीन ध्येय आहे, हे ओळखणे गरजेचे आहे. भारताने याच ठिकाणी ऑगमेंटेड इंटेलिजन्स’चा (संवर्धित बुद्धिमत्ता) पर्याय स्वीकारला असून तो मानवी बुद्धिमत्तेला पर्याय न ठरता तिला अधिक सक्षम करेल.
‘बिग एआय’ विरुद्ध ‘स्मॉल एआय’: नवा संघर्ष
सध्याचे एआय क्षेत्र हे काही मोजक्या पाश्चात्त्य कंपन्यांच्या हातात एकवटलेले आहे. एनव्हिडियाचे चिप्स बाजारावर 90-95 टक्क्यांपर्यंत राज्य करत आहेत. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानातील सार्वभौमत्व किंवा टेक्नॉलॉजिकल सोव्हरेन्टी धोक्यात येण्याची शक्यता असते. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाचे सल्लागार पीटर नवारो यांनी ‘भारतातील एआयचा खर्च अमेरिकेने का द्यावा’ असा प्रश्न विचारणे किंवा भारताला प्रगत चिप्सच्या पुरवठ्यातून वगळणे, हे जागतिक राजकारणातील बदलत्या वार्याचे संकेत आहेत. भारताने याला प्रत्युत्तर म्हणून ‘स्मॉल एआय’ची संकल्पना मांडली आहे. प्रचंड ऊर्जा आणि अवाढव्य डेटा सेंटर्सवर अवलंबून राहण्यापेक्षा कमी संसाधनांत जास्तीत जास्त उपयोगिता कशी मिळवता येईल, यावर भारताचा भर आहे. भारताचे 1000 कोटींचे ‘इंडिया एआय मिशन’ हे जरी पाश्चात्त्य कंपन्यांच्या तुलनेत छोटे वाटत असले, तरी भारताचा ‘डेटा’ हाच भारताचा खरा कणा आहे. जगातील एकूण डेटापैकी 20 टक्के डेटा हा भारतातून निर्माण होतो. हीच भारताची खरी ताकद आहे.
आव्हाने आणि सुरक्षिततेची पायवाट
कोणत्याही मोठ्या क्रांतीसोबत धोके येतातच. योशुआ बेंगिओ यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘इंटरनॅशनल एआय सेफ्टी रिपोर्ट’मध्ये स्वायत्त यंत्रांच्या धोक्यांकडे लक्ष वेधले आहे. एआय स्वतःच्या अस्तित्वासाठी चुकीचे मार्ग अवलंबू शकते, ही भीती काल्पनिक राहिलेली नाही. भारताने आपल्या ‘पाच स्तरांच्या एआय स्टॅक’मध्ये सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. तसेच ‘युवाई’सारख्या उपक्रमांतून 13 ते 21 वयोगटातील तरुण पिढीला या तंत्रज्ञानाशी जोडताना नैतिक मूल्यांची जाणीव करून देणे, हे भविष्यातील धोके टाळण्यासाठी उचललेले पाऊल आहे.
या शिखर परिषदेदरम्यान सुमारे 100 अब्ज डॉलरपेक्षा (सुमारे 8.3 लाख कोटी रुपये) जास्त गुंतवणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः सेमीकंडक्टर, एआय डेटा सेंटर्स आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन आणि गुगल यांसारख्या कंपन्यांकडून मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली जाईल, ज्यामुळे भारताची ग्लोबल एआय हब म्हणून ओळख अधिक गडद होईल. भारत यावेळी इंडिया एआय गव्हर्नन्स गाईडलाईन्स सादर करणार आहे. यामुळे एआयच्या वापरामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुरक्षेसाठी एक जागतिक मानक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय, परिषदेच्या शेवटच्या दिवशी होणारी जीपीएआय कौन्सिल बैठक जागतिक एआय धोरणांना अंतिम आकार देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरेल. भारताचे ‘भाषिणी’ हे बहुभाषिक एआय मॉडेल आणि ’किसान ई-मित्र’ सारखे उपक्रम या परिषदेत आकर्षणाचे केंद्र असतील, जे कमी साधनसामग्री असलेल्या देशांसाठी एक यशस्वी रोडमॅप ठरू शकतात.
एकूणच, भारत मंडपममध्ये पार पडणारी शिखर परिषद भारताला केवळ एक बाजारपेठ म्हणून नाही, तर एआय विश्वाचा मार्गदर्शक म्हणून जागतिक पटलावर उभे करेल. इंटरनेटच्या ‘डॉट कॉम’ क्रांतीप्रमाणेच एआयच्या क्षेत्रातही एक फुगा (बबल) फुटण्याची भीती व्यक्त केली जात असली, तरी पायाभूत सुविधांच्या दृष्टीने भारत सज्ज आहे. डिजिटल इंडियानंतर आता ‘एआय इंडिया’च्या दिशेने होणारी ही वाटचाल भारताला खर्या अर्थाने विकसित भारत बनवण्याच्या दिशेने नेणारी असेल. ‘स्मॉल एआय’च्या माध्यमातून सामान्यांचे जीवन सुसह्य करणे, हाच भारताचा मूळ उद्देश असून तोच या परिषदेचा गाभा आहे.