Navi Mumbai International Airport | विमान वाहतुकीला नवे पंख

Navi Mumbai International Airport
Navi Mumbai International Airport | विमान वाहतुकीला नवे पंख
Published on
Updated on

कॅप्टन नीलेश गायकवाड

भारतातील दळणवळणाच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीच्या वाटचालीत दि. 8 ऑक्टोबर 2025 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण, या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. सुमारे 19,650 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेले हे विमानतळ केवळ एक पायाभूत प्रकल्प नसून भारताच्या वाढत्या उड्डाणशक्तीचे आणि आर्थिक आकांक्षांचे प्रतीक आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवसेंदिवस वाढत असलेला प्रवासी व मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी दुसर्‍या विमानतळाची गरज अनेक वर्षांपासून भासत होती. देशातील सर्वाधिक व्यग्र विमानतळ असलेल्या मुंबईत नवीन स्लॉटस् मिळविणे अवघड झाले होते. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण नियोजनात अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ मुंबईसाठीच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि देशाच्या व्यापारजगतासाठी दिलासा ठरणार आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन एका टर्मिनलसह 3,700 मीटर लांबीच्या ‘कोड एफ’ धावपट्टीवर वार्षिक 20 दशलक्ष प्रवाशांची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. हा टप्पा डिसेंबर 2025 पासून कार्यान्वित होईल, तर 2036 पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या विमानतळाची क्षमता 90 दशलक्ष प्रवाशांपर्यंत वाढेल. 1,160 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या ग्रीन फिल्ड विमानतळाचा विकास अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीत करण्यात आला आहे.

या विमानतळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम. प्रवाशांसाठी ‘डिजी यात्रा’ सक्षम प्रवेशव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवासी प्रवाह नियंत्रण, ‘हँडस्फ्री’ बॅगेज ट्रॅकिंग, मुलांसाठी खेळ झोन आणि मुंबई-महाराष्ट्राच्या कथा सांगणारे डिजिटल टनेल्स अशा अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. 80 खोल्यांचे ट्रांझिट हॉटेल, 500 प्रवाशांसाठी सीआयपी लाऊंज, तसेच 110 हून अधिक रिटेल व खाद्यपदार्थ केंद्रे या विमानतळाला जागतिक दर्जाचा अनुभव देतात. सतत टिकाऊ विकासावर भर देत या विमानतळात 47 मेगावॅट सौरऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच कमी पाणी वापर करणार्‍या उपकरणांचा वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, ईव्ही बस व वाहनांचा वापर आणि रनवे बांधकामासाठी रॉकफिल पद्धतीचा वापर करून पर्यावरणीय संतुलन राखले गेले आहे.

उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये नावाची घोषणा झाली नसली, तरी पंतप्रधानांनी लोकनेते दि. बा. पाटील यांचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याबाबत चर्चा केली असून, पंतप्रधानांनी या नामकरण प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे काही तांत्रिक प्रक्रिया सुरू आहेत आणि त्या पूर्ण झाल्यावर अधिकृत घोषणा होईल.

आधुनिक काळात विमान प्रवासाला बहर आला आहे. दळणवळणाच्या क्षेत्रात विमानसेवा ही अत्यंत महत्त्वाची ठरत आली आहे. 2024 मध्ये भारतात देशांतर्गत विमान प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या सुमारे 16.1 कोटींवर पोहोचल्याचे आकडेवारी सांगते. 2023 पेक्षा ही वाढ उल्लेखनीय आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एकट्या मुंबई विमानतळावर 52.8 दशलक्ष प्रवाशांची नोंद झाली होती. 2024 मध्ये ती 6.3 टक्क्यांनी वाढून 54.8 दशलक्ष झाली. आजच्या काळात विमानतळ म्हणजे केवळ उड्डाणांसाठीची भूमी राहिलेली नसून आर्थिक साखळीतील सर्वाधिक प्रभावी घटक बनले आहेत. मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर देशातील लॉजिस्टिकबाबत किंवा दळणवळणाच्या सोयीसुविधांबाबत जे भगीरथ काम केले आहे, त्यामध्ये अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या विमानतळांचाही सहभाग आहे. नवी मुंबई विमानतळामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर नवा आर्थिक पट उलगडणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांना आता जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी जवळचा आणि अत्याधुनिक हवाई मार्ग मिळणार आहे. विशेषतः पुणे आणि परिसरातील उद्योग विशेषतः ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्मिती आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रांना मोठा फायदा होईल. कारण, या विमानतळात 3.2 दशलक्ष टन क्षमतेचा कार्गो टर्मिनल विकसित होणार आहे. त्यामुळे निर्यातीचा खर्च कमी होईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात महाराष्ट्राची औद्योगिक उत्पादने अधिक स्पर्धात्मक बनतील. तसेच मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात ‘अटल सेतू’मुळे पुणे आणि नवी मुंबई यांतील अंतर केवळ अडीच ते तीन तासांवर आले आहे. यामुळे प्रवासी व मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होतील. परिणामी, पुणे-मुंबईदरम्यान नवा औद्योगिक कॉरिडॉर विकसित होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या विमानतळामुळे थेट 25 हजार लोकांना आणि अप्रत्यक्षरीत्या 60 हजारांहून अधिकांना रोजगार निर्माण होईल. 2036 पर्यंत या संख्येत वाढ होऊन एक लाखांहून अधिक लोकांना रोजगाराची संधी मिळेल. या विमानतळाभोवती लॉजिस्टिक पार्क, हॉटेल्स, ट्रान्स्पोर्ट हब्ज, औद्योगिक युनिटस् आणि सेवा क्षेत्राचे केंद्र निर्माण होणार आहे. हे सर्व मिळून मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक गतीला प्रचंड वेग देणार आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या मते, विमान वाहतूक क्षेत्र भारताच्या अर्थव्यवस्थेत 53.6 अब्ज अमेरिकन डॉलर इतका वाटा उचलते आणि 7.7 दशलक्ष रोजगार पुरवते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे हा वाटा आणखी वाढेल, तसेच मुंबई प्रदेशातील क्षमतेवरील ताण कमी होईल. या विमानतळामुळे देशांतर्गत उड्डाणांना अधिक वेळापत्रक मिळेल, मालवाहतूक द्रुतगतीने होईल आणि भारताचा विमानतळ व्यवस्थापनाचा दर्जा जगातील सर्वोच्च स्तरावर पोहोचेल.

मुंबई, ठाणे, भिवंडी, जेएनपीटी बंदर आणि तळोजा औद्योगिक परिसर या सर्व ठिकाणांच्या जवळ असलेले हे विमानतळ ‘मल्टिमोडल लॉजिस्टिक हब’ म्हणून विकसित होत आहे. विमानतळापासून फक्त 14 किलोमीटरवर जेएनपीटी असल्याने समुद्र मार्ग व हवाई मार्ग या दोन्ही वाहतुकींचे समन्वय सुलभ होणार आहे. ही सुविधा महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीत अधिक सशक्त स्थान देईल.

भारताचे राष्ट्रीय पुष्प असणार्‍या ‘कमळ’ या प्रतीकावर आधारित वास्तुरचना, नैसर्गिक वायुप्रवाहासाठी डिझाईन केलेले छत आणि प्रकाशाचा कार्यक्षम वापर या सर्व घटकांमुळे हे विमानतळ ‘ग्रीन आर्किटेक्चर’चे अत्युत्तम उदाहरण ठरत आहे. टिकाऊ विकासाच्या जागतिक उद्दिष्टांशी सुसंगत राहून भारताने पर्यावरणस्नेही पायाभूत सुविधा निर्माण करण्याची दिशा या प्रकल्पातून दाखवली आहे. एकूणच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ विमान वाहतूक क्षेत्रात नव्हे, तर औद्योगिक, पर्यटन, व्यापार आणि रोजगाराच्या क्षेत्रातही नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news