

कावेरी गिरी
वर्तमानपत्रांची पाने उघडली की, हल्ली रक्ताचे सडे आणि क्रूरतेच्या अशा कहाण्या समोर येतात, ज्या वाचून मन सुन्न होतं आणि मेंदू बधिर होतो. ज्या प्रेमाला आपण जगातील सर्वात सुंदर, अथांग आणि पवित्र भावना मानतो, त्याच प्रेमाच्या नावाखाली आज रक्ताचे पाट वाहिले जात आहेत. कुठे प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले जातात, कुठे होणाऱ्या पतीला दरीतून ढकलून दिलं जातं, तर कुठे संसार सुखाचा करण्यासाठी नव्हे, तर नवऱ्याचा काटा काढण्यासाठी थेट सुपारी दिली जाते.
हे जे काही आपल्या अवतीभवती घडतंय, ते खरंच 'प्रेम' आहे का? की प्रेमाचा मुखवटा घालून वावरणारी एखादी हिंस्र, विकृत आणि आदिम मानवी प्रवृत्ती आहे, हा प्रश्न आता केवळ सोशल मीडियावरील चर्चेचा किंवा चार भिंतींआडच्या चिंतनाचा विषय राहिलेला नाही. हा आपल्या ढासळत चाललेल्या सामाजिक मानसिकतेचा एक अत्यंत गंभीर आणि भयावह इशारा आहे.
काही काळापूर्वी दिल्लीत घडलेल्या हत्येचा आपल्याला विसर पडलेला नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून अशाच थरकाप उडवणाऱ्या घटना समोर येत आहेत. नुकतंच समोर आलेलं सिया गोयल प्रकरण असेल किंवा मेघालयाचे चर्चित हनीमून मर्डर केस... या घटना केवळ गुन्हेगारीच्या कथा नाहीत, तर त्या मानवी संवेदना संपत चालल्याची लक्षणं आहेत. या घटना पाहिल्या की असा प्रश्न पडतो की, एखादी व्यक्ती इतकी अमानुष कशी वागू शकते?
अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली, जिथे एका महिलेने आपल्याच पतीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह घराच्या कोपऱ्यात एका निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून, त्यावर सिमेंटचा थर देऊन पुरून टाकला. कित्येक दिवस ती महिला त्याच घरात, त्याच ड्रमच्या शेजारी अत्यंत सामान्य आयुष्य जगत होती. नुकतीच घडलेली घटना म्हणजे टॉयलेट क्लिनर मर्डर केस, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून भरबाजारात पतीनं पत्नीची पारळीचे सपासप वार करून हत्या केली. कारणे काहीही असली, तरी माणसाचा जीव घेण्याइतपत क्रूर मानसिकता तयार होणे, हे अत्यंत भयावह चित्र आहे. जोडीदाराला मारणं हा विचारच मुळात अस्वस्थ करणारा आहे.
नकार पचवण्याची असमर्थता आणि 'इगो'चा खेळ
या सर्व भीषण घटनांचा बारकाईने अभ्यास केला, तर त्यामध्ये एक समान आणि अत्यंत ठळक धागा सापडतो, तो म्हणजे 'नाकारले जाणे' (Rejection), न पचवता येणे. 'तू फक्त माझीच आहेस/माझाच आहेस, जर माझी होऊ शकली नाहीस, तर मी तुला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही,' किंवा 'माझ्या मर्जीविरुद्ध तू नातं कसं तोडू शकतेस/शकतोस?' हा जो अहंकार (Ego) आहे, तोच या सगळ्या हिंसेचं मूळ कारण आहे.
आजच्या पिढीमध्ये 'नाही' ऐकण्याची क्षमता कमालीची कमी झाली आहे. लहानपणापासून हट्ट पुरवले गेल्यामुळे किंवा प्रत्येक गोष्ट सहज मिळत गेल्यामुळे जेव्हा नात्यामध्ये एखादा नकार मिळतो, तेव्हा व्यक्तीचा ताबा सुटतो. आपल्या इच्छेप्रमाणे समोरची व्यक्ती वागत नाही, ती नात्यातून बाहेर पडू इच्छिते किंवा तिने लग्नाला नकार दिला की, त्या नकाराचा बदला थेट तिचा जीव घेऊन घेतला जातो. हे प्रेम नाही, हा मालकी हक्क गाजवण्याचा हिंसेचा मार्ग आहे. तसेच घरच्या मंडळींनी लग्न ठरवल्यानंतर अमूक तिच्याशी वा त्याच्याशी मला लग्न करायचे नाही, हे उघडपणे/स्पष्टपणे न बोलणे, हा एक महत्त्वाचा मुद्दा. हिंसकतेकडे झुकण्यापेक्षा आधीच आपल्या मनातील गोष्टी घरात, होणाऱ्या जोडीदाराला स्पष्ट सांगणे अत्यावश्यक आहे, ज्यामुळे असे गुन्हे घडणार नाहीत.
पश्चातापाचा लवलेश नसलेले 'सायकोपाथ्स'
या सगळ्या घटनांमध्ये अधिक भयावह आणि चिंताजनक बाब कोणती असेल, तर ती म्हणजे गुन्ह्यानंतर या आरोपींचे असणारे चेहऱ्यावरील भाव. जेव्हा पोलीस या आरोपींना पकडतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती असते, ना केलेल्या कृत्याचा पश्चाताप. जणू काही त्यांनी एखादी अत्यंत साधी, रोजच्या जगण्यातली गोष्ट केली आहे, अशा भावशून्य आणि थंड नजरेने ते कॅमेऱ्यासमोर किंवा पोलिसांसमोर उभे राहतात.
मनोविश्लेषकांच्या मते, ही 'सायकोपॅथी' (Psychopathy) किंवा समाजकंटक व्यक्तिमत्त्वाची लक्षणे आहेत. जिथे माणसाला समोरच्याच्या वेदनेची, रक्ताची किंवा मृत्यूची काहीच किंमत वाटत नाही. स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा राग आणि स्वतःचा अहंकार शांत करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. जेव्हा प्रेम हे भावना न राहता एक 'ऑब्सेशन' (वेड) बनतं, तेव्हा अशा क्रूर घटना जन्माला येतात, असं म्हटलं जातं.
डिजिटल जगाचा आभासी प्रभाव आणि सुटत चाललेला संयम
आज आपण ज्या डिजिटल युगात जगत आहोत, तिथे सगळं काही 'इन्स्टंट' हवं असतं. रील आणि शॉर्टस्च्या जमान्यात माणसाचा संयम संपला आहे. थ्रिलर वेब सीरिज, गुन्हेगारीवर आधारित सिनेमे आणि सोशल मीडियावरील आभासी जग यामुळे हिंसेचं उदात्तीकरण होतंय की काय, अशी भीती वाटते. गुन्ह्यांचे नवनवीन मार्ग शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातोय. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, पुरावे कसे नष्ट करायचे, याचे धडे तरुण पिढी इंटरनेटवरून घेते आहे, ही देशाच्या भविष्यासाठी अत्यंत घातक घंटा आहे.
प्रेम हे मुळात स्वातंत्र्य देणारे असते, बंधन घालणारे नाही. प्रेमात समजूतदारपणा, आदर आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करणे अपेक्षित असते; पण आजकालच्या बहुतांश नात्यांमध्ये 'प्रेम' कमी आणि 'हक्क' गाजवण्याची वृत्ती जास्त दिसते. 'मी म्हणेन तसेच झाले पाहिजे' हा अट्टाहास जेव्हा नात्यात येतो, तेव्हा ते नातं सुखाचं उरत नाही, तर ते एका तुरुंगासारखं बनतं.
नकार स्वीकारायला शिकवणं ही काळाची गरज
या वाढत्या गुन्हेगारीला आणि विकृतीला आळा घालायचा असेल, तर केवळ कायद्याचा बडगा पुरेसा नाही. कारण, कडक कायदे असूनही या घटना थांबलेल्या नाहीत. आपल्याला आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक रचनेत बदल करावा लागेल.
घराघरांमध्ये संवाद हवा : पालकांनी आपल्या मुलांना केवळ यश पचवायला शिकवू नये, तर अपयश आणि नकार कसा स्वीकारायचा, हेही शिकवायला हवे. मुलांना लहानपणापासूनच 'नाही' हा शब्द ऐकण्याची आणि तो पचवण्याची सवय लावली पाहिजे.
भावनांचे व्यवस्थापन (Emotional Management) : रागावर नियंत्रण कसे ठेवायचे, नैराश्य आले, तर कोणाशी बोलायचे, याबद्दल शाळा, महाविद्यालये आणि घरांमध्ये मोकळी चर्चा व्हायला हवी.
मानसिक आरोग्याकडे लक्ष : कुटुंबातील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती अतिशय हिंसक वर्तन करत असेल, संशयी असेल किंवा अवाजवी मालकी हक्क गाजवत असेल, तर वेळीच मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. अशा लक्षणांकडे 'त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे' म्हणून दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते.
प्रेमाच्या नावाने चाललेला हा रक्ताचा खेळ आता थांबायला हवा. सिया गोयल असो, सोनम असो की, तो निळ्या ड्रममधील मृतदेह... या घटना केवळ बातम्या नाहीत, तर त्या आपल्या समाजाच्या विस्कळीत होत चाललेल्या मानसिक स्वास्थ्याचे आरसे आहेत.
प्रेम हे जीवन देणारं असतं, जीवन घेणारं नाही. एखाद्या नात्यात भीती, संशय, धाक आणि हिंसा असेल, तर डोळे मिटून त्याला 'प्रेम' समजण्याची चूक करू नका. नाकारलं जाणं किंवा एखादं नातं अपयशी ठरणं म्हणजे आयुष्य संपणं नव्हे. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला 'फुलस्टॉप' नसतो, काही ठिकाणी 'कॉमा' देऊन पुढे जायचं असतं, हे ज्या दिवशी आजची पिढी समजून घेईल, त्याच दिवशी खऱ्याअर्थाने 'प्रेमाच्या नावानं...' चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल. अन्यथा, रोज सकाळी वर्तमानपत्राची पाने रक्ताने माखलेलीच राहतील आणि आपण फक्त 'मन सुन्न झालं' म्हणून पुढे निघून जाऊ.