

भारतातील आयटी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा स्तंभ मानला जातो. देशाच्या निर्यातीत, रोजगार निर्मितीत आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये या क्षेत्राचा मोठा वाटा आहे; परंतु सध्याच्या जागतिक परिस्थितीत विशेषतः काही देशांमधील युद्धामुळे जागतिक आर्थिक आणि तंत्रज्ञान धोरणांवर परिणाम होत आहे, ज्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम भारतीय आयटी क्षेत्रावर होत आहे.
सध्याच्या काळात युरोप आणि मध्यपूर्वेसारख्या भागांमध्ये सुरू असलेले युद्ध जागतिक आर्थिक संतुलन बिघडवत आहे. तेल व इंधनाच्या किमतीत वाढ, पुरवठा साखळीतील बिघाड, जागतिक आर्थिक मंदीची भीती आणि सुरक्षिततेची चिंता या घटकांमुळे जागतिक कंपन्या त्यांचे तांत्रिक प्रकल्प पुन्हा विचारात घेत आहेत. अशा स्थितीत भारतासारख्या देशांवर ज्यांचे आयटी उद्योग मुख्यत्वे निर्यातीवर अवलंबून आहेत, त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होऊ शकतो.
आयटी व्यवसायावर परिणाम
भारतातील अनेक आयटी कंपन्या जसे की, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज यांचे मुख्य ग्राहक अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातील आहेत. युद्धामुळे या देशांमध्ये आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत : करार रद्द किंवा विलंब होणे - काही मोठ्या प्रकल्पांचे करार रद्द होऊ शकतात किंवा प्रकल्पांची सुरुवात विलंबित होऊ शकते.
नवीन गुंतवणूक कमी होणे - युद्धामुळे आर्थिक धोका वाढतो. त्यामुळे विदेशी कंपन्या भारतात नव्या तंत्रज्ञान प्रकल्पासाठी गुंतवणूक कमी करू शकतात.
डॉलरच्या चलनातील अनिश्चितता - युद्धामुळे डॉलरची किंमत अनिश्चित होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम भारतीय आयटी निर्यातीत महसुलावर होतो. रोजगारावर परिणाम - भारतातील आयटी क्षेत्र हजारो युवकांना रोजगार देते; परंतु युद्धामुळे काही अपवादात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकतात:
स्थायी रोजगाराची धोक्यात येणे - प्रोजेक्ट रद्द किंवा विलंब झाल्यामुळे नवीन भरती कमी होऊ शकते.
कंत्राटी कामगारांवर दबाव - युद्धामुळे कंपन्यांना खर्च कमी करण्यासाठी कंत्राटी कामगारांचे नोकरीत बदल किंवा कमी पगाराचे प्रस्ताव करावे लागू शकतात.
विदेशातले आयटी नोकरीची संधी कमी होणे - युद्धामुळे परदेशातील कंपन्या भारतीय तज्ज्ञांना दूरस्थ नोकरीवर घेण्यात सावधगिरी बाळगू शकतात.
युवकांच्या आयटी करिअरवर परिणाम
भारतातील युवकांचे आयटी करिअर या संकटाचा थेट परिणाम घेऊ शकतात. विशेषतः जे विद्यार्थी नवीन कौशल्ये शिकत आहेत किंवा नवीन नोकऱ्या शोधत आहेत, त्यांना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
करिअरमध्ये अनिश्चितता - प्रोजेक्ट कमी झाल्यामुळे नोकरी मिळवणे कठीण होऊ शकते.
कौशल्यांची मागणी बदलणे - काही तंत्रज्ञान जसे की, क्लाऊड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचे मागणी वाढू शकते, तर पारंपरिक कौशल्यांची मागणी कमी होऊ शकते.
ग्लोबल एक्स्पोजर कमी होणे - परदेशातील कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी कमी होऊ शकते, ज्याचा थेट प्रभाव करिअर प्रगतीवर पडतो.
संधी आणि उपाय
युद्धामुळे संकट निर्माण होते, तरी भारतीय आयटी क्षेत्रासाठी काही संधीदेखील आहेत.
स्थानिक व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे - जागतिक बाजारपेठेत असलेल्या अनिश्चिततेमुळे भारतीय कंपन्या देशांतर्गत डिजिटल प्रकल्पांवर अधिक लक्ष देऊ शकतात.
नवीन तंत्रज्ञान अवलंबणे - आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी अशा क्षेत्रांत कौशल्ये मिळवणे युवकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
दूरस्थ नोकरीची संधी - जगभरातील कंपन्यांकडून दूरस्थ काम करण्याच्या संधी मिळू शकतात, जिथे भारत हे तांत्रिक कौशल्यांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे.
भारतीय आयटी क्षेत्राने सध्याच्या जागतिक परिस्थितीत स्थिर व शांत भौगोलिक बाजारपेठांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जपान, तैवान आणि कोरिया यांसारख्या पूर्वेकडील देशांमध्ये तंत्रज्ञानाची मोठी मागणी असून दीर्घकालीन भागीदारीची संधी आहे. ‘लूक ईस्ट’ धोरण स्वीकारून भारतीय कंपन्यांनी या देशांमध्ये सेवा, संशोधन व नवोन्मेष क्षेत्रात विस्तार करावा. त्यामुळे निर्यात वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि भारतीय आयटी उद्योग अधिक मजबूत व स्पर्धात्मक बनेल.
जपान, तैवान आणि कोरिया या देशांमध्ये व्यवसाय व नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी भारतीय आयटी व्यावसायिकांनी काही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. प्रथम जपानी किंवा कोरियन भाषेचे मूलभूत ज्ञान मिळवणे फायदेशीर ठरते. स्थानिक व्यावसायिक संस्कृती, वेळेचे पालन आणि गुणवत्तेवर असलेला भर समजून घेणे महत्त्वाचे आहे. कंपन्यांनी स्थानिक भागीदारांसोबत संयुक्त प्रकल्प, तंत्रज्ञान सहयोग आणि स्टार्टअप भागीदारी वाढवावी. सरकारी व उद्योग संघटनांच्या व्यापार प्रतिनिधी मंडळांचा उपयोग करावा. तसेच क्लाऊड, एआय, सायबर सुरक्षा आणि सेमीकंडक्टरसारख्या क्षेत्रांमध्ये कौशल्य वाढवल्यास या बाजारपेठांमध्ये व्यवसाय आणि नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.
ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (जिसीसी)
या अनिश्चिततेच्या काळात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (जिसीसी) ही एक मोठी संधी आहे. पुणे हे सध्या देशातील जीसीसीसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण ठरत आहे. बँकिंग, फायनान्स, ऑटोमोटिव्ह आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हे ‘कॅप्टिव्ह तंत्रज्ञान केंद्र’ म्हणून उदयास येत आहे. मुंबई-पुण्यासोबतच आता नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्येही जीसीसी क्लस्टर्स विकसित केले जाणार आहेत. जागतिक कंपन्यांच्या विविध कार्यांसाठी (उदा. तांत्रिक, वित्तीय, उत्पादन, ग्राहक सेवा) स्थापित केलेली केंद्रे म्हणजे जीसीसी. या केंद्रांमधून कंपन्यांना जागतिक स्तरावर कार्यक्षमतेने कामकाज करता येते आणि नवीन संधी मिळवता येतात.
ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्समध्ये जागतिक स्तरावर करिअरची संधी उपलब्ध आहे. ही केंद्रे जागतिक कंपन्यांसाठी एक महत्त्वपूर्ण भाग बनत आहेत, ज्यामुळे नवीन नोकऱ्या आणि वाढत्या संधी निर्माण होत आहेत. फक्त महाराष्ट्रातच 900 हून अधिक अशी केंद्रे विकसित झाली आहेत. ही भारतात राहून जागतिक करिअर घडवण्याची एक उत्कृष्ट संधी आहे. तुम्ही योग्य कौशल्ये (उदा. परदेशी भाषा, संवाद इत्यादी कौशल्ये) विकसित केल्यास आणि योग्य नेटवर्किंग केल्यास ॠउउ मधून विदेशात काम करण्याची दारं उघडू शकतात. बहुतेक ॠउउ मध्ये ग्लोबल टीम्ससोबत संवाद व समन्वय असतो. त्यामुळे वेगवेगळ्या देशांतील कामाच्या पद्धती, संस्कृती आणि लीडरशिप स्टाईल समजतात, जे आंतरराष्ट्रीय करिअरसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
भारतीय आयटी क्षेत्र हे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. युद्धाचे परिणाम असले, तरी योग्य तयारी आणि धोरणात्मक निर्णयांनी हा उद्योग अधिक सुदृढ होऊ शकतो आणि युवकांसाठी उज्ज्वल करिअरची संधी निर्माण होऊ शकते.